जोडीदार तू माझा भाग ७२

 जोडीदार तू माझा भाग ७२ 



मंद पावलाने आलेल्या सुखाला एका टाचणीने ठेचलं होतं, पाय रक्ताळा नव्हता पण जरा इजा झाली होती, अलगद पायाला सावरत परत सुखाने भरारी घेतली होती, घरात वातावरण बदललं होतं. अंजलीच्या रडक्या चेहर्‍यावर जरा हास्य उमटलं होतं. तीही घरातल्या कामात स्वत:च मन बदलत होती. तिच्यासाठी हा बदल शक्य नव्हता, पण जिथे आजवर फक्त मनाची ऐकली तिथे आज मेंदूच ऐकायचं हे ठरवलं होतं मनाने तिच्या.

छकुलीकडे बघत मनाला सावरलं होतं, विचार पक्का होता, अमित नावाचं गणित आता सोडवणं थांबवून जरा पुढच्या गणितांमध्ये शक्कल लढवत आयुष्याची लढाई लढायची, कदाचित पुढचं गणित सोडवतांना अलगद अमित नावाच्या गणिताच कोडं सहज सुटेल, आणि ती परत त्या गणितावर येईल. इथे मोहिते निवासात तिला कुणाच्या फक्त आधाराने उभं राहायचं नव्हतं. स्वतः उभं राहून आधार व्हायचं होतं.

घरातल्या कर्त्या आणि लाडाच्या मुलीचा साखरपुडा तिच्या स्वप्नातल्या राजकुमारशी साक्षात होणार होता. जणू प्रत्येकाच स्वप्न पूर्ण होणार होतं. आईच रूप आणि बाबांचा रंग घेवून घरात प्रत्येकाची जवाबदारी सांभाळणारी आज हा उंबरठा ओलंडून तो उंबरठा ओलांडायला तयार झाली होती हा क्षणच जणू जपून ठेवण्यासारखा होता घरातल्या मनांसाठी उत्साह मना मनात होता आणि सानूला आनंदी बघून तो अजूनच मनाला तजेला देत होता.

रात्रीच्या जेवणानंतर सर्व आपल्या आपल्या खोलीत आरामासाठी पोहचले होते, सकाळी सर्वाना कामं होती. मंद प्रकाश पसरला होता, रात्रीचा मधून मधून वाहणारा वारा सानूला हळूच छळत होता.

घरच्या बगीच्यात पडलेला मांडव नटून थटून जणू सानूला इशारे करत होता. लायटिंग खाणाखुणा करत मिचकवत होती, सानूला विश्वास बसत नव्हता की हा सर्व थाट तिच्यासाठी होता, वाऱ्याची प्रत्येक झुळूक तिच्या मनाला हेलकावे देतं होती. मनाने बावरलेली आणि कुठेतरी दूर स्वतः मध्ये हरवलेली सानू आज सानू नव्हतीच. स्वप्न समोर उभं होतं की ती स्वप्नात होती हे तिलाही जाणवत नव्हतं, हसली, आज ती खोलीत एकटीच होती, राणी सासरी आणि अनुने आजपासून तिचं आयुष्य बाळूसोबत सुरु केलं होतं. अलगद सानूच्या मनाने तिच्या प्रतिबिंबाची जाग घेतली आणि ती स्वतःशी बोलू लागली,

“सानवी लग्न करत आहेस तू ... कधी विचार केला होतास का ग, कसं घडलं हे सारं?”

“पण समोर स्वप्न उभं झालं... आणि...”

“आणि काय ग, मग तू शिरलीस का त्यात ?”

“नाही... स्वप्नच खरं झालं... आणि मी होकार दिला.”

“दिलास ना आता मग सारं उत्तम... आता माघार नको.”

“उत्तम ...पण ..मी आणि लग्न !”

“पण काय... करायचं नव्हतं?”

“कधी विचार केलाच नव्हता... माझे बाबा ?”

“मग आता करतेस ना? बाबांना तुझा आनंद हवाय ग....”

दोन मनांचा मनातच सवांद सुरु होता आणि फोन वाजला, सुमंतचा होता, सानूने पटकन उचलला,

“ओ हो, सो फास्ट, काय आमची वाट बघत होतीस काय?”

“नाही... हो... नाही.“

“अरे जस्ट बोललो, काय अजून जागी आहेस?”

“फोन उचलला ना मग जागीच की... तुही आहेस ना!”

“विचार करत होतो तुझा...”

“हो का. काय सुरु होता विचार.”

“हुमम... वादळ आता इकडे येणारं... मग तयारीला लागावं म्हणतो...”

“काय, नको का येवू ? बघ बाबा, नाही म्हणणार असशील तर मला माझ्या बाबांसोबत राहायला आवडेल...”

“मग मला यावं लागेल बाबांसोबत राहायला तिकडे.”

“ये, बाबा एकटे पडतील रे माझे ...” सानू हळूच म्हणाली.

सुमंतने सानूचा स्वर ओळखला,

हु हु ... पण तू येत राहशील ना इकडे, आपला इथला प्रोजेक्ट तुचं लीड करणार आहेस ना... आणि आई पण आता इकडे राहायचं म्हणते ग, आपण बघितलेला बंगला फिक्स करतोय मी, करू ना ?

हो कर, आवडला मला, आणि जवळ पण आहे इथून. म्हणजे तसा जवळ नाहीच पण आहे... तीन चार तासात पोहचेल मी.”

मग परवा करूया फिक्स सोबत जावून, नंतर मी निघणार ग, तू सामान वगैरे बघून घेशील, नंतर,...

“हो, पण मन खूप बेचैन झालंय विचाराने…

“म्हणजे, अजून काय विचार आहे तुझा..?”

“तू ना तुचं ,..तुचं आहेस तो ज्याने ह्या वादळाच्या मनात वादळ उठवलंय, आणि विचारतोस अजून!”

“अर्र.. बापरे! म्हणजे वादळाच्या मनात आम्ही वादळ घालतोय तर... “

“सुमंत...

“सानू, मला काहीही घाई नाही, आता तू मला गवसलीस, आता म्हातारा झालो तरी तुझी वाट बघेल. पण तुझी माझी गाठ पक्की करू दे... मग तू जसं म्हणशील ना तसं, कळतंय मला, तुला तुझ्या मुळापासून मला तोडून माझ्या घरची शोभा करायचं नाही. राजकन्या आहेस आणि राणी म्हणून ठेवायचं आहे. काळजी करू नकोस. आपण लग्न तू म्हणशील तेव्हा करू...”

“सुमंत ...”

“हो हो, घाई आहे मला पण, तुझ्या प्रत्येक नात्यातलं कर्तव्य तू पार पाडवस हेच म्हणेल, तेव्हाच तुझा तुझ्या नात्यांवर हक्क कायम राहिलं, मैदान सोडून जाणारे तर मलाही पसंत नाहीत, तू त्यातली नाहीस हेच तर खास बात आहे तुझ्यात... नाही तर ..”

“नाहीतर काय रे !”

“नाहीतर मुलींची काय कमी होती मला...?”

“असं!, मग?”

“मग काय, आता काही नको रे, तू हवी, तेही जशी आहे स तशी, काहीही बदल नको.”

“हो... खरच?”

“हो आता काय लिहून देवू?”

“अगदीच नको, पण तुझ्याबाद्द्ल माहिती काढली होती तेव्हा तू मला माझ्या कवरेजच्या बाहेर वाटला होतास...”

“ओ, हो... म्हणजे माझी माहिती काढली होती तर तू ...”

“अरे हम तो आपको पेहलेही चाहते थे, मगर आपके नाम पे तो पेटेंट और क्या क्या  था की बसं थांब लिया था हमने खुदको... मगर जब ....”

“ओ हो, तब क्या ?”

“काही नाही... ते राहू दे माझ्या जवळ फक्त, माझं गुपित म्हणून... आपण म्हातारे होवू ना तेव्हा मजा येईल तो विचार करून ...”

“चला, म्हणजे माझी बुकिंग म्हातारंपणापर्यंत पक्की तर ...”

हु हू, पण जरा काळजी वाटत आहे रे, मी पळत नाही आहे ना, बाळूची अजून सुरुवात आहे, राणीचं लग्न आताच झालंय, खूप खर्च झालंय रे, बाबा जरा हळव्या स्वभावाचे आहेत आणि आई... लग्नाचा असा काही विचार नव्हता माझा... पण आता...”

पण काय?

तू उभा राहिलास ना स्वप्ना सारखा समोर ... आणि हे वादळ अडकलंय तुझ्यात …”

“मी तुझ्या समोर नाही तुझ्या सोबत उभा आहो, हे आधी लक्षात घे, मग बघ सगळं सोपं वाटेल.”

“हु हु ...आता...”

“आता काही नाही, उद्या येवू ना...?की तेही थांबवायचं की लांबवायच, मला काही घाई नाही, माझी भटकंती संपली, आता तू म्हणशील तर आयुष्यभर असाच वाट बघत राहिल... तू म्हणशील तर आपण म्हतारपणात लग्न करू, साठ वर्षाचे झालो की, काय म्हणतेस...?मला काही हरकत नाही....हा पण तेव्हाही तू वादळ हवीस मला... ”

“सुमंत ... काहीही ना तुझं... मी वाट बघते उद्याची... लव यू...”

“चला... बोलणं सार्थ झालं, लव यू डार्लिंग...”

रात्र परत सकाळीची वाट बघत झोपी गेली होती. आणि घर मनातच हसलं होतं. उद्याच्या स्वप्नात शिरलं होतं. 

 

 

सुमंतचा विचार करत सानू झोपीच्या कुशीत शिरली, नभातला चंद् कडेला झाला आणि बघता बघता नभाच्या कडा सोनेरी व्हायला लागल्या. गार वारा सुरु झाला तशी झाडं कडा पलटत भरा भरा जागी झाली. पक्ष्यांचा किलबिलाट सुरु झाला तशी सानूला जाग आली. स्वप्नात जागी झाल्यासारखी ती उठली, खिडकी उघडली आणि तो वाऱ्याचा स्पर्श अनुभवत ती त्या नभात वाढत जाणाऱ्या सोनेरी कडा बघत होती. वातावरण तेजोमय होत होतं तसं सानूच मन त्या तेजाला मनात उतरवत सुमंत मध्ये गुंतत होतं. ती रम्य पहाट तिला लेयावसी वाटत होती. हळुवार वर येणार सूर्य जणू सानूला येणाऱ्या प्रकाशाची जाणीव देतं होता. बऱ्याच दिवसापासून मनात असलेली अशांतता त्या हळुवार तेजाने कुठल्या कुठे पळाली होती. विचारांचा थकवा हरवला होता आणि सानू प्रसन्न भासत होती.

मनात डोकावत तिने स्वतःलाच शोधलं, आणि मोबाईल वर मेसेज आला,

“शुभ सकाळ, वादळ उठलंय काय?”

सानूने अगदीच टाईप केलं,

“हो आणि आता तयार झालंय तुझ्याकडे सुटण्यासाठी, बघ अजून वेळ गेली नाही.”

असं का, येतोय मग... भेटू लवकरच.सुमंतने मेसेज टाकला.

सानूचा दिवस असा भरकन उडाला, राणी आणि राजन दुपारीच पोहचले होते. तिच्या घरची मंडळी संध्याकाळी पोहोचणार होती. घरात वर्दळ वाढली होती. संध्याकाळी कार्यक्रम होता. सगळी कडे उत्साह वाढला होता.

पाहुणे जेमतेम पोहचले होते. कन्या पूजन झालं होतं, सानूच्या हातात साखरपुडा दिल्या गेला होता, कन्या पूजनात मिळालेला भरजरी शालू आणि दागिने सानूला घालून परत मांडवात जायचं होतं.

“काय ग हे राणी, उगाच आता हा भारी शालू नेसायचा का मी? हे एवढे भारी कपडे नाही बाई वापरले मी. आणि हे माप ग कुणी सांगितलंय त्यांना. मला तर कुणीच विचारलं नाही.”

“ताई, सुमंत जीजुने मला फोन केला होता, दुकानातून, मी मापं दिलाय तुझा.”

“अय्या, हा कसला डाव ग ह्या सुमंतचा, माझ्या भावाला काय कॉल करतो, तुला काय करतो.”

“ताई, नवरा आहे तुझा होणारा, तुला जरा आनंद देवू बघतोय, आणि आहे ना ग त्याच्याकडे सर्व मग मागे का यावं त्याने. बघ किती सुंदर साडी आहे ही,” आणि राणीने तिला ती नेसायला मदत केली.

“राणी हे जरा जास्त होतं आहे असं नाही  का तुला वाटतं, मी आणि हे असले कपडे.”

“अग नेस ग, चालतं कधी कधी, तुला काय रोज नेसायची आहे साडी, तिकडे अमेरिकेत नेवूही नकोस. इकडेच ठेवून देशील. पण घाल आनंदाने. तो आनंद दिसू दे चेहऱ्यावर.”

“राणी, खूप बोलायला लागलीस हा, चुरू चुरू...“

“मग, माझी सासू लग्नापासून रोज मला नवीन भारी भारी साड्या नेसायला लावते आणि कुणा कुणाला भेटायला आणते ते तर मला आठवतही नाही.”

“म्हणजे, अजून मु दिखाई सुरूच आहे का?”

“हो, पण खूप लाड करतात त्या माझा, अजूनतरी मला काही वावगं बोलल्या नाही, कि कधी कमीपणाने वागणूक दिली नाही.“

“बऱ आहे ग,” म्हणत सानूने साडीचा पदर टाचला, सुंदर सोनेरी रंगांची साडी सानूला खूप सुंदर दिसत होती. जणू सोनेरी पहाट अजूनही ती लेवून होती. गव्हाळ सोनेरी रंग खुलून आला होता.

राणी तिला बघत म्हणाली, “ताई जीजुने परफेक्ट रंग शोधलाय तुझ्यासाठी. चॉईस जबरदस्त हा...”

म्हणून मी चॉईस आहे ना त्याचा.” सानू मनातून हसली.

अनु लगेच खोलीत आली, “ताई चला, झाली ना तयारी, मांडवात निघायचं आहे, सगळे वाट बघत आहेत.”

सानू मांडवात आली तेव्हा सुमंत बघतच राहिला, त्यालाही ती सोनेरी पहाट ल्यावीशी वाटली.

मासाहेब जवळ आल्या,

“सानवी, गोड दिसतय बाळा, बसं अशीच हसत राहा.”

सानूने मासाहेबांचा आशीर्वाद घेतला आणि मंचावर आली. सानू जणू स्वप्नात उभी होती आणि ते स्वप्न संपूच नये असं तिला वाटत होतं, अलगत सुमंतने तिचा हात धरला आणि अंगुठी तिच्या बोटात सरकवली. कधीही न लाजणारी जरा लाजली. आणि तिनेही अंगुठी सुमंतच्या बोटात हळूच सरकवली. मंडपात टाळ्यांचा गजर होता आणि आनंद मनामनात होता.

कथा क्रमशः

© उर्मिला देवेन

urmiladev@gmail.com 

कथा वाचण्यासाठी मनापासून धन्यवाद!!

कथेच्या प्रकाशनाचे आणि सर्व अधिकार उर्मिला देवेन कडे कायद्याने राखीव... कथा कुठेही चोरून टाकलेली आढळल्यास कॉपीराईट कायद्याअंतर्गत शिक्षेस पात्र असाल...

कथेवर प्रतिक्रिया नक्की नोंदवा! आवडल्यास लाईक/ कमेंट/शेअर नक्की करा!

कथेचा पुढचा भाग लवकरच.

स्टे कनेक्टस्टे सेफ...

Post a Comment

0 Comments