जोडीदार... प्रवास तुझा माझा... भाग ६

 जोडीदार... प्रवास तुझा माझा... भाग ६


सुमंत निघाला आणि घरात वातावरण अगदीच उत्साहित झालं, पण पाहुण्यांमध्ये कुजबुजही होतीच की नवरा मुलगा लग्नाआधी नवऱ्या मुलीला तिच्या खोलीत भेटायला गेलेला म्हणून. पण काय ना माहिते काळानुसार बदलले होते. आणि घरच्या मुख्य माणसांनाच काही फरक पडणार नव्हता, तर मग काय!

अनया घरात वावरत होती तेही नवलच होतं ना पाहुण्यासाठी, अनया आणि अंकितचा तर ना बारात ना बेंडबाजा सीधा दरवाजा असं होतं. ग्रुप ग्रुप मध्ये बसलेल्या पाहुण्यांना विषय भरपूर होते बोलण्यासाठी. पण चालायचे... मुलांच्या सुखासाठी आयुष्यभर मर-मर करणाऱ्या पालकांनी त्यांनाच त्याच्या इच्छेने जगण्याचे स्वतंत्रता न देणे, म्हणजे पालकत्वाचा अपमानच की.... मुलांच्या सुखात आपलं सुखं मानणाऱ्या पालकांना मुलांच्या सुखासमोर दुसरं काय असायला हवं.

असो... पालकत्व एक कठीण आणि मनाला हवासा असणारा कधीही न संपणारा प्रवास आहे. आणि मुलाचं लग्न म्हणजे आई वडिलांचीही कसोटी असते. नवीन नाती जुळवणे जेवढे सोपे ना तेवढे ते टिकवून ठेवणे महाकठीण. जो जोश नवीन नाती जुळतांना मनात असतो तोच जोश कितींचा कायम असतो? लग्नाच्या वरातीत आनंदाने नाचणारी लोकं कधी वर्षभरात त्याचं नात्यावर बोटं मोडतांनाही आपण बघतो... अर्थात नाती आली की त्याला निभावताना मेहनत आलीच की हो, बघा पटलं तर...

सर्व आवरता-आवरता संध्याकाळ झाली, हळद सुरु झाली होती. सानू, अनु, राणी, आराध्या मावशी, सुनी काकी, मामी, अंजू आत्या सर्व महिला मंडळ मांडवात होते. आरतीची घरात घाई सुरु होती. ओरडून ओरडून तिचा आवाज अगदीच कमी झाला होता. आणि आता तो कुणाला ऐकायलाही येत नव्हता.

अरुण मात्र आज दुपार पासून त्याच्या खोलीतून खूप काही निघाला नव्हता. त्याला आज अस्वस्थ वाटत होतं. आणि हे फक्त भीमा काकाला माहित होतं. भीमा काका आणि सदा काका त्याच्या जवळ दिवसभर होते. आणि घरच्यांना वाटत असायच की मित्र सोबत आहेत म्हणून.

आरतीला जर जाणवलं होतं पण भीमा काकाने तिलाही फारसं कळू दिलं नव्हतं. त्यांनी परस्पर डॉक्टरांना संपर्क साधून अरुणची काळजी घेतली होती. कारण सानूला हे माहित होवू द्यायचं नव्हतं कुणाला...

आरती ओरडत खोलीत शिरली,

“अहो मुलीचे बाबा चला मुलीला हळद लावायची आहे, आणि हे काय अजुनही तुमची तीन पत्ती सुरूच आहे. चला आधी सर्व खोळम्ब्लेत तिकडे.”

“चला हो भीमा काका आणि सदा जीजू तुम्ही काय करता इकडे. तिकडे चला”

आरती समोर आता कुणी आय बोलणार होतं, निघाले सर्व. बाबा आणि आईने जोड्याने सानुला हळद लावली. आणि तिची हळद आता कुठे रंगत होती.

अंकितने अनयाला मागून येवून तोंडाला हळद लावली आणि मग सर्व मांडवात मजा सुरू झाली, प्रत्येक जोडीने आपल्या आपल्या जोडीदाराला हळद लावावी हा सर्व संमतीने निर्णय पास झाला.

मांडवात असणार्‍या सर्व जोडीदारांनी आपल्या आपल्या जोडीदारांना हळद लावली. उत्सव सोहळा होता तो. अंकितने तर अनयाला खूप छळलं, तिच्या हातीच येत नव्हता तो, शेवटी घराच्या मागच्या अंगणात अनुने त्याला छकुलीच्या मदतीने गाठलं आणि मग हळद लावली. अंकितने मोक्याचा फायदा घेतला आणि त्याला लावलेली हळद त्याने त्याच्या गालावरून तिच्या गालावर पोहचवली.

ये, सोड ना, काय हे तुझं!”

सोडण्या साठी नाही धरलय.”

अरे आता सोड कुणी बघेल.”

“बघेल तर बघेलं, काय भितो तो काय मी, आता लग्न झालं माझं, मागे राणीच्या हळदीच्या वेळी लपून हळद लावली होती तुला... आठवते ना...? पण आता हे असं मिठीत घेतो आणि हे असं लावतो...”

म्हणत त्याने त्याचा गाल तिच्या गालावर घासला... अलगद ओठ ओठांना लागले... आणि मग त्या ओठांच्या मिलनाला साक्ष होती हळद...

अंजू आत्याने पटकन मागचं दार उघडलं, आणि अंकित भानावर आला,

अनु पटकन आत्या जवळ गेली,

 “आत्या बघ ना किती हळद लावतोय मला, आणि किती वेळेचा लावतोय.”

“आत्ये आताचा उघडायच होतं काय ग?” अंकित हळद पुसत म्हणाला.

अंजू आत्याने त्याला आणि अनुला बघितलं आणि ती हसत बाळूकडे आली, त्याचा कान ओढत म्हणाली,

“ये, काय रे माझ्या सुनेला इथे त्रास देतोस... तुला काय मोहित्यांची परंपरा माहित नाही.”

“माहित आहे ना, तेच पूर्ण करतोय... कान सोड ना अत्तु, दुखतोय...”

“असं... चल पाणी गरम झालंय तिकडे, अंघोळी करा पटापट.....”

अंकितने निघतांना अनुला इशारा केला, आणि हळूच ओठ हलवत म्हणाला, “बघतो तुला खोलीत, इथे कोण येणारं.”

अनुने त्याला अंगठा दाखवला आणि ती हसत होतीच तर तिची नजर अंजू आत्यावर पडली, अंजू आत्याही हसली.

पाण्याचा पंप आवरतांना तिला अमित आठवला, आज मांडवात फक्त तिचाच जोडीदार नव्हता, हळदीच्या नावाचे आणि आत्या म्हणून मानाचे दोन बोटं गालावर लागले होते. मोडून पडलेला संसार ती स्वत :च उभा करत होती पण जोडीदाराची कमी तिला सलत होती. स्वतःला समजावत पाणी भरत होती. तिच्या आयुष्यातल्या रंगांना लागलेली नजर कशी उतरवायची हेच कळत नव्हतं...

इकडे सानूने हळद लावलेले फोटो सुमंतला पाठवले होते आणि त्यानेही त्याचे हळदीचे फोटो शेअर केले होते. दोघेही खूप खुष होते. उद्या लग्न सोहळा होता.

सानू खोलीत अंघोळ करून निवांत बसली होती, उद्यापासून ती मोहिते निवास सोडून राणेंची सून होणार होती. मोतोश्री सदनात तिचा गृहप्रवेश होणार होतं. तसा तो बंगाला तिनेच सजवला होता आणि कहीदा जावून आली होती. पण उद्यापासून तिथली सून म्हणून वावरणं म्हणजे नवीन प्रवास सुरु होणारं होता.... नाती ओळखीची झाली असली तरी नाती जपायची होती. वाऱ्याचे पंख लावून स्वतः च्या मनमर्जीने उडणारी नात्याच्या हवाश्या कैदेत शिरणार होती....

अचानक राणी खोलीत शिरली तेव्हा तिचे डोळे लाल होते. राजनही तिच्या मागेच शिरला, हळदीसाठी आलेला होता आणि आज पासून तो इकडेच राहणार होता.

सानू दचकली, म्हणाली, “अहो राजन रावं काय काय झालंय? सर्व ठीक आहे ना?”

राजन, “हो हो सर्व ठीक आहे दी.”

“मग ही का रडते आहे.”

आणि राजन हसायला लागला...

“अहो सांगताय का मला?”

“राणी तू सांग काय झालंय...” राणी अजूनच रडायला लागली.

सानू, “ये वेडाबाई सांगतेस कि रागावू राजन रावांना.”

राजन,“दी, हे बरय, अभ्यास करायचा नाही हिने आणि नापास व्हायचं आणि मी रागवून घेवू, दी तिचा एक विषय राहिला आहे ह्या सेमिस्टरचा.”

सानू, “अरेच्या, राहूदे ना, काढून टाक पुढ्या वेळी, रडायचं काय... पेपर कठीण होता म्हणायचं.”

राणी, “ताई तुला तर माहित आहे रागिणी?”

सानू, “तिचं काय? गोड आहे ती, काही म्हणार नाही.”

राणी, “तसं नाही, तिने शिकवणी दिली होती त्या विषयाची, तरीही राहिला ना ग, मग तिला कसं वाटेल.”

सानू राणीला चिडवत, “म्हण ना ग, अजून शिकव म्हणून, तेवढाच तुला आणि तिला वेळ मिळेल... तिचंही लग्न ठरलंय ना?”

“काय हो राजन रावं जावई एकदम ISI ऑफिसर मिळालाय तुम्हाला.”

“हो, सगळी आमच्या बहिणाबाईची कृपा, शोधून कुठे मिळणार होता असा जावई. तीही ISIची अंतिम परीक्षा देते आहे आणि त्याची पोस्टिंग आहे लवकरच.”

“अरे व्हा, मग कधी ठरलंय लग्न?”

“रागीनीची परीक्षा झाली की.”

“मस्त, मग आहे की रागिणी राणीला शिकवायला अजूनतरी.”

“हो तर, म्हणूनच मी राणीला सांगतोय ना, की काही काळजी करू नको म्हणून, पण ही सारखी रडते म्हणते, म्हणून मी संगीतलही नव्हतं हिला पण माझा फोन बघितला हिने आणि हिला रिझल्ट दिसला, आता काय, रडू बाई रडत आहे. केव्हांची.”

“अरे पण काय राजन रावं मोबाईल कशाला दिला मग .”

“अरे दी, हळदीचे फोटो बघता बघता तोही रिझल्टचा फोटो तिला दिसला, मग काय करू.”

“आता समजवा तिला, मी निघते टेरेस वर. तुम्ही बोला,”

राणी अश्रू पुसत म्हणली,“ताई, तू थांब आम्हीच जातो वरच्या खोलीत, मी अंजू आत्याला पाठवते इकडे. छकु आणि ती अॅडजस्ट होतील इकडे.”

“तेही ठीक, पण रडू नकोस, निघेल विषय अजून काही वेळ गेलेली नाही...” तोच सानूचा फोन वाजला. तो सुमंतचा होता. राणीने ने बघितला आणि ती राजन सोबत खोलीतून निघून गेली.

इकडे बाबांच्या खोलीत गडबड सुरु झाली होती, बाबाना अचानक त्रास वाढला होता. आरतीच्या आता लक्षात आलं होतं. भीमा काका आणि सदा काका सतत सोबत होतेच पण आरती आता घाबरली होती.

रागात म्हणाली, “काय हो तुमचं, आता लेक म्हटल कि हिंमत करावी लागते. दोन घराची दुवा असते ती, हे असं तुम्हाला बघितलं तर ती काही लग्नाच्या मांडवात उभी राहायची नाही. चला घ्या बऱ औषधी.”

बाळू खोलीत डॉक्टरांना घेवून शिरला होता. डॉक्टर तपासत होते तर म्हणाले,

काय हे मोहिते साहेब, तुम्हीच म्हणाला होतास ना मागच्या आपल्या बैठकीत कि मुली माझ्या मुलांसारख्या आहेत म्हणून, आणि आपली सानू काय वादळ आहे हो, तीचा एक पाय तर इथेच राहिल तिच्या इथेल्या ऑफिसमध्ये, काही काळजी नाही... बोलली होती ती मला मागे दर तीन महिन्यात इकडे ऑफिसला भेट असेलच तिची म्हणून. काही काळजी नाही आपली लेक सतत डोळ्यासमोर असेल.”

अरुण स्मित हसला, “माझ्या लेकीला सांगू नका ह्यातलं काही, नाहीतर ती उगाच सर्व मनाला लावून घ्यायची.”

“मग करा कि स्वतःला तयार, नाहीतर सानू सरळ सगळी तयारी मोडून पाडेल.”

आणि डॉक्टर आरतीला म्हणाले, ”ह्यांना मी औषधी दिल्या आहेत, आता द्या आणि निवांत आराम करू द्या, उद्या सकाळी ते ठणठणीत बरे होतील. काही काळजी नाही, जरा थकवा आणि लेकीसाठी हळवे झाले आहेत.”

नंतर त्यांनी बाळूला बोलावून सगळं सांगितलं, आणि निघून गेले.

कथेचा पुढचा भाग लवकरच.


---

तुम्ही मनातल्या तळ्यात what's app ग्रुपही जॉईन करू शकता, कथेचे अपडेट तिकडे तुम्हाला सहज मिळतील.
लिंक- https://chat.whatsapp.com/IUtIE0RJdnE94Jna0UTviJ
कथेचा.. बऱ्याच वाचकांनी ही कथा पहिल्या पर्वा पर्यंत वाचली आहे आता पुढे जोडीदरासोबतचा प्रवास नक्की वाचा ....

© उर्मिला देवेन
urmiladev@gmail.com
कथा वाचण्यासाठी मनापासून धन्यवाद!!

कथेच्या प्रकाशनाचे आणि सर्व अधिकार उर्मिला देवेन कडे कायद्याने राखीव... कथा कुठेही चोरून टाकलेली आढळल्यास कॉपीराईट कायद्याअंतर्गत शिक्षेस पात्र असाल...
कथेवर प्रतिक्रिया नक्की नोंदवा! आवडल्यास लाईक/ कमेंट/शेअर नक्की करा!
कथेचा पुढचा भाग लवकरच.
स्टे कनेक्ट, स्टे सेफ...
फोटो आभार गुगल

Post a Comment

0 Comments