भाग ५२
सावंत वाडा-
राणी सावंत वाड्यात पोहोचली होती, जोरदार स्वागत झालं होतं
तिचं, असा भव्य दिव्य स्वागत सोहळा तिने बहितला नव्हता. आज पहिला दिवसं होता तिचा
त्या वाड्यात वावरण्याचा, भल्या मोठ्या वाड्यात भले भले तिला बघायला येत होते. काय
बोलावं त्यांच्याशी हेही तिला उमगत नव्हतं, नणंद रोहिणी तिच्या सोबत होती पण तरीही
तो बावरलेला अंदाज तिला काही बोलू देत नव्हता. एवढ्या मोठ्या घरात आणि घरातल्या
लोकांमध्ये आपलं कसं होणार हे तिला राहून राहून वाटत होतं. रात्रीच जेवणं सुरु
झालं होतं आणि सगळे पाहुणे जेवत होते. तिच्या घरी अगदीच मोजके पाहुणे होते पण इथे
वाडा भरून होता आणि घरच्या जेवणाला राजेशाही पंगत होती. राणीला रोहिणी सोबत घेवून
आली. आणि राजनच्या जवळ तिला बसवलं. बसावं कसं हेही तिला कळत नव्हतं, लाजत होती की
अवघडपणा होता हेही तिला उमगत नव्हतं. बसल्यावर ते भलं मोठं सजलेलं चांदीच ताट बघून
मनाला कुठे आवर घालावा कळत नव्हतं, तेवढ्यात रोहिणीने राजनला राणी वहिनीला भरवायला
सांगितलं, राजनने इमरती उचलली आणि राणीला भरवली. आता राणीचा टर्न होता, तिला तर
काय उचलावं कळत नव्हत. ताटात नाना प्रकारचे पदार्थ होते, हात पदार्थावर जावून आवरल्या
जात होता, तोच राजन तिच्या कानात हळूच म्हणाला, “काही भरवं काही हरकत नाही.”
आणि राणीचा हात रुमाली रोटीवर पडला, आता तो रुमाली रोटीचा
घास कुठल्या भाजीसोबत राजनला भरवायचा हा ही प्रश्न होता, तेव्हा रोहिणी म्हणाली,
“वहिनी ठेचा आहे, द्या दादाला, घेवूद्या स्वाद.”
म्हणंत तिने राणीचा रुमाली रोटीचा बाईट असलेला हात ठेच्यावर
लावला, आणि मग राणीने राजनला तो बाईट भरवला.
“अरे खा की दादा, ठेचा!, मस्त चव असते, आजचं लग्नाच्या
जेवणात होता. मला आवडला, आणि तू सवय कर आता, ठेच्याची, वहिनीला येत असेल करता.”
“काय वहिनी, ठेचा येतो ना? कर मग माझ्या दादाचा... माझ्याकडून
मुबा आहे तुला.” रोहिणी दोघांना चिडवत होती. राजनला तिखट लागलं होतं पण राणीच्या
मनाला रोहिणीच बोलणं झोंबलं होतं. आपण अगदीच सामन्य घरच्या आहोत ही जाणीव रोहिणीने
तिला करून दिली कि काय हे तिला सारखं वाटत होतं.
राजन मात्र गटागट पाणी प्याला आणि राणीला हळूच धक्का देत
म्हणाला,
“झक्कास होता ठेचा, बघतो तुला रात्री.”
राणी लाजली आणि लाजतच जेवायला लागली. समोर असलेला मसाले भात
तिला खायचा होता, पण खायचा कसा हा तिला प्रश्न पडला होता, समोर असणारं कुणीच
हाताने भात खात नव्हतं पण राणीला तो हाताने खाण्यात मज्जा आहे हेच माहित होतं. हात
भातापर्यंत जावून मागे येत होते. शेवटी राहूच दिला तिने. राजन जवळचं बसून ते सगळं
बघत गालातल्या गालात हसत होता, म्हणाला,
“मला माहित आहे तुला मसाला भात हाताने खायचा आहे, तू त्या
दिवशी रेस्टोरेंट मध्येही हाताने खात होतीस, पण आज नवरी आहेस, सगळे तुला बघत आहेत.
चमचा घे आणि खा. नाहीतर राहूदे. आणि सावंतांकडे बाहेरच्या लोकांसमोर दिखावा खूप
असतो तेव्हां हे सगळं तुला शिकावं लागेल.”
राणी हसली, “असं काय! मग खरे सावंत अजून गवसायचे आहेत
वाटतं.”
आणि तिने चमचा घेतला, तोही चांदीचा होता. नजर पडली तर
पाण्याचा ग्लासही चांदीचा होता.
राजनने परत काजू कतली उचलली आणि तोंडात भरत तो म्हणाला,
“तसं समज, पण समारंभात आणि पार्टीमध्ये भारी थाट असतात
सावंतवाड्यात. इथल्या पंगतीची चर्चा असते.”
राणी गालात हसत होती आणि काहीशी मनात शांत झाली होती. आज
तिला सावंतवाडा राजेशाही वाटत होता आणि इथे वावरणारा प्रत्येक राजवंशी. घरात सरस्वती
आणि लक्ष्मी दोघीही विराजमान होत्या. जेवणानंतर सर्व आपल्या आपल्या खोलीत निघून
गेले होते, रोहीणीने राणीला तिच्या आणि राजनच्या खोलीत आणलं, ते आणलं कसं हे ही
राणीला कळत नव्हतं, बावरलेली ती राजनची मोठीशी खोली बघून जरा परत बावरली. राजन
यायला वेळ होता मग जरा खोली बघत होती, सामानाला हात लावावा की नाही हेही तिला उमगत
नव्हत, रोहिणी परत खोलीत आली आणि म्हणाली,
“वहिनी हे कपाट तुच्यासाठी नवीन बनवलं आहे, दादा येईपर्यंत
तुमचं सामान लावा इथे. तो जरा त्याच्या मित्रांसोबत बसला आहे.”
राणीने रोहिणी खोलीतून जाताच ते कपाट उघडलं, कपाट आधीच नवीन
साड्यां, ड्रेस आणि बरंच काही ह्याने भरून होतं. समोर चिठी होती, तिने ते उचलली,
लिहिलं होतं,
“प्रिय राणी, तुला आजचा दिवस भारी वाटला असेल ना
सावंतवाड्यात, हीच सावंत वाड्याची शान तुला कायम ठेवायची आहे. आजचं नाही....शिकशील
हळू हळू... आमच्या सर्वांच्या तुझ्याकडून खूप काही अपेक्षा नाही पण सावंतांची
प्रतिष्ठा सावंतांना अतिशय प्रिय आहे. बसं तेच जपा. हे सर्व तुझ्यासाठी आई आणि
बाबांकडून.
आई बाबा!
रोहिणी परत खोलीत आली,
“वहिनी कसं वाटलं आईच गिफ्ट.”
“अहो, पण आई कुठे आहेत?”
“ती खूप बिझी आहे ग, मिठीईचे बॉक्स वगैरे बघण्यात.
उद्यापासून पाहुणे निघतील ना, मग तयारी सुरु आहे, सोबत काय काय द्यायचं त्याची,
तुम्ही आराम करा. उद्या आई बोलेल तुमच्याशी. मी लगेच पाठवते दादाला.”
राणी त्या भव्य सजलेल्या खोलीत राजनची वाट बघत बसली होती.
मोहिते निवास-
घर सर्व परतले होते, अंकितने घरी येतांना कॅटरिनवाल्या कडून
भाजी आणि काही उरलेलं खाण्याच आणलं होतंच.
सानूने आणि अनुने ते गरम केलं, सोबतीला अजून थोड्या चपात्या
केल्या आणि सगळे हॉलमध्ये जेवत बसले.
जेवणानंतर हॉलमध्येच सर्वांनी गाद्या टाकल्या आणि पटापट
पडले, अनु आणि सानू आज सर्वांसोबत हॉलमध्ये झोपणार होत्या, कुणालाच गप्पा सुचत
नव्हत्या, सारे गुमान गप्प होते. राणीची आठवण येत होती. पडल्या पडल्या अंकितने
मोबाईल टीव्हीला कॅनेक्ट केला आणि सगळे लग्नाचे त्याने धावपळीत काढलेलं फोटो बघत
होते.
सावंत वाडा:
आलेशान सजेलेला सावंतवाडा शांत झाला होता, अधूनमधून आईचा
आवाज राणीला ऐकायला येत होता. ती कदाचित प्रत्येक खोलीत जावून पाहुण्यांची
विचारपूस करत होती. राणी कानोसा घेत होती पण हिंमत होतं नव्हती बाहेर डोकावण्याची,
राजन अजूनही खोलीत आला नव्हता. ती भली मोठी खोली तिला बघून हसत आहे असाच भास
राणीला होतं होता. राणी दिवसभराच्या समारंभाने थकली होती आणि तिचा डोळा लागला.
काही वेळाने दरवाजा वाजला आणि राणी दचकून उठली, समोर राजन
होता, “काय ग झोपली होतीस का?” थकलीस?”
“अहो जरा डोळा लागला, किती वेळ लावला तुम्ही.!”
“अग मित्र सोडत नव्हते, आणि माझे सगळे भाऊ आलेत, मामे भाऊ,
आतोभाऊ, चुलत भाऊ... मग गप्पा रंगल्या. आता कुठे त्यांनी मला सोडलं, ते अजूनही
बसले आहेत, डबल पार्टी सुरु आहे तिकडे.”
“अहो तुम्ही घेतली आहे का? वास येतोय.”
“हो मी रम घेतली आहे, अग ते सोडतच नव्हते. तू काळजी करू नको,
तू झोपं, मी घेत असतो कधी कधी. इट्स ओके. मी हेंडलं करेल. तू कपडे बदलले नाहीस.”
“हो बदलू का? राणी जरा अवघडत बोलली?”
“अरे म्हणजे, अवघडतं ह्या कपड्यात, तू आधी बदल बघू. साधसं
काही घाल. आईने आणि रोहिणीने इथे ह्या कपाटात सगळं ठेवलं असेल.”
राणीने परत कपाट उघडलं, नजर नाईटसूटवर पडली, तशी तिची नजर
तिच्या बॅगवर पडली, संध्याकाळी पाठवणीच्या वेळी झालेली तिची चिडचिड तिला आठवली,
कपाट बंद केलं, तिच्या बॅगजवळ आली, उघडली,. मनात विचार शिरला,
“उगाच ओरडले ना मी, तायडी! ऐकून घेतलं माझं. इथे तर सगळं
होतं....”
राजन वाशरूममधून आला,
“काय ग काय विचार करतेस, कपडे बदल ग, किती भारी आहेत ते,
मलाच तर कसंतरी वाटत आहे.”
राजानेही त्याची शेरवाणी बदलली, नाईट सूट घातला. आणि तो
भराभरा खाली निघून गेला. राणीने साडी बदलत होती तेवढ्या वेळात राजन खाली जावून
मसाला भात घेवून आला.
परत आला तेव्हा राणी गुलाबी शिफोनच्या साडीत त्याला अजूनच
सुंदर दिसत होती. त्याने तो मसाले भात खोलीतल्या टेबलवर ठेवला, राणीला बसायला
सांगितलं.
“राणी तुझी इच्छा राहिली होती ना भात खायची, जेवली नाहीस
तू.”
“चल जेवूया आपण, मी माझी आवडती इमरती आणली आहे. तू भात खा
मी हे खातो...”
राणीला आश्चर्य वाटलं, ती बघतच होती तर राजनने तिला मसाला
भात हाताने भरवलाही, “अहो मी खाते... असू द्या.”
राणीला तर मसाला भात खूपच आवडत होता, तिने आवडीने संपवला.
सोबत राजनच्या आवडीची इमरतीही खाल्ली.
दार परत वाजलं, राजन उघडायला गेला तर अम्मा काकी मसाला दूध
घेवून उभ्या होत्या, “राजन बाबू, दूध पाठवलं आहे आईसाहेबांनी.”
राजनेन दुधाची दोन्ही गाल्स आतमध्ये घेतली आणि दार कडीबंद
केलं.
खोलीतले दिवे मंद झाले होते, आणि प्रमाचे दिवे प्रकाशित.
घरात मंद मंद शांतता झाली होती आणि मनात कल्लोळ मजला होता.
सकाळीच राणी लगबगिने उठली, राजजने तिचा हात पकडला,
“अग झोपं, अजून कुणीच उठलं नसणार.”
“अहो पण ६ वाजले, आई उगाच पहिल्या दिवशी नाराज होतील.”
“असं म्हणतेस जा मग खाली,...”
राणी पटापट आवरून खाली आली, खाली सगळं सामसूम होतं, ती
खोल्या बघत बघत स्वयंपाक घरात पोहचली, कुणीही नव्हतं, अम्मा काकी तेवढ्या स्वयंपाक
घरात भांडी मांडत होत्या. राणीला बघताच म्हणाल्या,
“नवीन सुनबाई, आपल्याला काही हवं होतं का?”
राणी हळूच म्हणाली, “नाही... तसं नाही, अहो कुणीच कसं दिसत
नाही इकडे, मला वेळ झाला का.?”
“अहो नाही नवीन सुनबाई, सगळे थकले असतील ना, मग आरामात
उठतील.”
“म्हणजे?”
“अहो सावंत वाडा आहे हा, इथे सर्व त्यांच्या मर्जीचे मालक
आहेत. तुम्हाला काही हवं असेल तर सांगा.”
राणी अवघडत म्हणाली, “नाही, मी काही नाश्त्याच करू का?”
“तुमची मर्जी, इथे टाइम टेबल लागला आहे त्यानुसार आजचा मेनू
असेल. पण... कदाचित.”
“पण काय..?”
“पण काही नाही... तुम्ही करा.”
राणी परत अवघडली, म्हणाली, “पोहे आहेत का घरी?”
“हो आहेत ना, पण आजचा मेनू बाहेरून येणारं आहे, पाहुणे घरात
आहेत म्हणून. तुम्हाला पोहा हवा असेल तर मी करते.”
राणी काहीच बोलली नाही. आणि स्वयंपाक घरात बसून राहिली.
तेवढ्यात राजनच्या आत्या म्हणजे मोठ्या सासूबाई आल्या, खर तर त्यांना बघून राणी
घाबरली, कारण त्याच्या मुलाच्या दुसऱ्या लग्नासाठी सानूदीचं स्थळ आलं होतं, जे
नाकारल्या गेलं होतं. त्या येवूनही काहीच बोलल्या नाही, फक्त जातांना म्हणाल्या,
“काय बाई म्हणून सोयरीक केली महित नाही. सोयरीक कशी तोलाची
मोलाची पाहिजे, काय ते ध्यान आणून ठेवलंय आमच्या राजनने कोण जाने, कळतही नाही हिला
काही.”
म्हणत त्या परत अम्मा काकीला म्हणाल्या,
“अम्मा माझं निंबू पाणी घेवून ये टेरीस वर मी योगा करते
आहे.”
राणी उठून उभी झाली, काय बोलावं कळत नव्हतं. अम्मा काकीने तिला इशाऱ्यात शांत केलं, पण पहिल्या
सकाळीच तिला टोमणा पडला होता.
© उर्मिला देवेन
urmiladev@gmail.com
कथा वाचण्यासाठी मनापासून धन्यवाद!!
कथेच्या प्रकाशनाचे आणि सर्व अधिकार उर्मिला देवेन कडे कायद्याने राखीव... कथा कुठेही चोरून टाकलेली आढळल्यास कॉपीराईट कायद्याअंतर्गत शिक्षेस पात्र असाल...
कथेवर प्रतिक्रिया नक्की नोंदवा! आवडल्यास लाईक/ कमेंट/शेअर नक्की करा!
कथेचा पुढचा भाग लवकरच.
स्टे कनेक्ट, स्टे सेफ...
0 Comments