जोडीदार.... प्रवास
तुझा माझा.... भाग ४०
भराभर दिवस
वाऱ्याच्या पंखाने उडाले, अनुने बंगलोरच्या नौकरीला राजीनामा दिलेला आणि नोटिस
पिरीअडचे तीन महीने संपले होते. तिच्या आई बाबासोंबत आनंदात तिला तो वेळ घालवता
आला होता. बाबांच्या मदतीने तिने सगळं सामान बंगलोरवरून मुंबईत मोहिते निवासात
ट्रान्सफर केलं होतं. आणि आज अनु तिच्या आई बाबासोबत परत येत होती.
अरतीची घाई सुरू
होती, बाईच्या मागे लागून तिने बाळूची खोली आवरून घेतली होती. शिवाय अनुचे आई बाबा
इकडेच येणार असल्याने तिला उत्सुकता लागली होती.
“अहो, ऐका ना, तो
कोळी मसाला जरा घेवून येता का?”
“हो आणतो ना. येतो मी.”
बाबा आज परत कोळी
मसाला घ्यायला गेले होते, जेव्हा जेव्हा अनुचे आई बाबा येत असत हमखास आरती कोळी
पद्धतीच जेवण करत असायची. बाबांनी येतांना खूप काही आणलं होतं, काही अनुच्या
आवडीचं तर काही आरतीच्या. आणि काही इनबाईला आवडणाऱ्या मिठाया ते घेवून आले होते.
गेटवर होते तर मागून टेक्सीने होर्न दिला. सगळे पोहचले होते. आनंदांत स्वागत झालं,
चहा झाला, अनुने सगळं भराभर नाही बोलून सुद्धा आवरलं, जेवण्याच्या पंगती बसल्या,
हसण्यात बोलण्यात अनुने विषय छेडला,
“आई बाबा, म्हणजे
दोन्ही आई बाबा हा, माझी तिकीट बुक झाली आहे. मी सानूदी शी बोलले.... बाळाच नामकरण
झाल्यावर आठवड्या भरात मी निघणार आहे.”
अनुची आई, “बाई,
एकटी जाणार काय, जावई येणार नाही तुला घ्यायला.”
अनु, “आई तो काही
तिकडे खूप वर्षासाठी नाही आहे. त्याचा ऑनसाईट प्रोजेक्ट सुरू आहे. आणि राहिले तीन
महिने. येण्यात वेळ जाणार उलट खर्च असेल. त्यापेक्षा मीच जाते ना, मग दोघेही परत
इकडे.”
अनुची आई, “तरीही ग
बाई, माझी पोर कशी जाणार एवढ्या दूर.”
आता दोन्ही बाबा
हसले, अनुचे बाबा म्हणाले, “जाणार म्हणेज, विमानाने जाणार ग, तुला बसवून देवू का
तिच्यासोबत. “
अनुची आई हळूच म्हणाली,” मी काय करू तिकडे ह्या
दोघांमध्ये. तशी आजकालची मुलं आणि त्यांच्या त्या गोष्टी काही समजत नाय. काय हो
आरती ताई.”
आरती, “बरोबर
बोललात ताई, मला तर माझी सून काही तरी सोप्या भाषेत सांगते म्हणून समजते.”
बोलण्यात सर्वांना
समजलं होतं अनु दीड महिना इकडे असणार आणि नंतर जर्मनीला निघणार म्हणून.
अनु माहिते निवासात होती आणि सारं काही बघत होती,
तिलाही आता कधी अंकितकडे जर्मनीला जाते असं झालं होतं. बऱ्या घरची ती होतीच आणि
आता मोहिते निवास लक्ष्मी आनंदात नांदत होती. अनुने सर्व शॉपिंग केलं होतं आई बाबांना
सोबत घेवून.
आज अनुने आईसाठी
सूट घेतला होता आणि बाबांना तिने जीन्स टी शर्ट घेवून दिला होता. ते सगळं घालून ते
जाणार होते कोळी वाड्यात. आता राणीच्या सासरी तर जावू शकत नव्हते, तिकडलं वातावरण
जरा वेगळं होतं, पण अनु मुळे कोळी वाड्यात अरुण राव जरा फेमस झाले होते, त्यात अनुचे
बाबा त्यांना खूप मानत असत. आता तर तेही बिजनेस करत नसत. अंकितने सर्व बिजनेस
कॉंट्रॅक्टवर दिला होता नि तो नुसता कमिशन घेत असायचा.
दोन दिवस कोळी
वाड्यात राहून, मासे खावून अरुण आरती आनंदाने घरी आले होते. अनु तिच्या खोलीत तिचं
सामान आवरत होती, आई आली,
“अनु, अजून काय काय
खरेदी करणार आहेस ग?”
“अहो आई, तिकडे फार
थंडी असते, अजून थरमल घ्यायचे आहेत मला आणि आता सानू दी येणार आहे.”
“अग हो, तू आहेस ना
तर सानूशी अजिबात बोलणं झालं नाही.”
“आई माझं होते रोज
बोलणं व्हॉट अप वर. तिची ड्यू आहे आता लवकरच, आपल्याला बातमीसाठी तयार राहावं
लागेल.”
“अरे हो, मग ग,
बाळासाठी काय के करायच आपण, आणि आपल्या घरी येणार आहे का ती?”
“अहो आई, सानू दी
आता पार बदलली हो, म्हणत होती, दोन दिवस राहील म्हणून. “
“असं, ठीक आहे.“
“अहो मी म्हणाले,
बारसं इकडे करा म्हणून.”
“मग काय बोलली?”
“हो म्हणाली”
“अग मग तयारी किती
असेल.”
“अहो आधी मुलगा कि
मुलगी माहित तर होवू द्या.”
“अग तिला माहित
असेल. तिकडे सहज सांगतात.”
अनु गालात हसत
होती, तर आई म्हणाली, “बाई म्हणजे तुला माहित आहे. बोलली ती तुला. मी ह्यांना
म्हणाले होते विचारा म्हणून...”
“अहो आई चिल,... दी
ला मुलगा होणार आहे.”
“अग बाई, तुला
बोलली.”
“मीच फोडलं तिला. “
“बरं झालं ग बाई,
तू आलीस इकडे. नाहीतर ह्या मुली तर मला काही सुचू देत नाही. आता माझ्या राणीला एक
बाळ झालं कि माझी चिंता मिटली, म्हणजे तू तर माझी सुनबाई आहेस, माझ्या लाडाची, मला
कसं सर्व सांगतेस, म्हणून मला काही तुझ्यासाठी काळजी नाही. पण मुली आता परक्या झाल्या
ना ग, वेळ नसतो त्यांना बोलायला सुद्धा. आणि तू वेळ काढून मला आणि ह्यांना फोन
करतेस. “
“आई.... आता कशाला
डोळ्यात पाणी. चला लिस्ट बनवा.”
“आणि अनु, तिच्या
घरचे सर्व येणार आहेत म्हणे, मग ग आपण काय आणि कस करायचं.”
“म्हणेज, आपण काही
कमी नाही आता. मी सर्वांसाठी पैठण्या त्याही हाताने विणलेल्या बुक करून ठेवल्या
आहे. आणि अंजु अत्याला बाकीचे सगळे कपडे सांगितले आहे. त्या तिघींसाठी सोन्याचे
सिक्के आणि मोत्याचे काही दागिने सोनाराला सांगितले आहे. मुलांसाठी काही खरेदी
आहे, पण काही वस्तू अंकित जर्मनीवरून पाठवत आहे. बाकी राहिली आपली इकडली खरेदी तर
ते आपण करू. मी राणीदीशी बोलून घेईल.”
“बाई ग किती हे
सगळं, मला तर सुचलं नसतं, बर झालं तू आहेस.”
“आहेस म्हणजे मी
कुठे जाणार हो.”
“कुठे नाही ग बाळा.
ह्या घराची सर्व सत्ता तुझ्या हातात येतांना बघून खूप आनंद झाला. आता लवकर बातमी
दे.”
“काय हो आई, बोलले
ना मागे मी तुम्हाला.”
“हो हो, बघ तू आणि
अंकित मला बाई लेकीचं करण्याची हौस मनातच राहिली, एक अमेरिकेत आणि एक....”
“ सगळं होईल, चला
बाबांना सांगा त्या ड्राइव्हर काकांना फोन करायला.”
“का ग कुठे जायचं
आहे.”
“अहो चला, अंजु
आत्याने बोलवलं आहे आपल्याला.”
अनु आई बाबांना
घेवून अंजु आत्या कडे गेली होती. परत येतांना बाबांना आज अजून छातीचा त्रास होत
होता. पण ते बोलत नव्हते. गुमान येवून झोपले. अनुही अंकितशी बोलण्यात गुंग होती.
आणि आई सुनेसोबत तिच्या गप्पा आणि सारं काही जपण्यात आनंदी होती.
महिना उलटला आणि
सानूची गोड बातमी ऐकायला आली, मुलगा झाला होता तिला. राणे पॅलेसमध्ये शुभेछ्यान्चे
फोन सुरू होते. श्री आनंदाने सर्वाना मिठाई वाटत होता, त्याने आज पहिल्यांदा
त्याच्या लहान भावाला घेतलं होतं,
“ममा, हा
माझ्यासारखा दिसतो ना.”
“अरे म्हणजे, तूच
होतास ना माझ्यासोबत माझी काळजी घेत. आणि तो तुझा लहान भाऊ आहे, तुझ्यासारखाच
असणार रे.”
सुमंत श्री आणि
सानूने मासाहेबांचा त्यांच्या खोलीत जावून आशीर्वाद घेतला, मासाहबे जरा बऱ्या
झाल्या होत्या. त्यांना आता भारतात जायचं होतं. तसं सर्वांच ठरलं होतंच. पण
महिनाभर तरी अवकाश होता.
पण हा अवकाश
शशीच्या येण्याने उडून गेला आणि सहपरिवार राणे भारतात आले, राणे बंगल्यात रोषणाई
होती. आणि मोहिते निवासात मांडव पडला होता शशीच्या स्वागताचा. बारसं झालं की जया
आणि सारंग मुलांसोबत नागपूरसाठी निघणार होते. सारंगी आणि स्टेविन आग्रा फिरायला
जाणार होते. आणि सुमंत लगेच दोन दिवसात परत निघणार होता.
मोहित्यांकडे
बारश्याचा थाट जोरात होता. सगळी राजकींय व्यवस्था होती. आज सारं काही राणेच्या
तोडीचं महित्यानी केलं होतं. मासाहेब तब्यतीमुळे आले नव्हत्या पण राण्यांचे घरचे
सर्व मंडळी हजर होते.
आज परत अरुणला
कासावीस वाटत होतं. पण कार्यक्रमाचा थाट काही औरच होता. आणि मग त्यालाही कधी बरं
वाटत गेलं समजलं नाही. तशी अनु वेळोवेळी त्यांच्यावर लक्ष ठेवून होती. पण बाबांना
अनुलाही त्रास द्यायचा नसायचा.
सोहळ्यात राणी जरा
जरा गोष्टीला नाराज होत होती. तिची मनस्थिती तिला माहित होती. श्रीशी तीचं जमत
होतं मग हळूच तिची मैत्री जसीकाशी झाली. मुलांसोबत ती रमत राहिली.
तिला मुलांसोबत
बघून सानू तिच्या नजीक आली म्हणाली,
“राणी काहीच विचार
करू नकोस, प्रत्येकाच आयुष्य वेगळं वेगळं असतं ग, मी राजनशी बोलले. किती मोकळा आणि
सहज समजणारा आहे तो. मला खात्री आहे तू नक्कीच त्याच्यासोबत आनंदी आहेस, त्याला
आनंद दे जो त्याला तुझ्यामुळे मिळतो, बाकी काय मुलं होतीलच.”
“तायडा, तुला सोपं
वाटते ग, मी भोगलं आहे. इथे सगळं असून काहीच नाही हा भास मनाला रोज मारतो.”
“राणी, नको ग, असा
विचार करू, तुझ्या जोडीदाराने काय करावं मग, तुला नक्की बाळ होईल, मला माहित आहे
ना.”
“तू काय भविष्य
सांगणारी आहेस काय.”
“नाही ग, पण माणसं वाचणारी
आहे. आज राणे पॅलेस माहिते निवासात आहे तुला अजून काय सांगू.”
राणी हसली, सानू
तिला परत म्हणाली, “ मला माहित आहे तुला वाटते मी काय बोलले, अग सोपं काहीच नसते,
जर सोपं असतं तर मग मिळालेल्या गोष्टीची किंमत काय.... तुझे प्रयत्न सुरू ठेव, बघ
यशाला सारं अपयश पुसून तुझ्यापर्यंत यावं लागेल.”
राणी येवून सानूला
बिलगली, “तायडा, असं होणार ना ग.”
“नक्की माझी
बहिणाबाई.... आणि तुझा तो जोडीदार आहे ना, कधीचा तुझ्या ह्या स्माईलची वाट बघत
सुमंतशी बोलत बसला आहे, त्याला जावून हि मिठाई दे, आणि हस, जीव जीवात येईल
त्याच्या.”
“तायडा... तू ना...
“
राणीच्या चेहऱ्यावर
हसू आलं आणि ती राजनकडे गेली. आईने सर्वांना बोलावलं, सारंगीने शशीला पाळण्यात
टाकलं. तो तिचा मान होता. स्टेविन सगळं बघून खूप उत्साही होता. सानू तर राणी होती.
तिचा थाट काही औरच होता. एका चौदावर्षाच्या मुलाची आणि नुकत्याच जन्मलेल्या मुलाची
आई म्हणून तिची भूमिका बघण्यासारखी होती. श्री सांभाळताना तिच्यात समजूतदारपणा होता
तर शशी सोबत ती लहान होत असायची.
बाबा तिला असं बघून
निशब्द होत असायचे. आईला तिचं कौतुक भारी होती. आणि हे सगळं बघणारा तिला
जीवाभावाचा जोडीदार तिला साथ देत तिच्या सोबत होता. सानू आता मुलगी वाटत नव्हती ती
एक रुबाबदार स्त्री भासत होती. तिच्या असल्याने आज सगळी नाती तिच्या सोबत उभी
होती. आता ती मोहित्यानही सानू नाही तर राणेंची सूनबाई मोठी पेशवेबाई वाटत होती. तिच्या
वागण्या बोलण्यात सुमंत आणि फक्त सुमंत असायचा, तिची काळजी आणि सारं काही
सुमंतसाठी असायचं.
सोहळा संपला आणि
दोन दिवसात सानूने राणे बंगल्यात जाण्याचा निर्णय घेतला होता, तिला आता तिकडली
काळजी जास्त होती, आई बाबांना हवं नको काय ते तिने घरात राहून ओळखून घेतलं होतं,
बाबांची काळजी होती पण आता सुमंतची ओढ जास्त होती. ही नाती तिला आजही प्रिय होती
पण नवीन नात्याने प्रेमाने तिचं स्वागत आणि वर्चस्व स्वीकारलं होतं. तिथून तिला
निघण्याची तयारी करायची होती. श्रीची शाळा लगेच सुरू होत असल्याने तिला शिकागोला
निघायचं होतं. आज माहेरचा उंबरठा ओलांडताना तिने वळून मागे बघितलं नव्हतं. घाई
मनात होती, तिच्यासाठी राणे बंगल्यात तिची वाट अतुरतेने बघितल्या जात होती.
0 Comments