जोडीदार.. प्रवास
तुझा माझा .. भाग ९
घरातल्या
घरात लग्न म्हणता-म्हणता सोहळा जरा वाढला होताच की, पण मोहिते खुष होते.
होमाची विधी
झाली आणि सून मुख विधीसाठी मासाहेब समोर आल्या, मुलाला आणि सुनेला त्यांनी काही वेळेसाठी
मांडीवर बसवलं आणि सानूचा चेहरा आरशात बघितला, तिच्या पाठीवर हात फिरवत तिच्या
वेणीवर सोन्याची फूलं बांधली. उपहार स्वरूप कमरबंद हातात दिला. सोहळा अंतिम चरणात
आला होता ... मांडवात जेवणं सुरू झाली होती. सारेच वर वधूला आशीर्वाद देऊन परत
निघत होते. मांडवात मोजके लोकं होती.
अरुण जरा
शांत झाला होता, भीमा आणि सदा त्याच्या जवळ आले आणि म्हणाले,
“अरुण
मुलांकडल्याना जेवणाच आमंत्रण द्या तुम्ही दोघ मिळून, ही पिशवी मासाहेबानी दिली
आहे. बघ रे ह्यात काय ते.”
सदाने उघडून
बघितली तर त्यात चांदीचे भांडे, सोन्याचे मनी, मोती होते. अरुण भीमा कडे बघत होता.
भीमा पटकन म्हणाला,
“अरे
मुलांकडल्याना आमंत्रण द्याचं असतं चांदीच्या वाटीत ५ मोती आणि ५ सोन्याचे मणी घालून अक्षता घालून
द्यायचे असते. हा त्यांचा मान असतो. आणि सान्यांची ती परंपरा आहे म्हणे. मासाहेबांना तर
काही हरकत नाही पण बाकीची पाहुणे मंडळी आहेत त्यांचा मान ठेवण्या साठी ही पद्धत
करावी लागेल. मी बोललो होतो सुमंतशी, पण तो म्हणाला, काही काळजी करू नका म्हणून.”
“अरे पण हे
जरा जास्त झालय ना, आता लग्नाच्या पद्धतीचा स्थर बदलला, आणि आता हे! म्हणजे सारं लग्न
त्यांनीच ठरवलं असं झालंय, आपल्याला कसं वेळेवर समोर येतंय. काही बोलण्यासाठी
चान्सच नाही. मान्य आहे राजघराण्याशी संबध जुळलेत पण लग्न इथे मोहिते निवासात होतं
आहे, आमच्या ऐपती नुसार उत्तम सगळं आहेच ना... मग हे नवीन नवीन काय रे समोर येत
आहे. मी बोलणार मासाहेबांना, आधी सगळं सांगायचं ना, आम्ही केली असती जुळवा जुळव,
मुलीचा बाप आहे तिच्या आनंदासाठी सारं काही करू शकतो.”
“अरे शांत
हो, कशाला उगाच ह्या शेवटच्या रीतीसाठी उगाच बोलायचं, लग्न होवून जावू दे बोलूया
आपण मासाहेबांशी आणि सुमंत रावांशी.” भीमा अरुणला शांत करत म्हणाला.
अरुणला हे
काही पटलं नव्हतं, त्याने ऐक नजर सानूवर टाकली, तिचा तो आनंदी चेहरा बघून सांर
काही विसरला अरुण, आणि आरतीला आवाज दिला त्याने. दोघांनी पाहुणे मंडळींना रीतसर
जेवणाच्या पंगतीच आमंत्रण दिलं. आता मात्र अरुणला मनावर ओझं असल्याच भास होतं
होता, आणि त्याच्या छातीत हलकंस दुखायला लागलं, पण सांभाळत त्याने सर्वांसोबत बसून
जेवण केलं.
सोहळा अंतिम
चरणात आला होता.... पाठवणी साठी सानूला रीतसर तयार व्हायचं होतं. मासाहेबानी
तिच्यासाठी वेगळे कपडे आणि दागिने आणले होते. सानू तयार होण्यासाठी निघून गेली...
पण मोहिते अटकले होते मनाने त्या सोहळ्यात, सानूची पाठवणी हा अंतिम सोहळा मनाला
कोरत होता... पण रीत जगाची, लेकीला परक्या घरी पाठवणं म्हणजे काय ते आपण सर्वच जाणता...
पेशवाई पेहराव परिधान करून सानू तयार झाली होती. आनंद तिच्या चेहर्यावर
झळकत होता. बाबाने अलगद दार ठोकलं,
"मोठ्या पेशवीण बाईचा जरासा वेळ मिळेल काय
आम्हाला?"
सानू पालटली, "बाबा,
काय हे, मी तुमची सानू, पेशवीण
बाई मी राण्यांच्या घरात, इकडे मी सानूच ठीक आहे."
आणि ती बाबांना बिलगली. आसवांनी ओला झालेला अरुणच्या खांद्यावरचा
शेला तिला जाणवला, लक्षात सारंच आलं होतं, पण
तिने अश्रुला वाट मोकळी केली तर बाबा गडबडतील हेही तिला माहित होतं.
आलिंगन देताना तिच्या पेशवाई नथीचा दांडा बाबांच्या सदऱ्याच्या
धाग्यांमध्ये गुंतला, बाबा अलगद काढत म्हणाले,
"सानू, पेशवाई मान
ह्या नथीत असतो म्हणतात, बस तो मान जप आणि नाती मनांच्या
धाग्यात सतत गुंतून ठेव. हा गरीब बाप तुझ्या पेशवाई थाटाची बरोबरही करू शकत नाही
पण तो थाट कायम ठेवावास हा आशीर्वाद आहे माझा. तू समजदार आहेस, जरा मनाला बोचलं म्हणून बोलतो, मासाहेबांनी केलेली
सर्व रीती भाती डोळे दीपणाऱ्या होत्या, पण एवढं करायचं नसतं ज्याने समोरच्याला कमीपणा वाटेल. आम्ही जे आहोत त्यात
त्यांना हिरा गवसला मग हा हिरा जपण्याचं काम त्यांनी खाणीत नाही तर महालात करावं,
एवढंच म्हणणं आहे. इथल्या रीती भाती इथल्या पद्धतीने व्हायला हव्यात
ग, तिकडे तू सोन्याच्या ताटात जेव पण इथे ताट स्टीलचंच
चकाकले ग,"
सानुला बाबांचा सूर कळाला होता पण मनात शांत बसलेलं वादळ तिला
उठू द्यायचं नव्हतं, बाबांचं बोलणं तिने शांत एकूण घेतलं कारण
त्यांचं खाणारं मनही मोकळं व्हायला हवं होतं. ती बाबांना आश्वासित करत ती हळूच
म्हणाली,
"बरोबर बाबा, मलाही
जरा वेगळंच वाटलं पण दूध नासायला काहीच वेळ लागत नाही म्हणून गप्प होते पण पुढची
रीत आई जशी करेल तशीच होणार."
तिने फोन हातात घेतला, सुमंतला लावला,
“सुमंत जरा मासाहेबांनी आवर घाल, इथे सर्व अवघडले आहेत रे, पाठवणी आईच्या मनाची होवू
देत."
सुमंतला तिचा इशारा कळाला होता. त्याने काळजी करू नकोस म्हणत
फोन ठेवला. आई दारात उभी होती. बाबांनी आईला इशारा केला आणि ती लगेच तयारीला
लागली.
बाबा परत सानूच्या डोक्यावर हात ठेवत म्हणाले,
"पेशवे बाई, आमच्या
मनाचा मान राखलात अजून काही नको."
त्यांचं भरून आलेलं मन त्यांनी मनातच मुक्त केलं. आज ते
सानूसमोर नव्हे तर राण्यांची मोठी सून श्रीमती सानवी सुमंत
राणे होती. पेशवे घराण्याचा वारसा होता म्हणून मांडवात सासरचे तिला पेशवेबाई
म्हणून हाक मारत होते आणि तो मान खूप मोठा होता मोहित्यांसाठी.
बाबा खोलीतून जड पायांनी निघाले आणि राणी, अनु खोलीत शिरल्या, सानूला पेशवाई पेहऱ्याव्यात बघून
राणी तर बघतच राहिली,
"तायडे तू तर पेशवे बाईचं दिसतेस ग."
"दिसते काय! आहेच ताई पेशवे बाई." अनु
खोली आवरत म्हणाली.
सानू स्मित हसली, राणी आणि सानूला
जवळ ओढत म्हणाली,
"राणी, अनु बाबांची काळजी
घ्या ग, मी ना ही गेली आणि ही आली बघ उद्या."
"तू काळजी करू नकोस मी अजून आहे इथे काही
दिवस, बोलले मी राजनशी आधीच, आणि
त्यांनी आईलाही सांगितलं तस मगाशी, इथून कॉलेज करेल मी काही
दिवस. आणि अनु वहिनी आहेत ना त्यांना सांभाळायला. "
“उद्या या तुम्ही सत्यनारायणासाठी, आम्ही सर्व वाट बघतोय.” अनु खोली आवरतच होती. राणी तिला असं बघून तीही
पसारा आवरायला लागली,
“तायडे काय हे, किती पसारा केलास
ग.”
"पसाराच तर आहे माझा... कसा आवरू आणि कुठे
आवर घालू... मी ना वादळच बरी होते.... चायला प्रेमात पडले आणि सारं कसं हवंस
वाटायला लागलं."
राणी आणि सानू जवळ आल्या, "ताई आवरा
स्वतःला, तुम्ही रडलात ना तर बाबांचा तोल जाणार बघा."
अनु पटकन म्हणाली.
"तेच तर मनात कितीही रडावसं वाटलं ना तरी आज
रडायचं नाही हे मी नक्की केलंय..."
तोच आई खोलीत शिरली, "पेशेव बाई
मासाहेब आवाज देत आहेत, निघायचं म्हणतात."
"अनु घे ग ही आरती, फिरव
पेशवे बाईला मांडवात, प्रत्येकाचा आशीर्वाद घे
म्हणावं."
अनुने आरती घेतली पण ती आईकडे बघत राहिली, तर आई परत म्हणाली,
"हो हा मान तुझा आहे, सून
आहेस ह्या घरची, ही सारी सत्ता तुला सांभाळायची आहे."
आणि मग सानू राणी कडे बघत ती म्हणाली,
"माझ्या मुलींना सुद्धा आता तुला संभाळायचं आहे अनु बाळा. हो
पुढे आरती घेऊन."
सानू अनुसोबत मांडवात आली, मोहिते पद्धतीने
पाठवणी सुरू झाली, सानू प्रत्येकाला भेटत होती आणि आठवणी
जाग्या होतं होत्या. मांडव पाहुण्यांनी भरला होता आणि डोळे अश्रुनी. पण हिम्मत
कुणाची अश्रुनी वाहतं करण्याची. सानू बाळू समोर उभी झाली आणि सारं कसं थांबलं,आता मात्र दोघेही गडबडले, शब्द नव्हते पण मन बोलत
राहिली, सानू स्वत:ला आवरत म्हणाली,
"शेंबड्या सांभाळ सर्व, नाहीतर हे वादळ तुला सोडणार नाही."
बाळू हसला, "चायला अजून
वादळ आहेच तर मी तर शोधत होतं, चला शाशवती झाली ही आपली सानूदीच
आहे."
डोळ्यांची किनार चोरून पुसत बाळू सानुला बिलगला. त्याचा गिळला आंवढा
सानूने जाणून घेतला.
सानू गेटसमोर आली जरा थबकली, पालखी पुढे होती.
तिने बाबांकडे बघतील, ती धावत आली आणि बिलगली, बाबा हळूच म्हणाले,
"पालखी मोहिते निवासासमोर आहे मला काहीच
हरकत नाही. तू राण्यांची सून आहेस, तो तुझा मान आहे."
"बाबा, काळजी घ्या,
मी येते उद्या, आपण निवांत बोलू. मनात काहीच
ठेवू नका. उद्या तुमच्या जावयांना घेऊन येते."
बाबांनी तिची पाठ थोपडली, लाड केला. हात
पकडला आणि गेट पर्यंत आणलं,
"सानू वादळ आहेस आणि वादळच राहावीस ही माझी
इच्छा आहे. पेशवे बाईचा मान कायम असो...." बाबांनी
मासाहेबांना हात जोडले.
राणेयांच्या परंपरेनुसार सुनबाई पालखीत माहेराहून निघावी असा
आग्रह मासाहेबांचा होताच, कारण सारंगच्या लग्नात तिला असा सोहळा करायला मिळाला
नव्हता. त्यांनी जातीने पालखी तयार करवून घेतली होती सानूसाठी. सानू पालखीत बसली
आणि राण्यांनी पालखी उचलली... दूरवर पालखी
चालत राहली आणि घरचे सारे... नंतर काही
अंतराने सानू कार मध्ये बसली आणि कार दूर निघून गेली.
खूप वेळ थांबवून ठेवलेले अश्रू आता मात्र वाहते झाले होते.
मांडवात आई रडत होती आणि सारेच कसे शून्य झाले होते... वादळ घरातून गेल्यानंतरची
शांतता मनाला बोचत होती. आतापर्यंत बोलका असलेला सोहळा अगदीच शांत
झाला होता.
इकडे सानूही गाडीत बसताच रडायला लागली, सुमंत तिला आवरत होता पण सानू रडत राहिली...
कथेचा पुढचा भाग लवकरच.
---
तुम्ही मनातल्या तळ्यात what's app ग्रुपही जॉईन करू शकता, कथेचे अपडेट तिकडे तुम्हाला सहज मिळतील.
लिंक- https://chat.whatsapp.com/IUtIE0RJdnE94Jna0UTviJ
कथेचा.. बऱ्याच वाचकांनी ही कथा पहिल्या पर्वा पर्यंत वाचली आहे आता पुढे जोडीदरासोबतचा प्रवास नक्की वाचा ....
© उर्मिला देवेन
urmiladev@gmail.com
कथा वाचण्यासाठी मनापासून धन्यवाद!!
कथेच्या प्रकाशनाचे आणि सर्व अधिकार उर्मिला देवेन कडे कायद्याने राखीव... कथा कुठेही चोरून टाकलेली आढळल्यास कॉपीराईट कायद्याअंतर्गत शिक्षेस पात्र असाल...
कथेवर प्रतिक्रिया नक्की नोंदवा! आवडल्यास लाईक/ कमेंट/शेअर नक्की करा!
कथेचा पुढचा भाग लवकरच.
स्टे कनेक्ट, स्टे सेफ...
फोटो आभार गुगल
0 Comments