जोडीदार ... प्रवास तुझा माझा....भाग २१
राणे पॅलेस
सानू जयासोबत
शॉपिंग करून आली, तीने जराही जयाला जाणवू दिली नाही की ती तिला पारखू पाहत आहे.
जयाने पेमेंट केला ते कार्ड सुमंतच होतं ही सानूला माहित झालं. तरीही तिने काना
डोळा केला. तिच्या सोबत गप्पा करत ती घरी आली. दुपार झाली होती. घरी स्टेविन आणि
सारंग त्याच्या मित्रांसोबत त्याच्या खोलीत जोर जोरात गप्पा करत ड्रिंक्स घेत
होते. सानूने सारं आणलेलं सामान मारियाला लावायला सांगितलं आणि ती सहज त्यांच्या
खोलीत गेली,
सारंग पिऊन फुल
होता, सानूला बघताच गोंधळला, स्टेविन सिगारेट फुंकत होता पण त्याने ती विझवली, सानू
बघून निघणार तोच, सारंग जोरात म्हणाला,
“ही आली आहे आता वचक
बसवायला म्हणे, अरे माझा दादा काही करू शकला नाही तर तू काय ग? चल निघ खोलीतून.”
स्टेविनने पुढे
होवून त्याला सांभाळलं आणि सानूला म्हणाला,
“हे सिस प्लीज डू
नॉट माइंड, त्याने खूप प्यायली हाय.”
सानूने पालटून
काहीच उत्तर दिलं नाही, ती तिथून निघाली, ती निघाली ही जयाने बघितले,
“ताई, जरा चिडले हो
हे, काल जे झालंय त्यांना आवडलं नाही. तुम्ही मनावर घेवू नका. दादा...”
सानूने तिला हात
दाखवत थांबवलं, आणि काहीही न बोलता निघून गेली.
आता तिला सर्व काही
माहीत करून घ्यायचे होते, ती हॉलमध्ये येवून बसली, तिने लॅपटॉप उघडला आणि तिकडेच
काम करत राहिली, मारियाने तिच्या साठी कॉफी आणली,
“मॅडम सरांनी फोन
करून सांगितलं आहे तुम्हाला कॉफी लागते काम करताना.”
सानू स्मित हसली,
आणि कामात बिझी झाली, तिकडे खोलीतून सारखे आवाज येत होते. मासाहेब त्यांच्या खोलीत
गुमान पडून होत्या. सानू आज इकडेच हॉलमध्ये असल्याने कुणीही नंतर हॉलमध्ये भरकटलं
नाही. मुलं चारला घरी आली आणि मग घरात सानूच्या मागे मागे ती होती. सारंगच्या
खोलीतील पार्टी मात्र अजूनही संपली नव्हती.
जसीका सानूला
म्हणाली,
“मामी, तुला त्रास होत नाही काय ग? मीन्स इट्स लाऊड यू नो.”
“आज तो लाऊड एकायचा
आहे मला, कारण परत तो ऐकायला यायला नको ह्या राणे पॅलेसमध्ये.”
“व्हॉट मामी ?”
“इट्स ओके, तू खा आणि
स्टडी कर.”
“ओके मामी, पण मी
इथेच तुझ्या जवळ बसते.”
“ओके, नो
प्रॉब्लेम.”
काही वेळाने साशंक
आणि सुमितही सानूजवळ अभ्यासाला बसले. बसल्या बसल्या सानूला आईच्या चहाची आठवण
झाली, घडीकडे बघितलं तर वाटलं तिकडे सगळे गाढ झोपेत असतील.
चहा हवा होता मग
करायचं काय ह्या विचारात ती शिरली. आईकडे कधी एवढ्या पाच एक वर्षात स्वत: केलेल्या
नव्हता, अगदीच आठवी नवीत असतांना बाबा घरी येण्याच्या वेळी सानू चहा मांडून
बाबांची वाट बघत बसायची. आठवणी तिच्या मनात घोळत होत्या. तोच सुमंतचा फोन आला,
“हे सानू टेस्टिंग
सुरू आहे. जरा रिपोर्ट बघून घे, मला जरा यायला वेळ होईल आज.”
“अरे सुमंत.. ऐक ना”
“बोल बोल, पण लवकर.”
“जावूदे, आल्यावर
बोलू.”
“महत्त्वाच आहे का?”
“नाही तेवढं, तू ये
मग बोलू.”
सानूने आता आळस
टाकला आणि ती उठली, मारिया तिला विचारायला आली,
“मॅडम, चहा घेणार
का?”
“तुला येतो का
करता?”
“हो आधी मासाहेब
किचनमध्ये यायच्या तेव्हा त्यांनी शिकवला आहे मला.”
“टाकतेस का
माझ्यासाठी? मी जरा काही ईमेल बघून घेते.”
सानू परत कामात
मग्न झाली तेव्हाच हॉलमधून सारंगचे मित्र निघून गेले. स्टेविन त्यांना सोडायला
दारा पर्यंत आला. परत निघताना त्याने सानूवर जरा कटाक्ष टाकला आणि मग काहीही न
बोलता त्याच्या खोलीत निघून गेला.
जसिका हळूच
म्हणाली,
“हे असचं सुरू असते
मामी, आम्ही इकडे हॉलमध्ये सहसा बसत नाही. ममा तर अजून घरी आली नाही.”
“कुठे गेली आहे ग
ममा.”
“माहीत नसते
कुणालाच पण उशिरा पर्यंत येते. आज पपा घरी आहे, तो पण नसतो.”
“बरं, तू अभ्यास
कर.”
सानूला जवळपास सर्व
लक्षात आलं होतं. वाया गेलेल्या राज्याची धुरा तिच्या हातात होती. तसा तिला कुणाचा
त्रास नव्हताच, ती तर राणी म्हणून शिरली होती त्या पॅलेसमध्ये पण काय होतं ते तिला
दोन दिवसांत सलत होतं.
--
सानू गुंतली होती
नात्यांची सुटलेली गुंफण परत विण्यात. महिना झाला होता सानूला इकडे शिकागोमध्ये.
मोहिते निवासात
बाबांना सानूच्या येण्याचे वेढ लागले होते. सानू कधी येईल ही त्यांना सारखं वाटत होतं. बाळूने बंगलोरला फ्लॅट किरायाने
घेतला होता. अनुची घरात बांधा बांध सुरू होती.
आज परत आई बाबांना
निवांत भेटला होता, दुपारी दोघेही बसून ऊन
खात होते.
“काय ग सानू कधी
येणार आहे माहीत आहे का?”
“अहो, कालच तर
बोलली, पुढच्या रविवारी इकडे पोहचेल म्हणून. तिचा प्रोजेक्ट संपलाय म्हणे इकडला. डिलीव्हरी
आहे म्हणत होती.”
“पुढल्या रविवारी
हो ना, आणि बाळू अनु सोमवारी निघणार आहेत. किती दिवस राहणार आहे सानू काही माहीत
आहे तुला?”
“घ्या! हे तर
तुम्हाला माहीत पाहिजे ना.”
“नाही ग मला नाही
माहीत, पण ती काहीतरी बोलत होती दत्तक बाळ घेणार आहे असं म्हणत होती.”
“अग बाई हे काय आता
नवीन, कशाला म्हणाव, आता तर लग्न झालंय, होईल ना तिला. काहीही विचार करते ही
मुलगी, येवू द्या इकडे समजावते तिला.”
“अग, सानू बोलली
आहे, म्हणजे हा निर्णय दोघांचा असेल. ती कधीच कुठला निर्णय असाच घेणार नाही आणि
बोलणार पण नाही.”
“अहो पण हे काय
आता, अजून काय हो माहीत आहे तुम्हाला?”
“एक मुलगा आहे
म्हणे, पायाने लंगडा आहे, बारा वर्षाचा.”
“अग बाई, आता हे काय!!!
लहान मुलं काय कमी आहेत. बारा वर्षाच्या मुलाला काय माया लागेल तिची.”
“हेच, हेच तर आहे
माझ्या मुलीत, तुला नाही समजायचे. मी भेटलो त्या मुलाला.”
“अग बाई, घ्या,
म्हणजे तुमची साथ आहे तर... विचित्र आहे सर्व, कसा तो देव माणूस तयार झाला काय
माहीत. आता घर बघाव तिने, हे काय नवीन डोक्यात तिच्या. तुम्ही बरे खत पानी घालता हो.“
“काहीही बोलू नको, पण
तिने काही विचार केला असेल ना? जावूदे, राणीची काही खबर, तिची सासू काहीतरी बोलत
होती म्हणे त्या बर्वे बाई बोलत होत्या.”
“अहो काय ते, लोकं
ना आपलं विसरतात आणि मग सुनेला बोलतात. आपल्या राणीची तीच कथा आहे. पण बरं बाई
माझा जावई भला, काही फरक पडत नाही माझ्या मुलीला. आणि तुम्हाला माहीत आहे का,
रागिणीच लग्न आहे म्हणे लवकर. त्यांची तयारी सुरू झाली आहे. तीन चार महिन्यांनंतर
आहे असं आलं ऐकायला हो.”
“अरे व्हा, जावई
तोच ना आयएसआय ऑफिसर... रागिणीची निवड ना?”
“हुमम, लव कम अरेंज
मेरिज हो...””
“असं काय बोलतेस,
तुझ्या बहिणीच आहेच ना.”
“अरुने सिद्ध केलंय
स्वत:ला, तिची गोष्टच न्यारी. जोडीला जोड आहे अस्मित बुवा. पक्के जोडीदार आहेत ते.
उभं केलयं त्यांनी स्वत:च साम्राज्य. दरारा आहे माझ्या अरुचा...”
“हुमम आता आपलं तर मापलं ना, रागिणीच पण असंच आहे ग.
तिने घरी सांगितलं, दोन्हीकडे काही प्रॉब्लेम नाही.”
आणि दोघेही हसले,
तेवढ्यात अनु अंगणात आली,
“आई माझी ती छोटी
बॅग दिसली काय हो?”
“अग मी धुतली आहे. बघ मागच्या अंगणात आहे.”
“असं होय, आणि आई
बाबा मी आज माझ्या आईकडे जाणार आहे, तुम्ही दोघे येणार का? बाबा बोलत होते. ते
म्हणाले तुम्हाला कॉल करतो म्हणून.”
बाबाने आई कडे
बघितलं, अनुने ते बघितलं आणि म्हणाली,
“तसं नाही, आई
म्हणत होती तुम्ही दोघे आले नाही ना कधी तिकडे मग आता मी येत आहे तर घेवून ये
म्हणून, तुमचं काही वेगळं ठरलं असेल तर काही हरकत नाही, मी दुपारी जाते आणि रात्री
परत येते.”
आई तिला थांबवत
म्हणाली,
“नाही ग काही ठरलं
नाही, पण तुझं तुझ्या आईशी काही खाजगी असलं तर मग तुला बोलता येणार नाही ना, आम्ही
तिकडे असलो तर मग आम्हाला बघावं लागेल सगळ्यांना.”
अनु आता बसली, “आई
माझं इकडे जेवढं खाजगी आहे ना तेवढं कुठेच नाही, आई सोबत पण नाही. तिला तर माझ्या
बऱ्याच गोष्टी माहीत नाहीत, आणि तुम्हाला त्या अगदीच माहीत झाल्यात. चला आपण
जावूया तिकडे आज त्यांना त्रास द्यायला.”
बाबा हसले, “मग मी
शेविंग करतो, इनबाईकडे जायचं आहे.”
आई उठली, “चल माझी
ती निळी पैठणी काढते मी, खूप दिवस झाले कुठे घालायला मिळाली नाही, जरा मिरवू या
तिकडे कोळी वाड्यात.”
सगळे हसत घरात
शिरले, आणि तयारीला लागले.
आठवडा उडत निघून
गेला, आणि पहाटे सानू मुंबईत आली, बाळू आणि अनु तिला आणायला गेले. बोलत घरी आले,
आईने आरती ओवाळली, आणि सानूने बाबांना आलिंगन देत घरात शिरली, जणू आज नव्याने वादळ
घरात शिरलं होतं , बाबांचा उत्साह बघण्यासारखा होता. सानूच्या गप्पांनी सर्वांना
भुरळ घातली होती. सानूला दुपारी अनाथ आश्रमात जायचं होतं.
जेवतांना बाबाने
सानूला विचारलं,
“सानू सगळं नीट ना
बाळा?”
“हो, सगळं नीट, बसं
जरा जमा जमव सुरू आहे माझी.”
“ती कश्याची ग?”
बाळू लगेच म्हणाला,
“अहो बाबा, तिकडे धुमाकूळ घालण्याआधी वादळ स्वत: एनर्जी साठवत आहे, काय तुम्ही
एवढं छोटसं कळत नाही... अरे वादळा आधीची शांतता आहे ही.”
सानू वांग्याची
भाजी परत मागत म्हणाली,
“आई तुझ्या हातच्या
भाजीची चव ना, आख्या जगात नाही ग, काय मस्त चव आहे यार. दे मला थोडी अजून.”
आईने भाजी तिला
वाढली आणि म्हणाली, “सानू मी भाजी नाही ग केली आज, अनुने केली आहे.”
सानू अनुकडे बघत
म्हणाली, “चायला आम्ही हिच्या मुली पण आम्हाला नाही जमली हुबेहुब चव पण तुला बरी
काही महिन्यात जमली ग, मोहित्यांच्या सुनांसाठी राखीव आहे कि काय बाबा.”
अनु हसली¸ “अहो ताई
मी ना जवळपास सगळं शिकून घेतलं आहे.”
आई तिच्या जवळच
बसली होती, तिच्या पाठीवर हात ठेवत म्हणाली,
“बघ, मी नसले तरीही
मोहिते निवासात तुला हाच भाजीचा सुवास भेटेल.”
अनु लगेच म्हणाली, “नसेल
म्हणजे, अजून खूप शिकायचे आहे मला.”
सानूने आता विषय
बदलला,
“हा तर शेंबड्या..”
“ये तायडे, आता नको
ग बोलू ना असं, बायको आहे माझी.”
“असं, मला वाटलं ही
तर मोहित्यांची सून आहे. पण तरीही यार तुला शेंबड्या म्हटल्या शिवाय मला काही आजचं
जेवण पचायचं नाही, हवी असेल तर परवानगी काढते तुझ्या बायकोची.”
“अहो बाळूची बायको,
काही हरकत आहे का?”
“म्हणा हो, आधी
तुमचा भाऊ आहे तो.”
चला परवानगी
मिळाली, “काय रे शेंबड्या, मला वादळ म्हणत होतास ना तू.”
“मग काही हरकत आहे
का?”
“नाही, आहेच मी आणि
हो, ही वादळा आधीची शांतता आहे, सगळं ओळखून हमाला बोल करायचा, उगाच माहित काही
नाही आणि बोंबलत मी सुटत नाही...”
“अबे काही खरं नाही
बाबा राणे पॅलेसमध्ये, पॅलेसच ना?”
“हो, ये कधीतरी.”
“नको बाबा, अजून
तरी आमची लढाई इकडेच सुरू आहे. ती मजल गाठायला वेळ आहे.”
“वाट बघते मी.”
आई आणि बाबा मात्र
सानूच्या बोलण्याने सुखावले असले तरी मनात चिंतित पडले होते. दुपारी अनु आणि अंकित
त्यांची तयारी करत होते आणि सानू अनाथ आश्रमासाठी निघून गेली. सुमंत सोबत
ठरल्याप्रमाणे तिने श्रीकांतची भेट घेतली. संचालकला विश्वासात घेतलं आणि त्याची
ट्रीटमनेट सुरू करण्याची अनुमती घेतली. श्रीकांतला सोडून तिने संचालकाला स्पष्ट सांगीतलं
की ती त्याला दत्तक घेणार आहे म्हणून. रीतसर कारवाई सुरू करण्याची विनंती तिने
केली. सुमंतही ऑनलाइन होताच, त्यानेही सर्व स्पष्ट केलं. श्रीकांतचा इलाज भारतात
झाला नाही तर त्याला कायद्याने दत्तक घेवून ते शिकागोला नेणार हेही ठरलं. आणि आधी
त्याच्या इलाजाची सोय इकडे बघण्यासाठी प्रयत्न सानू आणि संचालक करणार होते. ठरल्या
प्रमाणे उद्या सानू त्याला हॉस्पिटला घेऊन जाणार होती.
कथेचा पुढचा भाग लवकरच.---
0 Comments