जोडीदार तू माझा... भाग ११

 जोडीदार तू माझा...  भाग ११ 



प्रश्नाच्या गोंधळात राजनकडले होतेच, तरीही राजनला शाश्वती होती तो जरा थबकला, मनातून गालात हसला, मनात राणीच्या गालासारखी खळी आठवली, म्हणाला,  

“राणीला मी पसंत आहे. ती नकारणार नाही. तुम्ही कळवा. नाहीतर मी परस्पर बोलतो भीमा काकांशी.”

बाबा त्याला थांबवत म्हणाले,

“अरे पण तिला विचारायला हवं ना? आपण असं तिला गृहीत धरून निर्णय घेवू शकत नाही.”

राजन हॉलमधून निघून जातांना म्हणाला,

“मला विचारायची गरज नाही, तुम्ही विचारा, मला होकार कळलाय तिचा. पुरेसा आहे मला. तुम्ही विचारा काय ते.”

तो त्याच्या खोलीत आला. त्याने येताच सानूला मेसेज केला आणि सांगितलं कि त्याने घरी सांगितलं म्हणून. आणि मेसेजच उत्तर येण्याची वाट बघत होता. राणी त्याला आवडली होती. रागिणीने तिच्या आणि सानू सोबत काढलेली फोटो तो त्याच्या मोबाईल मध्ये झूम करून बघत होता. कधी हसत होता तर कधी काही मनातच बोलत होता.

मोहिते निवासात राणी मात्र कासावीस झाली होती, बहिणीने नाकारलेला मुलगा आपण पसंत करण्यात तिला स्वतःचा कमीपणा वाटत होता. घरात सर्वाना आता कळून चुकलं होतं मग आपण कसं बोलावं हेही तिला सुचेना झालं होतं. सानूला काही ऑफिसच काम होतं मग ती हॉलमध्येच बसली होती काम करत. सानूला बघायला आलेला राजन तिने नाकारला होता आणि बघा ना, राजनला राणी पसंत पडली होती. नातं गुंतागुंतीच झालं होतं, आणि हा गुंता सोडवायचा कसा ह्या विचारत सारेच होते.

सगळे घरात शांत झाले होते, बाळू स्वयंपाक घरातून पाणी घेवून त्याच्या खोलीकडे वळत असतांना त्याची नजर राणी आणि सानूच्या खोलीवर पडली. खोलीतून रडण्याचा आवाज येत होता, त्याने दार सारलं, राणी अजून झोपली नवह्ती, ती रडत होती, बाळूने हाक मारली,

“राणी रडतेस का ग? आणि का ग रडतेस?”

“नाही तर, नाही रे.” राणीने स्वतःला सावरत आणि अश्रू पुसत उत्तर दिलं.

“ये रडत आहेस तू.” असं म्हणून त्याने लाईट लावले.

“का रडतेस? तू तर आनंदी व्हायला हवी, राजन आवडला ना तुला? आणि ताईने पण त्याला नाहीच म्हटल आहे, तुझी लाईन क्लिअर आहे ग.”

“बाळू तसं नाही, माझं मन मलाच खात आहे, कसं सांगू आता... ताईला काय वाटेल माझ्याबद्दल, तिला न आवडलेला मला आवडला...”

“अरे बापरे!! काहीही विचार करतेस ग तू... वाईट तर तिला वाटायला पाहिजे...तिला बघायला येणाऱ्या मुलाने तुला पसंत केलंय... पण ती तर खुश आहे तुझ्यासाठी. आणि असं काहीही नसतं ग, जोडीदार हा आपला आपला असतो. तिचा तिच्यासाठी उत्तम ना, तुला काय हवंय ते तिला का आणि कसं माहित असणारं? तिची आवड तुझी कशी असणारं ग? वेडाबाई, उगाच विचार करत आहेस.”

आता सानूही खोलीत शिरली, आणि बाळूला बघून दचकली,

“ये शेंबड्या इथे काय करतोस?”

त्याने राणीला डोळा मारला आणि म्हणाला,

“आलो होतो तुझी खेचायला, तुला काही वाटत नाही का ग, त्या राजनने तुला नापसंत केलंय आणि राणीला पसंत केलंय म्हणून.”

“चायला, तो काय मला नापसंत करेल, मी त्याला पसंत केलाय माझ्या राणीसाठी.... उत्तम जावई असणारं तो ह्या घरचा... आणि माझं म्हणशील तर मला माझा जोडीदार गवसला ना कि मी ही अशी एका पायावर उभी असेल लग्नासाठी... पण आज आपण खुश आहोत राणीसाठी. मी एवढं तर ओळखलं त्याला, तो काही घरच्यांच ऐकून राणीचा नाद सोडणार नाही.”

“ये राणी काय लव्ह स्टोरी आहे यार तुमची! मस्त... तू टेन्शन घेऊ नकोस राजन नक्की काही तरी करेल.”

“ताई तुझं काहीही पण ग.”

“आहा... बघ लाजली रे...”

“नाही ना ग ताई, मला कसंतरी होतं आहे, आई बाबा काय विचार करत असतील ना माझ्याबद्दल?”

“कुणी काहीही विचार करत नाही, आम्ही सगळे आनंदी आहोत तुझ्यासाठी, आता काय ते राजनला करू देत. आणि बाकी सगळं सांभाळायला आपले भीमा काका आहेत.”

बाळूही म्हणाला, “हो ना, ही वेडाबाई रडत होती. चिल राणी.... तू तर राज्याची राणी होणार आता. अरे सावंत वाडा किती मोठा आहे माहित आहे का तुला? अरे त्यांच्याकडे म्हणे स्वयंपाकाचा शेडूल असतो, नुसतं तुला सांगाव लागेल काय काय करायचं ते. आता हा तू छान छान स्वयंपाक करतेस ना, तो काही तुला तिकडे करवा लागणार नाही.”

मग तो सानूला म्हणाला,

“सानू दी तू ना उगाच नाही बोललीस ग, तुझं जमलं असतं ना तिकडे, तुला तर स्वयंपाक येत नाही.”

“पण खिचडी येते मला, मी सांगितलं होतं राजनच्या आईला.” सानू स्वतःचा नाईट सूट कपाटातून काढत होती.

“पण आता काय फायदा! तू ना ती खिचडी खाणारा शोध आता.”

बाळू राणीला डोळा मारत सानुला म्हणाला.

“अबे ये शेब्ड्या, तू नवस बोल रे... म्हणजे तुझा नवस पूर्ण झाला कि मला मिळेल कुणीतरी खिचडी खाणारा.”

सानू आणि बाळूच्या खेचा खेचीत राणी हसरी झाली होती. दोघांनीही राणीला समजावलं होतं. रात्रीच्या काळोखात काळे विचारे सोडले होते तिघांनीही.

सकाळी सानुने राजनचा मेसेज बघितला आणि ओरडली,

“ये राणी, तुझ्या हिरोने बोंब ठोकली ग तुझ्या सासरी... अबे बघ मी म्हणत होते ना... पोरगा पडला प्रेमात... अब डरनेका का नाही...आगे बढो हम तुम्हारे साथ है.”

राणी झोपेतून जागी झाली आणि तिच्याकडे आली, तिनेही मेसेज बघितला हसली, आणि स्वतःमध्येच रमत स्वतःच आवरायला बाथरूम मध्ये शिरत होतीच, तर पलटली, मागून येवून तिने सानुला गच्च मिठी मारली.

सानू तिला म्हणाली,

“पुरे, बहिणाबाई, अजून दिल्ली दूर आहे! ही सुरवात समजा. खूप काही करायचं आहे तुला.”

“तू आहेस ना ग सोबत.”

“मग, मी आहेच, पण तुला तुझी लढाई लढायची आहे राणी... अभी तो शुरुवात है! जा आवर, मी आधी राजनला मेसेज टाकते, वाट बघत असेल तो, हा रात्रीचा मेसेज आहे.”

सानूने राजनला मेसज केला,

“आप आगे बढो हम तुम्हारे साथ है... आपला मेसेज पोहचवला. हा राणीचा मोबाईल नंबर आहे... ह्या नंतर गरज पडली तर हक्काने मेसेज टाका... हम आपके साथ है.... आगेका प्लॅन बोलो होनेवाले जवाई.”

इकडे राजन जणू उत्तराची वाट बघत होता. समोरून उत्तर लगेच आलं,

“भीमा काका जिंदाबाद!”

सानू हसली, तिने फोन नाइटसूटच्या खिश्यात टाकला, वाशरूम मध्ये गेली, चेहऱ्यावर पाणी घेतलं, ब्रश घेतला आणि बाबांकडे आली, बाबा नेहमीप्रमाणे पेपर वाचत होते, आई स्वयंपाक घरात नाश्त्याच करत होती, आलं विलायचीच्या चहाचा सुगंध घरात पसरला होता, सानू ब्रश करत आईला म्हणाली,

“आई मस्त चहा झालाय ग, व्हा आणि कांदे पोहे आजपण केलेत, आज काय बेत आहे तुझा सकाळी सकाळी.”

“हो आता रोज तेच असणार नाश्त्याला जोवर तू परत ह्या कांदे पोह्याच्या कार्यक्रमाला तयार होतं नाहीस.”

“ये आई काय ग तुझं, बास झाला तो कालचा कार्यक्रम... गप ना ग, आणि तुला ना कांदे पोहे झाक जमतात, पीएचडी झाली आहे तुझी त्यात, तुझ्या सारखा कुणी करूही शकत नाही.”

“हुम्म, घे आवर आधी. राणी उठली का ग?”

“अरे मी तेच सांगायला आले होते.”

आणि ती बाबाजवळ येवून बसली

“बाबा, राजनचा मेसेज आलाय, त्याने तिकडे सांगितलेलं दिसतय. बघा मी म्हणत होते ना!”

आई लगेच स्वयंपाक घर सोडून हॉलकडे आली, बाबांनी पेपर खाली घेतला, सानू काही अजून बोलत नव्हती, ती आधी तोंड धुयायला निघून गेली. आई मात्र पुढचं ऐकायला आतुर झाली होती, मागेच गेली,

“आणि ग काय, सगळं ठीक नां तिकडे.” आई लगेच बोलली.

“हो हो, तू शांत हो, राजनने राणीला पसंत केलंय, इथे दोन्ही बाजूने पसंती आहे मग काही काळजी नाही आई. तो म्हणाला भीमा काकाशी बोलतो म्हणून आणि घरही सांभाळतो म्हणून.”

सानू तोंड पुसत म्हणली. नंतर तिने आईला चहा घ्यायला सांगितला आणि ती बाबाकडे आली,

“बाबा, आपण भीमा काकाला बोलू ना, त्याच्या घरी बोलायला. आईचही म्हणणं बरोबर आहे... लग्न खूप काही बदल आणते आयुष्यात, जोडीदार हा खूप महत्वाचा असतोच पण त्याची नातीही जपावी लागतात... जोडीतील ओढ नाती जपल्याने वाढते आणि नात्यांना ओढता येत नाही तसं जास्त ढीलही देता येत नाही... राजन उत्तम मुलगा आहे, देईल राणीला पदोपदी साथ... प्रेम सर्व करायला लावतं, आणि तो प्रेमात पडलाय राणीच्या, नाही का हो बाबा?”

सानू बोलत होती आणि आई बाबा ऐकत होते. आईने तिच्या हातात चहा दिला आणि बाबांना पोहा, पण लक्ष तिची वेगळीकडेच होतं. सानुला काय बोलावं हे तिला कळत नव्हतं, सानू सर्वाच विचार करते हे बघून ती अवाक झाली होती. बाबा तिला बघतच राहिले आणि तिच्या डोक्यावर हात ठेवून म्हणाले,

“सानू, आपण बोलूच भीमा काकांशी, आणि तशी गरज नाहीच ग, ते नक्की करतील प्रयत्न आपल्या राणीसाठी.”

मग त्यांनी जरा आईकडे नजर टाकली. ती आधीच स्वयंपाक खोलीत परत गेलेली होती तर बाबा सानुला हळूच म्हणाले,

“पण तुझं काय सुरु आहे सानू? यंदा लग्न करायचं कि नाही बाळा? आई खूप काळजीत असते ग. माझी तर काल रात्री पर्यंत वाट लावली तिने. रडत होती ग, हळवी आहे ना ती. मी समजतो सगळं तुझं पण ती नाहींना समजत ग, तिच्या ठिकाणी ती बरोबर आहे बाळा.”

“बाबा, तुम्हाला तर माहित आहे, अजूनतरी असं कुणी आवडलं नाही मला, आईच्या इमोशनल ब्लकमेलमुळे मी राजनला बघायला तयार झाले पण मला माझ्यासाठी नाहींना आवडला तो... आणि योगायोग बघा आपली राणी आवडली त्याला आणि तो राणीला.... मला मग तो आवडला, जावई म्हणून!”

बाबा तिच्याकडे बघत राहिले तर ती परत म्हणाली,

“बाबा मला नाही इतक्यात लग्न करायचं.”

असं म्हणत ती खोलीत निघून गेली. बाबा जरा शांत झाले, त्यांना खरं तर माहित होतं सानू लग्नाला का नाकारते म्हणून, तिच्यावर खूप जीव होता त्यांचा. त्यांना आता काळजी होती कि कोण सानूला तिच्या जवाबदारी सगट स्वीकारेल. सानू काही तिची जवाबदारी सोडून लग्न करणार नाही हे ते जाणून होते. पण आरतीच्या सांगण्यावरून सतत सानूच्या मागे लागायचे. सानूच वाढतं वय त्यांना जाणवत होतं पण वाढत्या वयासोबत तिची सर्वांना घेवून चालण्याची कलाही वाढत होती हे बाबांशिवाय कुणाला माहित होतं.

अरुणने अर्ली रिटायरमेंट घेतलं होतं ते त्यांच्या पायाच्या त्रासामुळे, आरती प्राईवेट शाळेत कारकून होती पण तिने ती नौकरी सोडली होती. मुलांचा वाढता पसारा आणि तिच्या ओटी पोटाच्या ऑपरेशन नंतर तिला पुढे नौकरी जमलीच नाही. अगदीच इंजिनिअरिंग नंतर सानूला लगेच लठ्ठ पगारची नौकरी लागली आणि तिने सगळा पसारा हातात घेतला. नंतर बाळू आणि राणीचं शिक्षण, घर सगळं सानूने संभाळल होतं, सानू एकटीच कमावती होती आता, अजून बाळूला चांगली नौकरी नव्हती, त्याचं इंजिनिअरिंग नुकतच संपल होतं आणि तो चांगली संधी शोधत लहान मोठे जॉब करत स्वतःचा खर्च काढायचा. राणी आता सायन्स पदवीची परीक्षा देणार होती. आई आरतीला सानूच वाढतं वय टोचत होतं, तीस वर्षाच्या आधी तिचं लग्न व्हावं ह्यासाठी तिची कुरकुर सूर असायची. 

काय विचार करताय, लग्न हेच अंतिम असतं का? मुलीसाठी? जरा लग्नाला उशीर झाला कि घरचे आणि बाहेरचे सारेच कसे मागे लागले असतात... पण जोडीदार असतोच ना कुठेतरी,

बसं तो समोर येण्याची वाट बघावी लागते...

आणि तेच सर्व बघत होते सानूसाठी... भेटूया पुढच्या भागात...

कथा क्रमशः 

© उर्मिला देवेन

urmiladev@gmail.com

कथा वाचण्यासाठी मनापासून धन्यवाद!!

कथेच्या प्रकाशनाचे आणि सर्व अधिकार उर्मिला देवेन कडे कायद्याने राखीव... कथा कुठेही चोरून टाकलेली आढळल्यास कॉपीराईट कायद्याअंतर्गत शिक्षेस पात्र असाल... 

कथेवर प्रतिक्रिया नक्की नोंदवा! आवडल्यास लाईक/ कमेंट/शेअर नक्की करा!

कथेचा पुढचा भाग लवकरच.

स्टे कनेक्ट, स्टे सेफ...

फोटो साभार गुगल

Post a Comment

0 Comments