जोडीदार तू माझा... भाग ३७

 भाग ३७ 



आई बाबा दागिने खरेदीसाठी निघून गेले. अनया त्यांच्या जोडीदाराच्या नात्याला बघून स्तब्ध झाली होती, न बोलता बाबांना आईच्या भावना कळत होत्या, आणि बाबांच्या भावना आई व्यक्त होत होती हे बघून अनया मनातच त्यांचं कौतुक करत राहिली. तिला कळलं होतं आईसोबत बाबा खंबीर उभे आहेत आणि तिला आता स्वत: मार्ग काढावा लागेल. बाबा मदत करणार नाहीत पण प्रेमाने नजर ठेवतील... सांभाळतील, पण आईच्या विरोधात जावून नाहीच. तिने दीर्घ श्वास घेतला.

जरा वेळ शांत सोफ्यावर बसून हॉलमधून घराला नेहाळत होती, समोरच आई बाबांचा भारदस्त मोठा फोटो लावला होता... त्यांना बघून जोडीदाराची संकल्पना अजूनच घट्ट झाली तिच्या मनात. शेजारी नवीनच फ्रेम करून लावलेला राणी आणि राजनचा फोटोही होता, आणि जरा जागा मोकळी होती. तिच्या मनात विचार घोळू लागला,


“माझा आणि अंकितचा... फोटो हवा ना इथे...”

मनात आलेले विचार परत आदळले,

“आपला कसा असणार आपण तर पळून लग्न केलं...”

जरा वेळ मनाला शांत केलं तिने,

“असो... येईल तो क्षण जेव्हा आई आणि बाबा स्वत: ह्या इथे आमच्या दोघांचा फोटो लावतील... तोपर्यंत लढाई सुरू अनु, मोहित्यांची सून म्हणून उभं व्हायचं आहे...”

जरा स्वप्नात रमली, तोच तिला तिच्या आईचा रडका चेहरा आठवला, आणि डोळे भरून आले,

आई, सॉरी ग, तुझी इच्छा होती ना माझं लग्न धूमधाम करण्याची, मी नाही चान्स दिला तुला. समजून घे ना....”

अश्रू गालावर ओघळत होते, विचारांच्या लाटा मनात उसळत होत्या. तर परत अंकित आणि सानूचा बाईकवरचा फोटोवर तिची नजर पडली,

सानूदी, काही वेगळीच आहे ही, कशी घरच्यांना घेवून चालते, मला जमेल का हिच्या मागून. आता सानूदीपण लग्न होणार मग मी होईल आईबाबांची मुलगी? जमले मला? का नाही, मी प्रयत्न करायला तयार आहे, बाबा तसे नाही, आई जरा.... पण प्रत्येक नात्याला वेळ द्यावा ना.... सगळं नीट होईल, इथे सगळे आहेत माझ्यासोबत.”

स्वप्नाच्या गोड विचारात तिचा डोळा लागला, आणि जोर जोरात बेल वाजण्याचा आवाज तिच्या कानी पडू लागला, जणू स्वप्नात बेल वाजत आहे हा भास तिला होतं होता आणि एकदम आवाज आला,

"अनु.... अनया....”

अनया ताडकन उठली, दाराकडे सरसावली, दार उघडलं, समोर अंकित होता, एकदम बिलगली, अंकित ही तिला गच्च बिलगला, घरात शिरताच त्याने दार लावलं,

"तू कशी आहेस? जेवली होतीस का? आणि घरात एकटीच का आहेस? काही झालं तर नाही ना...”

आई ….आई ... बाबा ,बाबा …म्हणत तो स्वयंपाक खोलीकडे निघाला, अनयाने त्याचा हात धरला, "अंकित सर्व ठीक आहे, आई बाबा आताच काही वेळेआधी दागिन्यांच्या दुकानात गेले आहेत."

“अरे हो मी पण ना भांबावलो आणि विसरलो होतो.”

आणि ती पाण्यासाठी वळली... तर परत अंकिताने तिला मागून येऊन गच्च मिठी मारली,

"अनु आज दिवसभर कामात मन नव्हतं माझं,  मग लवकर निघालो आज, तू कशी आहेस...? कुणी तुझ्या घरच्यांनी येऊन इकडे राडा तर नाही ना घातला..."

अनया  हळूच त्याच्या मिठीतुन बाहेर आली,

"नाही रे असं काही झालं नाही, आणि जे झालंय तेही तुला सांगण्या इतकं महत्वाचं नाही.... तू sतू ते काय म्हणालास राडा… माझ्या घरच्यांचा?"

"तुझ्या बहिणीचा फोन आला होता कि तुझ्या आईची तब्यत खूप खराब झाली म्हणून आणि बाबा काहीही करू शकतात इकडे येऊनही... आलियाला त्यांनी इथला पत्ता विचारला म्हणे पण ती बोलली कि तिला माहित नाही... तर तुझ्या फोवरून त्यांनी मला फोन केला होता... जाम शिव्या दिल्या ग ... सगळं गुमान ऐकून घेतलं मी... पण काळजी वाटत होती म्हणून हा असा ताडकन निघून आलो. तुझे बाबा जर अख्खा विदर्भ वाडा घेऊन इथे आले तर ... काहीच आवरता येणार नाही... आणि मला बाबांची काळजी वाटली, ते हार्ट पेशन्ट आहेत, आणि आईचा बीपी नेहमी लो होत असतो..."

"बापरे! आता कसं होणारं रे? आता रे? काय करायचं आपण ?" अनया घाबरत बोलली.

“कसं, काय? म्हणूनच मी आलोय ना घरी, मी सानूदीलाही फोन केलाय, ती निघाली आहे ऑफिसमधून. राणी पण येत आहे, रस्त्यात होती मी कॉल केला तेव्हा... "

"अंकित मला भीती वाटत आहे रे." अनया परत अंकितला बिलगली.

"घाबरू नको, बरं झालं बाबा आई घरात नाही.... मी सानूदीला सांगतो त्यांना अजून काही खरीदी करायला सांग म्हणून म्हणजे ते जास्त वेळ बाहेर राहतील आणि इथे काही झालं तर आपण सर्व सांभाळून घेऊ.... "

अनया आता फार घाबरली होती तोच राणीने बेल वाजवली, बाळूने जाऊन दार उघडलं,

“बाळू ठीक ना रे सारं?

“हो अजूनतरी...”

“बर झालं आई बाबा नाहीत. अनया वहिनी ठीक आहे ना?”

“हो हो, राणी तू फ्रेश हो आणि निघ राजनला भेटायला मी सांगितलं आहे त्याला, तो तुला पीक अप करणार आहे चौकातून ."

राणीने अनयाकडे रागाने बघत एक कटाक्ष टाकला आणि खोलीत गेली... अनया अंकितसोबत त्याच्या खोलीत गेली आणि बिलगून रडू लागली,

"ये रडू बाई रडतेस काय ग अशी? जब प्यार किया तो डरना क्या ? आणि एक लक्षात घे ह्या घरातले कसेही वागत असले तरी कुणाही समोर ते तुला आणि मला एकटे पाडणार नाहीत. सगळे आहेत आपल्या सोबत ... " अंकित अनयाला धीर देत म्हणाला.

"राजन भावजी आले होते सकाळी ?" अनया हळूच बोलली.

“मग काय बोलले का...?. मी फोन केला तेव्हा नुसते चिडवत होते, काही वाटलं नाही मला कि त्यांना काही फरक पडला असेल म्हणून, खुल्या विचारांचे आहेत, घेतील राणीला सांभाळून आणि त्यांच्या घरच्यांनाही… आपल्याला दोघांना फक्त सर्वांना घेऊन चालायचं आहे... इथल्या कुणाचं मन तुझ्या माझ्या मुळे दुखायला नको, बस आपल्याला एवढंच करायचं आहे... काही लढाया शांत राहून लढाव्या लागतात... "

आणि राणीने आवाज दिला,

"बाळू मी निघते आहे पण काहीही वाटलं तर कॉल कर ... काळजी घे. .. अनया वहिनी हिम्मत ठेवा... लग्न करण्याची हिम्मत केली ना आता तेच पुढे ठेवा... आम्ही आहोत सगळे सोबत.. " राणी निघतांना टोचून बोलली.

"ये बाळू नक्की कॉल कर काही झालं तर." राणीने दार लोटत म्हणाली.  

अंकिताने बाल्कनीत येऊन मान हलवली . आणि तो परत खोलीत गेला,

अनया त्याला म्हणाली, "तू राणी ताईला का बाहेर पाठवलं रे ?"

"नको ग... तिच्यासमोर काही… उगाच तिच्या मनाला लागायचं. आणि डूख धरून बसायची तुझा आणि माझा, तिचा स्वभाव आहे... मग मीच विनवणी केली राजन रावांना आणि सांगितलं तिला भेटायला... उगाच तिचा लग्नासमोर मूड जायला नको.  जरा हळवी आहे, पण माझी लहानाबाई मला कधीच त्रास होवू देणार नाही हेही नक्की माहित आहे मला."

 अनया अंकितकडे बघतच राहिली, तिच्यासोबत उभा असूनही त्याला बहिणीची काळजी होती हे तिच्या नजरेत आलं होतं. अंकितने हळूच अनयाला जवळ घेतलं,

"काय विचार करत आहेस...? प्रेम विवाह आहे आपला, पण लग्न झाल्यापासून प्रेमाचं क्षणही जगलो नाही आपण, हेच मनात आहे ना तुझ्या.."

अनया परत अंकिताला बिलगली, डोळे भरून आले होते. प्रेमाची सोनेरी दुनिया काट्यांची बोचत होती. भावनांचा गुंता वाढला होता. भीतीने मनात काहूर माजला होता... प्रेम विवाहाच प्रत्येक्ष रूप असं असतं ह्या भावनेने ती कासावीस झाली होती. प्रेम दोघंच असूनही किती लोकांची मनधरणी करावी लागते हे तिच्या लक्षात आलं होतं... प्रेमात एकमेकांना जिकतांना सर्वाना जिंकाव लागतं हे तिला कळून चुकलं होतं. लग्न हा प्रेमाचा विजय नाही हे तिला जाणवलं. आपण लग्न केलं आणि समस्यांना पूर्णविराम लागला हे चुकीच आहे हे तिच्या ध्यानात आलं.

तिची मिठी परत घट्ट करत अंकितने तिच्या माथ्यावर ओठं टिपले, माथ्यावरून ओठापर्यँत ते सरकत आले... श्वास बेभान झाले… ओठांवर ओठ पडले, श्वासांची धुंदि एकजीव झाली,  तिच्या त्या  नाजूक रुपाला बघून अंग अंग रोमांचित झालं होतं अंकितच... मनाला आवर पडत नव्हता पण मेंदू तेवढ्याच गतीने ओढत होता.

मीही जरा ओढते आणि बाकी उद्याच्या भागात मांडते...


कथा क्रमशः 

© उर्मिला देवेन

urmiladev@gmail.com

कथा वाचण्यासाठी मनापासून धन्यवाद!!

कथेच्या प्रकाशनाचे आणि सर्व अधिकार उर्मिला देवेन कडे कायद्याने राखीव... कथा कुठेही चोरून टाकलेली आढळल्यास कॉपीराईट कायद्याअंतर्गत शिक्षेस पात्र असाल... 

कथेवर प्रतिक्रिया नक्की नोंदवा! आवडल्यास लाईक/ कमेंट/शेअर नक्की करा!

कथेचा पुढचा भाग लवकरच.

स्टे कनेक्ट, स्टे सेफ...

फोटो साभार गुगल

Post a Comment

0 Comments