आयुष्य जगताना... शोध स्वत:च्या इकिगाईचा १० ते १२ लेख

 आयुष्य जगताना... शोध स्वत:च्या इकिगाईचा 




आपण जन्माला येतो तेव्हा आपल्या जन्माचा उद्देश आपल्याला माहित नसतो. पण जसे जसे आपण मोठे होतो आपण आयुष्याच्या यशा अपयशाच्या पायऱ्या चढत असतो. आता आपल्या इकिगाईची भेट आपल्याला होत असेलही पण आपल्याला धावायचे असते. आयुष्याचे गणित पक्के असते. शिक्षण, नौकरी, पैसा, लग्न, मुलं... मुलाचं शिक्षण, नौकरी, पैसा, लग्न, मुलं आणि मग मरण! झालं संपला आपला अध्याय.

आता वाटेल ह्या वरच्या पाच शब्दांमध्येच तर आयुष्याचा उद्देश आहे. आपण जगतो कशासाठी, पुढची पिढी उभी करणे हा आयुष्याचा उद्देश असूच शकतो. हो ना?

नक्कीच, पण ती आपली जवाबदारी आहे, आता आवडही असूच शकते.... ह्यात काही वाद नाही... पण आयुष्याचा उद्देश कदाचित नाही... 

सुरवातीला मी एका जपानी शाळेत शिकवायला जात असायची, एकरावी बारावीच्या क्लासवर मला शिकवायचे असायचे. त्या दिवशी मी मुलांना तुम्हाला आयुष्यात काय व्हायचे आहे ह्यावर बोलायला लावणार होते. प्रत्येकाला पुढे येवून पाच मिनिट बोलयाचे होते आणि मला त्यांना गुण द्यायचे होते. पंचवीस मुलांचा वर्ग होता, त्यातल्या मोजून दोन मुलांनी डॉकटर आणि विद्यापीठात जाण्याची इच्छा बोलून दाखवली, आता बघा अख्या वर्गात दोन विद्यार्थी होते ज्यांना युनिवर्सिटीत जायचे होते. मग बाकीचे तेवीस विद्यार्थी काय करणार होते.

आपल्याकडे जर हा प्रश्न केला तर वर्गातील अर्ध्यापेक्षा जास्त  संख्या तर डॉक्टर आणि इंजिनियर बोलून मोकळी होणार आता त्यात त्यांची इच्छा असो कि नसो. पण इथे पूर्ण वर्ग वेगळा वेगळा बोलला, मुलांना कुक व्हायचे होते, बेकर व्हायचे होते, कपडे शिवायचे होते, फ्लीम बनवायची होती, गायक व्हायचे होते, गिटार वाजवायची होती, बेसबॉल खेळायचा होता, नर्स व्हायचे होते. पेंटर व्हायचे होते, मूर्ती बनवायची होती, अजूनही खूप जे मला आता आठवत नाही... मला तर त्या वेळी वाटले होते प्रगत देशातील मुलं आणि असा विचार करतात. आणि मग खूप विचार केल्या नंतर समजलं हा समोर बसलेला वर्ग भविष्यातील समाज आहे. जिथे प्रत्येक घटक महत्त्वाचा आहे. सर्वच डॉक्टर आणि इंजिनिअर झाले तर चालणार कसे. डॉक्टरला कुकची गरज पडतेच, आणि कुकला कपडेही लागतात, इंजिनिअरला बेसबॉल बघायला आवडतो, खेळाडू आवर्जून गाण्याच्या शोला जातो, गायक मोठं मोठे पेंटिंगस घरी लावतो.. सगळी साखळी आहे.

आता इकिगाई समजून घेतली तर सहज उमगेल असे हे त्याचे गणित इथे बालपणापासून मुलांमध्ये दिसते. आता हा त्यांच्या संस्कृतीचा भाग म्हणावा असे बोलायला हरकत नाही. माझ्या मते तर जगातल्या प्रत्येक देशातील संस्कृति अनमोल आहे, शिकण्या सारखी आहे. संस्कृतीचा वारसा जपणे आणि स्वत:ला प्रगत नुसते समजणे वेगळा वेगळा प्रकार आहे माझ्यामते.

 

आयुष्य जगताना...

३.      शोध स्वत:च्या इकिगाईचा

आता तुम्हाला वाटणे साहजिक आहे की ह्या सर्व मुलांनी जे घरी बघितले असेल तेच त्यांना व्हायचे असेल, तसं मुळीच नाही बरका, माझ्या वर्गातल्या एका मुलांचे वडील रिसर्चमध्ये काम करत होते. त्या मुलानेच मला हे सांगितले होते आणि त्याला उत्तम बेकर व्हायचे होते. तो जेव्हा त्याच्या वडीलांबद्दल बोलला तेव्हा मी लगेच गुगल केलं आणि माहिती काढली. पोरगा खरं बोलत होता.. पण मला प्रश्न पडला होता बाप जगात नाव कमवत आहे. मोठं मोठ्या जरनलवर त्याच नाव आहे. आणि ह्याला बेकर व्हायचे आहे. त्या वेळी तर मी त्या मुलाला मूर्खात काढले होते. पण आता वाटते, नाही, त्याचा निर्णय त्याच्या आनंदासाठी होता. मुख्य म्हणजे त्याच्या घरी तो मान्य होता बाराव्या वर्गात असलेला मुलगा आणि बेकर होण्याचे स्वप्न मनात ठेवून पुढचा विचार करत असेल तर आपल्याकडे घरात वातावरण कसे राहील ह्याची तर मी कल्पना करू शकत नाही पण हे इथे जपान मध्ये असे होते. आता तो मुलगा भविष्यात मोठा बिजनेस उभा करणार हयात काही शंका नाहीच. कारण ते त्याचे इकिगाई आहे.

आता वाटले म्हणजे मनाला येईल, आवडेल तसे करणे म्हणजे जगण्याचा उद्देश की काय! जगायला पैसा लागते तोही मिळायला हवा त्यातून, कामातून मान सन्मान मिळायला हवा, गरजा पूर्ण झाल्या नाहीत तर मनात बेकर बनण्याची इच्छा असूनही आपण इंजिनिअरीइंग/ मेडिकल करणार हो. आणि मन मारत साठी पर्यंत काम करणार. हा, आता साठ वर्षानंतर आपण परत आपल्या इकिगाई सोबत जगू  शकतो, पण.... एवढा काय विचार ना.. आपलं राहून गेलंय ह्याचा... त्या वयात जोशाने आपण करू शकतो... पण जोश मुलांशी भांडण्याचा येऊ शकतो आपल्याकडे... हाहाहाहा... असो तरीही परिस्थिती बदलत आहे हे ही सत्य आहेच.

अहो आयुष्य दूसरा चान्स देते हो, बस आपल्याला तो ओळखायचा आहे. आता सर्वांना तारुण्यापासून त्याच्या इकिगाई सोबत जगता येणे अवघड आहे,... मग आपली इकिगाई आपल्याला गवसे पर्यन्त स्वत:चा शोध घेणे आणि जगण्याची उमेद कायम ठेवत काहीतरी करण्याच्या उमेदेणे जगणे तर ते जगणे हो..  नाहीतर ही तर नुसती ये-जा असणार ना?

पण खरच... होईल हे.... आणि झाले तर माझ्या ह्या लेख मालिका सार्थकी लागल्या असे समजेल मी!

 

  

आयुष्य जगताना...

इकिगाईचा शोध- लेख १२

आपण जन्माला आलोय मग त्यामागे काहीतरी उद्देश असेल. विचार केला तर आपला जन्म आपल्या कुठे हातात होता हो! पालकांनी त्यांच्या अनंत प्रेमाची सीमा गाठली आणि आपण उदयाला आलो. आता असं भाग्य सर्वांचे नसते, सगळेच प्रेमातून उदयाला येतात असेही नाही. म्हणून माझं असं म्हणणं आहे कि आपला जन्म आपल्या हातात नसतो आणि मृत्यूही नाही. मग जे हातात आहे त्या काळावर तरी आपले साम्राज्य हवे की नाही...

आता इथे जपान मध्ये लोकांचे असे म्हणणे आहे की प्रत्येक माणसाला एक इकिगाई असतेच. आता कुणाला ती लवकर गवसते तर कुणाला उशिरा. कुणाला तो भेटलेला असतो तर कुणी अजूनही शोधात असते.

माणसाने आपल्या इकिगाईचा शोध घेणे थांबवले नाही पाहिजे. जोपर्यंत तो गवसत नाही अंतर मनाला हाक मारत राहिली पाहिजे. हा इकिगाई पण ना मनातल्या खूप आतल्या कप्यात दडून असतो. त्यावर खूप आवरणे असतात, जवाबदारी, भीती, पैसा, समाज अश्यात अनेक बंधनांनी जखडून असतो कधीकधी. एकदा हा इकीगाई आपल्याला गवसला तर मग आपण मागे येत नाही असे इथले लोकं मानतात, आता आपल्याकडे अजूनतरी असे व्हायला निदान वेळ आहे. आता ही बंधने इथेही माणसांना आहे पण त्यालाही एक मर्यादा असते हे इथल्या माणसांना माहीत आहे. देश प्रगत असला म्हणजे जगायला कष्ट कमी पडतात असे नाही, की श्रीमंत देश आहे मग इथले लोक सोनं भरघोस वापरत असतील, ह्यांची घर म्हणजे बंगला असेल मोठं मोठ्या गाड्या असतील, हयातलं काहीही नाही. साधी सरळ  माणसं बघितली आहेत मी इथे. अर्थात त्या साधेपणात त्यांचा स्व मान असतोच हो.

आता त्या मुलाचा विषय माझ्या मनात सारखा घोळ घालत असायचा. वर्गावर असले की मी त्याला प्रश्न विचारायची, उत्तर अगदीच बरोबर देत असायचा तो, हुशार वाटायचा मला पण बेकर होण्याचे स्वप्न होते त्याचे. उत्सुकता म्हणून मी त्याच्याशी संवाद वाढवला. तो शाळेच्या कूकिंग क्लब मध्येही सक्रिय होता. बिस्किटस खूप मस्त बनवायचा, त्या दिवशी त्याने मला त्याच्या क्लबमध्ये बिस्किटची चव घेण्यासाठी आमंत्रण दिले होते. मी चार पर्यंत काम करून घरी निघायची पण त्या दिवशी सहा पर्यंत थांबली होती. त्याचा उत्साह कौतुक करण्यासारखा दिसला मला.

क्लबमध्ये असणाऱ्या मुली तरी काय बिस्कीट बनवणार पण पठ्याने अगदीच चविष्ट बनवले होते. त्याच्या आयुष्येच ध्येय स्पष्ट होते. बारावी झाल्याझाल्या त्याला बेकरीत काम करायचे होते मग बेकिंग क्लास करायचा होता, मग त्याला इटलीला जायचे होते केक शिकण्यासाठी. स्वतःची बेकरी टाकायची होती. बिजनेस वाढवायचा होता.... बापरे, मी तर कधी स्वप्नात असा नुसत्या बेकर होण्यासाठी असा प्रवास  विचारातही आणला नव्हता. त्याची पसंत आणि पॅशनने त्याला त्याचा इकिगाई दिला होता. मलाही प्रश्न पडला होता मी माझ्या इकिगाईसोबत जगत आहे की ओढल्या जात आहे ओघात...

To be continues…

पुढील अपडेटसाठी तुम्ही मनातल्या तळ्यात what's app ग्रुपही जॉईन करू शकता, किंवा माझ्या पेजला फॉलो करू शकता. लिंक कॉमेंटमध्ये आहे.

© उर्मिला देवेन

urmiladev@gmail.com

लेखाच्या प्रकाशनाचे आणि सर्व अधिकार उर्मिला देवेन कडे कायद्याने राखीव...

स्टे कनेक्ट, स्टे सेफ...

 

Post a Comment

0 Comments