जोडीदार तू माझा... भाग २३

 जोडीदार तू माझा...  भाग २३ 


येणाऱ्या आनंदाची चाहूलही घरातलं वातावरण आनंदमयी करवून टाकते. कुठूनतरी एक शक्ती संचारली असते जी मनात असणाऱ्या दुःखाला क्षणभरासाठी बाजूला सारते, उत्साह भरते. तसंच काहीसं घरातल्या मंडळींचं झालेलं होतं. आता बघूया आजच्या भागात,



सानू विचारात होती कि पाहुण्यांसोमार काय बोलावं म्हणून, आईचही तिला बरोबर वाटत होतं आणि राजनच्या आईला दुखवायचं नव्हतच, राणीची तयार करत ती गुमान शांत होती.

सानू राणीची साडी अवरतांना तिला म्हणाली,

“राणी तुला काय हवंय माझ्यासाठी हे महत्वाच.”

“ताई मी नाही सांगू शकत, तू जे म्हणशील ना ते.”

“असं कसं, लग्न तुझं! मी का सांगाव?”

“तायडे, बोल ना ग.”

“हुम्म, चल हॉलमध्ये बोलूया, वाट बघत आहेत सर्व.”

राणी आणि सानू हॉलमध्ये आल्या.  वातावरण कसं राणीला सुरेख झालं होतं, राणीच्या रूपाची किमया लगेच पसरली होती. सारे तिला बघून स्मित गप्प झाले होते. भीमा काकाने गोष्ट सुरु केली,

“काय मग अरुण करायचा का साखरपुडा येत्या रविवारी?”

“अरे, घाई होईल रे आम्हाला, घरच पाहिलं कार्य आहे आमच्या...”

बोलतांना बाबा परत शांत झाले. सूर जरा उतरला होता. त्यांच्या मनानेच मनाला कदाचित प्रश्न केला होता, पाहिलं कार्य पहिल्या मुलीचं असायला हवं होतं ना?

“बाबा, काही काळजी करू नका, आपण घरच्यामध्येच करूया ना.” राजन राणीकडे बघत, तिला नजरेने खुणावत म्हणाला.

त्याच्या आईने त्याचं म्हणणं नाकरलं,

“का रे? आपल्या घरचं पाहिलं कार्य आहे हे.”

“आई काही हरकत नाही ग.”

“हरकत का नाही, ते काही नाही.”

राजनच्या आईचा स्वर जरा वाढला होता. बाबा आणि आई दचकले होते, मग लगेच त्यांनी स्वर आवरला आणि म्हणाल्या,

“आमच्याकडून साखरपुड्याला शंभर माणस येतील, हवं तर हॉलमध्ये करूया आपण.”

“आई, लग्न करुयाना ग मोठ,” राजन परत राणीला इशाऱ्याने शांत करत म्हणाला.

“अरे, मोहिते साहेब आपण टिक्याला ही नाही म्हणत आहात, नाहींतर साखरपुडा आणि लग्न मागोमाग उरकलं असतं ना. नाही, आमच्याही काही हौस आहेत ना!” राजनची आई जरा नाराजीच्या स्वरात म्हणाली.

“काकू तशी मज्जा येत नाही हो, साखरपुडा आणि लग्न दोन दिवसाच्या फरकाने केलं तर ...” सानू हसत म्हणाली.

आणि वातावरण हलकं झालं, सगळे जरा हसले, भीमा काका बोलले,

“हे बरोबर बोलली बाळा तू, अरे मोहिते आणि सावंतचं पाहिलं लग्न कार्य आहे.., कसं, पूर्ण मस्तीत व्हायला हवं.”

राणीच्या चेहऱ्यावर जरा हसू आलेलं. राजनही जरा शांत झाला,

“राणीचा निकाल पुढल्या महिन्यात आहे. आपण त्याच्या पुढल्या आठवड्यात साखरपुडा करूया, काय ग आई. म्हणजे राणीचं टेन्शन पण निघून जाईल. निकाल तिच्या हातात असेल. लग्नला तिला वेळ देता येईल आणि नंतर...”

“आणि ती लग्नानंतर मास्टर साठी प्रवेश पण घेईल... हो ना राजन.” सानू राजनचा सूर उचलत म्हणाली.

“काय म्हणता सावंत साहेब आपण.” भीमा काका म्हणाले.

“नाही, बरोबर आहे. मग आज आम्ही खाली हात जात नाही, टीका लावूया.”

“नाही नाही.. उगाच कशाला.” आई आरती परत म्हणाली.

सानूने आईला इशाऱ्याने थांबवलं, बाबांकडे बघितलं आणि आत निघून गेली. आईही तिच्यामागे गेली.

“सानू काय म्हणत आहेत हे, तुला माहित आहे ना, टीका लावला आणि मग लग्नाला नकार दिला तर, तुला माहित आहे ना, त्या मागच्या गल्लीतल्या काकू, त्यांच्या मुलीला टीका लावला होता मुलाच्या नावाचा, मग नंतर मुलाकडेच्या लोकांनी लग्न तोडलं ग, मग त्या मुलीला तर टीका लागला होता ना त्या मुलाच्या नावाचा... नंतर किती त्रास झाला तिच्या घरच्या लोकांना मुलीचं लग्न जुळवतांना... चार लोकं काय म्हणत होते त्यांच्या बद्दल आता तुला काय सांगू,” आई सानूला अगदीच काळजीने सांगत होती.

“आई तुझी काळजी अगदीच यौग्य आहे, पण राजन नाही ग तसा, आपण त्याला टीका लावायला सांगू ना. तू थांब. चल आधी तो पेढ्याचा डब्बा घे, मी बघते कसं करायचं ते. आपण वळवू या ना सगळं पण जरा हळू हळू....”

सानू आणि आई परत बैठकीत आल्या, बाबांच्या गप्पा सुरूच होत्या तर सानू म्हणाली, “काकू आपण टिक्याचा कार्यक्रम तुमच्या घरी केला तर, किती मज्जा ना, म्हणजे बघा, आमचं घरही बघून होईल आणि कार्यक्रमही होईल. अशी रीत असते कदाचित.”

“अग बाई हो कि, जमेल, हे लक्षात आलंच नाही माझ्या” राजनची आई अगदीच आनंदाने म्हणाली.  

“आता एक काम करा, तुम्ही सगळे उद्या या आमच्याकडे”

“हो आणि आम्ही तिथेच राजनला टीका लावू राणीच्या नावाचा, काय हो जावई बापू.” सानू हसत म्हणाली.

“हो जी, जशी आपली इच्छा...” राजन राणीला खुनावत होता.

प्रश्न मिटला होता, पाहुणे उद्या राजनकडे जाणार होते आणि साखरपुडा ठरला होता. राणी राजनकडे बघून लाल झाली होती. हॉलमध्ये गप्पा रंगल्या होत्या उद्याच्या तयारीच्या. एक जोडी आयुष्भरासाठी शिक्कामोर्तब होणार होती. घर आनंदात होतं आणि घरातलेही. मग बघूया राजन कडे काय होतं ते.

बाबा त्यांची चिंता विसरले होते. आई आनंदी होती कि घरात लग्न कार्य होणार म्हणून. बाळू, नवीन नौकरीत आणि त्याच्या तिच्यात मग्न होता. सानू ह्या सर्वांपासून दूर कुठेतरी हरवूनही स्वतःला शोधत सर्वांमध्ये होतीच.

रविवार उजाडला, नेहिमचा रविवार सावकाश उगवतो पण आज जरा लवकर उजडला होता कदाचित, पहाटे पासूनचं आरतीचं घरात हे शोध ते शोध सुरु झालं होतं. तिचा नाश्ता तयार होता. सामानाची यादी तयार करत ती बसली होती. अरुणही स्वतःच आवरून तिच्या सोबत बसला होता. जुन्या आठवणीत दोघेही शिरले होते आणि आठवण होती अंजली आत्याच्या लग्नची!

घरची लहान होती म्हणून आईची खूप स्वपन होती पण अंजलीने अमितशी पळून लग्न केलं आणि सर्व कसं वाहून गेलं होतं. त्या साऱ्या आठवणी अरुण समोर फिरत होत्या,

“आरती, आपली अंजली खरंच खुश आहे का ग?”

आरतीने सुस्कारा दिला, “हो,  आहे म्हणावं आता, का हो?”

“नाही, सहज आठवण झाली आज, आपण असंच तयारीत होतो ना, आणि ती घरातून निघून गेली होती...”

“तुम्हाला पण ना कुठेही काहीही आठवतं हो, जावू द्या ना आता. कशाला त्या जुन्या जखमा उगाच खुडत बसता.”

“नाही ग, बहीण आहे माझी, मनाला त्रास होता तिला बघितलं कि, तिच्या जोडीदाराने तिला दगाच दिला ना! ही आहे आपली संसाराचं उपरणं सांभाळत आहे आणि तो स्वतःची जवाबदारीही सांभाळत नाही... कसला जोडीदार, ही ना टाकूनही देत नाही त्याला.”

“अहो काय बोलता! आता छकुली आहे, तिचा जीव गुंतलाय हो तिच्यात, जन्म दिला नाही तिने छकुलीला पण प्रेम खूप आहे तीच छकुवर. आहे आपल्या आधाराने, करते शिलाईचं काम, निभतं तिचं  आणि आपण आहोच ना... जावू द्या... आपल्या नजरे समोर आहे तेच खूप आहे.”

“जीव तुटतो ग माझा, जोडीदार म्हणत हीच जोडी धरून ठेवत आहे... अमितच्या परतीच्या आशेवर. आणि तो काहीच करत नाही, बसून खातो आणि हिलाच मारतो. कसं जगते ग ही, मला तर तुला दुखवताही येत नाही.”

“अहो शांत व्हा जरा, अंजली रमली आहे तिच्या छोटाश्या व्यवसायात आणि छकुलीत. खुश आहे.”

“हो आता तशीच समजूत काढायची स्वतःची, पण जोडीदार खूप महत्वाचा असतो ग, आपण म्हणतो, काय गरज पण तुला आणि मला माहित आहे, काय आणि कशी गरज पडते ते. आयुष्याच्या वळणांवर हवाच असतो ग, थोडा वेळ तो स्वाभिमान आणि अभिमान शिरला कि वाटतं, काय कुणाची गरज, पण काय आणि किती हे मला आणि तुला आतापर्यंत कळलंय ना!”

आरती जरा शांत झाली होती, शिरली होती स्वतःच्या कोषात काहीतरी शोधत... तर अरुणने तिला हलवत म्हटलं,

“हुम्म..., कुठे पोह्चलीस?”

“नाही हो, आपल्या सानूचा विचार करते आहे. एवढं सगळं करते ही मुलगी, हिचा जोडीदार कसा असायला हवा हेच कळत नाही.”

“हुम्म..., त्याची तू काळजी करू नकोस, तिचा जोडीदार भक्कम असेल, तिला सामावून घेणारा आणि समंजस.. बघच तू.”

“तसंच हो बाबा, अहो पण आहेत कुठे ह्या दोघी बहिणी, अजून उठल्या नाहीत का?”

आरतीची ओरडा ओरड सूर झाली होती तर सानू आणि राणी दोघीही खोलीतून बाहेर आल्या.

“आई काय हा सारा पसारा घेवून बसलीस,” सानू बाबांच्या गळ्यात हात टाकत म्हणाली.

“अग, सामान आहे, न्यायचं आहे ना राजन रावांकडे....”

“अरे हो, पण एवढं, काय एकाच वेळेस देतेस कि काय? येवू दे परत परत जावयाला घरी.”

आणि बाळू खोलीतून ब्रश करत बाहेर आला,

“अरे पण राणी तर येणारं नाही ना आपल्या सोबत? नवरी मुलगी कुठे जाते नवऱ्या मुलाच घर बघायला...” त्याने चिडवत सानूला हाय फाय दिला. आणि राणी कडे आला,

“काय राणी तू घरीच थांबायचं आणि घर साफ करून ठेवायचं.”

“ये चिडवू नको, तिच्या सासूने सांगितलय तिला सोबत आणायला.” सानू सोफ्यावर बसत म्हणाली.

“आणि तू गाडी वाल्याला फोन कर, वेळवर यायला सांग,” सानू बाळूला म्हणाली.

“हो जी बाईसाहेब अजून काही काम असेल तर सांगा जी.”

“नाही, आधी तेच करा तुम्ही.”

“अरे, आटपा लवकर सगळे, उगाच वेळ लावणार आणि तिकडे निघायला वेळ होणार,” आई सामान आवरायला लागली.

“अहो ऐका ना.”

“अहो बोला ना, असं बोललीस ना कि कसं काळीज वर खाली होतं माझं.”

“काय हो तुमचं आपलं नेहमीच. आता काय काळीज वर खाली होण्याचे दिसव आहेत”

“म्हणजे, तुझं म्हणणं काय!”

“जावू द्या, नेहमीच तुमचं, काहीही.”

“नेहमीच नाही, खूप दिवसांनी बोललात आपण असं राणीसरकार.... हुकुम करा आता बसं आपण...”

“जावू द्या हो तुमचं नेहमीच, आधी भीमा काका आणि मंडळीला सांगा परस्पर तिकडे यायला नाहीतर विसरायचे तुम्ही. तसे ते येतीलच पण आपलं सांगण कधीही उत्तम.”

आई स्वयंपाक खोलीकडे निघाली.

घरात धामधूम होती, जणू सर्व घर उत्सवात होतं. घरातल्या सर्वाना राणीच्या सासरी जाण्याची घाई होती. आणि राणीला राजनला भेटण्याची... आपणही भेटूया आणि बघूया काय घडतं ते राजनकडे... भेटूया पुढ्या भागात...लवकरच ...


कथा क्रमशः 

© उर्मिला देवेन

urmiladev@gmail.com

कथा वाचण्यासाठी मनापासून धन्यवाद!!

कथेच्या प्रकाशनाचे आणि सर्व अधिकार उर्मिला देवेन कडे कायद्याने राखीव... कथा कुठेही चोरून टाकलेली आढळल्यास कॉपीराईट कायद्याअंतर्गत शिक्षेस पात्र असाल... 

कथेवर प्रतिक्रिया नक्की नोंदवा! आवडल्यास लाईक/ कमेंट/शेअर नक्की करा!

कथेचा पुढचा भाग लवकरच.

स्टे कनेक्ट, स्टे सेफ...

फोटो साभार गुगल

Post a Comment

0 Comments