जोडीदार तू माझा .. भाग ५१



 सोहळा समाप्तीवर होता, हा तोच सोहळा असतो जिथे सर्व आनंदात होते आणि शेवट मात्र अश्रुनी ओला होतो. राणी पाठवणीसाठी तयार होत होती आणि पाहुणे मांडवात वाट बघत होते.

राजनच्या आईच्या कानावरही अंकितबद्दल बरंच काही आलं होतं, राजन जवळ आला आणि त्याच्या आईने त्याला विचारलं,

“काय रे तुला माहित आहे का अंकितबद्दल काही?”

“हो, मला तर कधीच माहित आहे.”

“मग, सांगायचं ना!”

“त्यात काय, खूप काही मोठी गोष्ट नाही, मुलगी चांगली आहे, घरच्यांना पसंत आहे, दिलीय त्याने कोर्टात अर्जी, आहे लग्न लवकरच.”

“मग काय रीतसर नाही करणार का लग्न?”

“अग, आता झालं ना हे लग्न मोठ्या थाटात आपल्या मागणीनुसार मग भावाने घेतली ना माघार, कशाला खर्च अजून. आणि मुलीकड्ल्यांना तर काहीच हरकत नाही, त्यांनी मुलगी आधीच देवून टाकली, ही तर लग्नाच्या दोन दिवसापासून इकडेच आहे, राणी आणि सानूसोबत.”

“हो का रे, बऱ आहे बाबा, आपल्याला नाही जमणार होतं, सावंतांचा भारी दरारा आहे.”

“तिचे बाबा मोठे मास्यांचे व्यापारी आहेत. आपल्या तोडीचे काय आपल्यापेक्षा जास्तच असेल त्यांचा वर्षाचा टर्न ओवर... दोनच मुली आहेत त्यांना. ती अनु मोठी आणि जी तिच्या सोबत होती ना ती लहान.”

“अग बाई, अंकितचं तर मस्त... इकडेही ऐकटा आहे आणि तिकडे तर ह्या दोघी...”

“हुमम, पण परीक्षा आहे त्याची... जावूदे आपल्याला काही हरकत नाही ना. तो त्यांचा घराचा प्रश्न आहे. अर्थात मी आता इथला आहे आहे म्हणून मला ही गोष्ट त्यांनी आधी सांगितली,”

“असं म्हणतोस, काही हरकत नाही बाबा आम्हाला, तुला माहित आहे ना.”

“अरे... मला तर पहिल्याच दिवशी राणीच्या बाबांनी सांगितलं. एवढं काही खूप मोठ वाटलं नाही म्हणून मी सांगितलं नाही, रागिणीसारखी ती मला... कशाला चुकीच ठरवू. आणि राणीचं मन मला दुखवायचं नव्हतं. उगाच इथेल्या घरचा तिथे बाऊ कशाला? माझ्यात आणि राणीच्या नात्यात एक नकळत रेष ओढल्या गेली असती, ह्या गोष्टीला वाव दिला असता तर. अंकित आणि अनया सक्षम आहेत एकमेकांसाठी जोडीदार म्हणून, काढतील मार्ग ह्याचा मला विश्वास होता आणि आहेही. असो, उगाच गोष्टीत तेल टाकू नका आपल्याला रीतसर सांगण येईल तेव्हा बोलू. विषय संपला. निघायचं आहे ना?”

राजनच्या आईने होकाराचा इशारा करत राजनच्या डोक्यावर हात ठेवला आणि ती उठत म्हणाली,

“निर्णय तुमच्या दोघांचा आणि नातंही पहिले तुमचं मोहित्यांशी, आम्ही बोलून काय उपयोग, पटलय मला, निघायचं ना की तुझं अजून काही आहे...”

“हो ना आहे माझं खूप काही आहे इथे, माझ्या बायकोची मंडळी आहेत ना, तिचा जीवं निघायला हवा आणि माझा तर तिच्यात आहे आता...”

“ये राज्या, झालं कि तुझं राणी पुराण... निघूया रे, चल म्हणावं तुझ्या राणीला सावंत वाड्यावर राज्य करायला. वाडा आणि माणसं सज्ज आहेत राणीच्या स्वागतासाठी.”

आई आणि राजनने एकमेकांना मिठी मारली आणि राजन अंकितकडे निघण्याच्या तयारीबद्दल बोलायला वळला. गाड्या परतीसाठी सज्ज होवून गेट समोर लागल्या होत्या.

राणीचा मात्र तिच्या खोलीत गोंधळ उडाला होता, मनात घराची आठवण होती पण पाठवणी तर हॉलमधून होती.

“तायडे माझी ती बॅग टाकली नाही बाळूने ग, आता मी काय करू?

“हे बघ चीडचीड नको करूस, आता त्याने टाकली नाही असं नाही ना ग, आपण पण नेमकी तीच कपड्याची बॅग विसरलो ना, होते घाईत ग, मी पाठवते घरी गेल्यावर, आता तिकडे गेल्यागेल्या तू काही कपडे बदलणार नाहीस. जरा निवांत असेल. मी पाठवते काही काळजी करू नकोस. हे सगळं मी आणि अनु आवरतो, तू शांत हो.”

“अनु हे सगळं टाक बघू ह्या बॅगमध्ये. मी अंकितला फोन करते.”

अनु आणि छकुलीने गुमान सर्व आवरलं. राणीची बॅग तयार करून दिली. राणीचे डोळे मात्र लाल झाले होते, तिचं काही क्षणाआधी ओरडणं तिला बोचत होतं, असं ओरडून बोलणं आता कुठे तिकडे घडणार होतं. सानूच अंकितशी बोलून झालं होतं आणि अंकितने त्याच्या मित्राल घरी पाठवलं होतं बॅगसाठी, घरच्या सोफ्यावर ती बॅग राहिली होती. रवी तासभरात ती घेवून येणार होता.

“राणी, बॅग येत आहे. काळजी करू नकोस. रवी गेलाय आणायला. तो पोहचेल तासभरात इकडे. तोवर मांडवात काही रिती भाती आहेत आपण आटपून घेवू. तुला बॅग मिळेल. आधी ते डोळे पूस. मी मेकअप करून देते.”

राणी दबक्या आवाजात म्हणाली,

“हो का, रवी गेलाय का... मग ठीक आहे. आणेल तो.”

काही समान घेवून सानूने तिला तयार केलं आणि मनाने हळवी राणीही तयार झाली निघण्यासाठी. राणीने पाठवणीसाठी असलेल्या सर्वाना अक्षद लावली, कुठे आठवणी येत होत्या तर कुठे हुंदका दाटून. पण राजन तिच्या सोबत होता. मग सारच आवरल्या जात होतं. दोघेही मांडवात जोडीने उभे झाले होते. समोरचा मार्ग त्याचा त्यांना चालायचा होता, राणीच्या मागे माहेरचे उभे होते आणि पुढे सासरचे. आणि मध्ये चालत होती एक जोडी जोडीने ज्याना साथ सर्वांची होती पण चलायचं स्वतः होतं.

काही अंतरावर माहेरची सर्व माणसं थांबली आणि दूरच्या अंतरावर सासरची माणसं उभी होती तिच्या प्रतीक्षेत. आता हे अंतर राणीला गाठायचं होतं. माहेर मागे पडणार होतं आणि ती सासरच्या माणसात मिसळणार होती. माहेरच्या थांबलेल्या माणसांना तिने एकदा पलटून बघितलं आणि उपरणाला ढील पडली, तिचं ढील सावरली राजनने, राणीला अश्रू आवरले नाही आणि ती आई, सानू आणि अनुला धरून रडू लागली. राजन मात्र उपरणं तसचं राणीकडे सोडून पुढे निघाला नाही त्याने राणीला पुरेपूर वेळ दिला. आणि जेव्हा राणी थांबली तो परत तिच्या सोबत चालायला लागला. दोघेही सावंत परिवाराजवळ पोहेचले होते. राणी त्या अंतराने आज सावंतांची सून झाली होती. आता ह्या क्षणापासून ती माहेरी पाहुणी होती.

बाबा, भीमा काका आणि अस्मित कुमार हात जोळून राजन आणि राजनच्या वडिलांसमोर येवून उभे झाले, बाबा म्हणाले,

“राणीला सून म्हणून नेताय पण मुलगी म्हणून ह्या घराशी तिचं नातं कायम असेल.”

तोच राजनच्या बाबाने त्यांचे हात पकडले,

“हो तर.... मी पण माझ्या मुलीला घेवून चाललोय, सून व्हायला तिला वर्ष लागतील. आणि तो तिचा स्वतःचा प्रवास असेल, पण मी माझ्या मुलीसोबत नेहमी असेल... काय ग राणी...”

आणि राणीचा रडका चेहरा खुलला. सर्व गाड्यांमध्ये बसले होते. रवी बॅग घेवून वेळेत पोहचला होता. आणि राणीची ती चिंताही मिटली होती. राणी राजन त्यांच्या गाडीत बसले, सोबत कुणीच बसलं नव्हतं, हे मात्र सानूला जाम आवडलं, निदान ह्या प्रवासात त्यांना बोलता येणार होतं, तिने राजनला गाडीच्या खिडकीतून म्हटलं,

“मस्त प्लानिंग केली राव, बोला आता, लग्नाच्या गर्दीत आज खूप काही राहिलं असेल बोलायचं आणि तिकडे घरी खूप काही थाटात तयार असेल... राजन राव मस्त... ऑल द बेस्ट! आमच्या राणीलाला सांभाळा...”

राजनही हसला, “अहो, हे तर ठरलं होतं, माझ्या आईसोबत, ती आणि रोहिणी पुढे गेल्या आहेत. आम्ही निघतो आता. अनुमती द्या ताईसाहेब, आपल्यामुळे आज राणी माझ्या सोबत आहे. खूप आभार हो.”

“असू द्या, मी निमित्य ठरले, बाकी तुम्ही दोघं मेड फॉर ईच अदर आहात, हे तेवढंच खरंय.”

“राणी, तुला काही काळजी करण्याची गरज नाही, तुझा जोडीदार तिथे तुझ्या सोबत आहे. बिनधास्त राज्य उभं कर जोडीने... ऑल द बेस्ट! माझी बहिण आहेस माझे गुण नक्की आहेत तुझ्यात... तू सर्व काही करशील.... काय वेडाबाई....”

सानूने राणीचा हात घट्ट पकडून जरा सोडून दिला, आणि राजन रावांना नमस्कार करत कारची काच बंद करायला सांगितली. अनु आणि अंकितने नकळत गाडीला हात लावून पाठवणीची प्रथा पूर्ण केली होती. गाड्या सावंतवाड्याकडे निघाल्या होत्या. तश्या त्या जानोश्यावरून त्यांच्या थाटात निघणार होत्या हे मोहित्यांना माहित होतं.

अंकितने अनयासह रीतसर बहिणीची पाठवणी केली होती. आणि हा मानही नकळत अनुला मिळाला होता, तिला अजून काय हवं होतं, न बोलता सार पदरात येवून पडत होतं. अंकितने मोठ्या हुशारीने अनुच्या भावनेचा मान प्रत्येक ठिकाणी ठेवला होता. घरच्यांना ते कळत होतं पण माज्जाल कुणी बोलणार होतं, अंकितने आईच्या शब्दला मान देत अनुच्या भावनांचा मान ठेवला होता, नकळत आईला कळालं होतं कि तिचा निर्णय काहीसा बरोबर नव्हता. पण घरात लग्नाच्या दिवसापर्यंत कुठलाच वाद झाला नाही आणि लग्न आटोपताच अंकित आणि अनया सर्वांसमोर सोबत जोडीने उभे राहू शकले. आज परत अनुला अंकितवर विश्वास बसला होता. आणि घरचे मनात शिरले होते. जोडीदाराशी नातं परत घट्ट झालं होतं येणाऱ्या आव्हानांना समोर जायला.

अनु आणि अंकित हातात हात धरून, गाडीकडे निघाले, समोर आई दिसली, अनुने हात सोडला, तोच अंकितने तिचा हात धरला आणि आईजवळ आला,

आई निघायचं ना आपणपण, तुम्ही व्हा पुढे मी येतो मागून. जरा आवरून घेतो इकडे.

आईने होकाराची मान हलवली आणि अनुला गाडीत बसण्यास नजरेने इशारा केला. अनुने एक नजर अंकितकडे बघितलं, आणि ती गाडीत बसली. तेवढ्यात कैलास गाडीसमोर आला, काकू मस्त झाला सोहळा, आता दुसरा कधी?

त्याला खेचत सानू म्हणाली,

तू जेवलास का रे? मला दिसला नाहीस जेवतांना. नुसता कामात होतास.

अरे किती काम असतात मेहुणीच्या लग्नात तुला काय माहित...”

“हे बहिण आहे तुझी ती आलं का लक्षात...

“बहिण म्हण नाहीतर मेहुणी.... एकच ग...”

“एकच नाही... जेवलास काय ते सांग..

“मग, मस्त दोन वेळा जेवलो...

दोन वेळा तर जेवलास, आता कशाला हवा तुला दुसरा सोहळा.

नाही म्हणतेस, मग घरच्या घरही चालेल मला.

आहे ना, ये घरी....

म्हणजे तू तयार आहेस, येवू मी घोडीवर…

तू गाडीवरच ये... आणि शक्य झालं तर घेवून ये तुझ्या तिलाही.

काय ग सानू.... तू माझा पचका करतेस, माझ्या अजून तिचा पत्ता नाही आणि तू मला म्हणतेस... तू तर तयारच नाहीस... मग काय दुसरीकडे टाकतो आता नजर...

कशाला टाकतोस काकूने पाहून ठेवली आहे... माझं बोलणं झालं आज मांडवात.

असं होय म्हणजे तिने तुला सांगितलं माझ्याशी बोलायला....

हो, आणि आता तुझी ती बुलेट बाजूला कर, गाडीला निघू दे, जाम थकलोय आम्ही, तू ये घरी इथूनच जावू नकोस... बघ काय असेल ते.

सानू मी येतो पण नाईटशिप आहे माझी, जास्त वेळ थांबणार नाही...

“बऱ होईल, पण ये लवकर... तुझ्याशी काही बोलायचं आहे...”

“असं म्हणतेस... अरे उडत जा ती नाईटशिप... आलोच...आणि त्याने त्याची बुलट बाजूला केली.

अस्मित कुमारही हॉल मधूनच बेंगलोरसाठी निघून गेले, ते उद्या परत येणार होते, जवळपासचे पाहुणेही हॉलमधून परतले. घरचे पाहुणे घरी निघाले होते.

अंकितने बाबांना आणि भीमा काकांनाही पाठवून दिलं होतं. तो, रवी आणि कैलास सगळं आवरत थांबले होते.कथा क्रमशः

© उर्मिला देवेन

urmiladev@gmail.com

कथा वाचण्यासाठी मनापासून धन्यवाद!!

कथेच्या प्रकाशनाचे आणि सर्व अधिकार उर्मिला देवेन कडे कायद्याने राखीव... कथा कुठेही चोरून टाकलेली आढळल्यास कॉपीराईट कायद्याअंतर्गत शिक्षेस पात्र असाल...

कथेवर प्रतिक्रिया नक्की नोंदवा! आवडल्यास लाईक/ कमेंट/शेअर नक्की करा!

कथेचा पुढचा भाग लवकरच.

स्टे कनेक्टस्टे सेफ...

Post a Comment

0 Comments