जोडीदार तू माझा... भाग २७

 जोडीदार तू माझा...  भाग २७ 



एक पिढी अस्ताला येण्याआधीच पुढची पिढी उदयाला आलेली असते. ती जसं-जशी आपली पाय रोवते तसं-तशी जुनी पिढी ऱ्हास व्हायला लागते. उगवत्या सूर्याला जसे सारेच सलाम ठोकतात तसचं काहीस असतं नवीन आणि जुन्या पिढीत, नाही का? आता बघूया आजच्या भागात.

जुन्या पिढीचा अनुभव आणि कार्य हे खूप काही शिकवणार असलं तरीही नवीन ते नवीच असतं. नवीन विचार आणि त्याला घडवून आणण्याची पद्धत काही न्यारीच. सानूही असचं काही करत होती जवाबदारी ने वागतांना. 

घरात नवीन विचारांचे वारे वहात होते. राजनने त्याची जवाबदारी हातात घेत राणीला उभं करायची जवाबदारी घेतली होती. त्याला असं बघून आई बाबांचा नवीन पिढीच्या प्रेमावर अजूनच विश्वास बसला होता. पहिल्या नजरेतलं प्रेम हे हेच का, असा विचार घरातल्या प्रत्येकाच्या मनात घुमत होता.  प्रेमात राणी आणि राजन होते पण संपूर्ण घर तो आनंद घेत होतं.

प्रेमाच एक नातं सर्वांना प्रेमाच्या नात्यात हळुवार गुंतवत चाललं होतं. सावंत आणि मोहित्यांमध्ये संबंध सुधारत होते. सावंत राणीला मनापासून भावी सून म्हणून स्वीकारायला तयार झाले होते. राणी सावंतांच्या रिती भाती मनात रुजवत दिवस जणू मोजत होती.  तिच्यात आणि राजनच्या आईत संवाद वाढत होता. दिवस आणि रात्री एकमेकांना ओलांडत सुखाची चव घेत धावत होते.

बघता बघता, उद्यावर साखरपुडा येवून ठेपला होता. आरतीची आणि अरुणची घरात गडबड सुरु होती. घरात रोषणाई लागली होती, बाहेर मांडव पडला होता, घरात धामधूम होती पण घरात अजूनतरी पाहुणे यायचे होते. सारी धामधूम सुरू होती ती आरती आणि अरुणची, दोघांची खेचाखेची आणि गोड गोड भांडणांनी घर आपसूकच दणाणलं होतं. तशी गाडी घरासमोर लागल्याचा भास अरुणला झाला, चष्मा सांभाळत तो दारावर आला, मोहित्यांकडले राजनचे बाबा आणि त्यांची मोठी बहिण आणि बहिण जावई, मंडळी सावंतांकडे पोहचली होती.

“अरे, सावंतसाहेब आपण, बाईसाहेब, या या, असे अचानक” अरुण पाहुण्यांना बघून हात जोडत  म्हणाला.

“अग, आरती पाहुणे आलेत ग, ये जरा पाणी घेवून बाहेर,” अरुणने घरात डोकावत आरतीला आवाज दिला.

सावंतनाकडले हात जोडून उभे होते. बघून आरतीच्या हृदयाचे ठोके वाढले होते, सानू घरी नव्हती.  राणी  पार्लरला गेलेली. बाळू वरच्या खोलीत सजावटीच काम करत त्याच्या तिच्याशी गप्पा करत होता. पाहुणे येताच तो सगळं सोडून गॅलरीत येवून उभा झाला, जिथून खालच्या हॉलची बैठक दिसत होती.

“अहो, बसा आधी आपण,” अरुनने सर्वाना बसायला सांगितलं.

राजनचे बाबा हात जोडत म्हणाले, “अहो मोहिते आपल्याकडे एक प्रस्ताव ठेवायाच होता.”

“काय तो?” बाबा जरा घाबरत म्हणाले. आईपण आता बाबांजवळ येवून उभी झाली.

“अहो घाबरू नका, काही नकोय आम्हांला, पण आपली सानवी सून म्हणून हवी आहे.”

“सानू. पण राजन राव तर..?”

“अहो राजनसाठी नाही, माझ्या बहिणीच्या मुलासाठी....”

“म्हणजे राघवसाठी का?”

“अहो हो, जोडी कशी मस्त दिसेल हो.”

“पण....”

बाबा पूर्णपणे गडबडले होते, लाडाच्या मुलीला असं स्थळ आलेलं बघून बाबा पार मनातून कासावीस झाले होते. काही शब्द निघत नव्हते त्यांच्या तोंडातून. त्यांना असं बघून सावंत साहेब पुढे म्हणाले.

“म्हणजे तसं काही नाही, त्याला ती पसंत पडली आहे, म्हणून फक्त आम्ही विचारायला आलोय. तसा....ss...आपल्यावर फोर्स नाही हो. आम्ही सानवीला ओळखून आहोत. पण एक शब्द विचारावा म्हणून आलोय. बघा जमतं काय ते, काय दोन्ही मुली एकाच घरात असतील ना, साथ असेल दोघींना.”

बाबा गुमान गप्प सोफ्यावर बसले. गप्पच झाले. त्यांच्यासाठी पाहुण्यांना आता काही सांगण अशक्य होतं. उद्या साखरपुडा होता आणि आज हा निर्णय घेणं म्हणजे सारी नाती कात्रीत आली होती. गुमान गप्प झालेल्या बाबांना बाळू बघत होता. बाबा का बोलत नाहीत म्हणून त्याला राग येत होता.

बाबांनी आरतीकडे बघितलं, तिच्या चेहऱ्यावर आनंद होता. कारण आईला तर सानूच लग्न हा मनातला विचार होता. मग त्यांनी वर नजर करत बाळूकडे पाहिलं आणि बाळूने चक्क नकाराची मान हलवली आणि भराभरा पायऱ्या उतरून खाली उतरला.

“काका, राघव दादा साठी म्हणताय ना आपण.” बाळू जरा जोरात आणि पायऱ्या उतरत म्हणाला.

“हो अंकित बेटा, तू भेटला आहेस ना त्याला, समंजस आहे रे तो, आपल्या सानवीला सांभाळून घेईल आणि तुम्हा सर्वांनाही. म्हणजे आता सानवी जसं तुमचं सर्वांच करते ना तसचं ती करत राहिलं. आम्हाला काही प्रोब्लेम नाही. काय म्हणता अरुणराव.” राजनचे बाबा उत्तर देत म्हणाले.

बाळू सावंत काकांच्या पुढे आला, “काका, राघव विधुर आहे.”

सावंत काका शब्द शांत करत म्हणाले, “हो हो... माधवी वारली..”

बाळू त्यांचे शब्द पूर्ण न होवू देताच म्हणाला,

“त्यांची पत्नी दोन वर्षा आधी वारली ना? आणि मुलगी वहिनीच्या माहेरी असते, होना?”

“हो हो, पण जास्त वयाचा नाही राघवं आणि साधा सरळ आहे, मुलगी तीन वर्षाची तर आहे. आणि मुख्य म्हणजे राघवला सानवी पसंत पडली. तो लग्नाला तयार झाला हे मात्र नवल. नाहीतर माधवीच्या आठवणीत आमचा राघव हातून सुटत चालला होता हो. मागे सानवी घरी आलेली राघवच बोलणं झालं तिच्याशी आणि मग त्याने ताईला सांगितलं, आपली सानवी आहेच तशी. काय हो अरुणराव काय ,म्हणता? द्यायचा का बार उडवून एकाच मांडवात.”

आता घरात सारे सुन्न झाले होते, कात्री अजूनच घट्ट झाली होती. घरातलेही सारेच आले होते कात्रीच्या तोंडात. शब्द फुटत नव्हते आणि हृदय जोराने धडधडत होतं. घरालाही जणू धास्ती भरली होती.

सावंतानी ठेवलेला प्रस्ताव सर्वाना सुन्न करवून गेला होता. मोहिते निवास काळजीत पडलं होतं, घरात सानू नव्हतीच आणि बाबा काहीच बोलू शकत नव्हते, सावंत साहेबांना नकार कसा द्यावा कळेना झालं होतं.

बाबांना घाम फुटला होता. आईचा आवंढा दाटून आलेला, सानूसाठी विधुर कसा पचवणार होती ती, आई बाबांना असं बघून बाळू गप्प बसू शकत नव्हता. त्याने आता आवाज वाढवला,

“हो, माझी दी आहेच लाखात एक, पण सानूदी राघव साठी? पटलं नाही हो. सानूदी, एक न पेलणार वादळ आहे... वादळ! मला नाही वाटत हा तो किनारा आहे, जिथे ते वादळ शमेल. कदाचित माझी सानूदी राणीसाठी हे मान्यही करेल, पण मला माफ करा. मला हे मुळीच मान्य नाही. ती आमच्यासाठी एवढं करते त्याची परतफेड अशी? तिला पूर्ण अधिकार आहे तिचा जोडीदार निवडण्याचा, त्याचा अधिकार कुणालाच नाही. सॉरी, मी लहान आहे आपल्या सर्वांसमोर, पण मला हे माझ्या सानूदीसाठी अजिबात मान्य नाही. राजन रावं कसे तयार झाले? त्यांना तर सर्व माहीत आहे दीबद्दल. सावंत काका नात्यांच्या आड ही अट नको. माफ करा, उद्या घरी कार्यक्रम आहे, आपण हे काही इथे बोललात ते विसरा, आम्ही उद्या वाट बघतोय आपली.”

बाळूने फोन हातात घेतला आणि तो राजनला लावायला लागला.

“अहो आम्ही तर... अहो मोहिते साहेब आवरा मुलाला. तिचं लग्न जुळत नाही म्हणून विचार केला हो. तसं राजनला यातलं काही माहित नाही बाळू.” सावंत साहेबांची बहिण मध्येच बोलली. 

“कोणी सांगितलं, ती लग्नाला तयार नाही, आज ती तयार झाली तरी मुलांची रांग लागेल. हो, आहे ती वयाची पण अजून प्राण आहे ह्या घराचा. तुम्ही माफ करा आम्हाला.” बाळू परत बाबांना इशारा करत म्हणाला.

बाबा आणि आई मात्र पुरते घाबरले होते, ह्या नात्याला नाकारलं तर राणीचं लग्न तुटेल ही भीती त्याच्या मनात शिरली होती. दोघांची मन बाळूला थांबवायला तयार नव्हती पण मेंदू कासावीस होतं होता.

गोष्टी सुरूच होत्या तर राणी घरी पोहचली. ती येताच जरा सर्व शांत झाले. काहीश्या गोष्टी कानावर पडल्या होत्याच तिच्या. तरीही नम्रपणे सर्वांचा नमस्कार करत ती आत जात होती तर परत बाळू तिला म्हणाला,

“राणी, थांब ग, तुही ऐक, पाहुणे काय म्हणत आहेत ते! तुझंही मत हवंय ह्या निर्णयात, सानू तुझी मोठी बहिण आहे. आणि तू होणारी सून आहेस सावंत घराण्याची. तुझं मत नक्कीच महत्वाच आहे इथे.”

आता राणी काय उत्तर देईल ह्याची सर्वाना वाट होती, तिची सानूदी वर प्रेम होतं पण राजनशी तिचं नातं मनाच जुळलं होतं, नवीन नाती सुरु होण्या आधी नात्यात अळ पडायला नको हे तिला वाटत होतं.

“ऐकलंय मी बाळू, तू बरोबर आहेस. मी तुझ्या सोबत आहे. मलाही हे ताईसाठी मान्य नाही.”

हात जोडून ती राजनच्या बाबांना म्हणाली, “बाबा, तुम्ही जरा रागिणी ताईला जागेवर ठेवून विचार करा ना, तीही माझ्यापेक्षा मोठी आहे, जेमतेम ताईच्या वयाची, आयएयसची तयारी करते आहे. अजून तिचा लग्नाचा विचारही नाही, तसचं माझ्या ताईचं आहे. आम्हाला कुणालाही तिच्या लग्नाची घाई नाही, हो ना ग आई?” राणी आईच्या जवळ गेली.

“हो,हो, हो तर ..”आई डबडबलेल्या डोळ्यांना अलगत पुसत होती. 

बाबांचा गोंधळ उडाला होता, त्यांना बाळू योग्य वाटत होता पण सांवत साहेबांना वाईट वाटत आहे बघून त्यांचा चेहरा पडला होता. आई मनातच स्वतःच्या विचारावर परत परत येत स्वतःला सावरत होती.

श्वास रोखून सारेच होते. काय निर्णय असेल बाबांचा. सानू करेल का लग्न राघवशी. बघूया पुढल्या भागात.

कथा क्रमशः 

© उर्मिला देवेन

urmiladev@gmail.com

कथा वाचण्यासाठी मनापासून धन्यवाद!!

कथेच्या प्रकाशनाचे आणि सर्व अधिकार उर्मिला देवेन कडे कायद्याने राखीव... कथा कुठेही चोरून टाकलेली आढळल्यास कॉपीराईट कायद्याअंतर्गत शिक्षेस पात्र असाल... 

कथेवर प्रतिक्रिया नक्की नोंदवा! आवडल्यास लाईक/ कमेंट/शेअर नक्की करा!

कथेचा पुढचा भाग लवकरच.

स्टे कनेक्ट, स्टे सेफ...

फोटो साभार गुगल

Post a Comment

0 Comments