जोडीदार तू माझा... भाग अंतिम ...
सावंत वाडा:
“राणी चल किती वेळ झालाय, आवर लवकर. मला वेळ होईल मग.”
राजन राणीला ओरडत होता आणि राणीला कॉलेजला जायचं होतं. तिचीही गडबड सुरु होती.
कुणालाही कमी तिच्या कडून पडू नये ह्या नादात आज तिने तिची सर्व कामं सकाळपासून
केली होती. तयार झाली होती आणि सासूच्या खोलीत निघाली,
“आई बाबा येवू का?”
“अरे ये. अग सांभाळून, ती ओढणी बघ खाली लोंबत आहे.” बाबा तिला बघत म्हणाले.
राणीने हसत ओढणी सांभाळली, आणि आईला म्हणाली,
“कॉलेजेला निघते आहे आई मी, मी सकाळी अम्मा काकीला सगळं सांगितलं आहे त्या
करतील दुपारच जेवण तयार आजच्या मेनुनुसार, मी माझा लंच सोबत घेतला आहे. बाबा तुमची
मेडिसिन मी येतांना घेवून येईल. आई मला वेळ होतोय, काही राहिलं तर बघून घ्याल.”
“हो हो, तू निघ, राजन सोडून देतोय ना?”
“हो, तो बाहेर आहे गाडी घेवून..”
“बर आणि परतीच कसं?”
बाबा म्हणाले, “मी गाडी पाठवेन, टेक्सीने यायचं नाही.”
“बऱ बाबा... माझा शेवटचा क्लास झाला की मी कॉल करते.”
“नाही, त्याआधी कर. उगाच कॉलेजमध्ये वाट बघत राहशील.”
राणीची स्वतः मध्येच गडबड सुरु होती, घाबरली होती. आईच्या घरून निघतांना ती
कधीच अशी नसायची पण आज धांदल उडाली होती तिची. मनात घाबरली होती. कदाचित समजलं
होतं घरच्यांनी साथ मिळाली नाही तर ती काहीच करू शकणार नाही आणि मग तिची त्याच
दिशेने वाटचाल सुरु होती. घरातून निघतांना आपण काही विसरलो तर नाही ही कुजबुज तिला
होतं होती. गाडीच दार उघडलं, राजन जोरात म्हणाला,
“राणी तुला कळत नाही का? मला तुला सोडून ऑफिसलाही निघायचं आहे. सगळं वेळवर
करायचं.”
राणीचं मात्र त्याच्या बोलण्यावर लक्ष नव्हतं. ती तिची बॅग बघत होती, काही
विसरली तर नाही म्हणून परत परत विचारात होती. राजनही शांत झाला,
“राणी शांत हो. काही झालेलं नाही... तू शांत राहा. तुला करवून घ्यायचं आहे
सगळं, सहज काहीच नाही आणि सहज सगळंच आहे... हे लक्षात ठेव. मी तुझ्या पाठीशी आणि
सोबतही आहे पण लढाई तुझी आहे. लग्नानंतर शिक्षण आणि सर्वच सोपं नाही, तुला
प्रत्येक वेळी आईची आणि घरच्यांनी मदत घ्यावी लागेल. आणि घरचे नेहमी तुला चांगलंच
बोलतील असही राहणार नाही. जरा डावपेच शिक पण डावपेचाने वागू नकोस. आईही ह्या
काळातून गेली आहे, तुला समजून घेईल, पण काय ना आपला काळ सगळे सहज विसरतात आणि
समोरच्याच डोळ्यात भरत असतं. मी तुझ्या लढाईत आईची किंवा तुझी बाजू समोरून कधीच
घेणार नाही कारण मला तुझ्या कुबड्या व्हयाच नाही. पण तू जेही करशील त्यात माझा
होकार कायम आहे.”
राणीने अलगत मान हलवली होती, तिलाही आपण आज लढाईवर निघाल्याचा फिल येत होता.
राणीची परीक्षा सुरु झाली होती. स्वत:ला सिद्ध करायचं म्हणजे स्वतः चीच कसरत असते
हे तिला जाणवलं होतं.
राणीची नवीन सुरुवात तिच्या जोडीदारासोबत भरल्या घरात झाली होती. तिची तर
तारेवरची कसरत होती. सानू तिच्या जोडीदारासोबत नवीन आयुष्याचे नवीन स्वप्न
नात्यांच्या रेशमी धाग्यांनी गुंतत होती. बाळू आता घरातला कर्ता पुरुष झाला होता,
आणि हळवीशी मुळमुळू रडणारी अनु सुनबाई कम मुलगी म्हणून वावरत होती.
आई बाबांना परत एकमेकांसाठी वेळ मिळणार होता... उतरत्या वयात प्रेमाचे दिवस
येणारं होतेच.
“हॉलमध्ये दोघेच होते, अरुण आरतीला म्हणला, मुलं मोठी आता झालीत राणीसरकार,
आता आपला वेळ सूर... काय मग केव्हा बसूया आपण आपल्या राहिलेल्या गोष्टीची यादी
करायला.”
“काय हो, मोठी झाली म्हणून सोडून नाहीना देवू शकत, आपण कालही पालक होतो आजही
आहोत आणि उद्याही राहू, ती मोठी झालीत तसे आपणही मोठे झालोत... त्याच्या गरजांसोबत
आपण वळत गेलो आणि आताही वळावं लागेल... पुढे ही त्यांना गरज पडली कि आपण उभे असणार
त्यांच्यासाठी? बघाना अंकित अमृतसरला जातोय, मनात असूनही आपण त्याला थांबवू शकत
नाही.”
“आरती काय बोलतेस, मुलांनी ऐकलं तर ....”
“अहो मी आपल्यात बोलते आहे, पण वळलोय ना आपण... काळजी वाढली हो, आता तीन मुलं
तीन दिशेने राहणारं आणि आपण इथे झुरत राहायचं.”
“मी नाही झुरत राहणार... माझी तर लॉटरी लागली... तू आणि मी... आणि...”
“आणि ही शांतता... आरतीचे डोळे भरून आले होते....”
“अग...”
“काय हो! आतापर्यंत मुलांसाठी आयुष्य काढलं आणि आता... त्यांच्या शिवाय
काढायचं आहे... पिलं भरारी घायला तयार झालीत...”
आरती ढसाढसा रडायला लागली. अरुण तिच्या जवळ येवून बसला,
“ये वेडाबाई, अरे तू आपली जीगरा आहेस. अरे हा पाठीचा कणा आहे ना माझा तिशी तू
मला आहेस, तू अशी मोडली तर मी कसं उभं राहायचं... अरे अभी तो दिन अपने है और राते
भी... बघ मी काय म्हणतो, मी ना यादी करतो काय काय करायचं ह्याची... आणि आपण भीमा
आणि सुनीताला इकडेच राहायला सांगू, तो सदाही तिकडे ऐकटाच असतो, त्यालाही बोलावून
घेवू. आणि राहूया मिळून. मुलं येतील आपल्याला भेटायला... मौज मस्ती बघ!”
“कसली मौज हो, स्वार्थी असतात मुलं... कामं झालं.... निघाले... अडवलं तर वाद
विवाद... आणि काय काय ते... जावू द्या...”
“अरु... का ग असं बोलतेस...”
“मग, बोलुद्या हो, जरा तयारच करते आहे स्वतःला. आता आपण दोघेच राहणार ह्या
घरात. किती स्वप्न बघत उभं केलं हे निवास... आणि बघा ना कसं खाली होणार आता...”
“ ती आपली स्वप्न होती, आपण बघितली, त्यांची स्वप्न त्यांनी बघावी, आपली अडचण
कशाला अरु, आता तू आणि मी परत दोघं, बघ लग्नानंतर आपल्याला दोघांना कधी वेळ मिळाला
नाही, तू बोलायची नेहमी पण घरात आई बाबा होते, आणि आज संधी समोरून आली आहे मग....
मी तर बाबा माझे सगळे लाड पुरवून घेणार...”
“हुम्म... आता पुढचे तीन महिने... अजून...”
“हे तीन महिने काय अशे उडतील बघ, सानूच्या लग्नाच्या तयारीत आणि अंकितच्या
प्रोजेक्टच्या भानगडीत मग आपण दोघेच...”
अरुणने मोठा सुस्कारा घेतला, आरती त्यांच्या हातात हात देत म्हणाली,
“हो... खरा प्रवास तर आपला दोघांचा आहे, आयुष्याच्या प्रवासात सगळे आपल्या
आपल्या स्टेशनवर उतरतील ना, पण आपण सोबत असणार आहोत शेवटी पर्यंत.
मी तुझी तू माझा...
मग ना कसली बाधा,
अहो, जोडीदार तू माझा, काय!”
“मग निघायचं पुढच्या प्रवासाला सर्वाना आनंदाने निरोप देतं... तेही खुश आणि
आपणही...तू आणि मी...”
“हो असचं आता, तुम्ही म्हणाला ते हो...”
“आणि मला तू म्हणशील ते...”
घरटं रिकामी होणार होतं आणि परत आरती आणि अरुणच्या हळुवार प्रेमाने बहरणार
होतं.
अंजली आत्या स्वतःला सावरत होती, तिच्या विचाराने नवीन भरारी घेतली होती.
तिलाही तीन महिन्यात स्वतःला सिद्ध करायचं होतं, एकतर अमितला कायमच सोडून पुढे
निघायचं होतं नाहीतर त्याला परत उभं करायचं होतं. खोलीत बसून तीही विचाराचे आखाडे
मांडत होती. तिलाही स्वतःच विश्व उभं करायचं होतं, अरुणने त्याची जमीन विकायला
काढली होती, आणि जमिनीची रक्कम मिळताच अंजू नवीन फ्लॅट आणि त्यातंच बुटिक
टाकण्याचा प्लॅन करत होती. पुढच्या तीन महिन्यात तिला बुटिकच सर्व प्लॅन करायचं
होतं. सोबतीला सर्व असतात पण सोबत तेव्हाच असते जेव्हा आपलं काहीतरी स्वतःच असतं
हे तिलाही कळालं होतं.
भीमा काका आणि काकी मुलाकडे रशियाला जाण्याचं प्लॅनिंग करत तयारीला लागले
होते. आयुष्याच्या सरत्या काळात एकदा मुलाचा संसार डोळे भरून बघायचा होता दोघांना.
मुलाला, सुनेला आणि नातवांना एकदा भारतात येण्याच आमंत्रण द्यायच होतं. पुढचे दोन
महिने तिकडे राहून ते परतणार होते.
सदा काका नेहमीसारखा बायकोच्या आठवणीत रममाण होता. अडगडितल्या खोलीत सदा
काकाला संगीताची डायरी भेटली, वाचून त्याची जगण्याची उमीद वाढली, तिने लिहून
ठेवलेल्या तिच्या इच्छा सदाने पूर्ण करायच्या ठरवल्या होत्या, आधी त्याला वीणा
शिकायची होती. संगीताची वीणा त्याने पुसून स्वच्छ केली आणि तीन महिन्यात शिकून
संगीताच आवडतं गाणं वाजवायच ठरवलं होतं.
सर्वांचा नवीन प्रवास सुरू झाला होतां, कुणाचा जोडीदार सोबत तर कुणाचा सोबत
नसूनही सोबत.
हे नातंच असं असतं, जोडीदार सोबत असला तरी प्रवास सोबत असतो आणि नसला तरीही
त्याच्या आठवणीत सोबत असतो. म्हणूनच तर जगातलं एकमेव आगळं वेगळं नातं असतं हे....
जोडीदाराच !!
समाप्त.... पण सुरुवात नवीन पर्वाची...
कथेचं दुसरं पर्व लागलीच सुरू होणार आहे, ज्याची सुरवात सानुच्या लग्नापासून
होणार.
आता पर्यंतच्या कथेत प्रत्येक जोडीला जोडीदार मिळालाय पण जोडीदाराची साथ आणि
ओळख तर आयुष्याच्या प्रवासात होते, संसारातले चढ उतार आणि नवरा बायकोच्या गमती
जमती म्हणजे जोडीदारासोबतचा प्रवास...योग्य जोडीदार भेटणे सोपं नसतं पण जोडीदारा
सोबत ते नातं निभावणं त्याहूनही सोपं नसतं, नाती, पैसा, स्वाभिमान, अंहकार आणि बरंच
काही बघत घट्ट होतं हे नातं, काही सवय ह्या नात्याला घट्ट करते तर कधी प्रेम, कधी
छोट्याश्या झगड्याने नाती तुटतात तर कधी मोठ्या वादातूनही उठून उभं राहतं. नातं
दोघांच असलं तरीही सर्व नाती जपत पुढे जावं लागतं.
ह्या नात्यात एवढं काही असतं ना ते कुठल्याच नात्यात नसतं, एक निर्लज्ज असं
नातं! जिथे सकाळी भांडण होवूनही रात्री एकमेकांच्या कुशीत शिरावं वाटतं... अतोनात
प्रेम करूनही तेवढाच राग येतो. आणि खूप काही....जे शब्दांत नसतं...
तेच शोधूया जे आपलं असणार आहे. घेवून येते आहे काही नवीन जोडयांसोबत....
लवकरच... जोडीदार... तू माझाचा खरा प्रवास,
पर्व २ मध्ये.
तेव्हा कथेचे अपडेट तुमच्या मोबाईलवर मिळवण्यासाठी खालील पहिल्या comment whats
ग्रुपच्या लिंकला जॉईन करा.
आणि पेजला लाईक/फॉलो करायला विसरू नका.
0 Comments