जोडीदार तू माझा... भाग ३३
मनात खूप गोंधळ आणि हुरहूर घेवून अंकित आणि अनया होते, जाणीव होती त्यांना काय केलंय त्यांनी म्हणून पण ... प्यार किया तो डरना क्या ... आता पुढे
अंकित आणि अनया ऐकमेकांचा हात पकडून उभे होते, जणू ते गुन्हेगार होते घरच्यांचे असचं काहीसं चित्र होतं ते. सारे गप्प झाले होते अंकितच्या बोलण्याने, आईने तोंडाला कुलूप लावलं होतं, बाबा विचारात होतेच. राणी तिच्याच विचारात होती कि आता राजनकड्च्यांना कसं सांगायचं. जरा वेळ शांतता होती घरात.
सानूने अंकितला जवळ घेतलं, “अरे हो आम्ही काहीच म्हणत नाही आहोत, पण बाळू आपल्याला मार्ग काढावं लागेल ना, अरे कुणीच अनयाला कुठेच पाठवणार नाही, तुला कुठेच जायची गरज नाही. कळलं का? शांत हो.”
बाबा सानूला हाताने इशारा करत म्हणाले, “ठीक आहे, आता विषय संपला, राणीचं लग्न होवून जावू द्या, त्या दरम्यान आम्ही भेटून येवू अनयाच्या घरच्यांना, काही जमलं तर ठीक नाही तरी ठीक, बाळूने कोर्टात अर्जी केलीच आहे, आपण रीतसर लग्न लावून देवू ह्याचं. पण आता थांबा तुम्ही सर्व.”
“अनया तू सुनबाईच आहेस ह्या घरची हे लक्षात ठेव, पण जरा आता काही दिवस मुलगी म्हणून राहा इथे.”
“राणी, सानू सांभाळा तिला, तिच्या मान सन्मानात कुठेच कमी नकोत आपण.”
“सुनबाई आता आम्ही तुझं मनात असूनही हवं तसं स्वागत करू शकत नाही पण ह्याचा अर्थ असा नाही कि आम्ही तुला वेगळं समजू, वेळ दे आम्हाला, हा येवढा मोठा धक्का पचायला वेळ लागेल ना, जरा तूही समजून घे, जे झालंय त्यात तुझी भूमिका होती हे तर मान्य ना तुला? आता तू दोषी वगैरे आहेस असं आमचं काहीही म्हणण नाही, तसा तू गैरसमजही करून घेवू नकोस पण हा नाजुक विषय आहे ह्याला नाजुक पद्धतीने हाताळावा लागेल ना?”
अनयाने अलगत मान हलवत होकार दिला. आता बाबा बाळूला म्हणाले,
“आणि तू रे, दे तिला साथ जोडीदार आहेस तिचा, काय तिचं कॉलेज वगैरे काय ते कसं बघा जरा, ह्या सर्व व्यायापात काहीही सुटता कामा नये. आता लग्नाचे पाहुणे घरी येणं सुरु होणार तेव्हा सगळं जपून करा आणि वागा. निदान तेवढी अपेक्षा आमची आहे.”
“अनया आता तू ह्या घरची आहेस तेव्हा सगळ्या गोष्टीच भान असू दे, एवढीच अपेक्षा आहे तुझ्या कडून, चला आपल्या आपल्या कामाला लागा.”
“राणी, राजन कधी येणारं ते सांग आम्हांला, त्याच्याशी बोलून घेवू त्याला आधी विश्वासात घेणं गरजेच आहे, नकळत कुणाकडून कुठल्याही पद्धतीने गोष्ट त्याच्यापर्यंत पोह्चाण्याधी आपण ती त्याला रीतसर जशीच्या तशी सांगूया.”
“आरती चल आपल्याला त्या सोनारा कडे आज जायचं होतं, आटोप सर्व पटपट, निघूया, दुपार पर्यंत.”
आई गप्पच तयारीसाठी निघून गेली, सानू ऑफिसची तयारी करत होती. अंकितही तयार होवून ऑफिससाठी निघाला होता.
“अनया, मी निघतो ग, काळजी घे तुझी,”
असं अलगत, काहीसं लाजत, काहीस अवघडत अंकित, डोकावत, राणीच्या खोलीबाहेरून बोलला, तशी अनया बाहेर आली, डोळे परत भरून आले होते तिचे, मान हलवत तिने होकार दिला. अंकितने तिला इशाऱ्याने दिलासा दिला. डोळे त्याचेही पाणावले होते पण खचून कसं चालणार ह्या विचाराने त्याने सगळा आवंढा गिळला होता.
मागून येवून सानूने त्याच्या खांद्यावर हात ठेवला,
“बाळू काळजी करू नको, आम्ही आहोत तिच्या सोबत, आणि आई बाबा असतात घरी. रमेल ती, तिला कुठे जायचं आहे का?”
“नाही ताई, मी घरात मदत करू का? चालेल का तुम्हाला?” अनया हळूच म्हणाली.
“अरे, चालेल म्हणजे धावेल, पण तुझं काही असेल तर तेही कर, तुला कुणी काही म्हणणार नाही इथे.” सानू आईला इशारा करत म्हणाली.
“म्हणजे तुझा काही क्लास वेगेरे आहे का?” आई पेपर उचलत म्हणाली.
“नाही आई... काकू...”
“चालेल मला आई म्हंटल तरी.”
“आई माझं काही नाही, मी कॉम्पुटर शिकायला जायची पण ते बंद झालं माझं. म्हणजे बंदच केलं बाबांनी नंतर.”
“बऱ, मग आता काही करायचं आहे. परत सुरु करायचं का” बाबा आई जवळ येवून बसत म्हणाले.
“हो, नाही .....तुम्हाला चालले का? मी...”
“अरे, म्हणजे... हा घे पेपर बघ कुठे काही आहे का तुझ्यासाठी, आमची काही हरकत नाही. पण जरा जपून.”
“अंकित, बघ काय ते, तिचे क्लासेस परत सुरु करून देशील.”
“बाबा धन्यवाद, मी बघतो, येतो मी ....” अंकित निघतांना म्हणाला.
अनयाने बाबांनी दिलेला पेपर घेतला आणि खोलीत गुमान बसून मुलाखती बघत होती. सानू निघाली होतीच आणि राणीही कॉलेजसाठी निघणार होतीच तर राजनने बाहेरून गाडीचा होर्न वाजवला.
बाबा बाहेर निघाले,
“अरे या या जावई बापू... या...”
“अहो इकडे जरा काम होतं म्हंटल काल राणीने फोन केलेला मग जरा टाकली इकडे चक्कर.” सानू गेटवरच होती तर तिनेही ऑफिसला आधी फोन लावून कळवलं कि ती जरा लेट येणारं म्हणून. बाबा राजनला घेवून आत आले. मागेच सानूही आली. वेळेची चुकामुक झाली आणि अंकित ऑफिससाठी निघून गेला होता. राजन आलाय म्हटल्यावर अनया घाबरली. आतमध्येच बसून राहिली. डोळे परत पाणावले होते. काळजी तिलाही होती, तिच्यामुळे अजून काही अडचण नको ह्यात विचारात ती मनातून हादरली होती.
बैठकीत सर्व बसले, सांगाव कसं कुणाला कळेना झालं होतं, मग बाबांनी अनयाला आवाज दिला, “अनया बेटा, जरा ये इकडे.”
अनया आणखीनच घाबरली, खोलीतून निघालीच नाही, मग परत बाबांनी आवाज दिला, तरीही ती आली नाही.
“सानू, जा काय करते आहे ती? बोलावं जरा बाहेर, आपण ओळख करवून देवू या.”
तेवढ्या वेळात राजन आणि राणीचे इशाऱ्यात बोलणे सुरु होतेच पण राजनला काही कळेना. राणीने त्याला कळत नाही म्हणून तोंडाचा मुरडा मारला आणि राजन हळूच हसला. सानू खोलीत आली तेव्हा अनया पार भिंतीला चिपकून बसली होती,
“ताई, मी नको ना..”
“अग असं काय करतेस, तुझी ओळख करवून द्यायची आहे, बस!, लपवायचं नाही ना आपल्याला घरच्यांपासून. मी आहे चल.”
सानुने अनयाला हॉल मध्ये आणलं,
“राजन रावं ही माझी वहिनी, बरका! आणि जरा दम घ्या. सर्व सांगते.”
राजन उभाच झाला, आणि सानूने बसायला सांगताच आश्चर्य विभोर होवून बसला.
बाबांनी आणि सानूने घडलेला सर्व प्रकार राजनला सांगितला. अनया उभीच होती, मनातून घाबरली होती. तिलाही काळजी वाटत होती कि तिच्यामुळे काही चुकायला नको आणि जमलेल्या नात्यात इर्जन पडायला नको म्हणून. सारखी शून्यात बघत उभी होती. सर्व ऐकून राजन म्हणाला,
“मला अंदाज आला होता त्या दिवशी पण मी बोललो नाही. असो, मला ह्यात काहीच वावगं वाटत नाही, माझ्या आणि राणीच्या संबंधात ह्याने काही फरक पडत नाही, आणि हा जोही निर्णय आहे तो सर्वस्वी अंकित आणि अनयाचा आहे. माझं काहीही म्हणणं नाही, तुम्हा घरच्यांना जे यौग्य वाटत असेल ते करा तुम्ही. माझी साथ असेल. अर्थात मला माझ्या घरी सांगाव लागेल पण ते आताच येवढ्या घाईत सांगाव असं काही नाही. आणि ही किती घाबरली आहे.”
“अनया घाबरतेस कशाला? प्रेम केलसं, लग्न करण्याची हिंमत दाखवली आणि आता काय घाबरायचं, जे होईल त्याला समोर जायचं. तू काही कुणाचं वाईट करणार नाहीस, आणि माझं आणि राणीच तर नाहीच नाही”
“माझ्या मुळे राणी ताईला त्रास तर नाही होणार ना?”
“कशाला? मला काय दुसरे कारण नाहीत का तिला त्रास द्यायला.” आणि तो हसायला लागला.
राणीने परत तोंड वाकडं केलं, आणि घरात वातावरण हसरं झालं.
राजन परत अनयाला म्हणाला,
“हस आता.. आणि नात्याने तू माझी बहिण होतेस. काही लागलं तर सांग मला, असा कान पिळतो ना त्या अंकीतचा, चुपेरुस्त्म निघाला.”
राजनने क्षणात सर्व वातावरण हसर केलं आणि बाबांचा आशीर्वाद घेवून निघाला, मागेच त्याला सोडायला राणी निघाली,
“अहो, घरी कसं सांगणार तुम्ही?” राणी मागून हळूच बोलली.
“बघतो मी, प्रश्न आहे पण उत्तर नक्कीच असेल ना? तू काळजी करू नको, तुझं कॉलेज?”
“हो मी निघते आहे आता...”
“मी सोडतो तुला.”
“बाबा मी सोडतो राणीला कॉलेज पर्यंत, चालेल ना?” राजन गेटवरून बोलला.
बाबा परत दारात आले, “हो चालेल, हो, चालेल राजन रावं.”
सानू अनयाला म्हणाली, “अनु... ये तुला अनु म्हंटल तर चालेल का ग?”
“हो ताई, म्हणा तुम्ही, लहानच आहे मी तुमच्यापेक्षा...आणि माझी आई म्हणतेच ना मला अनु ....”
आईची आठवण होताच अनया परत रडकुंडीला आली होती.
“अग बाई, रडू बाईच आहेस ग तू.... जावू आपण तुझ्या आईला भेटायला, हवं तर फोन कर, काही हरकत नाही, संबंध अशे तुटतात का ग....? जावूदे वेळ जरा. होईल सगळ नीट. आणि हे जरा जरा गोष्टीला डोळ्यात पाणी आणायचं नाही. मोहित्यांची सून आहेस तू. हा मोहिते निवास तुला आनंदाने भरायचा आहे. चल मी निघते, संध्याकाळी सांग मला तू काय काय केलं ते. बोलू आपण. “
“आई मी येते ग,”
“अग सानू जरा थांब,”
“काय आई?”
“अग हिने काही सामान आणलं दिसत नाही सोबत.”
“मग, दे कि तिला माझे सुट, होतील तिला... नाही राहूदे, हे पैसे घे, जावून या दोघी, काही सूट घेवून घे तिच्यासाठी.”
अनया मागून आली, आणि म्हणाली, “ताई मला शिवणकाम येत, मी शिवू का ड्रेस घरी, मशीन आहे का आपल्याकडे ?”
“बाबा, अहो बाबा, घ्या तुमच्या शिलाई मशीनला वाली भेटला, काढा ती माळ्यावरून बाहेर.” सानू बाबांना आवाज देत म्हणाली.
“अनु, बाबांना मदत कर, ते देतील तुला मशीन साफ करून, मी निघू..?”
“हो ताई, या तुम्ही, मी... मी जाते बाबांकडे....”
आता घरात आई बाबा आणि अनया होते. अनया आणि सर्वच मनातल्या मनात दचकून होतेच. आई तर फारच मनातून हादरली होती पण दाखवत नव्हती, एकाऐकी सून घरात हे तिच्या मनाला पटत नव्हतं. बघूया अनया आणि आईची गट्टी होते काय ते... पुढच्या भागात..
कथा क्रमशः
© उर्मिला देवेन
कथा वाचण्यासाठी मनापासून धन्यवाद!!
कथेच्या प्रकाशनाचे आणि सर्व अधिकार उर्मिला देवेन कडे कायद्याने राखीव... कथा कुठेही चोरून टाकलेली आढळल्यास कॉपीराईट कायद्याअंतर्गत शिक्षेस पात्र असाल...
कथेवर प्रतिक्रिया नक्की नोंदवा! आवडल्यास लाईक/ कमेंट/शेअर नक्की करा!
कथेचा पुढचा भाग लवकरच.
स्टे कनेक्ट, स्टे सेफ...
फोटो साभार गुगल
0 Comments