आज पहाटेच घर जागं झालं
होतं, त्याला कुठे झोप होती. घरात आयुष्यभर वावरणारी जोडी आज
बंधनात बांधणार होती, त्याच्या साक्षीने...
आई चार पासूनचं स्वयंपाक
खोलीत होती, घराच्या मंडळीचं जेवणं घरीच करायचं होतं तिला. नाश्ता आणि स्वयंपाकाची
तयारी तिची झाली होती. सूर्य किरणांसोबत घराच्या बागेत जरा स्वतःचा योगा करून तिने
बागेतली फुलं तोडली होती. गुणगुणत अंगण
आवरलं. पाणी शिंपडलं, रांगोळी घातली.... तिच्या उत्साहाने घरही उत्साहित झालं
होतं. स्वतःचं सर्व आवरून आता ती सर्वांवर रागावण्यासाठी तयार झाली होती.
नंतर तिने अरुण, भीमा
काका आणि सुनिताला उठवलं, सर्व मिळून चहा घेतला. काम वाटून घेतली,
“भीमा काका आणि सुनी तू
ग, इकडे मांडव बांधा, हवन कुंड सजवा हॉलमध्ये, भटजी आता येणारच आहेत, मी आताच
मेसेज केला त्यांना, आठ पर्यंत पोहचतो म्हणाले.“,आई चहा पीत सांगत होती.
“आणि अहो तुम्ही...”
बाबा दचकत म्हणाले,
“मला रे काय बाबा करायचं
आहे, काय हुकुम माझ्यासाठी!”
“घ्या पटपट आवरून तुमचं, काय
ते आज वॉशरूम मध्ये अर्धा तास बसायचं नाही... “
“हुम्म.... काहीही
तुझं... पेपर वाचत असतो मी तिकडे.”
“का इकडे मी काय पेपर
ओढून लादीपुसायला घेते.”
“तुझा काय भरवसा... घेशील
पण....” बाबा हळूच भीमा काका कडे आणि सुनी काकी डोळा मारत म्हणाले.
“बऱ आता तेही करेन... ते
जावूद्या, जेवणासाठी जिलेबी घेवून या.”
अरुण गड्बडत म्हणाला,
“हो हो आता तयार होतो आणि
निघतो, मी काय म्हणतो, इमरती आणू का ग?”
“ते कशाला? जे सांगितलं
ते आणा ना!”
“अग, त्या दिवशी राणी बोलता बोलता सहज बोलली होती ना, राजन रावांना
इमरती आवडते म्हणून... आपलं म्हणून म्हटलं, आपल्याला काय जिलेबी आणि इमरती
सारख्याच वाटतात बुवा... पण खव्याची आणतो मग... आता जावई भेटले मोठ्या घरचे मग
त्यांची चॉइसपण महाग असणार ना, जीवात जीव आहे तोवर करायचं, लाड पुरवायचे, काय म्हणतेस?”
“अग बाई हो, आणा आणां
नक्की आणां, ह्या सगळ्या गडबडीत माझ्या जावयाचे लाड राहून गेलेत, असं करा, खव्याची
इमरती आणि जिलेबी दोन्ही आणां, आणि काजू कतली पण आणा राणीला आवडते हो...”
“असं म्हणतेस, निघतो मी
लगेच. आता आदेश मिळाला मला...” म्हणत बाबा उठलेही.
सुनीता आणि भीमा काका
लग्न विधीसाठी लागणार सामान निवडून योग्य ठिकाणी ठेवत होते,
काका काकीला म्हणाले,
“चला, आता आपला अंकितही
गृहस्थाश्रमी होणारं....”
सुनीता सुपाऱ्या हातात
देत म्हणाली,
“काय हो हे गृहस्थाश्रम? तुमचं काहीही हा!”
“अग, त्याला अर्थ आहे म्हणून म्हणालो ना! गृहस्थाश्रम म्हणजे, असा कालखंड जिथून माणसाचा जोडीदारा सोबतचा प्रवास सुरू होतो,
त्याच्या सोबत राहण्यासाठी त्याची धडपड सूर होते. कुटुंब तयार होत. एकमेकांच्या
सहवासाने आयुष्याचे गोड, तिखट आंबट, कडू असे सगळे स्वाद तो घेत असतो. आपलं आयुष्य
हे आपलं नाही ही जाणीव ह्याच काळात जास्त असते. तारुण्याच्या उत्साहात मोकाट
सुटलेलो आपण जोडीदारासाठी थांबतो... आता अंकित २७ वर्षाचा आहे ना? मग त्याच्या
निदान ५० ते ५५ वर्षा पर्यंत त्याला सर्व कुटुंबाच्या गोष्टी बघाव्या लागतील, नंतर
पुढची पिढी उभी होईल आणि त्याच कार्य कमी होईल... मग त्या नंतरचा काळ तो कुठल्याही
पद्धतीने काढू शकतो, कुणी सन्यास घेतात, कुणी काही, तर कुणी काही, नंतर आयुष्य हे
वानप्रस्थाश्रमाकडे वळलेलं असतं. पण जोडीदारासोबत घालवलेला हा गृहस्थाश्रमातला काळ
वानप्रस्थाश्रमाला सोयीच आणि आनंदी करतो.”
काका त्याचं सगळं ज्ञान सांगण्यात मग्न होते. तोच सुनीता काकीने त्याच्या हातात तांब्याच
हवन कुंड दिला, आणि इशारा करत जागेवर मांडायला लावला,
“आता हे काय हो तेही
सांगा मग, वानप्रस्थाश्रम की काय...? आणि आपण तर आता पन्नासच्या वर आहोत...पण
जोडीदार आहोत ना... काय सुचलं ना तुम्हाला पण...”
“अग...”
“अहो ते तुमच्या जवळच
लाकडाच पाकीट द्या, कशाची आहेत हो, आंब्याची लाकडं दिसत आहे, काय बाई आजकाल सर्व
पाकीटमध्ये मिळतं.”
भीमा काकाने लाकडाच पाकीट
काकीकडे सरकवलं,
“लिहिलं आहे त्याच्यावर
आंब्याची आहेत. फोड ते आणि ठेव त्या पात्रात... हा तर मी काय म्हणत होतो. वानप्रस्थाश्रम!
“सांगा हो आता काय ते
वानप्रस्थाश्रम.”
“हो आपण आता त्याच
अवस्थेत आहोत, आणि हा असा काळ की गृहस्थाश्रमाच्या जवाबदारीतून जरा कमी झालेलो
असतो, माणूस हा काळ एकटाच समोर जातो तर कधी जोडीदारासोबत, शक्यतो माणसाने ह्या
काळात समाजकार्य करावं, या काळात प्रत्येक
व्यक्तीने आपल्या संसारातून लक्ष हळूहळू कमी करून समाजोपयोगी कामे करणे अपेक्षित असते…”
“मग विचार काय तुमचा?” सुनीता थाली सजवत म्हणाली.
“विचार आणि आता अजून काय
करू ग, माझी समाजसेवा तर कधीची सुरू आहे. लग्न जुळवून आणणं म्हणजे काय ग! आता मला ते उत्तम जमतं मग ते सुरू केलं.”
“हो, तुम्ही त सर्वांसाठी
मनापासून करता, अगदीच कुणीही मदत मागीतली तरीही, तेही काहीही दक्षिणा न घेता.”
“मग काय, आपला मुलगा,
येवढ्या दूर असतो, त्याच्या लग्नातही आपण नव्हतो, मनातल्या गोष्टी पूर्ण
करण्यासाठी आपण प्रत्येकाच्या लग्नात मनातून सहभागी असतो... आपलं मन रमतं आणि वेळ
मजेत जातो. तू असतेस माझ्या सोबत मग मला काहीच वाटत नाही, तुझी साथ अशीच राहू
दे... मग हे वानप्रस्थाश्रम अवस्था बघ कशी आपल्याला निर्वाणपदापर्यंत निवांत
पोहचवेल.”
सुनिता थोडी भावूक झाली,
अगदीच जवळ येवून बसली,
“जावूद्या, हे घर काय
परकं आहे आपल्याला, मानपान सर्वच आहे. नाती रक्ताची नसली तरी मैत्रीची आहेत ना...
मी तर बाबा जाम खुश असते इथे. हे मोहिते निवास आणि ही नात्यांची साखळी, मी तर अलगत गुंतत कधी इथली
झाली समजलं नाही, वाट्याला कधी नातेवाईक आले नाही, अरुण आणि आरतीने ती कमी पूर्ण
केली, मुलगा शिकून अगदीच विदेशात गेला, त्याचा सहवास जेमतेम वीस वर्ष... पण इथे
मला सानू, राणी, बाळू माझी मुलं वाटतात.”
“मी पण, अरुण आरतीने माया
लावली तशी मुलांनी ती जपली... खरच आरतीने माया पेरली मुलांमध्ये... मग वाटतं आपण
कमी पडलो की काय...
नाही हो तसं काही नाही,
माझा लेक आणि माझी ती रशियन सून मायाळू आहेत. मला नाही बाई माझ्या लेकासाठी आणि
सुनेसाठी काही बाई बोलायचं.... ते आनंदात आहेत मग मी का इथे मन झुरवत राहू, सुनबाई
कितीवेळा आग्रह करते आपल्याला.... आणि माझे दोन्ही नातू पण मराठी शिकत आहे. मला
बाई नवलच आहे माझ्या मुलाच.”
“तेही बरं, दुरून डोंगर
साजरं.... मला तर तुझी साथ हवी. परत तेच
आपले दोघांचे दिवस जागल्या सारखं वाटतं मला... तू असतेस ना माझ्या सोबत, पण
वाईट वाटतं ग कधी कधी, आपला मुलगा तिकडे रशियात राहतो, तसा फोन तो रोज करतो पण...
इथलं गोकुळ काही न्यारंच वाटतं मला... पण तेही ना पिलांना उंच भरारी घ्याची असली
की घरटं सोडावं लागतं हे नक्की... आता
सानू नाहीका जाणारा अमेरिकेला... आपलही मन बघ ना, मुलगा दूर असला की, काय काय नाही
बोलत त्याला पण मुलगी विदेशात असली ही छाती ताणून जाते आपली... “
“तेही हो, आपली संस्कृती
ना? मुलाने आई वडिलांचं करावं हा भोळा समज आपला...”
“कोण करतं ग आजकाल कुठे
कुणाचं... मुलांसोबत रक्ताची नाती असतात आपली पण गरजेच्या वेळेवर कुणीच नसतं...
परकी माणस कामी पडतात, म्हणून तर ह्या काळात जमेल तेवढं समाजकार्य करायचं.“
“अहो मी आहे ना, तुमच्या
सोबत, कायम! सावली म्हणून... तुमचा हक्काचा जोडीदार...” म्हणत सुनिता हसली.
“हो ना, बघ ना, आज माझ्या
सोबत कोण माझ्या रक्ताचं आहे? तुझं माझ्याशी नातं प्रेमाच आहे बघ.... रक्ताची नाती
गरज संपली की ढुंकूनही बघत नाहीत आणि गरज पडली की त्याच रक्ताच्या नात्याने समोर
उभी राहतात... म्हणूनच आयुष्यात फक्त एक नातं महत्त्वाच आहे... जोडीदाराच... तुझं
नी माझं नातं...
ह्या संपूर्ण विश्वात
कुठलच नातं नाही असं... जे अंतापर्यंत सोबत असतं, किंबहुना त्या नंतरही जोडीदाराच्या
आठवणीत जगणारे आहेत ग...”
“अहो, काय झालंय तुम्हाला
आज... मला तर हा सोहळा बघून आपले दिवस आठवले.”
“काही नाही, मगाशी सदाला
त्याच्या बायकोच्या फोटोशी बोलतांना बघितलं मी, आणि मला माझा विचार आला... मी तर
तुझ्या शिवाय राहूच शकत नाही. विचारच करू शकत नाही ग...”
“अहो जोडीदार हे जुडे
नसतात पण, एकमेकांशिवाय राहू शकत नाही हे नक्की, लागतं एकाला आणि त्रास दुसऱ्याला
होता... मीही तुमच्या शिवाय आयुष्याचा विचार करू शकत नाही... आता तर असं वाटतं
जोडीदाराची गरज ह्या काळात जास्त भासते... हो ना?
“हो ग, आण ते निरांजन आणि
खारका, दे बघू इकडे, आणि मी काय म्हणतो, आपण जावून येवू ना आपल्या मुलाकडे, बघू
जरा त्याचा संसार... आणि मग निवांत वानप्रस्थाश्रमाला मोकळे होवू...”
“हो माझ्याही मानत आहे
हो, सांगते मी त्याला विझा करायला, आणि आपणच करू हा तिकीट वगैरे.. आहे ना
आपल्याकडे पैसा, ते काही बोलायची नाही मी त्याला.”
“हे बरोबर, आपण करू शकतो
मग कशाला त्याच्या कडून करवून घ्यायचं, प्रोसेससाठी मदत करेल तो आनंदाने... खूप
दिवसाचा म्हणतोय ना, जावूया,.”
“अहो इथून कधी
निघायचं....” सुनिता हळूच म्हणाली.
हा शब्द मात्र आरतीने
ऐकला,
“काय ग सुनी, काय करशील
घरी जावून? आणि इथे काय तुला कुणी काय बोललं का? काही जायचं नाही तुम्ही दोघांनी.
राहू आपण सर्व इथेच... काय भीमा काका इथूनच काय ते तुमचे लग्न सोयरीकडेचे कामं
करा. “
“वहिनीसाह्बे, तेही खरं
हो, पण जरा हे सगळं आटोपलं की मुलाकडे जावून येवू म्हणतो...”
“म्हणजे रशिया टूर
तर....”
“तसं काही नाही... येवू
शेवटचं सगळं बघून, आता त्याने तिकडे राजपाट मांडलंय, इकडे काही येण्याचा त्याचा
तरी एवढ्यात बेत दिसत नाही, आणि आपण कशाला तकादा लावून त्याला भाग पडायचं, आपणही
तर आपल्या सोयीने गावं सोडून इथे मुंबईत आलो ना, मग त्याला का बोलायचं, आजची पिढी
एक पाऊल पुढेच... जिवंतपणीच त्याचा थाटबाट बघून येतो मग काय मेल्यावर त्याने
यायलाच हवं असं काही आपलं नाही... म्हणजे तो तसा नाही पण कशाला मुलांच्या चुका
दाखवत ह्या वयात पदरी आपुलकी गोळा करायची.... त्याला तर त्रास होणार नाही, होईल तर
आपल्याला, काय हो...”
“बरोबर बोललात तुम्ही,
हो, जावून या. झालं का सगळं, आवरलं दिसतेय. तुम्ही तयार व्हा.” आणि मग तिला भटजी
येतांना दिसले आणि ती तिकडे निघाली. भटजीच्या मागेच राजन आणि राणीही पोहचले होते.
घरात सर्व तयारी झाली
होती. अत्तर, फुलं आणि राळाचा सुगंध सर्व घरात पसरला होता. मनामनाला तजेला देत तो
अंतरमन सुखावत होता.
कथा क्रमशः
© उर्मिला देवेन
urmiladev@gmail.com
कथा वाचण्यासाठी मनापासून धन्यवाद!!
कथेच्या प्रकाशनाचे आणि सर्व अधिकार उर्मिला देवेन कडे कायद्याने राखीव... कथा कुठेही चोरून टाकलेली आढळल्यास कॉपीराईट कायद्याअंतर्गत शिक्षेस पात्र असाल...
कथेवर प्रतिक्रिया नक्की नोंदवा! आवडल्यास लाईक/ कमेंट/शेअर नक्की करा!
कथेचा पुढचा भाग लवकरच.
स्टे कनेक्ट, स्टे सेफ...
0 Comments