जोडीदार तू माझा... भाग ५
राणी आणि सानूची खोलीत खेचा खेची सुरूच होती. इकडे पाहुणे रमले होते बैठकीत. सारा आसमंत आणि ती बैठक वाट बघत होती सानूची... आपणही वळूया आजच्या भागाकडे.
आरती लगबगीने सानू राणीच्या खोलीत शिरली,
"सानू, चल बाळा हॉलमध्ये... अग...."
आणि ती सानुला बघताच बघतच राहिली, शब्द निघत नव्हते पण हळूहळू निघाले,
"किती मोठी झालीस ग सानू... खूप सुंदर दिसत आहेस तू बाळा."
आईने अलगत डोळ्याचा काजळ काढून तिला लावला, जरा हसली, तिला असं साडीवर बघून तिची सारी दिवसभराची चिडचिड कुठेतरी पळून गेली होती. शांत दिसत होती ती आता.
राणी आईला बिलगत म्हणाली,
"आई, आहे ना तुझी कार्बन कॉपी? सानू दी!"
"हो राणी, माझ्यानंतरही माझी प्रतिमा बघायला मिळेल तुम्हाला."
सानू तिच्या बिनधास्त नादात म्हणाली,
"आई असलं बोलत असशील तर कॅन्सल प्रोग्राम, मी नाही येत हॉलमध्ये."
आईने तिचा लाड केला, स्मित हसली,
"चल, बोलण्यात कुणी जिंकू शकत नाही तुझ्यासमोर, बाबांचे गुण घेतलेस ना... माझं काय नाक नक्ष! दिसतेस माझ्या सारखी रंग बाबांचा घेतलास.”
"अरेss आपण भेसळ आहोत... आई आणि बाबा दोघेही आहेत माझ्यामध्ये, फिर हम हम है... बाकी तो सारा..."
“हो हो, चंलं आवर पटकन...”
सानुने एक डोळा राणीला मारला, आणि ओठांवर लिपस्टिक परत लावली. आई पलंगावर पडलेले कपडे आवरत म्हणाली,
“चला आता, चला आता, आपलीच वाट आहे तिकडे. मी पोहे घेते, ये तू.”
“ये ग राणी ताईसोबत, राजनची बहीणही आली आहे, ओळख घे करून, बोल तिच्याशी, केव्हाची ती आपल्या बाळूशी बोलत बसली आहे." आई दारातून निघतांना राणीशी बोलली.
“आई मी पण येवू.” राणी स्वतःला आरश्यात सावरत म्हणाली.
आईने खोलीतून निघतांना होकार दिला होता, राणी मनातून मोहरली होतीच, तिने तिचे परत केसं आवरले. लिपस्टिक परत लावली... गुणगुणत ती ओठांवरची लिपस्टिक तिने पक्की बसवली. सानू सगळं बघत होती, म्हणाली,
“ये मटके, तोss... मला बघायला आलाय... कळलं का तुला. नाही तुला वाटत असेल तर तुचं जा समोर.”
“तायडे, काहीही पण ग तुझं, चल मी तुझ्या मागे मागे आहे.”
हुम्म... चला काय दिवस आलेत माझ्यावर, प्रेझनटेशनचा पॉइंटर घेवून ऑफिस मध्ये फिरते, इथे पोह्याच्या प्लेट्स घेण्याची वेळ आली माझ्यावर, ये राणी चल ग सोबत.”
सानू जशी हॉलमध्ये पोहचली, तशी लाईट गेली. जरा अंधार झाला घरात, सानू क्षणाचाही विलंब न लावता घरच्या इनव्हरटरकडे वळली.
डीपीच काम सुरु असल्याने लाईट गेले होते, अचानक इन्व्हरटर मधलं पाणी संपल्याने ते बंद पडलं होतं. घरात जरा वेळ शांतता होती. सानूने तातडीने इन्व्हरटर मशीनमध्ये पाणी ओतलं आणि घरात प्रकाश झाला. सानू तिकडेच अडकली होती आणि हॉलमध्ये आता आईसोबत राणी उभी होती. राणी आणि राजनची नजर भेट झाली, त्या क्षणात राजनला राणी पसंत पडली. दोघांच्याही नजरा जणू प्रेमाने बोलत होत्या. पहिल्या नजरेतलं प्रेम जणू ओढत होतं त्यांना. मन मिलनात गुंग होती.
आणि आईने परत सानुला आवाज दिला,
“सानू ये बाळा, झालंय सूर सर्व.”
जरा वातावरण आवरण्यासाठी आई म्हणाली,
“आमची सानू पण ना, तिकडे इन्व्हरटर मशीन मधलं पाणी कदाचित संपल असावं...”
सानू हॉलमध्ये आली आणि आई तिला पुढे करत म्हणाली,
"हि आमची मोठी मुलगी सानवी."
सानूने नमस्कार केला आणि ती धाडकन म्हणाली,
"तू... आधी निघ माझ्या घरातून... निघ म्हणते ना. अरे तुझी हिंमत कशी झाली माझ्या घरापर्यंत येण्याची. मी काही पैसे देणार नाही."
राजन उठून उभा झाला,
"तू आहेस ह्या घरची मुलगी? काय मुलगी आहेस कि काय?"
"ये, हिरो, निघायचं हा! गुमान... इथे हिरोगिरी करायची नाही. माझ्या घरात उभा आहेस तू."
"अग बाई, मला काही हौस नाही तुझ्याशी बोलण्याची... आणि तुझ्या घरापर्यंत येण्याची.”
आणि तो त्याच्या आई बाबांना म्हणाला,
“तुम्हाला सागतो, हिच्यामुळे..."
“काय रे हिच्यामुळे! काम करता येत नाही आणि आला मोठा हिच्यामुळे, निघ म्हटलं ना तुला माझ्या घरातून...”
सानू बेधडक म्हणाली.
सर्व घरातले एकमेकांकडे बघत होते पण कुणाला काहीच कळत नव्हतं. राणीने सानुला आवरण्याचा प्रयत्न केला, पण काही उपयोग नव्हता. राजन आणि सानू तर एकमेकांना बोलण्यासाठी चवताळले होते.
सारं घर किल्लोळमय झालं होतं. बाबा सानुला पुरते ओळखून होतेच, म्हणाले,
सानू गप्प बाळा, तू ओळखतेस का राजनरावांना?"
"ओळखत नाही पण ओळखून आहे, ह्या माणसांमुळे आज मला घरी यायला वेळ झाला."
“बऱ, ऐकतेस का माझं...”
आता राजन मध्येच बोलला,
“आम्ही शेअरिंगच्या टॅक्सीने आलो, मला काही वाटेत काम होतं म्हणून मी टॅक्सी थांबवली होती, तर ह्यांना ती थांबू द्यायची नव्हती."
सानू परत ओरडली,
"मग, टॅक्सी थांबण्याचे चार्जेस ह्यांनी द्यायचे ना? तो टॅक्शीवाला मला मागत होता."
"अहो त्याचा गैरसमज झाला, आपण एकाच ठिकाणी उतरलो ना म्हणून, उलट तुम्ही काही ऐकायलाही तयार नव्हत्या."
राजन अगदीच स्मित हसत म्हणाला, काहीसा प्रकार लक्षात आला होता त्याच्या. पण सानू काही स्वतःला आवरायला तयार नव्हतीच, तिला तर मुद्दा मिळाला होता कदाचित... ह्यातून निघण्याचा.
"हे हिरो गप्प बस... ATM मधून पैसे काढता आणि कार्ड तिथेच ठेवता आणि मग आठवलं कि परत टॅक्सी वळवायला सांगता... मग मी काय ऐकून घेणार होते... माझा वेळ फुकट गेला ना...”
आता ती बाबा कडे वळली,
”बाबा, मग मी त्या टॅक्सी वाल्याला सांगितलं कि माझे पैसेही ह्यांना मागायला....काय चुकीचं केलं का? किती वेळ गेला माझा हेलपाटे खाण्यात... तुम्हाला तर माहित आहे, त्या मार्गावर टॅक्सी मिळत नाही सहजा सहजी. आणि आज घरी यायचं होतं... पाहुणे येणार म्हणून"
बोलता बोलता सानू शांत झाली होती, आवाज मंदावला, मनातलं हसू ओठांवर आलं होतं.
आता जरा बाबाही हसले, सानुला गप्प करत म्हणाले.
"हो हो, तुम्ही दोघेही शांत व्हा जरा... बोलूया ना आपण, निवांतपणे."
भीमा काका बोलले, "सर्व जावू द्या आता, राजन ही आमची सानवी."
"सानवी बाळा, आता ओळख झालीच ना, मग, जरा अजून वाढवा... जरा निवांत बोला तुम्ही दोघे. तुला राजन बघायला आलंय."
आता मात्र सानू गालात हसली आणि राजनही... परत राजनची हसतांना नजर राणीवर पडली...
पोहे खातांना राजन आणि राणीचं चोरून बघणं सुरूच होतं. सानू तशीही मोकळ्या स्वभावाची होती. राजनच्या आईच्या अगदीच जवळ जावून बसली,
“आई कश्या आहात तुम्ही? काही त्रास तर झाला नाही घर शोधण्यात. जरा डीपीच काम सुरू आहे.”
राजनच्या आईला तिचा असा स्वभाव मनातून भाळला होता, आपल्या घराण्याला शोभेल अशीच सानू आहे असंच त्यांना वाटतं होतं. बोलतांना त्या म्हणाल्या,
“राजन मला सुनबाई अगदीच पसंत आहे रे. तू आधी गट्टी कर तिच्याशी, काय ते तुमचं झालंय ते टक्सीत निस्तरा आणि बोला बघू निवांत. म्हणजे अळी नाकों ना मनात.”
राजनच मात्र सर्व लक्ष राणीवर होतं, आई जे बोलली त्याने त्या गोष्टीला फक्त हलकासा होकार दिला होता. राजनचे बाबाही अरुणशी मनमोकळेपणाने बोलत होते. सर्वाना सानू पसंत होती. त्या तेवढ्याच बैठकीत राजनकडल्या सर्व मंडळींचे मन सानुने जिंकले होते, तिचं बोलणं, सर्वांची रीतसर चौकशी करणं, हवं नको बघणं, सारं काही पाहुण्याच्या लक्षात आलं होतं. आता वाट होती ती राजनच्या होकाराची आणि सानुच्या शिक्याची.
बोलता बोलता सानूच लक्ष राणीवर पडलं, सानूने राणीला हलवलं आणि डोळा मारत जरा मिश्किलपणे कानात म्हटल,
"कहीं पे निगाहें कहीं पे निशाना
जीने दो ज़ालिम बनाओ न उन्हे दीवाना...."
राणी सर्वांसमोर लाजलीच आणि नजर हटवून कप उचलायला लागली. हळबळीत तिला काही सुचत नव्हतं.
सानूने तिच्यासमोर राजनला आवाज दिला,
"चला, वरच्या माळ्यावरून निर्सग देखावा भारी दिसतो. बोलायचं का आपण?"
राजन उठला पण त्याची नजर उठत नव्हती, ती खिळली होती राणीच्या गालातल्या खळीत. भावना बोलत होत्या जणू ते दोघच हॉलमध्ये असावेत असंच राजनला मनोमन वाटत होतं. नजरांचा खेळ सूर होता आणि मग गुंतत होती त्या मोहाच्या गुंत्यात. तर परत सानुने राणीच्या कानात गुणगुणायला सुरुवात केली,
"शिकारी खुद यहाँ
शिकार हो गया
यह क्या सितम हुआ
यह क्या ज़ुलम हुआ
यह क्या गज़ब हुआ
यह कैसे कब हुआ
ना जानूँ मैं ना जाने वो...आह!"
राणी जरा हलकीशी बावरली, हळबळीत राणीने शरबतचे ग्लास सानूच्या हातात देत तिला हळूच म्हणाली,
"तायडे, काय सुरु आहे तुझं... तो तुला बघायला आलाय."
"असं? आणि तू हे ग्लास मला देत आहेस. मी घेवून जावू आतमध्ये, तू जातेस मग त्याच्यासोबत माळ्यावर? कळत नाही का ग तुला तो मला बघायला आलंय तो जानेमन."
राणी जरा परत बावरली,
“ताई सॉरी.”
“सॉरी काय, मस्करी केली मी, मला बघायला आलंय म्हणे, तो तर तुला बघतोय सारखा.” सानुने गाल्स तिच्या हातात परत दिले.
“माझ्या कडून तुझी लाईन क्लीयर आहे. आता बोलते त्याच्याशी आणि नाही म्हणते... तुला बोलले होते ना त्याला काही मी गवसायची नाही म्हणून."
“तायडे, तो तुला बघायला आलाय.”
“ये जावूदे ग, तेच ते नको ना बोलू, आलाय तर आलाय...”
तेवढ्यात आई आरती सानुला म्हणाली,
"सानू जातेस ना जावयाला घेऊन, वरच्या माळ्यावर, बोला तुम्ही दोघं?"
“हो, हो ना आई”
सानू राणीला चिमटा काढत म्हणाली.
आता सानू आणि राजन गप्प नि चुप्प माळ्यावर गेले. राजनच्या मनात भावनांचा कोलाहाल सुरु होता त्याला राणी मनातून आवडली होती पण घरच्यांना सानू सून म्हणून हवी होती. सानूला नकार दयावा असं काहीही तिच्यात नव्हतं म्हणूनच घरच्यांनी आधीच होकार कळवळा होता सानूसाठी.
त्याच्या आईवडिलांना सानू सर्वगुण संपन्न वाटत होती. सानुला राजनच्या वडिलांनी एक बिझनेस डील हॅन्डल करतांना बघितलं होतं तेव्हाच त्यांना ती राजनसाठी बायको म्हणून असावी असं वाटलं होतं आणि त्यांनी ही शोधाशोध भीमा काकांच्या मार्फत पूर्ण केली होती.
आता सानुला नकार तरी कसा द्यावा ह्या विचारात राजन गप्प होता. बघूया कोण कुणाला नकार देते ते पुढच्या भागात.
आधीचे भाग इथे आहेत जोडीदार तू माझा - कादंबरी कथा इथे वाचा
कथा क्रमशः
© उर्मिला देवेन
कथा वाचण्यासाठी मनापासून धन्यवाद!!
कथेच्या प्रकाशनाचे आणि सर्व अधिकार उर्मिला देवेन कडे कायद्याने राखीव... कथा कुठेही चोरून टाकलेली आढळल्यास कॉपीराईट कायद्याअंतर्गत शिक्षेस पात्र असाल...
कथेवर प्रतिक्रिया नक्की नोंदवा! आवडल्यास लाईक/ कमेंट/शेअर नक्की करा!
कथेचा पुढचा भाग लवकरच.
स्टे कनेक्ट, स्टे सेफ...
फोटो साभार गुगल
0 Comments