अक्षरक्रांती राष्ट्रीय मराठी कथा लेखन स्पर्धा- प्रथम पुरस्कार विजेती कथा
लफडं!
"अग जरा दूर हो तिच्यापासून, वांझ हाय ती बाय."
गावची पाटलीन आपल्या सुनेला सांगत होती. सुनबाई पदर सावरत
काहीतरी घाणेरडं हाताला लागू नये असं वागत रस्त्यातून बाजूलाच झाली. वांझ हा शब्द
ऐकताच मनातल्या भावना दुखावल्या मालूच्या, अंतरंगातून बावरली, मनातून कोसळली आणि
ती देवीला फुलं न वाहताच घरी निघून आली.
रड रड रडली आणि तिच्या पोटात जरा कळ आली, लगेच लक्षात आलं तिच्या, हाही महिना लाल झाला होता. ती ओक्साबोक्शी परत रडत होती. गेल्या वीस
दिवसापासून वेशीवरच्या रायजा बाईने सांगितल्याप्रमाणे रोज पिवळे फुलं वाहत होती
गावच्या देवीला. आणि... आज तिने वाहिले
नव्हते तोच कळा येवून पाळी आलेली. भोळी मालू ह्या विचारानेही त्रस्त झाली होती,
"माह्या नाशिबानच काय केलं कोणाच कोण
जाणे माय? सारे देव पुजून झाले आता, कोनचाच देव काही धावून
येत नाही माह्यासाठी. पाटलीन बाईच्या पोराचं आताच तर लगन झालं! नाय..? अन सुनबाई पोटुशी बिन हाय! मले का रे बारा वर्षापासून वनवास देतं रे
देवा...? आता तरी पाव. लोकं मले वांझ म्हणतत. नाही सहन होत
रे मले."
जीवाच्या आकांताने मालू रडत होती, आज ती जेवलीही नव्हती. दिवसभर कुठंतरी
शून्यात बघत बसली होती. संध्याकाळ झाली, पक्षी किलबिल करत घरट्याकडे वळत होते. सहज
खोलीतून बाहेर डोकावलं तिने तर शेजारणीची शेळी अंगणातील झेंडूची पानं खात होती.
तिथेच कोंबड्या बाहेर वाळवत टाकलेली डाळ खात होत्या. सकाळपासून घरातून बाहेर न
निघाल्याने अंगणात कचरा झाला होता. अंगणातल्या चिंचेच्या झाडाची पानं पडली होती, क्षणभर त्या चिंचेच्या झाडाकडे बघत म्हणाली,
"माह्या आंगणात हायस तू, पण कवा मले खावाची इच्छा होयल? गावातल्या नव्या
कोऱ्या नवऱ्या घेवून जातत, पण म्या तुले नुसती पाणी टाकत रायतो."
विचारातच होती तर गाईच हंबरणं कानावर पडलं आणि लगेच भानावर
आली,
"ओव माय, माह्या
चायनाले तर चाराच टाकला नाय ओ, बिचारी दोन जीवाची, ओरडून
राहिली कवाची."
जशी उठली तसचं तिच्या पोटात परत जोरात कळ आली, जरा पोटाला होत लावत बाहेर आली, शेजारणीच्या घराकडे बघत, तोंडावर हात ठेवत हळू आवाजात ओरडली,
"हुर्रू हुर्रू, काय
माय हिच्या कोंबड्या माह्या घरचे दाने खाऊन चांगल्या टूम होतत अन अंडे ते
खाते!"
मग विचारात पडली, मनातले बोल ओठांवर आले,
"बरं हाय बाई कोंबडीच्या जातीचं,
रोज अंडा देते. पिलं सांभाळून होत नाय तिले, पाय कसी तोऱ्यामदी
चालते व पिलायच्या पुढं,अन पिलं तिच्या माग माग... काय बाई तोरा हिचा, अन म्या कावं
अशी? कवा माय पिलू माह्या कडवर रायल देवा?"
कंठ जरा अजूनच दाटला होता मालूचा तर अजून गायीचा हंबरडा
सुरु झाला,आवंढा गिळला आणि चाऱ्याच टोपलं घेवून चायना गायीकडे ती निघाली. तिला
बघताच चायना मिरवल्यागत करत होती. मालूने तिला चारा टाकला आणि तिला हाताने गोंजारत
म्हणाली,
"पायजो माय, तुही माह्यापासून दूर होसील?
दोन जीवाची तू. तुलेही माहा बाट लागल. गावातल्या बायको तसचं
बोलत्यात, लय वाईट वाटते व मले. मले वांझ म्हणत व सारं
गाव... माही त सावली बिन सहन नाय करत पोटुश्या बाया."
आणि परत रडायला लागली. गावातल्या डॉक्टरने सर्व तपासणी करून
तिला सांगितल होतं कि तिच्यात काहीच दोष नाही. मग तेव्हांपासून ती देवाला पुजायची.
सासू तिला म्हणायची कि तुला कुठलाच देव पावणार नाही पण श्रद्धाळू मालूला सासूच
म्हणणं वाईट वाटायचं.
दोन वर्षाआधी अशीच मालू तिच्या खोलीत रडतं होती, पाळी सुरु
झाल्यामुळे... नवरा वामन आणि आईत भांडण सुरु होतं. त्याचं रात्री सासूबाई अचानक
देवाघरी निघून गेल्या. तेव्हापासून मालूला कुणी सांभाळायला नव्हतं. आज तिला सासूची
खूप आठवण येत होती. का कुणास ठाऊक सासूबाई नेहमी गावाच्या पलीकडल्या अनाथ आश्रमात
मुलांना खेळतांना बघण्यासाठी रोज जात असत आणि मालूला त्याचही वाईट वाटायचं कि आपण
त्यांना नातू देवू शकत नाही. पण, स्वतःला समजवायची, कि कुणा कुणाला उशिरा हा योग असतो आणि ह्याच आशेवर दिवस
काढत, आज तिला बारा वर्ष झाली होती. मनात एक सल होती की सासू नातवाचं तोंड बघू
शकली नाही.
रात्री सात वाजता वामन घरी आला. दारू पिवून होताच. दिवसभर
विकून उरलेली वांगी आल्या आल्या त्याने घरात फेकली आणि खाटीवर पसरला. मालू गुमान
ती फेकलेली वांगी उचलायला बसली, तोच तिची गोरीशी पाठ त्याला दिसली आणि तो मालुच्या
मागे पिसाळल्यासारखा लागला. त्याच्या दारूच्या आणि घामाच्या वासात मालू आणखीनच
कासावीस झाली आणि ओरडली,
"दूर व्हा, नाय जमत मले आज, हात नगा लावू मले, व्हा बाजूलं."
तिने असं म्हणताच वामन परत तिला ओढू लागला,
"काय व? तुय
हमेशाचच हाय. मले काय बी फरक पडत नाय."
आणि त्याने तिचा पदर ओढला. तिची पाठ उघडी केली. तिला पलटवलं
आणि चोळीच्या बटणा काढायला लागला. मालू चोळी सांभाळत परत समजवत म्हणाली,
"अवो, नाही
म्हणतात डॉक्टर, काय ते इन्फेक्शन का काय ते होते म्हणे. मग
पोरं होतं नाय!"
"ये, चल मले ज्ञान नको पाजू. नाही
पाहिजेत मले पोर बिरं. नुसती कट कट साली. घरभर कल्ला!"
त्याची चोळी उघडून झाली होती, थान उघडे पडले होते, ते हातात
घेत तो परत तिला बोचून बोलला,
"तू बंज्जर जमीन आहेस वं! तुही काही कूस
उजवाची नाय. ये, मले तुहा काय त फायदा होवू दे, बंज्जर साली,
जबान चालवते! भाकरच बंद करीन तुय वाली."
आणि त्याने तिचं काहीच ऐकलं नाही, ओढलं तिला, साडीच्या निऱ्या भसकन मोकळ्या
केल्या, ओढत पलंगावर पाडलं, अंग ओरबाडत त्याने तिचा पदर पार रक्ताळून टाकला. वामन
शांत झाला, बाजूला उताणा पडून राहिला आणि क्षणात घोरायला लागला. मालूने स्वतःला कसंबस
सावरलं, कपडे केले, खाली गादी टाकून वाकड अंगावर घेतली आणि झोपेची वाट बघत तशीच
गुमान पडून राहिली.
पहाटे उठताही येत नव्हतं तिला. पायात पाळीने गोळे भरले होते
तर माड्या ओढताण केल्याने दुखत होत्या. वेदना
असह्य होत होत्या पण काम करावं लागणार होतं. पहाटेच जावून चौकातल्या विहिरीतून दोन
गुंड पाणी आणलं पिण्यासाठी, कारण जरा जरी तिला उशीर
झाला आणि विहिरीवर बायका असल्या, तर ती दूर उभी राहून वाट बघायची पण कुणी तिला
पाणी भरू देत नसायचं. आणि गावात त्याच विहीरीच पाणी पिण्यासाठी गोड होतं.
परत आज सासूची आठवण झाली तिला. सासू असती तर आपण काल तिच्या
खोलीत गुमान झोपलो असतो आणि ह्या नराधमापासून वाचलो असतो ह्या विचाराने कंठ दाटून
आला होता तिचा.
निंबाची काडी तोडली आणि दात घासत चूल पेटवत होती तोच तिला रात्रीचं
स्वप्न आठवलं. स्वप्नात सासूने तिच्या डोक्यावर हात ठेवला होता आणि काहीच बोलल्या
नव्हत्या. सूर्याचे किरण अंगावर पडले तशी ती स्वप्नाच्या अर्थाने मनात आनंदली. सासूचा
आशीर्वाद असा स्वप्नाचा अर्थ घेत ती पुन्हां नवीन आशेने विचार करू लागली.
पाळीचे दिवस संपले होते. तिच्या मनाला जे वाटत होतं, ती ते मनात बोलत होती,
“बारा वर्षाचा वनवास सरल आता, ह्या महिन्याले बारा वर्ष पूर्ण होयल माह्या लग्नाले.”
उत्साह मनात शिरला होता. का कुणास ठावून तिच्या मनात पक्क
झालं होतं की ह्या महिन्यात ती नक्की पोटुशी राहील. रस्त्यावर खेळणारी मुलं बघून
मनातच बाळाची कल्पना करत त्या मुलांचा मागे धावायची. बाजारात मुलांचे कपडे बघायची.
सुंदर सुंदर टोप्यांना आणि मोज्यांना हात लावायची. इवले इवले झबले, त्यांचे ते रंग
तिला मोहात पाडायचे. ओल्या मातीचा वास घेवून बघायची. एखादी पोटुशी बाई रस्त्याने
दिसली की मागून जावून तिच्या पाऊल खुणांवर पाय ठेवत चालायची. ह्या आशेने की तीही
लवकर अशी कमरेला हात लावत चालावी म्हणून. लवकर ह्या जीवघेण्या वेदनेतून कायम बाहेर
पडणार, ती वांझ नाही हे तिला सिद्ध करायला मिळणार,
ह्या आशेने सुखावली होती. स्वतःला मालू पोटुशी होणार
असंच समजायला लागली होती.
लोकांच्या सांगा सांगी तिला आता हेही कळत होतं, की काहीच
दिवसं असतात, जेव्हा गर्भ
राहू शकतो, मग आता तिला वामनची ओढताड काहीच वाटत नव्हती. शरीराला कितीही दुखत असलं
आणि मनाला आरपार बोचत असलं तरी ती वेळ तिला हवीच असायची. बाळाच्या इच्छेने सर्व
सहन होत होतं. प्रत्येक वेळेस तिच्या मनात आशा असायची,
वामनचा भार सहन करतांना तिला बाळाची छबी दिसायची आणि मग सारं काही विसरत ती विरघडत
होती.
मी वांझ आहे की धास्ती तिची कमी होत होती. घरात दुडू दुडू
चालणार बाळ स्वप्नात येत असायचं, त्या इवल्याश्या पावलाचे आभास मनाला अनंत आनंदात घेवून जायचे मग मनात
स्वप्नांचा महल उभा करत विचारातच म्हणायची,
"म्या वांझ नायच, रायल
हा महिना मले, मग पायते म्या, सारे
माह्याशी मानाने बोलत्याल. सातव्या महिन्याले म्या साऱ्यायले बोलवीन माह्या घरी,
मले काय कमी हाय...”
जरा वेळ त्याच विचारात रमली, मग स्वतःला म्हणाली,
“चल बाई, आता पासनच कामाला लागतो व माय. माह्या काही घरधनी कामाचा नाय, काय बी करायचा नाय.”
मग तोंडावर हात ठेवून हळूच आनंदात बोलली,
“अव माय, पाटलीन बाई बोलवलं मले तिच्या नातवाच्या बारशाले... किती मजा येयल.. .माहे
सारे अरमान पुरे होयल आता."
त्या दिवशी ती आनंदाने अंगणातल्या चिंचेच्या झाडाकडे बघत
कोवळ्या हिरव्या चिंचा मोजत होती. बादलीभर विहिरीतून पाणी काढलं आणि चेहऱ्यावर
झोकलं, तारावरच्या लुगड्याच्या फडक्याने चेहरा
पुसला. घरात जावून स्वतःच तयार होण्याच बोचकं आणि आरसा घेवून अंगणात आली. तिथेच
कंगव्याने केस विंचरत आनंदात बसली.
वामन आज लवकर आला, आल्या आल्या परत अंगणातल्या बाजीवर लोळला, तिला असं बघत म्हणाला,
"काय व, कोणाले
पायतस, येवढा नट्टा पट्टा करून राहिली. काय लफडं चालू हाय का
व? नाही म्हटलं रोज अशी मरगडल्यावानी रायतस न. आज तुले काय व
झालं? चल चाय टाक माह्यासाठी, आली मोठी पावडर लाली लावणे
वाली!"
मालू उठली, आज तिला स्वतःचा आनंद घालवायचा नव्हता. नवरा
असाच असतो हेच समीकरण ती बघून होती मग गुमान वेणी बांधत आत गेली. चुलीवर आधीच भात
मांडला होता, निवे बाहेर
काढले आणि चहाच पाणी ठेवलं. जवळच्या डब्यातून चम्मचभर
पत्ती टाकली, आता साखर टाकणार होतीच तर चेहरा पुसत खोलीत
शिरलेल्या वामनला चुलीवर भाताचा गंज आणि शेजारी जेवनाच ताट दिसलं,
"कोण आलं होतं व घरात माह्या मागून? कोणाले
माह्या कमाईच जेवाले घातलस ताजं ताजं."
मालू काहीच बोलली नाही. ताट तिचच होतं जे तिने आज आनंदात
तसच ठेवलं होतं. चहा झाला होता, मालूने चहा गाळला आणि कप बशी घेवून उभी होती, तोच
वामनने चहाचा कप खाली आपटला. चहा गरम होता, मालुच्या पायावर पडला, भाजलं तिला, साडी वर
केली बघण्यासाठी तर वामनच लक्ष तिच्या पायातल्या एका तोरडी वर पडलं...
"तोरडी कुठ ह्या व तुही?"
आणि तो इकडे तिकडे बघू लागला, तोच त्याला तोरडी पलंगावर
पडलेली दिसली. दुपारी मनातल्या विचारांना जगतांना मालू घर साफ करत होती, पलंगावर उभी झालेली तेव्हा ती तिथे पडली
होती.
वामन पार चवताळला, आता त्याने रागात चुलीतली कोलती उचलली
आणि मालूला मारण्यासाठी तिच्याकडे वळला, मालू पाय सावरत बाजूला झाली,
“आव, नगा मारू. म्या
कायबीन केलं नाय.”
ती स्वतःला वाचवू लागली तोच कुणीतरी धावून आल्यासारखं
बाहेरून आवाज आला,
"अरे वामन, चालत
नाही कारे, आज डाव खेलायचा हाय ना, सगळे
जमले त्या वडाखाली, तुह्या घरचा टोर्च घेवून ये. मी गिलास
घेवून चाललो."
वामनचा मित्र फाटकातून ओरडत होता, आणि वामनने कोलती फेकली.
"अरे आलो, कपडे
बदलत होतो ना बे, तू जा, म्या येतो."
आणि मग मालूचे केस पकडत म्हणाला,
"ये भवाने, लफडं
कराच नाय, अन असल तर निघाच घरातून, तसय
तू काय कामाची नाय माह्या. बंजर साली, जाय टोर्च शोध, मले
जायचं हाय, रातचाले बघतो तुले."
आणि तो टांगलेल्या शर्टातून पैसे काढून मोजू लागला. सारे
पैसे घेवून तो घरात धिंगाणा करून निघून गेला होता. आणि मालू स्वतःला जपत घर साफ
करत होती.
वामन तिच्यापेक्षा वयाने दहा वर्ष मोठा, गावात हिरोगिरी करतच मोठा झाला. ह्या
पोरीला टाप, तिला छेड काढ, हेच सुरु
असायचं त्याचं. घरी १० एक्कर शेती, मग वडिलांच्या मेहनतीच्या कृपेने लक्ष्मी नांदत होती घरात. एकटा एक आईच्या लाडाने वाया गेलेला. वडील वारले
आणि मग त्याला बोलायला कुणी राहिलं नव्हतं. आई शेतात राबत असायची आणि हा मोकळा
गावात उनाडक्या करायचा.
गावात रखु नावाची बाई नवीन राहायला आलेली, सुंदर, देखणी होती
आणि वामनने तिला पार प्रेमात पाडलं होतं. तिच्या घरच्या फेऱ्या करायचा. लागलीच
तिच्या नवऱ्याची जवळच्याच जिल्हा परिषदेच्या शाळेत बदली झाली मग नवरा घरी यायला
वेळ होत होता. आणि आला तरी तो खूप थकलेला असायचा. रखुची शारीरिक मागणी तो पूर्ण
करू शकत नव्हता. त्याने बऱ्याचदा रखुला म्हटलेलं की बदलीच्या गावी राहायला जावू, पण
रखु अडकली होती वामनमध्ये.
रखु आणि वामन दिवसभर रखुच्या घरी राहायचे आणि मजा करायचे.
रखु वामनमध्ये एवढी गुंतली की तिला आता तिच्या नवऱ्याला सोडायचं होतं. पण भीतीपोटी
ती वामनसोबत पळून गेली. गावात त्यांच्या लफड्याची भारी चर्चा होती.
एका वर्षाने रखु घरी परतली, तिने नवऱ्याची माफी मागितली आणि सांगितलं कि वामनने पळवून नेलं होतं. तिचा
नवरा साधाभोळा मास्तर, विरघळला आणि बायकोला नमला. वामनला शिवीगाळ करत बायकोला
मिठीत घेतलं. रखु वर्षभर वामनशी
शारीरिक संबंध ठेवूनही पोटुशी झाली नव्हती. जे तिला हवं होतं त्याच्याकडून
प्रेमाची निशाणी म्हणून ते तिला मिळालं नव्हतं. आणि मग तिचं मन कंटाळलं.
आणि... गोष्ट तिच्या लक्षात आली. वामनवर तिने नको नकोशे
आरोप केल्याने तोही चिडला आणि लफडं संपल. रखुचा नवरा तिला घेवून बदलीच्या गावी
निघून गेला आणि तीन महिन्यात रखु पोटुशी राहिली. ही गोष्ट वामनच्या आईला कळली
होती.
मालू गावातल्या गरीब घरची मुलगी होती. तिच्या वडिलांना पैसे
देवून सासूने मुलाच लग्न लावून दिलं होतं कि तो सुधारेल, पण सुधारणा दिसत नव्हती आणि मालूची कुसही
भरत नव्हती. सुनेकडून अपेक्षा होती सासूला पण वामन त्यांना बऱ्यापैकी कळला होता
आतापर्यंत, मग मनातल्या मनात खंत वाढत होती त्यांची. त्या दिवशी मुलासोबत झालेल्या बाचाबाचीत मनाने हाय खाल्ली होती त्यांच्या आणि मनातल्या मनात युद्धाने शेवटी मरण आलं
होतं.
आठवडा झाला होता पाळीची तारीख जावून, मालू रोज एक एक दिवस वाढतोय म्हणून खूप खुश
होती. आता तिला भारीभारी आणि गरगरही वाटायला लागलं होतं.
जेमतेम दहा दिवस वर झाले होते. तिला चिंचा खाण्याची इच्छा
झाली, अंगणात बसून मनसोक्त चिंचा खाल्ल्या आणि मग
आम्लपित्त वाढल्यामुळे उलट्याही झाल्या. उलट्या झाल्यामुळे ती अधिकच आनंदाने फुलून
गेली. मनोमन पक्क झालंच होतं तिच्या, पोटाला हात लावत दुपारी
बोलत बसायची,
"तुह्या चाहुलीने वांझपण पुसलं माय. आता
तू न मी मजेत राहू, तुया बाबा बिन सुधरल आता. त्याले बीन लडा
लागलच ना... आता लवकरच जायल मी गावच्या सरकारी दवाखान्यात. तुया बाबाशी बोलाच बिन
हाय, पण आठ दिस झालेत तुहे बाबा घरला आले नाय. तालुक्यात
गेले ना गहू विकाया, लय गहू झाला यंदा. ओव माय तुह्याच
पायगुण होय रे, आता समदबीन ठीक होयल."
आणि ती स्वतःला सावरत उठली, पोटात जरा कळ आलेली, मग वाकतच घरात गेली, आता मालू बऱ्यापैकी राहायची. स्वतःला खूप
जपायची, दिवस वाढत होते आणि कंबरेचा त्रास वाढत होता पण मालू
खुश होती. स्तन ताठ व्हायला लागली होती मग आणखीनच आनंदाने फुलली होती. पंधरा दिवस वर झालेले आणि मालूचं शरीर जड झाल्यासारखं झालं होतं. अधूनमधून
ओटीपोटात कळा यायच्या आणि प्रत्येक कळ मालूला बाळाची चाहूल देऊन जायची.
इकडे, वामन तालुक्याच्या ठिकाणी गावच्या ठेकेदारासोबत दारूत मस्त होता. घरी
जाण्याची त्याला काही घाई नव्हती. त्या दिवशी बाजारात उभा होता तोच समोरून रखु
दिसली, कडेवर मुलगा आणि हात धरून एक मुलगी होती. हा जरा नशेत
होता, तिच्याजवळ नशेतच गेला आणि म्हणाला,
"अय, फुलराणी,
विसरली का मले? चल ना आज तुले मजा देतो. नवरा नाय दिसत वाटते, मग तर
बरच हाय. तसाही येळपट हाय तो. ठेव तुहे पोरं हिथ, चल त्या
गोदामामदी."
रखु जरा अवघडली, एकटीच मुलांना घेवून बाजारात आली होती, क्षणभर समजलं
नाही तिला. नंतर तो तिच्या अगदीच जवळ गेला आणि तिला ओढू लागला,
आता मात्र भर बाजारात रखु ओरडली,
"ये मुर्द्या, हे
असलं बायकोवर दाखव, पोरं जन्माला घाल आधी मग सांग मजा मले,
आला मोठा! नामर्द साला... "
त्याला जोराने धक्का देत ती निघून गेली. तिच्या धक्याने भर
बाजारात पडलेला वामन भूतकाळात शिरला. रखुच्या आरोपानंतर त्याने शहरात जावून
स्वतःची तपासणी करून घेतली होती. आणि त्याला तो डॉक्टर आठवला ज्याने त्याला
म्हटलेलं,
“तू हवी तेवढी मजा कर पण बापपण तुझ्या वाटेला
नाही.”
तेव्हापासून त्या रिपोर्टला खोटं ठरवण्यासाठी वामनने कही
बायकांना आणि मुलींना नादी लावून सोडलं होतं. प्रत्येक वेळेस बायका कोरड्या
सुटायच्या मग लफडं उघडीस येत नव्हतं. एवढ्या मोठ्या लफडेबाजाच एक भल मोठ लफडं
त्याच्या आज मनातून बाहेर आलं होतं. पडलेला तो कसा बसा उठला आणि घराकडे निघाला.
त्याला राहून राहून आज आई आठवत होती.
आज मालूला वीस दिवस वर झाले होते आणि ती मनाने खूप खुश होती, दररोज
वामनची वाट बघायची, आजही ती परत सुंदर तयार झाली होती,
म्हणाली,
"आज हे आले क दवाखान्यात न्यायाले
सांगतो, बातमी सांगल्यावर लय खुश व्हायले पाहिजेत आता. लय
झालं वनवन हिंडून."
स्वतःला आरश्यात न्याहाळत होतीच तर वामन घरात शिरला,
"काय व, कोणासाठी
नट्टा पट्टा करतस? पाणी आन माह्यासाठी."
मालू लागलीच स्वतःला जपत मडक्याकडे गेली आणि पाणी घेवून
समोर उभी राहिली, उजव्या पायाचं
बोटं ती डाव्या पायाने दाबत, मनातल्या असंख्य आनंदाच्या लहरींना अडवत हळूच म्हणाली,
"आव, आता घरी दारू
पिवून येत जावू नगा बरं. गर्भावर काय तो परिणाम होते म्हणे!"
तेवढ्यात तिला परत गरगरल्यासारखं झालं, पाय खेचल्यासारखे झाले, समोर अंधारी आली आणि ती खाली पडली. जरा मनातून सुखावत होतीच, पण काळजीतही
होती. तिचे शब्द आणि तिला असं बघून वामन एकदम उठला, हातातलं
पाणी त्याने तिच्या तोंडावर फेकलं, मालूला धडकी भरली. तिच्याकडे डोळे वटारून बघत
वामन वचकून बोलला
"ये भवाने, काय
नवीन लफडं, तुले काही पोरं बिर होणार नाही माह्याकडून...”
“अव, असं काय बोलता, दिस लय झालेत ह्याघनी. दवाखान्यात जाऊ
ना व आपून...”
“ये, कुठ गेलतीस? तोंड काळं कराले? का...?"
आणि तो डोक्याला खाजवत परत थांबून अजून जोराने बोलला,
"वाटलंच मले, गरम
गरम जेवाले घालतस आपल्या याराले."
आता त्याने धावत जावून तिचे केस धरले,
"सांग कोणाच हाय ते? माह्या माथे माराच नाय. निग माह्या घरातून, साली..."
ओढत तिला घराच्या बाहेर काढलं त्याने. समोर चिंचाच झाड
होतं, अगदी त्याच्या खाली पडली मालू. वामन परत ओरडून रागात म्हणाला,
"मले पोर होवूच शकत नाय. लय लफडी केली
म्या पण कवाबीन कोणतच लफडं बाहेर आलं नाय. बायकांची जात साली. पोरं होत नाय म्हणून
सोडून दिलं तिनं मले, अन हे भवानी, लफडं करते."
आता वामन तिला लाथा मारू लागला आणि मग छाती ठोकत म्हणाला ,
"मले सोडलं... नामर्द म्हणते मले... ते
माय बी मले नपुंसक म्हणत मेली. ये भवाने, तुले त सोडतच नाय
म्या. तू निग माह्या घरातून. हे लफडं माह्या घरात नाय पायजेत, साली लफडे करते
माह्या मागून, माह्या घरात."
मालू खूप घाबरली होती. तिलाही काही कळत नव्हतं, भीतीने पोटात गोळा आला, डोळ्यासमोर अंधारी
पसरली, सारं काही धूसर दिसत होतं... अचानक वामन तिला स्पष्ट दिसायला लागला, आणि
धारा लागल्या... त्या वाहून साडीतून बाहेर आल्या आणि तिचा कलंक मिटवून गेल्या.
आज ती परत लाल झाली होती, पण वांझपण मनातून मिटलं होतं
तिचं. खूप ओरडून ओरडून नंतर हसली, चिंचेच्या झाडाला बिलगली, जोराने हलवून चिंचा
पाडल्या आणि मनसोक्त खाल्या. वामन तिला असं बघून दारूची सोबत असेलली बॉटल काढून घरात
बसून पीत होता.
खरं तर मालू कधीच पोटुशी नव्हती, तिच्या नेहमीच्या आई होण्याच्या स्वप्नाने
आणि सततच्या मनस्थितीने तिला ते सगळे आभास होत होते. आणि योगायोग असा, की तिची
पाळी ह्या महिन्यात त्याच कारणाने लांबली होती. मग गावरान मालू काय समजणार?
ती तर बाळाच्या आशेने स्युडो प्रेग्नन्सीने
ग्रासली होती. पण आज तिला उमगलं होतं आणि त्या
स्वप्नाचा अर्थ गवसला होता. बारा वर्षांपासून मनात घुसमटत असलेला तिच्या अंतरमनाचा
आवाज तिला ऐकायला आला. तीच रूप बदललं होतं, मोठा सुस्कारा देत ती उठली आणि वामनकडे
वळली,
"वांझ मी नाय, तू हाय, बंजर साला,
नापीक... थू तुह्यावर, तू निग ह्या घरातून. घराची सफाई केली म्या, आईच्या खोलीच बिन केली. माह्या सासूने हे घर अन शेत माह्या नावावर लिवून
ठेवलं हाय. तू निग आणि तुय लफडे बीन घेवून जाय. आजपासून तुया माया काय बिन संबंध
नाय. अन अजून, आतापरोत म्या कोणालेबी गरम गरम जेवाले घातलं
नाय पण म्या आता घालीन. तू लफडं म्हणतस ना, म्या त्या लफड्याले जिंदगी करून दावीन,
चल निग... साला लफडेबाज...नापीक..."
आणि तिने त्याला ओढत घराच्या बाहेर काढलं, ढकलत अंगणाच्या
फाटकातून धक्का दिला, वामन रस्त्यावर पडला, तिने फाटक ओढून घेतलं. घराच दार लावून
घेतलं.
आज तिचा कलंक मिटला होता. मी वांझ नाय, मी वांझ नाय... असं
म्हणत ती घरात एकटीच आनंदी होतं होती. आज तिच्या मनातला मयूर नाचत होता. मनात दाटलेले असंख्य बंद आवाज
मुक्त झाले होते.
सादर विजेती कथा माझ्या वॉइस.. अंतरंमनाचा ह्या २०२२ प्रकाशित पुस्तकातिल आहे.
voice / वॉइस : अंतरमनाचा Paperback
for international copy- for Japan voice / वॉइस : अंतरमनाचा (Marathi Edition)
for others- voice / वॉइस : अंतरमनाचा (Marathi Edition)
लेखिका- उर्मिला देवेन
टोक्यो
०८१-०७० ३५२२ ३५८०
https://www.facebook.com/manatlyatalyat
0 Comments