जोडीदार तू माझा... भाग २४

 जोडीदार तू माझा...  भाग २४



घरातलं प्रत्येक मन आनंदी असलं की घरही आनंदी आणि प्रसन्न दिसतं. घराचा प्रत्येक कोपरा आज मोकळा श्वास घेत होता. सकाळपासून घर अगदी धामधुमीने न्हावून निघालं होतं. आता पुढे...

दुपार ओलांडली आणि सर्व तयार झाले, सानूने राणीला सुंदर तयार केलं होतं, तो निळ्या रंगाचा घागरा तिच्या गोऱ्यापान रुपाला अजूनच उजळवत होता. राणी, राणीचं दिसत होती. घरातली सर्व मंडळी राजनकडे निघाली.

भीमा काका आणि त्यांची बायको आधीच पोहचले होते. भीमाला आधी जावून सगळं बघायचं होतं, तसे ते चेहरे वाचण्यात आणि वातावरण मोकळं करण्यात पटाईत होतेच. आणि सुनीला  राहून भेद घ्यायला भारी जमत होतं. दोघेही उद्देशाने आधीच येवून  मोहित्यांची वाट बघत होते.

मंडळी पोहचली होती. राजनच घर एक राजवाडा होता, कमी वेळातही सर्व सजला होता. राणी आणि सानू सोबतच आत शिरल्या, त्यांना बघून राजनची बहिण रागिणी, त्याच्याकडे आली आणि सोबत घेवून गेली. भीमाने नजरेने अरुणला इशाऱ्यात सारं ठीक आहे सांगून सावंत साहेबांसोबत राहण्याचं सांगितलं. सुनी आरतीला घेवून बायकांमध्ये आली.

घरात प्रत्येक गोष्ट नेट नेटकी होती. घरातल्या मंडळी प्रमाणे घरही जणू अतिशय उच्च शिक्षित भासत होतं. राणी हे सर्व बघून भारावून गेली होती. रागिणीने राणीला राजनची खोली दाखवली, वरचा मजला दाखवला. राणी अजूनच हे सर्व वैभव बघून मनातून आनंदाने फुलत होती. सुंदर सजलेलं घर आणि सगळं कसं राजेशाही थाटात होतं.

घर बघता बघता सानूला परत फोन आलेला, फोन युएससवरून होता, सानू विचार करत फोनकडे बघत राहिली, आणि फोन बंद झाला, तेवढ्यात रागिणी पुढे निघून गेली. राणी आणि सानू तिथेच बाल्कनीत उभ्या होत्या. सानू फोनमध्ये गुंतली होती तर राणी राजवाड्याच्या वैभवात. तेव्हाच राजनच्या काकूचे बोल तिच्या कानावर पडले, त्या त्यांच्या मुलीशी एका खोलीत बोलत होत्या,

“मोठीने होकार दिला असता तर हे सर्व हिच्या वाट्याला आलंही नसतं, बघ कशी भुरभूर बघत आहे. कसं सांभाळेल सर्व कोण जाने, की लावते वाट सावंतांची... इकडे आपल्याकडे सगळ्या कश्या हाय क्लास आहेत, आता ह्यांनी मिडल क्लास शोधली, निदान शिक्षण नौकरी तरी बघायची होती, काय मुलींची कमी होती. अरे सावंतांचा दरारा काय कमी आहे. मला सांगायचं होतं ना ताईने. राजन काय काय गुणाचा मुलगा आहे माझा!”

राणीचा चेहरा अगदीच पडला होता, टपोऱ्या डोळ्यामध्ये पाणी साठायला आलं होतं, मनात हुंदका दाटून आला होता, तिला स्वतःचा राग येत होता कि सानूचा तिला तिचं कळत नव्हतं. सानू तिला सावरायला जवळ गेली तर समोर राजन येवून उभा राहिला, जरा त्यानेही काकूचे बोल एकले होते,

“राणी, हे चालायचं, ह्या सर्वांना पार करून तुला सर्व करायचं आहे. मी आहे ना तुझ्या सोबत तुझा जोडीदार, मग कशाला नाराज होतेस. सानवीदी ने मला नाकारलं नाहीच, त्यांनी मला तुझ्यासाठी निवडलं, मी त्याच्यासाठी कधी नव्हतोच त्यांच्या यादीत, काय दी?”

“नक्कीच, राजन राव अजून मला काय हवं!  राणीला राजा मिळायला आता साम्राज्य नक्कीच असणार ना!”

सानू राणीच्या जवळ आली, राणीला जवळ घेतलं,

”चल राणी, रागिणी बघ कधीची तिकडे वाट बघत आहे.”

राजन राणीला खुणावत म्हणाला.

“व्हा तुम्ही हॉलमध्ये, मी जरा काही सामान सांगितलंय आईने ते घ्यायला आलेलो काकूकडे.”

राणी राजनच्या बोलण्याने आधीकच फुलली, डोळ्यातलं पाणी कधीच बेपत्ता झालं, एक चकाकी क्षणात शिरली. गोड सजलेल्या राणीला बघून सावंत बाई खूप खुश होत्या, मोजकी मंडळी होती घरात, फारसं बाहेरचं कुणीच नव्हतं, तरीही पन्नास लोकं झाली होती. भारदस्त कुटुंब होतं राजनच. एकमेकांची ओळख आणि टिक्याचा कार्यक्रम मोठ्या आनंदाने पार पडला होता. जेवणाची व्यवस्था घरच्या मोठ्या हॉलमध्ये सुरु होती. सारे कसे जरा वेळ घोळक्यात बसले होते. राजनच्या काकू आरती जवळ येवून बसल्या.

“काय हो मोहिते ताई, तुम्हाला पटलं का?”

आरती जरा गोंधळली, पदर सावरत म्हणाली,

“काय हो, काही चुकलं अ,आमचं.”

“अहो मोठीला तसचं ठेवून लहाणीच लग्न जुळवणं.”

आरतीने दीर्घ श्वास घेतला, पण शब्दाचा ओघ आता तिला उमगला होता, स्मित हसत तिने काहीच उत्तर दिलं नाही तर मंजिरी काकू हातवारे करत म्हणाल्या,

“नाही, जरा थांबल्या असत्या ना, कि तुमच्या मोठीला लग्नच करायचं नाही? की अजून काही भलतंच तर नाही ना तिचं? काही सांगता येत नाही बाई आज कालच्या मुलींचं. आपण इकडे ढीगभर काळजी करायची आणि मुली तिकडे.....”

“अहो, काहीही काय बोलता? माझी सानू तसली नाही हो.”

“अहो खरच बोलते मी... त्या गवंडी बाईच्या मुलीचं असचं झालं... बिचारी, राहिली ना बिना लग्नाची आयुष्यभर, भावंडाना जोडीदार मिळाले, ते संसारात रमले, ती राहिली आईवडिलांची सेवा करत, आजकालच्या जगात कुणी कुणाचं नसतं... आईवडील काय जन्माचे सोबती असतात आणि भावंड आपल्या संसारात मग्न, आता एकटीच राहते एका खोलीत. मला तर कीव येते तिची, भावंड भावंड करत राहिली, आता कोण येतं तिला भेटायला. ”

अरतीच्या डोळ्यातलं पाणी सुनीकाकी ने बघितलं आणि ती भीमा काकाला बोलून जवळ येवून बसली,

मंजिरी ताई, आपल्या संजूच लग्न झालं ना मागच्या वर्षी. तुमची मोठी ना ती, अय्या ती नापास झाली ना, किती विषय राहिले होते हो तचे बीईला.”

आता मंजिरी काकू  गोंधलली,

“नाही हो, एकच राहिला होता विषय, देणार आहे ती आता. पूर्ण करणार आहे ती बीई.”

“अय्या, मी तर तिला भेटले होते मागे, आपल्या मॉलमध्ये, मला म्हणाली होती, काही जमत नाही म्हणून. आणि किती थकली होती ती कामाने. बाई बाई, कशी दिसत होती लग्नात आणि वर्षभरात पोरीने चेहरा पाडला, मला बाई काळजी वाटली, आणि नाही का ती, बाई ग, कसे ना तिचे सासरचे, पाठवलं नसणार. तुम्ही खडसावून सांगायचं होतं ना?

मंजिरी काकू, गप्प झाली होती, हळूच म्हणाली, “अग ती येणार होती, पण आज नाही जमलं तिचं, ती आणि जावई बाहेर जाणार म्हणे, मीच म्हटलं, आपली राणी तर इथेच येणार आहे सूनबाई म्हणून, भेट कधीही. नाही का राशी!”

मंजिरी काकू तिच्या लहान मुलीला म्हणाली. आणि लगेच उठत म्हणाली, मी जरा बघते तिकडे, जेवणाची काय सोय झाली की नाही.

सुनी आरतीच्या जवळ येवून बसली,

“काय ग कसली घाबरतेस..... “

“सुने, बर झालं तू आली, माझे तर डोळे पाणावले होते.”

“ते दिसत होतं मला.... अश्यांना घाबरायचं नसतं, नुसत्या बोलतात ह्या.”

आरतीचे परत डोळे अलगत पुसले. आता मात्र हे हलकसं ऐकू गेलेल्या राणीला कासावीस झालं होतं. मगाशी तिला सानूचा राग येत होता आणि आता तिला कसंस झालं होतं. मनात स्वतःचा राग येत होता. सानूच मोठ्पण मनात शिरलं होतं. आईची काळजी वाटत होती, हळूच ती सर्वाना चोरून बघत होती. मनात खूप आनंद होता, समोर जवाबदारी होती, काहीतरी सिध्द करण्याची ओढ होती. आपण जोडीदार म्हणून कसं उभं राहायचं ह्याचा जणू ती पाया उभारत होती.

बैठकीत साखरपुडा ठरला होता. लग्नाची दिनांक निश्चित झाली होती. राणीने मास्टरसाठी प्रवेश घ्यावा ही गोष्ट राजन आणि सानूने सर्वांसमोर क्लिअर केली होती. सावंतांना लग्न राजेशाही हवं होतं तर मोहिते तो लाजमा सांभाळू शकणार नव्हते तरीही त्यांनी होकार दिला होता. राजनने मध्यस्ती केली आणि लग्नाचा खर्च दोन्हीकडे विभागला गेला. सानूने आणि बाबांनी नजरेनेच राजनला धन्यवाद दिला होता. मंडळी परतीच्या मार्गावर निघाली होती. राणी सर्वात मागे होती, रागिणी तिला म्हणाली,

“वाहिनी, घाबरू नका, आम्ही सर्व आहोत तुमच्यासोबत, आधी तुम्ही वहिनीसाहेब होवून या, मग सर्व शिकवू तुम्हाला.”

राजनची आई तिथेच होती, “हो आता शिकवावं लागेलच ना तिला, तिला कुठे येतं काही.”

“आपल्या घराण्याची परंपरा आहे ती सुनेला शिकवून आपलंस करण्याची.” राजनचे बाबा लगेच म्हणाले आणि वातावरण हलकसं झालं.

“हो ना, आणि राजनने ती परंपरा जपली, असो, सुनबाई या तुम्ही लवकर. आम्ही वाट बघतोय, हा वाडा भावी सुनेची वाट बघतोय, आम्ही जातीने तयार करू तुला, तुम्ही आमच्या एकुलत्या एका मुलाची निवड आहात.” राजनची आई हसत आणि राणीला गोंजारत म्हणाली.

राणीने सर्वांचा आशीर्वाद घेतला आणि ती गाडीत बसली, राजनने तिला मेसेज टाकला, उद्या भेटायचा जो ती गाडीत बसताच वाजला. 

मेसेजवर बाळूची नजर पडली, “आम्ही पण येणारं, पार्टीला.”

राणी लाजली होती आणि जरा चीड्लीही होती, काहीस तिचं बिनसलं होतं, काय ते तिलाही माहित नव्हतं. आई आणि बाबा राजन कडला लाजमा बघून थक्क होते. कसं निभणार ह्यात जरा चिंताग्रस्त होते. त्यातल्या त्यात आईच्या मनात राजनच्या काकूची गोष्ट घर करून बसली होती. तिला सानूच तसं होवू द्यायचं नव्हतं. छकुलीला मांडीवर घेवून बसली होती पण नजर तिची तिच्या दोन्ही मुलीवर होती. सानुच्या  जोडीदारच्या शोधात राणीला  जोडीदार भेटला होता आणि सानू तिथेच होती.

मंडळी घरी पोहचली होती. अंजली आणि छकुली आज इथेच थांबणार होत्या. रात्र समोर सरकत होती आणि मनातले विचारही मनातच सरकून जमत होते  उद्याच्या आशेवर. भेटूया पुढल्या भागात लवकरच....


कथा क्रमशः 

© उर्मिला देवेन

urmiladev@gmail.com

कथा वाचण्यासाठी मनापासून धन्यवाद!!

कथेच्या प्रकाशनाचे आणि सर्व अधिकार उर्मिला देवेन कडे कायद्याने राखीव... कथा कुठेही चोरून टाकलेली आढळल्यास कॉपीराईट कायद्याअंतर्गत शिक्षेस पात्र असाल... 

कथेवर प्रतिक्रिया नक्की नोंदवा! आवडल्यास लाईक/ कमेंट/शेअर नक्की करा!

कथेचा पुढचा भाग लवकरच.

स्टे कनेक्ट, स्टे सेफ...

फोटो साभार गुगल

Post a Comment

0 Comments