जोडीदार... तू माझा...भाग ३

 जोडीदार तू माझ्या .. भाग ३ 



सानू अजून पोहचली नाही म्हणून घराला जणू धास्ती बसली होती. आई आणि बाबा त्यांच्या मनात काळजीत होते.

पाहुण्यांमध्ये महिला मंडळ घर बघत, एकमेकींच नको तेवढं गुणगान करत गप्पा करत होत्या. आरती मनातल्या मनात सानवीवर जाम चिडली होती. पाणी घ्यायला ती आता आली आणि बडबडतच राणीच्या खोलीत शिरली,


"राणी, तुला माहित आहे का ग तुझी ती लीडर ताई, कधी येणार ती? नुसता जीव टांगणीला लागला बघ हिच्यामुळे... मला बाई भीती वाटते, ह्या वेळीही ही काही आली नाही तर ग, चांगल स्थळ आहे ग ह्या मुलाच...”

“अग आई येईल ना ती. तू नको त्रास करून घेवू. ”

“केव्हा पण? की येणारच नाही ग? ह्या पोरीने नुसता नाकात दम आणला आहे. एकदा लग्न होवून गली ना कि सुटले रे बाबा."

राणी तिला चिडवत म्हणाली, "कसली सुटशील? ताई त्या घरातही धीगांना घालेल आणि तिची सासू तुझ्यासारखी सदाकदा बोंबलत असेल तिच्यामुळे. आणि तुला तिच्या बद्दल सांगून सांगून त्रास देईल."

"ये बाई बाहेर पाहुणे आहेत, ऐकतील ना तर वाट लागेल, आधी त्या तुझ्या ताईला फोन कर. ये म्हणावं एकदाची. काय नुसता घोर लावते आणि आपण मात्र मजेत जगते. त्या बाबांनाच पुळका असतो तिचा. सदाकदा माझी सानू, माझी सानू म्हणून सांगत असतात, कोणी सांगावं त्या बापाच्या मायेला की आता सानू लहान राहिली नाही म्हणून, येवढे गुंतले आहेत ना तिच्यात की कसे राहतील ह्या पोरीशिवाय कुणास ठावूक!"

“आई, बाबाची लाडाची लेक आहे ती.” राणी परत फोन लावत म्हणाली.

“हुम्म... तेच, म्हणून ती चढली आहे ना, लाव ग फोन तिला, मी बोलते.”

राणी फोन लावत होती. तर लागलीच अरुणरावांचा आवाज आला,

"अग, राजनराव आलेत ग. पाणी घे जरा..."

आई राणीला सानुला फोन लावण्याचा इशारा करत परत पाहुण्याकडे पाणी घेवून निघून गेली, आता तिची धुग धुग वाढली होती. नवरा मुलगा राजन घरी पोहचला होता आणि सानुचा अजूनही पत्ता नव्हता. आता ती काही येणार नाही असचं सर्वाना वाटत होतं.

राणीच सानुला फोन लावणं सुरूच होतं. तेवढ्यात राणीच्या खोलीची खिडकी वाजली,

"टक टक...”

राणीने खिडकीकडे नजर टाकली आणि ती परत फोन लावायला लागली. तर आवाज आला, ”ये राणी दार उघड. ये राणे... उघडतेस ना? फोन काय लावतेस मी इकडे आहे."

राणी ने दार उघडलं, "ताई, अग कुठे आहेस! मी किती वेळची तुला कॉल करत आहे."

"ही बघ इथे, दिसली? ये बाई आधी मागचं दार उघड, मी मागच्या गल्लीत उतरले आणि समोरून रस्ता बंद आहे. त्या डीपीच काम सुरु आहे. चायला आजचं सुरु व्हयाच होतं. मससीबी वाल्यांना आजचाच दिवस दिसला... काय हे सारं आजच व्हयाच होतं.”

राणी मागचं दार उघडायला निघत होतीच तर सानू परत म्हणाली,

“पाहुणे आले का ग?"

"हो.. तुला बघायला आले आहेत...किती छान! बघ मी तयार झाले आहे."

“तू तयार झालीस? तुला बघायला आलेत काय ग? मटके.”

“तायडे मजा ग तुझी...”

"मजा कसली! ही आई पण ना, माझ्या स्वातंत्र्यावर डुग धरून आहे. बाबांना शब्द दिला नसता ना तर माझ्यावर ही अशी घरात शिरण्याची पाळी आली नसती. जा... आधी तू दार उघड... आधीच त्या टॅक्सीमधल्या एकाने डोकं खाल्ल माझं. अजून तू नको खाऊ. काय ना एकएक नमुने असतात आणि माझ्याच वाट्याला येतात, स्वतःला महाराज समजतात,आणि...”

"ताई, काय झालं आता, कुणाला बदळून आलीस ग? पाहुणे आहेत घरी, कळतेय ना!"

"जावूदे, भिते का मी! सागते तो किस्सा कधीतरी. आधी तू जातेस की घालू उडी इथून.आली मोठी. तू आणि ती आई सारख्याच."

राणीने धावत जावून मागचं दार उघडलं,

“तायडे, गुमान जा खोलीत, पाहुणे आले आहे ग.”

“काय ग? भिते काय मी? तू जा आईला निरोप दे, मी आली म्हणा.”

मागच्या दारातून आत मध्ये शिरतांना सानुला बाळूने बघितलं,

"आयला, हे बघा, कसे दिवस आलेत टीम लीडरवर, चोरून शिरावं लागते आहे. अरेss अरेss..."

"ये शेंबळ्या, गप्प बस, थांब, जावू दे ह्या पाहुण्यांना... तुला आज सोडतच नाही... नाहीतरी मी त्यांना गवसायची नाही."

सानू आपल्याच तालात घरात शिरली, सैंडल तिने तिथेच टाकल्या. समोर ठेवलेली पाण्याची बाटली उचलली आणि गट गट पाणी प्याली. बाळू तिला आणखीनच चिडवत म्हणाला,

"हो ग, तू इथं आम्हालाच गवसत नाही... काय तर नुसती ती बाबांची चमची आहेस म्हणून झेलतो सारे तुला."

"असं! थांब रे तू. मी चमची का... मग तू चमचा रे आईचा."

"मी तर आहोच ना? आपण कसं सगळ समोरा समोरा बोलतो.”

“हो का... तू थांब, तुझ्या बऱ्याच गोष्टी माहित आहेत मला. मीही बोलते समोरा समोर, मग बघ. तू आणि आई.”

“बघू ग, आधी तू तयार हो, तुला बघायला आलाय तो राजन.”

“थांब रे मग..”

“मग काय! आता संपले रे बाबा आमचे दिवसं, काय छळलय देवा ह्या नमुन्याने हे तर आम्ही सांगूही शकत नाही, शेवटी ऐकलं आमचं त्या बाप्पाने... ह्या गणपतीती स्वतः मोदक तयार करून नैवद्य दाखवतो."

"ये आईचा चमचा, जा आईला सांग. आला मोठा... नैवद्य वाला... आली म्हणा मी, नुसती माझ्या नावाने घरात ओरडत असेल. घराला आणि घरातल्या प्रत्येक वस्तूला हादरवून सोडलं असेल तिने आतापर्यंत."

"हो जातोच ना... तसही वादळ घरात शिरलंय हे सांगायची गरज नसते... माहित झालं असेल तिला. तू शिरलीस ना घरात."

“ये हो बाजूला, आईचा चमचा!”

राणीने आईला इशाऱ्यात कळवलं होतच आणि आईनेही तिला मागून घरात शिरतांना बघितलं होतंच,

"आल्या का तुम्ही, या आता, जरा लवकर तयारी करा, तेवढं तरी नाकं राहूद्या शिल्लक. राजनरावं आलेत आणि आता सर्वांच सर्व बोलून झालंय... आपलीच वाट आहे. या लवकर."

“ये आयडे, तू किती गोड दिसतेस ग चिडलीस की, लाल लाल गाल झालेत तुझे. आणि ही पैठणी मी आणली होती तीच ना... नारंगी मी नारंगी ग...”

“हुम्म, सोड माझे गाल, आधी तयार हो.”

“अशीच जाते ना ग, काय कमी आहे. नौकरी करते, माहित तर आहे त्यांना, उगाच कशाला नवीन सोंग करून त्यांच्या समोर जावू.”

“सानू निदान आज तरी ऐक ग माझं...”

“बऱ बाई... बाबांना शब्द दिलाय... आता काही पर्याय आहे माझ्याकडे... तू जसं म्हणशील तसं.”

आई शरबतचे ग्लासेस घेवून पाहुण्याकडे निघाली. सानू तिचे परत गाल ओढून तिच्या पदराला तोडं पुसत तिच्या खोलीत शिरली.

राणी जेमतेम तयार झाली होती, आरश्या समोर बसून, स्वतःला बघत हसत होती,

सानू आत शिरताच उठली, "तायडे, हे तुझे कपडे काढून ठेवले आहे आईने, घाल ग लवकर. आणि कर तुझा तो स्पेशिअल मेकअप... आणि छा जावो आप बाजी."

सानूने ती जरी काठाची साडी हातात उचलली,

"ओ... किती भारी आहे ही, ही आईळी पण ना, कशाला येवढा खर्च केला कुणास ठावूक! काय करणार बाबा, बाबांना शब्द दिलाय गुमान घालावी लागणार.“

सानुने स्वतः आवरलं, फ्रेश झाली, राणी अजूनही आरश्या समोर बसून स्वतःला बघत होती, सानू तिला बघून हसली आणि मग म्हणाली,

“ये, हो बाजूला मटके, सदा आरश्या समोर राहतेस. तो राजन मला बघायला आलाय तुला नाही. अस्सा अस्सा... पळवून लावते ना त्याला की परत कुठली मुलीगी बघायला येवढे लोकं घेवून येणार नाही... चायला मुलगी बघायला आलेत कि पोट भरून खायला.”

“तायडे, हळू बोल ना ग.”

“हुम्म... हो ग बाजूला, तू सुंदरच आहेस, मटकी!"

राणी हसत बाजूला झाली, समोर असलेल्या पलगावर लोळत म्हणाली, "तायडे काय दिसतो ग तो! मस्त फ्रेंच कट दाढी आहे त्याची. बोलतोय मस्त. आहे हा तुझ्या तोडीचा, आहे! वाटत तर आहे. आपल्याला तर जाम आवडला यार. मस्त तायडे, लकी आहेस ग."

“असं! जावूदे उडत... थांब मीच उडवते त्याला.”

सानुने साडी नेसायला सुरुवात केली आणि ती निऱ्या पाडतांना म्हणाली,

"मी ना उडवतेच त्याला, जावूदे तू आधी ह्या निऱ्या लाव माझ्या बरोबर. तुला आहे का पसंत? बोलू बाबाशी? सांग तसं. तसाही तो माझ्या पसंतीत नाही. ते तर आई मागे लागली माझ्या. आणि मग बाबा माझ्या मागे लागले."

राणी ऐकूनच अवाक झाली होती, जरा मनात गुंतली होती, राजनला बघतातच क्षणी ती मोहरली होती आणि आता सानुने असं बोलताच ती काहीशी हरवली होती. सानू तिच्या नादात तयार होतं होती आणि राणी स्वप्नाच्या दुनियेत शिरली होती...

मग बघूया पुढच्या भागात राणीचं स्वप्न पूर्ण होतं काय ते आणि सानू खरच राजनला बघितल्या नंतर नकार देईल का? भेटूया पुढच्या भागात...

कथा क्रमशः 

© उर्मिला देवेन

urmiladev@gmail.com

कथा वाचण्यासाठी मनापासून धन्यवाद!!

कथेच्या प्रकाशनाचे आणि सर्व अधिकार उर्मिला देवेन कडे कायद्याने राखीव... कथा कुठेही चोरून टाकलेली आढळल्यास कॉपीराईट कायद्याअंतर्गत शिक्षेस पात्र असाल... 

कथेवर प्रतिक्रिया नक्की नोंदवा! आवडल्यास लाईक/ कमेंट/शेअर नक्की करा!

कथेचा पुढचा भाग लवकरच.

स्टे कनेक्ट, स्टे सेफ...

फोटो साभार गुगल

Post a Comment

0 Comments