सकाळ झालीच होती तर
अमितरावं घरासमोर येवून ओरडायला लागले, आवाजाने सारेच जागे झाले होते, समोरच्या
गेटवर कुलूप लागलं होतं, जे बाबा रात्री झोपण्याआधी लावत असत मग त्यांना घराच्या
आवारात शिरता आलं नव्हतं. त्यांच्या आवाजाने आता शेजारी पाजारीही जागे होवून गोळा
झाले होते.
बाबा आणि आई आता घाबरले
होते, छकुली त्यांच्या आवाजानेच खोलीतल्या कोपऱ्यात लपून बसली होती. अमित
रावांच्या कोण नादी लागणार म्हणून घरात
अंकितच्या नावाचा नाद सुरु झाला होता.
सानूने सगळं बघून तिच्या मित्राला म्हणजे इन्स्पेकटर कैलासला फोन केला
होता, तोही रात्रीची शिफ्ट संपवून नुकताच घरी आला होता. पण लागलीच तो निघणार होता.
सानूने समोर जावून अमित काकाशी बोलण्याचा प्रयत्न केला, तर ते तिलाच म्हणाले,
“ये बाई माझ्या बायकोला
भडकवू नकोस, आम्ही नवरा बायको बघून घेवू, आणि तुला कळतं तरी काय नवरा बायकोच नातं
असतं तरी काय ते. लग्न तर तू करणार नाहीस कदाचित, करणार काय तुला कुणी पसंत करत
नाहीत. उघड दार...”
सानूही रागात आली होती,
स्वतःवर शिंतोडे तिला सहन होत नव्हते, पण न बोलण्यात तिला अर्थ वाटला. तीही घरात
आली, इकडे छकुली घाबरून बसली होती तर अंजली वहिनी आणि दादाला विनवत होती,
“दादा वहिनी, निघते मी,
उगाच माझ्यामुळे तुमच्या सगळ्यांचा पाणउतारा करतोय हा माणूस, जरा काही दिवस माझ्या
छकुलीला सांभाळा, मी आलेच...”
बाबा काहीच बोलत नव्हते,
अंजली निघाली होती, तिच्या मागे तिला थांबवायला आराध्या धावली.
“माझं काय होवू दे ना
आजचं हो, सुटेल मी ह्या त्रासातून, मला त्रास होतोय ह्यापेक्षा माझ्यामुळे त्रास
तुम्हाला होतोय हे जिवंतपणी मरण आहे मला. जावूदे ग मला. प्रेम म्हणे, आज
प्रेमावरून विश्वास उठला माझा अरु, प्रेमात काहीही ना अरु मग जावूदे ग मला, मी
प्रेम केलंय मग मीच भोगेन ना, बघ ना ग अरु माझ्यामुळे प्रेमाचा अपमान होतोय...
नजरा बघ ना ग जरा .. नाही सहन होतं आता...”
ती उंबरठा ओलांडणार होती
तर अंकितने तिचा हात धरला,
“आत्या तुला बोललो ना मी,
कुठेच जायचं नाही ते.”
“बाळू, राहू दे रे बाळा,
लोक मजा बघत आहेत, कसंतरी होतंय मला, जावूदे, मारेल आणि होईल शांत, आता मरणच मला
वाचवू शकतं. प्रेम केलंय राज्या... सोडू कसं त्याला... तुला नाही कळायचं ”
“आत्या, आत हो... सगळं
कळतं मला. आणि हा डाइलॉग आता नको, मोठा झालोय मी.“अंकित
जोरात म्हणाला.
त्याने खुंटीला टांगलेली
किल्ली घेतली, आणि गेट उघडलं, हात कंबरेवर ठेवत तो म्हणाला,
“हा बोला आता, काय
म्हणता?”
अमितचे शब्द त्याला बघूनच
संपले होते,
“काही म्हणजे, माझ्या
बायकोला न्यायला आलोय, तू तू अडवू शकत नाहीस, आणि ती यायला तयार आहे.“
“असं, पण आम्ही नाही
पाठवत, काय करता, आणि एक, कान मोकळे करून ऐका, आत्या आता तिकडे येणारं नाही,
तुम्हाला जे करायचं ते करा... मी मदत करतो हवं तर, काय करणार तुम्ही सांगा...”
“मी मी... पोलिसात जाईल.”
कैलास पोहचला होता,
त्याला बघत अंकित म्हणाला,
“कशाला जाता?,हे घ्या मी
पोलीस स्टेशन इथेच आणलं, काय सांगायचं ते सांगा आता...”
अमित कैलासला बघून
घाबरला, हात जोडत म्हणाला,
“साहेब माझी बायको!”
आता कैलासने पोलिसी भाषेत
उत्तर दिलं, “अबे ये साल्या, धड तुला उभ राहता येत नाही, बायको काय सांभाळणार, आणि
काय रे, बायकोचा अर्थ समजते का? असा टाकीन ना आतमध्ये शारीरिक आणि मानसिक
अत्याचाराच्या केसमध्ये की बाहेर निघणार नाहीस... निघ इथून नाहीतर चल ठाण्यात,
तुझ्या बायकोने एफआयआर नोंदवलाय , करू तुला आता
अटक की निघतोस.”
अमित मागे सरकला, आणि
जातांना म्हणाला,
“बघून घेईन मी, सोडतो काय
तिला, कर म्हणा काय करते तर... हे नवीन आजकालची पोरं मला सांगतात काय, तिचा तो घुमट
भाऊ तर काहीच बोलत नाही, बघून घेईल मी तुम्हाला.”
कैलासने त्याला हाताने जा
म्हणत इशारा केला आणि तो निघून गेला. गाडी लावून कैलास घरात आला. अंजली मात्र
पुरती घाबरली होती, अश्रू तर आटले होते तिचे पण कोरडे पडलेले डोळे आशेने बघत होते.
मनात सल टोचत होती. कुठे आणून ठेवलं होतं तिला तिच्या जोडीदाराने, ना ती इथली होती
ना तिथली. ज्या प्रवासाला ती निघाली होती त्या प्रवासात त्यानेच काटे टाकले होते.
दोष कुणाचा होता हे तिलाही कळत नव्हतं, कदाचित आपण चुकलो ह्या ग्लानीने तिला
ग्रासलं होतं.
अनुने सर्वांसाठी चहा
ठेवला, सर्वांनी गुमान घेतला, कैलास आणि सानू गप्पा करत बाहेर आले,
“सानू ठाण्यात येवून एफआयआर दाखल कर, म्हणजे गोष्टी आपल्या हातात राहतील.”
सानूने होकार दिला, तोच
कैलास त्याच्या मूड स्वभावावर आला,
“ये सानू, लग्न करतेस
म्हणे तू, आई सांगत होती... काय तू हा समोरचा
गडी सोडून त्या अमेरिकेतल्या चिकण्याच्या मागे जातेस.”
“ये भंकस, तुझा तर घरच्या
घरी साखरपुडा झालाय असं सांगितलं काकूने, आता तरी थांब .”
“मी काय? थांबतोच ग...”
“ये तसं नाही, म्हणजे मला
चिडवणं थांबव...”
“ते तर ह्या जन्मात नाही,
आणि आपली बुक्किंग आहे पुढच्या जन्माची तुझ्या सोबत, ते काय ते आपल्याला सात जन्म
एका जोडीदारा सोबत नकोय बाबा... प्रत्येक जन्मात कसा जोडीदार नवीन हवा, तर काय तू
पुढल्या जन्मी माझी होणार हे नक्की...”
“कैलास तू ना... बास कर
रे, आवडतोस मला... आयुष्यभर मैत्री जपायची आहे तुझी...ये उद्या भेटवून देते तुला
सुमंतशी.”
“बास ग बास नको इमोशनल
करू आता... मला तू मैत्रीवरच थांबवलं यार. असो तुझी मैत्री पण लय भारी मला,.. येतो
नक्की उद्या, झोपं येत आहे ग, झोपतो जावून.”
“हो नक्की ये, तू
आल्याशिवाय मी सुमंतची व्हायची नाही हा...”
“अरे यार... आता जावून
झोपतो मग .... हा पण काही झालं तर बिनधास्त फोन कर... मी संध्याकाळी टाकतो एक
राउंड इकडे... “
“बघ जमलं तर पण उद्या
नाही आलास ना तर तुझी ह्याच जन्मात मी मैत्री तोडेल हा !”
कैलासने गाडीची किक मारली
आणि सानूला हाय फाय करत तो निघून गेला.
घराचा उदास चेहरा अंकितला
बदलायचा होता, तो अनुला इशारा करत म्हणाला,
“अनु, चल पोहा कर
सर्वांसाठी आणि आईकडून यादी घे काय काय करायचं त्याची, आणि सगळे जरा मूड बदला,
सानूदीला काय वाटायचं.”
“आत्या, बिलकुल रडायचं
नाही आणि घाबरायचं नाही, असं समज की तू अमित काकांना सुधारायला वेळ देत आहेस,
सुधारले तर किती छान ना पण नाहीच काही झालं तर तू मार्ग बदल आता, प्रेम वगैरे सगळं
बरोबर आहे ग, पण आता छकुली आहे तुला, तिचा विचार कर... प्रेमात जोडीदाराला एकटं सोडायचं नसतं हे मानून तू एवढी वर्ष त्यांच्या
सोबत होतीस ना, पण त्यांनी तुला पार एकटं केलं ग ... तू विचार कर, विचार करायला कुणीही
तुला थांबवणार नाही पण इथून जायचं नाही. “
अंजली आत्या काहीच बोलत
नव्हती... आज खूप दिवसांनी तिच्यासाठी कुणीतरी खंबीर उभं झालं होतं. मनात आनंद
होता पण जरा अमितची धास्ती भरली होती तिच्या.
अंजलीच्या समोर तिच्या
जीवनाचा मूकपट धावत होता, त्या आठवणी तिला त्रास देत होत्या, त्या आठवणीत ती खूप
आनंदी होती पण आज त्याच आठवणी तिला छळत होत्या. विचारात तिला समोर भीमा काका
दिसले, ती उठली आणि त्यांच्या पायावर जावून पडली,
“दादा तू मला माझ्या दादा
पेक्षा जाणतोस, काय चुकलं रे माझं, प्रेमच केलं होतं ना... मग प्रेमात सर्व काही
ना! आज माझ्या जोडीदाराने मला असं असह्य करून सोडलं, कुठे कोडं चुकलं कळतच नाही
रे. अरुनेही प्रवास शून्यातून सुरु केला होता पण आज तिचा दबदबा माहेरी आणि सासरी
दोन्हीकडे आहे, नाही. जळत नाही मी तिला, लायकी नाही माझी, पण मग मी कुठे चुकले...
प्रेमविवाह करून असं होत असेल तर माझा तर प्रेमविवाहावरचा विश्वास तुटला रे दादा.”
“असं म्हणू नकोस ग, इथे
खूप प्रेमवीर आहेत, आराध्याला बघ, ती आजही तेवढीच खुश आणि आत्मविश्वासाने भरून
असते, अस्मित कुमार किती अॅडजस्ट करतात हे आपण बघतोय ना, अग प्रत्येक नात्यात
अॅडजस्टमेंट असते, कधी आपल्याला तर कधी समोरच्याला ती करावी लागते. तुझी निवड
चुकली असं मी म्हणणार नाही पण त्याला तू चुकतांना थांबवू शकली नाहीस किंवा वेळीच
वेगळी झाली नाहीस... आणि गुंता वाढला, आणि
मुख्य म्हणजे तो गुंता तुझ्यात जास्त वाढला आहे अंजु. जावूदे आता. अंकित म्हणतोय ना तर थांबू आपण आणि तू
स्वतःच्या पायावर भक्कम उभी हो आता.”
“दादा, चूक सलते रे मनाला, माझ्या सोबतच का असं, ही भावना
मला जगू देत नाही. जगण्याची इच्छा राहिली नाही दादा. पण समोर छकुली दिसते आणि मी
परत जगायला लागते...”
“सर्वांना असचं वाटतं अंजू, आयुष्य ही परीक्षा आहे. आणि इथे
सर्वांचा पेपर वेगळं वेगळा असतो, कॉपी करता येत नाही मग ह्याच असं माझं असं का
नाही हे येतच नाही अंजू, आणि आयुष्याच्या ह्या पेपर मधले सारेच गणित सोडवता येत
नाहीत ना, काही तसेच सोडून द्यावे लागतात, काही उत्तम जमतात, काही अर्धे जमू
शकतात, पण तरीही ही परीक्षा पास करावी, पेपर टाकून निघून जावू नये, कारण इथे निकाल
टिकून राहण्यावर असतो. समज अंजू, की अमित नावाच गणित सुरवातीला बघून सोपं वाटलं पण
सोडवायला गेलीस तर नाही जमलं, मग काय त्याच गणितावर अडून राहणार आहेस, पुढचा पेपर
बाकी आहे ना, बघ जरा, तो सोडव... बघ तूही आयुष्याच्या परीक्षेत खरी ठरशील,
गुंडाळून त्याच गणीताला राहिलीस तर वेळ निघून जाईल ना... आणि बघता बघता तुझं जगणं राहून जाईल.“
“दादा, प्रयत्न करते आता
पुढे... पण मन गुंतलंय ना रे... त्याला कसं आवारू...”
“अंजू खरं सांगू का, कधी कधी
आयुष्य दिमाकाने काढावं, मन धोका देतं कधी कधी... “
“कसा सोडवू हा गुंता
दादा... हरले मी आजही नाही रे पण मनाने हार त्याच्या मनासमोर पत्करली... आता
आयुष्य जरा वेगळ्या पद्धतीने जगून बघते.”
“हे बघ आतापर्यंत तू
एकटीच सगळं सहन करायची पण आता छकुली आहे, तिची आई हो, आईपण सर्व नात्यावर भारी
असते अंजू. आणि मनाच काय ,कधी तरी आपण ते
स्वतःवर गुंतवाव ग... दुसऱ्यांवर गुंतवता गुंतवता आपण आपलं राहत नाही मग असा धक्का
लागला की तोल सांभाळत नाही.”
घरात सर्व गोष्टी ऐकत
होते, आयुष्याचा सार उभा राहिला होता सर्वांच्या, आयुष्य नावाची परीक्षा
प्रत्येकाची वेगळी होती. पण तरीही सर्व एका छत्रा खाली आनंदाने होतेच. प्रत्येकाची
कुठली ना कुठली बाजू नाजूक होती पण त्याला समोर ठेवून आयुष्य नाही ना जगता येत हे
कळून सगळे समोर जाण्याच्या प्रयत्नात होते.
0 Comments