मी बांगड्या भरल्या नाहीत हातात...

 मी बांगड्या भरल्या नाहीत हातात...



घरात प्रॉपर्टीच्या गोष्टी सुरू होत्या, गावाकडील शेतजमीनवर शेजारच्या काकांनी काही वर्षांपासून हक्क दाखवला होता. सुधाकरला वेळ नसल्याने त्याने आतापर्यंत लक्ष दिलं नव्हतं. तसे कागद पत्री सगळे त्याच्या नावावर होतेच म्हणून तो बिनधास्त होता आणि कानावर येऊनही काही बोलत नव्हता, पण ह्या वेळी काका ती जमीन विकणार हे त्याच्या कानावर आले आणि तो रागात आला, जसा त्याने गावातल्या मित्राचा फोन ठेवला तसा तो बोलला,
“मी काय बांगड्या भरल्या नाहीत हातात, काकांना काय वाटते, जमीन माझ्या नावावर केली आहे बाबांनी जाण्याआधी, आता आम्ही तिकडे नसतो म्हणून दिली ना काकांना वाहायला, मग त्यांची झाली!”
सुधाला सुधाकरच असं बोलणं खटकलं, ती पोळ्या लाटत होती तशी थांबली, बांगड्यांचा आवाज बंद झाला, स्वयंपाक घरातून बाहेर आली,
“अहो मी किती दिवसांची बोलते आहे. आणि आता काय ओरडत आहात.”
तिच्या हाव-भावात तिच्या सुंदर हातातल्या बांगड्या वाजत होते, तिथेच खेळत असणार्या आठ वर्षाच्या मनुने प्रश्न केला,
“ममा बांगड्या तू भरल्या आहेत ना हातात, मग पपा का असं बोलला.”
आता सुधाला जरा लागलं, ती गप्प झाली, आणि सुधाकर नंतर त्यांच्या वकिलाला भेटायला निघून गेला.
सुधा गप्प झाली होती, काही वेळात तिने हातातील बांगड्या काढून ठेवल्या. मनात खूप विचार घोळत राहिला,
“हातात बांगड्या भरणे म्हणजे काय नेमकं! आणि स्त्रियांच हातात बांगड्या भरतात, मग हे असं बोलणं.”
कामात तिने स्वत:ला व्यस्त करून घेतलं. दुपारी भाजी आणायला ती गेलेली, समोरच्या चौकात नेत्याचे भाषण सुरू होते, तो जोरात ओरडून म्हणाला,
“आम्ही काय हातात बांगड्या भरल्या नाहीत...”
शब्द कानावर पडताच सुधाच्या हातून वांगी खाली पडली, भाजीवाला बघत होता, तर तिने परत वांगी निवडायला सुरुवात केली. पण सुटलेला विचार परत डोक्यात शिरला होता.
बांगड्या ह्या सौभाग्याचे प्रतीक आहेत. आजकाल बांगड्या भरणे जरा कमी झालंय पण हल्ली तर स्त्रिया फॅशन म्हणून वापरता, सणा सुदीला हमखास आनंदाने भरतात. तेवढंच नव्हे तर मॅचिंग असतात, मग ह्याचा नेमका अर्थ काय, मनाला कोरून कोरून ती प्रश्न विचारात घराच्या दिशेने निघाली होती.
अचानक मनात विचार शिरला, “कदाचित स्त्रियांसारखी भावना, ममता, क्षमा करण्याची भावना, सहन करण्याची क्षमता पुरुषात नाही हा उद्देश असावा ह्या वाक्यामागे. भाषा पण ना वळली तशी वळते, पण तरीही स्त्री समोर असं बोलणं म्हणजे तिला लागणार ना, आणि उलट हे वाक्य कमतरता, असक्षमता असहायता दर्शवताना वापरणे म्हणजे स्त्रीचा अपमान.”
सुधा घरी आली तेव्हा सुधाकर घरात कुणाशीतरी फोनवर बोलत होता, तो परत रागात म्हणाला,
“त्या मुकुंदने हातात बांगड्या भरल्या असतील, म्हणून त्याची बायको अशी बोलू शकते. मी नाही भरल्या आहेत.”
सुधा रागात घरात आली आणि तिने आधी फोन सुधाकरच्या हातातून ओढला आणि बंद केला,
“सुधा काय हे तुझं, मला काय असचं समजतेस, मी काय गप्प बसणार नाही, गुमान गप्प बसणाऱ्यातला नाही मी. मर्द आहे मर्द... बांगड्या भरल्या नाहीत मी त्या मुकुंद सारख्या, उद्या निघत आहे मी गावी. साला कोर्टाचा कागद फेकून येतो त्या काकाच्या आणि त्या मुकंदच्या बायकोच्या तोंडावर. मान देता देता मानगुटीवर बसायला लागला हा काका. काका म्हणे, अरे हट चुलीत टाका.”
“अहो आधी भाषा सुधारा, कितीदा उद्धार करत आहात त्या बांगड्यांचा, ऐकायला वाईट वाटते हो, हातात बांगड्या भरणे म्हणजे काय असतं हो. मनाला बोचून जाते बोलणं, आम्ही काय हातात बांगड्या भरणाऱ्या काय कामाच्या नसतो काय. की नाजुक, लाचार आहोत? कि काय म्हणणं असते तुमचं पुरूषाचं, हौस म्हणून, सौभाग्य म्हणून हातात बांगड्या भरणं कमतरतेचे लक्षण आहे का.... कि सौम्यता, आपुलकीची भावना काय ते ठरावा आधी, आणि तसं बोलूच नका ना.”
सुधाकर शांत झाला, “सुधे, मला जाणवलं नाही ग, पण भाषा आपली, बाबा सारखे बोलायचे मग तोंडात आलं माझ्यासुद्धा. आता जाणवते आई, आत्या, आणि ताईला कसं वाटत असेल त्याचं, माझी तर सहज जीभ वळली म्हणून रागात बोललो...”
“सुधाकर माझा सन्मान असले ना तर कृपा करून हे वाक्य तुझ्या बोलण्यातून हद्दपार करा.... मी तर गृहिणी आहे पण आजची नारी काय कमी भरारी घेते! आणि मी रे?”
“नाही ग सुधे तू आहेस म्हणून मी आहे, तुझी हिम्मत, जिद्द आणि चिकाटी मला आज ह्या इथे उंच स्थानी घेवून आली आहे. तू हिम्मत दिलीस म्हणून ही माझी गगणभरारी आहे सुधे, मी तर किती हळवा आहे, मनुच्या जराश्या आजारात मी कसा होतो, बाबांच्या त्या हॉर्टच्या ऑपरेशनमध्ये तू कसे पटापट निर्णय घेतले होतेस.”
“जावूद्या.... आणि बांगडी किती पवित्र आहे हो, मग अशी वाक्य आपण टाळायला हवी ना...”
“सुधे नाही बोलणार आता, उद्या गावी जोतोय पण अजिबात हे वाक्य काहीही झालं तरी मी तोंडात येवू देणार नाही. आता आधी त्या बांगड्या घाल ग, तुझ्या हातात खूप सुंदर दिसतात. मी आल्यापासून बघतोय डायनिंगवर पडून आहेत.”
सुधा न बोलताच स्वयंपाक खोलीत गेली, सुधाकरने त्या बांगड्या हातात घेतल्या आणि तो तिच्या मागे गेला, तिला त्याने जवळ घेतले आणि त्या सोन्याच्या पाटल्या हातात भरून दिल्या.
“सुधे, ह्या घराची कर्ता-धर्ता आहेस, ह्याचं प्रतिक आहेत ह्या बांगड्या, ह्यात बसणाऱ्या ह्या हिरव्या बांगड्या आणि त्यांचा आवाज घरात तुझं अस्तित्व सांगत असते मला. चूक झाली. आता असले शब्द कधीच तोंडात येणार नाही माझ्या आणि माझ्या जवळपास असणाऱ्यांनाही बोलू देणार नाही. अरे सुरवात घरातून हवी ना, मला तर अभिमान आहे तू मला थांबण्याची हिम्मत केली.”
सुधाने हसत त्याच्या हातात चहाचा कप दिला, दोघंही गप्पा करत संध्याकाळच्या चाह घेत राहिले.
© उर्मिला देवेन
urmiladev@gmail.com
कथा वाचण्यासाठी मनापासून धन्यवाद!!
कथेच्या प्रकाशनाचे आणि सर्व अधिकार उर्मिला देवेन कडे कायद्याने राखीव... कथा कुठेही चोरून टाकलेली आढळल्यास कॉपीराईट कायद्याअंतर्गत शिक्षेस पात्र असाल...
कथेवर प्रतिक्रिया नक्की नोंदवा! आवडल्यास लाईक/ कमेंट/नावासोबत शेअर नक्की करा!
स्टे कनेक्ट, स्टे सेफ...
फोटो साभार गुगल

Post a Comment

0 Comments