जोडीदार... प्रवास तुझा
माझा.. भाग २
सानूला बाबांची
काळजी लागली होती. आपण इथे नसू तेव्हा बाबांचं कसं हे तिला राहून राहून मनाला बोचत
होतं. आई दिसते पण मनाने बाबांपेक्षा खंबीर आहे हे तिला माहित होतं. आई बोलून
मोकळी होते पण बाबा क्वचितच मनातलं बोलतात. बाबा कसे राहतील तिच्याशिवाय हा विचार
तिला आज खूप जाळत होता.
राणी सानूला
म्हणाली,
“तायडे, काय ग लग्न
आहे तुझं, आणि तुचं असा चेहरा करून बसलीस. मान्य आहे, बाबांवर जीवं आहे तुझा पण
आम्ही आहोत ग इथे.”
“राणी तस नाही ग,
पण?”
अनु लगेच म्हणाली, “तसं
नाही तर काय ताई, मी असेल काही महिने इकडे. मग तर झालं, आपण ना अंकितला ऐकटच
पाठवू... राहिलं तो काही महिने. नाहीतर आम्ही आई बाबांना घेवून जावू तिकडे.”
“नाही ग, आई बाबा
रमणार नाहीत तिकडे.” सानू हळूच म्हणाली.
अनु परत म्हणाली, “ताई
आपण बघू ना आपण काय होतं ते, तुम्ही आधी काळजी सोडा बघू, मी छान महेंदीचे कोण केले
आहेत. तुम्ही डिझाईन बघून घ्या. “
आणि तिने राणीला
इशारा केला, राणी लगेच म्हणाली
“तायडे, मी इकडेच
आहे. काय दोन तास तर लागतात ग मला इथे यायला.”
“राणी तसं नाही, तू
किती बिझी झालीस माहित आहे ना? घर, कॉलेज आणि... तू कुठे रोज येणारं ग इकडे..हळू हळू तुही कमीच
येशील ना... अनु आणि बाळूही बेंगलोरला जाणार, म्हणजे त्यालाही म्हणू शकत नाही, एवढा
मोठा चान्स मिळालाय त्याला. ट्रेनीग आणि नवीन प्रोजेक्ट, सगळं सेट होईल त्याच.
अनुसाठी त्याने त्याच्या ऑफिस मध्ये प्रयत्न केले आहेत... त्याला कुठे थांबवायचं
ग.
“बघ ना, आपण सर्व
आपल्या आपल्या जोडीदारांसोबत ह्या निवासातून निघून जाणार आणि हे दोघेच राहतील
इथे.“
“तायडे अजून वेळ
आहे ग, अनु वहिनी बोलली ना, कि ती सहा महिन्याने वगैरे जाईल म्हणून, तोवर आई बाबा
होतील अॅडजस्ट आणि तू आहेसच ना येत जा वरचे वर, काय कमी ग तुला.... घेवून जा आई
बाबांनाही तिकडे काही महिन्यासाठी...”
“सोपं नाही राणी
तेही, बाबांना नाही पटायचं, आणि ते आले तरी सात दिवस राहतील नीट तिकडे, जुनं खोडं
आहे राणी... तोच फरक आहे भीमा काकांमध्ये आणि बाबांमध्ये. बघ ना सुनी काकी आणि
भीमा काका जवळजवळ तीन महिने राहिले आपल्या
मुलाकडे.”
“अग ते वेळेनुसार
बदलले, आपले आई बाबाही बदलतील, तू काळजी करू नकोस. तू ना तायडे आता फक्त सुमंत
जीजू बद्दल विचार कर, बिचारे किती प्रेम करतात तुझ्यावर. तिकडे अख्ख अमेरिका
डोक्यावर घेतलं असेल त्यांनी.”
सुमंतच नावं घेताच सानू
खुलली, म्हणाली
“हुम्म, अग तो बोलत
होता कि उद्या मावशी सोबत निघत आहे म्हणे तो, पहाटे, मी ना विसरलीच ग, त्याला आता
फोन करते ग मी.”
“चला, म्हणजे, ओ
माय गॉड आणि जीजू सोबत येणारं तर...?”
“ये सांगेन हा मी
मावशीला....”
सानू आणि राणी परत
हसत होत्या आणि वातावरण खुललं होतं... हसता
हसता राणीचा फोन वाजला आणि ती गप्प झाली, फोन तिच्या सासूबाईचा होता. गंभीर होतं
राणीने उचलला, हो नाही उत्तर देत तिने तो ठेवला. ठेवताच सानू म्हणाली,
“काय ग सगळं ठीक ना?”
राणी पटकन म्हणाली,
“हो ग सगळं ठीक.”
“मग असा का चेहरा
पडला?”
“काही नाही, मी
इकडे जरा लवकर आले ना म्हणून त्यांची कुरकुर सुरु होती, कारण काहीच नव्हतं.
विचारात होत्या मी घराच्या नौकरांचा हिशोब केला होता का म्हणून. हो म्हणून मोकळी
झाले. आता ह्यांना मेसेज टाकते कि माझी वही एकदा बघून घेतील. अग ह्यांनी मला इकडे
आठवड्या आधी जा म्हणून सांगितलंय सर्वांसमोर, मग काय कुणीच बोललं नाही. मीही तयारी
केली आणि ह्यांनी सोडून दिलं मला.”
“चला, राजन आहे तर
तुझ्या सोबत, चिंता नाही, पण त्याला सर्व काही सांगायचं, काहीच लपवायचं नाही...
मनात असेल ते सांग त्याला, तेव्हाच तो सदैव उभा असेल तुझ्यासाठी.”
“हो ना ताई, राजन
आहेत म्हणून कॉलेज कसं मॅनेज होतं आहे... नाहीतर काय मोठां वाडा आणि एवढे नौकर
चाकर असून काही झालं नसतं... सगळे आपला वेळ विसरतात ग... माझ्या सासूचंही तसंच
आहे... पण मी काहीच बोलत नाही त्यांना... कधी कधी तर हेच म्हणतात का ग का नाही
बोललीस तुच बरोबर होतेस तरी... आणि मी सहज उत्तर देते, तुम्हाला कळालं ना मग त्यांनाही
कळेल लवकरच, बोलून काय करू...”
सानू हसली, “अरे
माझी वेंधळी बहिणाबाई फारच समंजस झालीय ग, अबे बोलो अपने सासुमा को हम मोहिते कि
बेटीया है... अस्सल, पारखा म्हणावं कसं कसं पारखता तर... प्रत्येक बाजू सरस
असेल... काय ग माझी बहिणा बाई...”
सानू परत तिच्या
ट्रॅकवर आली होती, गुणगुणायला लागली,
आज फिर तुमपे प्यार
आया है
आज फिर तुमपे प्यार आया है
बेहद और बेशुमार आया है
वातावरण कसं रम्य
झालं होतं... हळूच सानूने राणीला प्रश्न केला,
“राणी फॅमिली
प्लॅनिंग सुरु आहे ना...”
“हुम्म्म....
“नुसतं हुम्म्म,
बोल ग, आपणच तर आहोत.
“अग राजन म्हणतात
नकोय आता, आधी कॉलेज...
“अरे उत्तम, असला
नवरा हवा यार... पदो पदी साथ देणारा... काय ग
“अग, आमचं तेच ठरलं
आहे, पण कधी कधी आईना उगाच विषय घेवून बसतात. मग मला अवघडल्या सारखं होतं, नात्यात
कुणाचं बारसं, सातवामहिना असला कि मग लागतात माझ्या कानाजवळ... आणि मी राजनच्या.”
“मग!”
“मग काय, राजन
बोलतो ना त्यांना त्याला जमेल तसं, आणि मग परत माझी गोची होते कि मी ह्या गोष्टी
राजनच्या कानावर घालते. भसते ग मी...
“पण राजन काय
म्हणतो हे महत्वाच ग, बाकीच्यांचा विचार नको. मुलं होतील ग, आधी डिग्री संपव...”
“हो ग, आधी एमबीए,
नंतर ममा... असंच बोलतात राजन.”
“ठीक तर आहे. कशाला
विचार करतेस मग...
“विचार नाही, पण
पाळी आली आणि अलगत घरात माहित झालं की आईचा पडका चेहरा बघवत नाही... मी ह्यांना
बोलले, राहिलं तर राहू देवू ना, होईल मॅनेज, करायला आहेत ना तयार आई.”
“अग, काय बोलतेस,
असं काही करू नकोस, राजन रावं म्हणत आहेत नाम मग तुला ग काय घाई...
“नाही ग ताई, एकदा
का लग्न झालं की सारे मग त्याचं गोष्टीच्या मागे लागतात, बघशील तू पण, मी तर आता
ह्या सहा महिन्यात पार एकूण त्रासले, वाटतं घ्यावा च्नास आणि द्यावं उत्तर...
“ये वेडाबाई, आधी
तू तर मोठी हो मग.”
आता मात्र राणी
हसली, “हे हेच बोलतो राजन, आधी आपण मोठे होवुया, मग बघू बाळ...”
“राणी नशीबवान आहेस
ग, राजन तुला समजून घेतो, तुझ्या बाजू समजून घेतो, अजून काय हवं जोडीदाराकडून
तेव्हाची गप्प
असेलली अनु आता बोलली, “ताई, खर बोलल्या तुम्ही, जोडीदार मिळणे हे काही कठीण नाही
पण जोदिदारची साथ मिळणे हे दुर्मिळ आहे. हा आयुष्याचा प्रवास जोडीदारासोबत
घालवतांना खरच खरा कस लागतो, कसोटी इथे असते, जोडी नाही तर जोडीदाराची साथ हवी
असते. हे एकच नातं आहे जे दोन्हीकडून सारखं निभवावं लागतं तेंव्हा ते नातं
जोडीदाराचं होतं.”
राणी, “वहिनी
बाळूने पार जादू केलेली दिसते. आणि तुझं ग काय हल्ली सुरु आहे, मोघे फेशन मध्ये
शिकवायला जातेस म्हणे...”
“हो जाते ना,
अंकितच्या मित्राचं आहे. मिळतात थोडेफार, होतं माझं काही लहान सहान, आणि वेळ
आनंदात जातो.”
“चला तुमचं दोघांचही
जमतय आता आई बाबांना काही फिकर नाही... पण...”
“पण काय ग तायडे,
आलीस का अजून त्याच विषयावर, आम्ही आहोत इथे. अनु वहिनी आहे, मी आहे...
“पण मी नाहीना
असणार ग, अनु एका हाकेने येवू शकते, तू एका फोनने आणि मी?””
“तू एका फ्लाईटने,
कमी काय तुला....” राणी आणि अनु हसल्या.
“आणि तायडे, आई
बाबांनी आयुष्याचे खूप पावसाळे सोबत घालवले आहेत, त्यांना कधी भिजायचं आणि कधी
नाही हे आपल्यापेक्षा जास्त अवगत आहे. ते दोघे सक्षम आहेत जोडीदार म्हणून... आणि
बाकी करायला सून आहे त्यांची. आता तीच ह्या घरची मुलगी आणि सूनही, काय अनु
वहिनी...”
अनु हसली, नजरेने
होकार देत तिने राणी आणि सानूला आलिंगन दिलं... आलिंगनात आपलेपणा होता, हळवेपणा
होता, एकमेकांची काळजी होती... अनु घरातल्या रेणू रेणूत शिरत होती... आणि घरातले
आता अनुमय होत चालले होते.
कथेचा पुढचा भाग लवकरच.
---
0 Comments