जोडीदार तू माझा... भाग १०

 जोडीदार तू माझा...   

भाग १०


इकडे हॉल मध्ये सारेच अजून गप्पा करत होते, रात्र बरीच झाली होती, भीमा काकाने अरुणला शब्द दिला,

“अरे दोस्ता, काळजी नको करू मी बोलतो राजनशी, तोचं करू शकतो सर्व... त्याला राणी पसंत आहे ना, मग काहीच विचार करू नका. राजनरावं होणारच ह्या घरचे जावई.”

“काय वहिनी साहेब. काळजी करू नका, अरे मी आहो अजून माझ्या मुलींच्या आनंदासाठी. काय ते सर्व करायला मी तयार आहे.”

तेवढ्यात त्यांचा फोन वाजला, समोरून त्यांची अर्धांगिनी बोलत होती, भीमा काका जोरातच बोलले,

“येतो ग, हा निघालोच, अरे तू अजून थांबली आहेस का जेवायला? बऱ काय घेवून येवू.?”

भीमा काकांच्या बायको सोबतच्या संवादाने घरात सर्वांच्या चेहऱ्यावर आनंद आला होता. सानूही खोलीतून हॉलमध्ये आली होती. सहज भीमा काकाला म्हणाली,

“काय काका, आता एवढ्या रात्री कुठली घेवून जाताय? आणि काय दोघंच बसता का?”

आईने सानूला डोळे मोठे करत इशारा केला, पण भीमा काका हसले, म्हणाले,

“काय ग, कुठलीही चालेल... आम्हाला बुढया माणसांना काय ग, काहीही द्या... जातो घेवून, नाहीतर माझी बुढी मला काही घरात घ्यायची नाही.”

आणि सगळेच हसायला लागले... आरतीने भीमा काकाच्या हातात मिठाईचा डब्बा दिला,

तोच भीमा काका परत आनंदाने म्हणाले,

“धन्यवाद वहिनी! आपण माझी मेहनत वाचवली नाहीतर सुनीच्या नादात मी किती दुकानं फिरलो असतो...”

“सानू हे बघ आमच्या दोघांसाठी, काकीला गोड खाल्या शिवाय झोपच येत नाही आणि मी गोड ह्या शुगरमुळे खाऊ शकत नाही, अशी आमची जोडी आहे बघ.”

“काका, जोडी तशीच असायला हवी, आता माझे बाबा किती शांत असतात आणि आई...”

भीमा काका जोरात हसले, अरुण ने तोंडावर बोट ठेवलं, आरती सानूकडे नजर रोखून बघत होती, तोच भीमा काका म्हणाले,

“मी येतो मग... सुनी वाट बघत असेल माझी...”

भीमा काका त्यांचा बूट घालत म्हणाले,

“काय हा बूट घालूनच आता राणीची सोयरीक करावी लागणार... आधी उद्या मोजरीवाल्याकडे जावून बरोबर करतो. माझ्या मुलींचं लग्न जुळवायच आहे बाबा...”

निघातांनी त्यांनी सानुच्या डोक्यावर हात ठेवला.  त्यांच्यावरही खूप मोठी जवाबदारी होती. घरातले सर्व त्याच्या खोलीत गेले होते. आज घर आनंदी होतच, घरात लग्न कार्य होणार होतं. पण मनांचा गुंता वाढला होता. नकळत दोन मन गुंतली होती.

 

इकडे राजन कडेही राजनच्या मनात सगळा गोंधळ उडाला होता. त्याला काही सुचत नव्हतं पण गप्पही राहवत नव्हतं. राणीच्या गालावरची खळी त्याला गप्प राहू देत नव्हती, राजनने आल्या आल्या त्याच्या आईला हॉलमध्ये थांबवलं,

“आई मला काही बोलायचं आहे ग. आताच बोलूया आपण. उशीर नको व्हायला.”

घरात शिरणारी त्याची बहिण रागिणी त्याला लगेच म्हणाली,

“दादा आपण बोलायसाठीच घरी आलोय. उतावळा झालास का रे... मलाही वहिनी पसंत आहे...”

मग ती आईला खाना खुणा करत म्हणाली,

“आई आहे ना तुला तोड सानवी.... बेधडक! आपल्या घराला शोभेल अशी प्रतिमा आहे तिची. मला तर जाम पसंत आहे ती. काय बोलते ग, सुंदर आणि प्रसन्न वाटतं तिला बघून, मनात जे असेल ना ते तोंडावर असतं तिच्या, माझी तर मस्त जमेल तिच्याशी.“

राजन तिला मध्येच थांबवत बोलला,

“रागिणी जरा गप्प बसं! मी बोलतोय ना आईशी.”

राजन आईच्या पुढे येवून उभा राहिला

“आई मला खरच खूप महत्वाच बोलायचं आहे,”

“हो रे बोल, आता तुलाच बोलायचं आहे, काय ठरवलं तुम्ही दोघांनी? सानवी पसंत आहे ना तुला.? मी हे काय विचारत, तिला कुणी नकारू शकत नाही. जेवढी सुंदर आहे तेवढीच हुशार... आहे जरा गव्हाळ रंगांची पण तुला मस्त शोभते, शिवाय हाय सोसाइटीत कसं राहायचं तिला कळतं, मेकअप किती सुंदर केला होता तिने. आताच पन्नास लोकांची टीम सांभाळते, आपल्या छोट्श्या कंपनीला मोठं करेल ती तुझ्यासोबत, काय हो राजनचे पप्पा.”

राजनचे बाबा भीमा काकाला फोन लावतच होते तर म्हणाले,

“मग काय! आपली पसंत आहे. चुकायची नाही... मुलगी खूपच गुणाची आहे. मुख्य म्हणजे मेहनती आहे, मोकळी आहे. मनात लपवून राग धरून ठेवणारी मुळीच वाटली नाही, आपल्याला अशीच मुलगी हवी होती.”

नंतर त्यांनी भीमा काकाका फोन लावणं सुरूच ठेवलं पण ते काही उचलत नव्हते.

पाहुणे आणि भीमा काका खूप सारे प्रश्न सोडून गेले होते... आणि तेच प्रश्न राजनकडे पडले होते. राणीच्या मनात युद्ध सूर होतं. बाबांची काळजी वाढली होती तर आईला लोकांच्या बोलण्याची धास्ती भरली होती.... आणि आपल्या कथेची मुख्य नायीका सानवी मात्र सर्वांपासून दूर स्वतःच्या जोडीदाराच्या स्वप्नात मग्न होती.... जो अजूनही तिच्या समोर आला नव्हता.

राजन आता गोंधळला होता त्याला काही सुचेना झालं होतं, घरात सर्वांना सानू पंसत होती पण सानूने राजनला समोरून नाकारलं होतं, त्याच्या मनाची घालमेल वाढत होती, त्याने घरच्या कामवाल्या बाईला आवाज दिला,

“सुमी काकू, पाणी घेवून या जरा.”

सुमी घरातून पाणी घेवून आली आणि राजनच्या आईने तिला जवळची मिठाई दिली, म्हणाली,

“सुमी घरात लक्ष्मी लवकरच येणारं आहे तयारीला लागा. ही मिठाई आधी देवघरात ठेवा. सर्व स्टाफला मिठाई द्या. घरात लवकरच सुनबाई येणारं आहेत.”

सुमी काकी हसतच मिठाई घेवून गेली. राजनची आई खूप खुश होती. त्याचे बाबा भीमा काकांना फोन करण्यासाठी लागले होते, पण भीमा काकांचा फोन काही केल्या लागत नव्हताच. रागिणी सानू सोबत काढलेले फोटो आईला दाखवत बसली होती. पण राजनच्या मनात युद्ध सुरु होतं. कुणाला कसं थांबवायचं त्याला सुचत नव्हतं. पाणी प्याला आणि सोफ्यावरून उठला,

“आई मला राणी पसंत आहे, सानवी नाही.”

घरात सर्व शांत झाले होते, राजनच्या बाबांनी फोन बाजूला टाकला. आईने हातात घेतलेला पाण्याचा ग्लास टेबलवर ठेवला. रागिणी राजनकडे बघायला लागली. सगळं कसं थांबलं होतं. जणू धक्का बसल्या सारखं शून्यात शिरले होतं.

आई राजनला म्हणाली,

“ये मस्करी करतोय का आमची? कुठे सानवी आणि कुठे राणी... दोघीत खूप अंतर आहे.”

“आई हो आणि तेच अंतर मला आवडलं, मला राणी हवी आहे बायको म्हणून... सानवी माझी प्रतिस्पर्धी होवू शकते, पत्नी नाही ग... ती खूप हुशार आहे पण मला ते नकोय, मला ते हवंय जे राणीत आहे. मला राणीशी लग्न करायचं आहे.”

“काहीही काय, लग्न करायचं आहे, लग्न! राणीला बघितलं का तू... अरे काय सेन्स आहे तिचा. हो, आहे सुंदर, पण नकोच. आणि सानवीत काय कमी आहे रे, किती दिलखुलास मुलगी आहे ती, सुंदर, हुशार, नौकरी करणारी.... आपल्या घरात प्रत्येक स्त्रीने नौकरी केली आहे. मी आजही मुख्याधापिका आहे शाळेची. आणि माझी सून गृहिणी असणारा, छे काय म्हणतील लोकं... आणि बाबांचा विचार केला का तू. त्यांना सानवी आवडली होती म्हणून त्यांनी किती खटपट केली, तेव्हा कुठे भीमा काकाकडे माहिती मिळाली तिची. अरे तुम्ही दोघही मिळून आपल्या कंपनीला मोठ्या स्थानावर न्याल रे... आणि लग्न म्हणजे नेमकं असतं तरी काय... डील असते एक, आपलं आयुष्य सुखाच जावं म्हणून मुली जश्या सर्व विचार करतात ना तसं मुलानेही करावा.... आवड बिवड काही नसते... ते काही नाही आम्ही आधीच त्यांना होकार दिलाय.”

आता राजनकडे काहीच पर्याय उरला नव्हता हे सांगायला की सानू ने नाकारलं त्याला म्हणून, पण हिंमत केली पठ्याने.

“आई, तुला माहित आहे का? सानवीने नकार दिलाय मला. तिला नाही आवडलो मी, तिचे बाबा नकार कळवतीलच आपल्याला.”

“काय बोलतोस, पण मला असं काही वाटलं नाही तिच्या बोलण्यावरून... काय हो काय म्हणतोय हा?”

जरा शांत झाली आई आणि परत म्हणाली,

“म्हणून काय तू लहानीला पसंत करशील... काय समजते काय ती सानवी स्वतःला?”

“आई आताच तू तिच्याबद्दल काय काय बोलत होतीस, आणि आताच तुझा सुर बदलला?” राजन भुवया उंचवत आईला म्हणाला.

“अरे... आणि तू, नाकारलं तर दुसरी बघू ना आपण... मुलींची काय कमी आहे का! पण घरात सून अगदीच उच्च शिक्षित, सुंदर आणि नौकरी करणारीच येणारं... हा येवढा मोठा डोलारा उभा केलाय आपण त्याला सांभाळणारी मुलगीच तशीच हवी मला, राणी बिनी काही नाही.”

राजनची आई त्याच्या वडिलाकडे बघत म्हणाली,

“काय हो... तुम्ही का गप्प झालात? बोलणा काही तरी. काय हे!”

राजन त्याच्या नादात परत आईला म्हणाला,

“आई, नाही, मला राणीशी लग्न करायचं आहे. सानूशी नाही, सानूशीच काय आता मला रणीच हवी आहे माझी राणी म्हणून. लग्न माझं आहे मग पसंत माझी असणार, हा योगायोग होता, तुम्ही माझ्यासाठी निवडलेला जोडीदार मला नाही आवडला. मग त्यात येवढ काय! आवडली मला सानवीची बहिण आणि हा योगायोग मला हवासा आहे.”  

तो बाबांकडे येत म्हणाला,

“बाबा राणीच्या वडिलांना कळवा की मला राणी पसंत आहे म्हणून, आपल्या फोनची वाट बघत असतील ते.”

राजनची आई परत म्हणाली, “म्हणजे त्यांना माहित आहे तू राणीला पसंत केलसं म्हणून?”

“हुम्म.... जे कुणालाच कळालं नाही ते सानवीला उमगलं, तिने माझे डोळे वाचले, बोलली ती मला, राणीसाठी...”

आई आता शांत सोफ्यावर गुमान बसली, रागिणी तिच्या जवळ जावून बसली. बाबा जरा गोंधळले होते, म्हणाले,

“म्हणजे तू सानवीसोबत माळ्यावर राणीसाठी बोलायला गेला होतास. आणि आम्ही काय?”

“तसं नाही, पण सानवीने नकार दिला मला आणि गोष्ट राणीकडे आली, मला राणी आवडली आहे हे तिला समजलं होतं, एवढंच.”

बाबा म्हणाले, “अरे पण त्या राणीला कुणी विचारलं का? कि तू आणि... ती सानवी ठरवून मोकळे झालात.”

प्रश्न सर्वांच्या चेहऱ्यावर पडले होते, राजनला हे अजूनतरी कुठे माहित होतं. प्रश्नाचा खेळ मनात सुरु झाला होता.

भेटूया पुढल्या भागात..

कथा क्रमशः 

© उर्मिला देवेन

urmiladev@gmail.com

कथा वाचण्यासाठी मनापासून धन्यवाद!!

कथेच्या प्रकाशनाचे आणि सर्व अधिकार उर्मिला देवेन कडे कायद्याने राखीव... कथा कुठेही चोरून टाकलेली आढळल्यास कॉपीराईट कायद्याअंतर्गत शिक्षेस पात्र असाल... 

कथेवर प्रतिक्रिया नक्की नोंदवा! आवडल्यास लाईक/ कमेंट/शेअर नक्की करा!

कथेचा पुढचा भाग लवकरच.

स्टे कनेक्ट, स्टे सेफ...

फोटो साभार गुगल

 

Post a Comment

0 Comments