जोडीदार तू माझा... भाग १७

 जोडीदार तू माझा...  भाग १७ 



एव्हाना घरात वादळाच्या वेगाने शिरणारी सानू आज शांत हळुवार हलक्या शीतल वाऱ्यासारखी शिरली होती. बाबाला काहीतरी जाणवलं, त्यांनी स्वयंपाक खोलीतून पाणी सानूसाठी घेतलं आणि ते तिच्या खोली जवळ गेले आणि त्यांनी दार वाजवलं,

“सानू बाळा, मी आत येवू का ग?”

सानूने दार हलकसं लोटलं होतं, तिने ते उघडलं,

“बाबा या ना, तुम्ही कशाला हो विचारात.”

“मोठी झालीस तू आता, मी दार वाजवून यायला हवं, नियम तो नियम, मुलं मोठी झाली की पालकांनी हेच तर समजून घ्यायचं असतं.”

“हुम्म्म....” सानू काहीच बोलली नाही, हाताची घडी, कानातले, आणि केस मोकळे करत ती तिची उभी होती.

बाबा अगदीच सानूच्या जवळ आले,

“सानू बाळा दमलीस का ग? पाणी घे, तुझ्यासाठी आणलंय.”

सानूने ने पाणी घेतलं,

“अहो बाबा... मी जाणार होते ना, तुम्ही कशाला आणलं?”

“असुदे ग, तुला आठवते, मी ऑफिस मधून आलो कि तू मला पाणी आणून द्यायची. माझी बॅग घरात घेत बरोबर ठेवायची. नंतर मोठी झाली, आणि मग मी आल्या आल्या आल्याचा चहा टाकायची.”

“हुम्म, अहो पण तरीही...”

“तर काय झालं, बघ ना दिवस बदलली ग. माझी लहानशी सानू किती मोठी झाली.”

“हो, पण मी हे मान्य नाही करणार हा, तुम्ही बाबा आहात माझे. आणि मी कितीही मोठी झाले ना तरी तुमची तिचं लहान सानू असणारं आहे.”

“हो हो, पण काहीही काय ग, आणलं मी पाणी माझ्या लाडाच्या लेकीसाठी त्यात काय. ते जावूदे, तुझी मिटिंग होती ना आज.”  

आता मात्र सानूचा चेहरा खुलला होता, हरवलेलं काहीतरी सापडावं असचं काहीस झालं होतं तिचं, पाणी प्यायली होतीच, आणि उत्साह भरला होता तिच्यात. बांधलेले केसं परत मोकळे केले आणि ती अगदीच तिच्या नादात म्हणाली,

“बाबा प्रोजेक्ट मिळालाय मला...”

“अरे व्हा!! मग आमची सानू आहेस तशी....”

“तुम्हाला सांगू, तो यूएसएचा ब्रांच मॅनेजर आहे ना, खूप सपोर्ट करणारा आहे.”

“असं!! मग माझी सानू काय कमी आहे?”

“बाबा, त्याने खूपच उत्तमरीत्या सर्व सांगितलं क्लाईन्टला, आणि हा प्रोजेक्ट आमची कंपनी करणार आहे. मी लीड करते आहे बाबा. परत एक नवीन प्रोजेक्ट, नवीन अनुभव, खूप काही नव्याने शिकायला मिळणार.... आणि...”

“अरे व्हा, आणखीन एक प्रोजेक्ट. पार्टी दे मग.”

“अरे, तुम्ही म्हणाला तिथे बाबा.”

“मग कधी करूया बेत.”

“ठरवू या आपण, जावूया आईच्या आवडत्या रेस्टोरेंट मध्ये. तेवढीच माझी माता खुश होईल.”

आरती आई आणि राणी लागलीच खोलीत शिरल्या, आई हळूच म्हणाली,

“काय हो कुठे, आणि कशाला करताय पार्टी? कशाला हवाय नुसता खर्च...”

बाबा लगेच म्हणाले,

“झालं हीच सुरु, जेव्हा तेव्हा निगेटिव्ह बोलणं, अरेsss माझ्या लेकीने नवीन प्रोजेक्ट मिळवलाय, आहेस कुठे!”

“असं होय, मला वाटलं...”

“काय वाटलं तुला... तुझं आपलं काहीही.”

“काहीही पण हो तुमचं.”

“ये आई थांब ना ग जरा.” सानू आईला म्हणाली.

आणि ती परत बाबांना म्हणाली,

“बाबा तो यूएसएचा मॅनेजर हुशार आहे, समजून घेणारा. मानलं मी त्याला. कसं आहे ना कुणी कुणी खरंच सगळं कसं सहज करवून देतात, बसं त्यातला वाटला तो मला... शांत आणि सहज सगळं सहज करणारा...”

सानू ओघात बोलत होती आणि बाबा तिला बघून गालात हसत होते, आज पहिल्यांदा सानू असं कुणाबद्दल बोलत होती. आईने असं सानूला बघून राणीला खुणावलं आणि आई सानूला म्हणाली,

“लग्न झालं का ग त्याचं?”

सानू थबकली, तिचा तो ओघ पटकन खाली आला, म्हणाली,

“आई, तुला ना हेच सुचतं, तो यूएसए ब्रांचला आहे, मला काय माहित... तू लाव ना पत्ता, तुझी बहिण राहते ना तिकडे.”

बाबा आता आईला म्हणाले,

“काय ग? झालं का तुझं परत सुरु. जगुदे माझ्या लेकीला. नुसती मागे लागली असते.”

“लक्ष देवू नकोस ग सानू.”

आई आता जोरातच म्हणाली, “तुम्ही गप्प बसा हो. काहीही हो तुमचं. मी आपली सहज बोलले, आणि झालं तुमचं आणि तुमच्या लेकीच सुरू. तुम्ही दोघेच लागता माझ्या मागे. मी आपली घरगुती बाई, साधे साधे प्रश्न करते, काय होतं?”

आणि ती सानूला म्हणाली,

“हो सांगेन ना, तेही करेन... सोडणार नाहीच... तुला काय तशीच ठेवणार होय! तीस वर्षाची होशील आता. लग्न करायला नको. मला तुम्ही तीन होता ह्या वयात. माझं कसं सगळं निभलं होतं आणि तू... काय ते म्हणे. घोडी झाली नुसती.”

तेवढ्यात बाळू खोलीत शिरला आणि त्याने आईच हे वाक्य ऐकलं,

“हो ना, हिच्यासाठी घोडाच शोधावा लागेल आपल्याला.”

तो येताच सानू त्याला रोखून बघू लागली, तर आईच्या मागे येवून तो परत म्हणाला,

“अग आई, आपल्याला ना ह्या वादळाला शांत करणारा वेदेशी असा शांत नमुनाच लागेल कदाचित. मी आहे तुझ्यासोबत, लाव मावशीला फोन... कट कट जाईल आपली, ही तेवढ्या दूर गेल्यावर... नाहीतर काय! ह्या वादळाने नाकात दम आणलाय नुसता. मी तर मोठा नवस बोलणार आहे आता.”

“ये शेंबड्या, गप्प, तू आधी ज्या वादळाने घरात आलास ना ते आधी थांबव. वादळ म्हणे, आणि काय रे कर ना नवस तुला कुणी अडवलंय, नवस बोलणारे असे सांगत फिरत नाहीत.”

“तुला सांगून बोलतो मी, लपवून ठेवत नाही.”

“असं मग सांग ना, कुण्या पोरीसोबत फिरत होतास रे त्या पुलावर....”

“काय राणी हाच होता ना?”

सानूने राणीला डोळा मारला.  राणीनेही होकार देत उत्तर दिलं,

“हो ग ताई, हाच होता तो, हेच टीशर्ट होतं ना त्या मुलाच. हाच होता.”

“काय रे, तू कुठे फिरत होतास.” राणीही बाळूला बोलून गेली. बाळू गडबडला होता.

“अरे म्हणजे, आपली नजर आहे, चुकायची नाही.” सानूने परत राणीला डोळा मारला.

“ये तायडे काहीही काय ग... आणि हा असा शर्ट काय अख्या मुंबईत माझ्याकडेच आहे.” बाळू सानूला नकार देत म्हणाला.

“तुझ्याचकडे नाही पण तुझ्याकडे तुझी ही ताई आहे, तुझ्यावर नजर ठेवायला, समजलं!” सानूने राणीला हाय फाय दिला.

आई त्याच्याकडे रोखून बघत होती, तर तो तिला म्हणाला,

“आई, काय ऐकतेस तायडीच, काहीही बोलत आहे ती, असं काही नाही ग.”

“अरे मग मला कशाला सांगतोस.” आई सानूकडे बघत म्हणली.

“अग आई प्रत्येक चोर असाच म्हणतो, बघ त्याचा चेहरा.” सानू चिडवत म्हणाली.

बाळू, “आई.... आणि ये महिला मंडळ... काहीही सुरु आहे तुमचं.”

बाळू परत बोलत आईजवळ आला,

“आई, तू ना लाव बऱ फोन मावशीला, बघ ग एखादा नमुना ह्या आपल्या नमुन्यासाठी, लय वैताग आणला रावं.”

“ये शेंबड्या, चोरी पकडल्या गेली तर माझ्या मागे लागलास”, सानू चिडवत म्हणाली.

“आणि आई, बघ ग तुझा लाडाचा लेक, पार हातातून गेला आहे, आता! आता बोल?”

“ये बाई, तू आधी गप्प हो.”

“आणि तू रे, खरच वेळ झाला तुला आज, कुठे होतास? आणि ही काय नवीन भानगड अजून.”

“सांग सांग, आता का बोलती बंद! ये शेंबड्या. मला नमुना बोलतो. चेहरा बघ आपला, नमुना झालाय.”

“आई हिला सांग ना ग शेंबड्या नको म्हणू म्हणून”

“नमुनी कुठली.”

“अरे, ओ तो आपुनका हक्क है ! माझ्या फ्रॉकने शेंबूळ पुसला आहे मी तुझा, शेंबड्या. आणि नमुना मी नाही तू आहेस.”

“अग ये बाई, आता तो दाढी मिशीचा झालाय, कशाला म्हणतेस ग? आणि तू लहान नाहीस ना, तुला कळत नाही का!”

“आणि मला तो वादळ म्हणतो तर...”

“बाबा, हा मला नमुना ही बोलला आता.”

आईने डोक्याला हात लावला, म्हणाली,

“हे तीघ ना लहानच बरे होते, धबाके पडले कि गुमान गप्प राहायचे. इथे माझाच जीवं टांगणीला लागला असतो ह्यांच्यामुळे आणि ह्यांच काही वेगळेच सुरु राहते.”

“अहो चला हो, जरा मदत करा मला, ह्यांच्या नादाला लागू नका”, आई खोलीतून निघतांना बाबांना म्हणाली.

“हो जी राणीसरकार आलोच.” बाबाही मागेच उठले आणि निघाले.

निघतांना ते सानूला परत म्हणाले,

“अभिनंदन सानू परत एकदा. खूप प्रगती कर... मी आहे तुझ्या सोबत नेहमी.”

घरात मस्करी सुरु होती आणि घर आनंदाने हसत होतं...

ह्याच तर त्या आठवणी असतात ना, ज्या घराच्या कप्प्या कप्यात साठवून असतात. बहिण भावाची गमती जमती परत कुठे परतून येत असतात. आपल्या आपल्या जोडीदारा सोबत आयुष्याच्या वळणावर रामतांना ह्याच आठवणी सोबत असतात. असा योग नंतर येणे अशक्य होते.

मग भेटूया पुढच्या भागात. लवकरच... सानू, राणी आणि बाळूसोबत.

कथा क्रमशः 

© उर्मिला देवेन

urmiladev@gmail.com

कथा वाचण्यासाठी मनापासून धन्यवाद!!

कथेच्या प्रकाशनाचे आणि सर्व अधिकार उर्मिला देवेन कडे कायद्याने राखीव... कथा कुठेही चोरून टाकलेली आढळल्यास कॉपीराईट कायद्याअंतर्गत शिक्षेस पात्र असाल... 

कथेवर प्रतिक्रिया नक्की नोंदवा! आवडल्यास लाईक/ कमेंट/शेअर नक्की करा!

कथेचा पुढचा भाग लवकरच.

स्टे कनेक्ट, स्टे सेफ...

फोटो साभार गुगल

Post a Comment

0 Comments