जोडीदार.... प्रवास तुझा माझा! –भाग १

 

जोडीदार.... प्रवास तुझा माझा! –भाग १



तिन महिने भर्र वाऱ्याच्या वेगाने उडाले, आनंदात!  स्वप्नात आणि वाट बघण्यात... तीही काही और मजा असते, नाही का?

घरातल्या सर्वांचं स्वप्न समोर उभं होतं. सानूच्या लग्नाचा मांडव पडला होता अंगणात. रोषणाई लागली होती. अंगणात फुलांची रंगोळी सजली होती. व्हरांड्यात गाद्यांचा ढीग रचला होता. कॉंट्रॅक्टदार टेबल खुर्च्या मांडत होता. घरात पाहुण्यांची धामधूम वाढली होती. नाही म्हणता म्हणता पाहुणे सानूमुळे जमले होते.

गल्लीत चर्चा होती सानूचा होणारा नवरा अमेरिकेहून येतोय म्हणून. वेटाळात नावं बोटं ठेवणारी आज सानूचे गुणगान गातांना थांबत नव्हते.  

मनाच्या कप्या कप्यात आनंद भरला होता. घरात लग्न सोहळा होता की घरातल्या मनात न उमगणारं कोडं होतं.

कसं असतं ना घरातलं शेवटच लग्न म्हणजे उत्साह निमुळता होत गेलेला असतो. पण मोहित्यांकडे परिस्थिती वेगळी होती, घरातल्या मोठ्या मुलीचं लग्न शेवटचं होतं, लग्न काही खूप मोठं धडाक्यात नव्हत, पण घरातल्या प्रत्येकाच्या मनात ते मात्र धूम धडाक्यात होतं.

आज तीन महिन्यांनंतर सुनी काकी आणि भीमा काका रशियाचा दौरा करून परतणार होते. आणि ते सरळ अरूणकडे येणारं होते. अरुण रावांची आणि आरतीची घरात गडबड सुरु होती. दोघेही सुनी आणि भीमा काकाला घ्यायला जाणार होते. बाळूने आणि बाबाने जमवून नुकतीच गाडी घेतली होती आणि बाळू ती पुसत होता.

“राणीसरकार, आज होईल का तयारी?” अरुणराव तयार होवून हॉलमध्ये येत म्हणाले.

“झालीच हो, ही निघालीच मी.”

“असं म्हणता, आहा... काय सुंदर दिसतेस ग, आणि ही गेरुवी पैठणी अति सुंदर दिसत आहे तुला.”

आणि अरुणराव परत गाणं गुणगुणायला लागले,

“ओ मेरी जोहर जबी तुझे मालूम नाही...”

“काहीपण हो तुमचं, चला निघूया, सुनी आणि भीमा काका पोहचतील आता.” आई जरा लाजत म्हणाली.

“आहा, जरा ना तू टिकली तीरसी लावलीस काय ग?”

“अग बाई.”

आईने हाताने जरा टिकली नीट केली आणि म्हणाली,

“मग काय तुम्ही तेढेच बोलता ना मग लागली तेढी.”

“बाळू, काढलीस का रे गाडी, फ्लाईट वेळेवर आहे ना त्यांची, काय ग बाई, लग्नाचं घर आणि सुनी नाही म्हणजे कसं वाटत होतं, आता सूनी आणि भीमा काका आले कि घर कसं परत हसरं होईल.” आई साडी आवरत म्हणाली.

“म्हजे ग काय राणीसरकार! आम्ही काय उदास बिदास राहतो कि काय!” बाबा आईला चिडवत म्हणाले.

“काहीपण हो तुमचं, तुमच्याशी ना बोलणं म्हणजे... “

“आहा.. आहा... रागातही तू ना, आणि हा गेरुवा रंग, काय खुलवतो ग तुझ्या त्या छत्तीसी रागाला...”

“आता आहे काय नवीन, कुठला शब्दकोष हा... तुमचा नी माझा ना छत्तीसीचा आकडा आहे. म्हणे छत्तीसी राग! काय बोलावं बाई ह्या माणसाला घरात पाहुणे आहेत, सून आहे आणि हे काय भलतं ह्याचं?”

“अरे माझ्या आईने म्हणजे तुझ्या सासूबाईने छत्तीस गुण जुडले तेव्हाच तुला होकार दिला होता.”

“आणि तुम्ही तेच छत्तीसगुण दाखवत माझ्यासोबत आयुष्य काढलं.”

“अरे... हा होता मोहिते बाईचा टोला... अर्र... आहेस माझ्या आईच्या पद्चीन्हावर आहेस तू... माझ्या सूनेच काही खरं नाही आता...”

“असं !! बघतेच तुम्हाला नंतर, आता चला आधी.”

“बाळू चल रे बाबा... ह्याच्या नादी लागले ना तर, सूनी आणि भीमा काका घरीच पोहचायचे.”

राणी आणि अनु हसतच हॉलमध्ये शिरल्या, राणी आईला चिडवत म्हणाली,

“आई काय ग ही गेरुवी पैठणी आणि तू जाम शोभतेस ग, तू ना मला देशील ही... माझी वाटणी पक्की... सानू आणि ह्या अनु वहिनीला तर द्यायची नाही, मलाच शोभणार ही...”

“राणी तुझंही झालं का सुरू, माझी पैठणी आहे ही, मी नाही द्यायची कुणाला...”

तेवढ्यात बाळू हॉलमध्ये शिरला आणि अनुला चिमटा काढत म्हणाला,

“आई माझ्या बायकोला दे, म्हणजे वारसा हक्क ग... आता तिचा पहिला हक्क ना!”

आईने डोळे मोठे करून एक कटाक्ष त्याच्यावर टाकला आणि सारे मार्गी लागले, बाबा निघतांना म्हणाले,

“मी तर कधीचाच निघलो गाडीकडे, माझी काही चुकी नाही बाबा... बा अदब बा मुलायजा तयार हो.... राणीसरकार गाडीमे पधार राहे हे!”

त्यांनी गाडीच दार उघडलं, आई रागातच जावून बसली. बाळूने अनुचा चिमटा काढला आणि ती पलटताच तिचा पटकन कीस घेतला,

“काय? असा रोमान्स आहे मोहित्यांचा... परंपरा निभवायची आहे राणी... येतो आम्ही, काय मग आज देताय ना...”

अनु मधाळ हसली. तिला असं गोड हसतांना राणीने बघितलं आणि तीही हसली,

“मग गोड गोड बातमी कधी अनु वहिनी.”

“काहीही काय हो ताई. आता कुठे पंख मोकळे होतं आहेत, तुम्ही सांगा, नवीन काही.”

दोघीही बोलता बोलता बाहेर आल्या आणि आई बाबांना निरोप देत अंगणात बसल्या. अरुण, आरती आणि बाळू आज स्वतःच्या गाडीने भीमा काका आणि सूनी काकीला विमानतळावर घ्यायला गेले होते.

सानू बाल्कनीत सुमंतशी बोलत होती तर खालून अनु आणि राणी तिला हातवारे करत चिडवत होत्या.

तेवढ्यात सानू सुमंतशी बोलता बोलता तिच्या नेहमीच्या खिडकीतल्या जागी जावून उभी राहिली, सूर्य हलकासा खाली उतरत होता, चिमण्यांचा किलबिलाट सुरू होता, परतीच्या प्रवासाला तेही लागले होते. वेगळीच हुरहूर होती वातावरणात पण अचानक मनात काहीतरी शिरावं असं झालं आणि सानू मनातून गोंधळली, तिची नजर समोर असलेल्या बाबांच्या फाईलंवर पडली, हात अलगत तिकडे गेले. सुमंत बाय म्हणून तिने फोन ठेवूनच दिला.

“आह, हे कसं विसरले मी! बाबांची फाईल आहे ही. मला डॉक्युमेंट डॉ. साठेना पाठवायचे होते. सासूबाईची ट्रितमेंट तेच करत आहेत. नंबर पण नाही माझ्याकडे, कशी वेंधळी आहे मी!”

म्हणत तिने सर्व मोबाईल परत हातात घेतला, सासूला फोन करावा का असा विचार तिच्या मनात शिरला, परत उत्तरली,

“आता केला तर उगाच त्या घाबरतील, जावूदे, सुमंतला मेसेज करते... नको तोही कुठेतरी जाणार होता.”

लगेच तिला आठवलं की, सासूच्या औषधांची चिठ्ठी तिच्याकडे आहे ते, तिने हळबळीत तिचे बॅग काढली, जरा आवाजाने राणीही तिकडे आली,

“तायडे, काय शोधत आहेस, येवढ्या गडबडीत?”

“अग राणी मी ना, ते...”

“अग का गोंधळलीस, शांत हो तू, काय झालंय सांगतेस का?”

“राणी मी कसं विसरू शकते ग!”

“काय ताई, उगाच जीवाला आता नवीन घोर लावून घेवू नकोस.”

“मी एवढी हलगर्जी नव्हते ना ग.”

“सानू दी, आधी शांत हो, मला सांग.” राणी सानूकडे आली, तिने सानूला बसवलं,

“राणी, मी बाबांचे डॉक्युमेंट डॉ. साठेना पाठवायचे विसरले ग.”

सानू कासावीस झाली होती, बाबा तिचा जीव कि प्राण होते. तिला मनातच खुप चुकल्या सारखं झालं होतं.

राणीने तिला शांत केलं, तेवढ्यात अनुही तिघींसाठी चहा घेवून तिकडे आली, तिनेही हलकस ऐकलं होतं, सानूच्या जवळ आली,

“दी, चिल, मी बघितली होती ही फाईलं, आणि अंकितला सांगून आम्ही ते डॉक्युमेंट पाठवले आहे. तुम्ही आधी शांत व्हा.”

सानूने अगदीच अनुला मिठी मारली, “अनु, मी...”

“दी, रडताय काय, अजून काही पाठवणी झाली नाही तुमची... आणि काय हो आम्ही आहोत ना बाबांची काळजी घ्यायला.”

“अनु तसं नाही ग...”

“मग कसं दी... बाबा आमचेही आहेत. तुम्ही लग्नाच्या गडबडीत विसरलात हे माझ्या लक्षात आलं होतं. मग मिच ह्या सर्व डॉक्युमेंटला स्कॅन करून अंकितला बोलले.”

“डॉ साठेंचा नंबर मी घेतला होता सुमंत रावांकडून, अहो दी... तुम्ही रडू नका, आणि आधी शांत व्हा...”

सानूने स्वतःला सावरलं, “अनु, आज मला पूर्ण शाश्वती झाली कि तू आणि अंकित नक्की काळजी घ्याल आई बाबांची म्हणून...”

अश्रु पुसत ती परत म्हणाली,

“पण... तुम्ही, तर....?”

“दी, जावू द्या, करू काहीतरी आम्ही... तुम्ही आता तो विचारच करू नका ना...

तिघींनी चहा घेतला, आणि गप्पा करत होत्या, ती कातरवेळ काय सांगत होती कुणास ठाऊक, लग्न समोर होतं पण ती संध्या काही औरच होती. तो संध्या समय मनाला भावणारा होता पण मनाला जरा दुखवत होता... जरा मनात खंत का होती हे कुणाला कळत नव्हतं... तरीही मनाला आनंदाची लहर होती हे नक्की.

कथेचा पुढचा भाग लवकरच.

---

तुम्ही मनातल्या तळ्यात what's app ग्रुपही जॉईन करू शकता, कथेचे अपडेट तिकडे तुम्हाला सहज मिळतील.
कथेचा.. बऱ्याच वाचकांनी ही कथा पहिल्या पर्वा पर्यंत वाचली आहे आता पुढे जोडीदरासोबतचा प्रवास नक्की वाचा ....

© उर्मिला देवेन
urmiladev@gmail.com
कथा वाचण्यासाठी मनापासून धन्यवाद!!

कथेच्या प्रकाशनाचे आणि सर्व अधिकार उर्मिला देवेन कडे कायद्याने राखीव... कथा कुठेही चोरून टाकलेली आढळल्यास कॉपीराईट कायद्याअंतर्गत शिक्षेस पात्र असाल...
कथेवर प्रतिक्रिया नक्की नोंदवा! आवडल्यास लाईक/ कमेंट/शेअर नक्की करा!
कथेचा पुढचा भाग लवकरच.
स्टे कनेक्ट, स्टे सेफ...
फोटो आभार गुगल

Post a Comment

0 Comments