एक डाव तिचा.... “द बुमरेंग” - भाग १



मॅडमजी तुम्हाला भेटायला कुणीतरी सानिका मॅडम आल्यात.”

“अरे, कोण?”

“सानिका मॅडम! हे कार्ड दिलंय त्यांनी.”

“अरे हॉल मध्ये बसायला सांग त्यांना! चहा कॉफी विचार. पाणी दिलस का?”

“हो मॅडम, मी त्यांना मोठ्या हॉल मध्ये बसवलं आहे.”

“नको, माझ्या खालच्या स्टडी रूमला बसवं त्यांना.”

“हो मॅडम.”


“निरोप सांग मी आलेच म्हणून, मी हे जरा काही मेल संपवते आणि येते खाली. त्यांना काय हवं नको ते बघ.”

मधुने मानेने होकार दिला आणि तो पायऱ्या उतरून खाली आला, हॉल मध्ये गुमान मोबाईल चाळत बसल्या असणारया सानिकाला तो म्हणाला,

सानिका मॅडम, आपल्याला आमच्या मॅडमजीने त्याच्या हॉल जवळच्या स्टडी रूममध्ये बसायला सांगितलंय, चलताय ना?”

सानिकाने चष्म्याच्या वरून बघून काही वेळाने होकार दिला. आणि ती मधूच्या मागे स्टुडी रूम मध्ये जावून बसली. मधूने त्यांच्या साठी कॉफी आणली, सानिका हसली, “तुझ्या मॅडमजीला सांगितलंस ना. मी आलेय म्हणून.”

“हो मॅडम, त्या काही मेल लिहित आहेत. येतीलच इतक्यात.

रतीने आजचे सर्व मेल लिहून पाठवले होते, चष्मा काढून बाजूला ठेवला, दीर्घ श्वास घेतला. सानिकाच कार्ड हातात घेत तिने लॅपटॉप बंद केला पण आठवणी, सहज उघडल्या गेल्या.

त्या दिवशी ऑफिस संपायची वेळ झाली होती. सगळे त्यांच्या त्यांच्या सामानची आवरा आवर करत होते, रतीही तिची बॅग भरत होती. रती नेहमी उशिरा पर्यंत काम करायची तेवढाच तो तिला ओवर टाइम मिळायचा पण आज तिला रितेशला सरप्राईज द्यायचं होतं, त्याच्या ऑफिस मध्ये जावून.

रती आणि राजेशच लग्न होवून पाच वर्ष झाली होती. राजेश सिव्हील इंजीनिअर होता, खूप मोठी स्वप्न होती त्याची, नौकरी करून स्वतःला आठ तासात बंद करायचं नव्हतं त्याला. सध्या छोटे मोठे कॉन्ट्रॅक्ट घेत असायचा, कधी काम असायचं कधी नसायचं, नवीन टेंडरची वाट बघणं, ते भरणं आणि मग त्याचं सगळं सुरु व्ह्यायचं, पण अजुतरी हातात काही मोठं लागलं नव्हतं.

रती राजेशने प्रेमविवाह केला होता, मग दोघेही जे होतं त्यात खुश होते. राजेश नेहमी चिंतेत असायचा पण रतीची नौकरी उत्तम पगाराची होती, मग सांर कसं मजेत सुरु होतंच. राजेश खूप मेहनती होता पण त्याच्या मेहनतीला पाहिजे ते फळ त्याला मिळत नव्हतं. वडिलोपार्जित जे होतं ते सार काही त्याने त्याच ऑफिस सेट करतांना लावलं होतं आणि चांगल्या संधीच्या शोधात तो होता.

रतीचं खूप प्रेम होतं त्याच्यावर. निघतांना, राजेशला मुद्दाम तिने मेसेज टाकला,

“मला वेळ होईल.”

खरं तर तिला त्याच्या चेहऱ्यावरचा आनंद टिपायचा होता जो तिला लवकर बघून त्याच्या चेहऱ्यावर येणार होता, आणि मग नंतर सोबत बाहेर फिरून आवडत्या रेस्टोरेंट मध्ये जेवण करून घरी परत जाण्याचा तिचा प्लॅन मनात सुरु होता. मनात विचारांचे बंगले उभे झाले होते आणि तिला मॅनेजर ने बोलावलं हे सांगायला पिऊन आला, बॅग तिने तशीच ठेवली आणि धावत निघाली.

“सर, मला बोलावलं तुम्ही, मी निघतच होते आता. काही बोलायचं होतं का?”

मयूर, सिगारेट पीत होता, एक सिप जोरात ओढून तो तिला रोखून बघत म्हणाला,

अरे, ती मोहिते प्रोजेक्टची फाईलं अजून तयार नाही, उद्या मिटिंग आहे आपली त्यांच्या सोबत, आणि मला वाटतं तो प्रोजेक्ट तुम्ही लीड करावा.

रतीला काही सुचलं नाही, आधी तर ती दचकली, येवढा मोठा प्रोजेक्ट आणि सर तिला लीड करायला सांगत आहेत हे तिच्यासाठी खूप मोठं होतं, पण दुसऱ्या क्षणाला तिलाच वाटलं, माझ्या मेहनतीची कदर अजून काय!

ओढणी हाताने गुंडाळत ती म्हणाली, सर, खूप मोठी जवाबदारी आहे ही.”

मग, काय म्हणणं आहे तुमचं, म्हणजे सांगा तसं नाहीतर मी आपल्या सिनिअर पाटीलला सांगतो.”

नाही नाही, सर... मी करेन ना... तुम्ही गाईड कराल ना मला? म्हणजे मला तसा फारसा अनुभव नाही ना.”

“ऑफकोर्स, मी तर असेलच, यु नो, आपले बरेच प्रोजेक्ट आहेत, आणि मला एका उत्तम लीडरची गरज आहे, हे नवीन प्रोजेक्ट सांभाळायला.”

मयूर आणखीनच रतीच्या जवळ आला, जवळजवळ सिगारेट ओढून झाली होती त्याची, तिथेच समोर ठेवलेल्या अॅशट्रेमध्ये सिगार कूचकरली, आणि म्हणाला, “हे बघ...

सॉरी तुम्हाला तू म्हटल तर चालेल ना, म्हणजे हरकत नसेल तर...”

“हरकत नाही सर, मी लहान आहे तुमच्या पेक्षा...”

पुढचं काही मयूरने तिला बोलूच दिलं नाही, तिला बसायला लावलं आणि म्हणाला,

“मग करतेस ना उद्याच्या प्रेझेनटेशनची तयारी, माझी अशी इच्छा आहे कि उद्या तू प्रेझेंट करावं. तू करू शकतेस, माझा विश्वास आहे. यु नो, आय नो यु, तू खूप मेहनती आहेस, काहीतरी स्पार्क आहे तुझ्यात. आता ती करुणा आणि जयूपण उत्तम काम करतात पण तुझं काम अगदीच नीटनेटकं असतं. आय अप्रेशीयेट इट. टॅलेंटला  वावं देणं हेही आपल्या कंपनीच मोटीव्ह आहेच ना? माझा विश्वास आहे तुझ्यावर.”

रती हरबरयाच्या झाडावर चढली होती आणि खूप उत्साहात म्हणाली,

“सर, मी नक्की मेहनत करेल, मला हा चान्स हवाय. आय विल प्रूव्ह मायसेल्फ.”

“हेच हवंय, हा आत्मविश्वास हवाय मला, खात्री आहे तू करशीलच...मग प्रेझेनटेशन तयार करतेस ना...”

“हो हो तर...”

“मी कॅबीन मध्ये आहे. काही लागलं तर सांग, आणि हा, अजून तरी कुणाला सांगू नकोस, आपण उद्या सांगूया सर्वांना!

“ओके सर, नक्की!”

रती आनंदात तिच्या जागेवर आली, तिची सहकर्मचारी जयू तिला म्हणाली, “काय ग, काय म्हणत होता तो बोक्या.”

रतीने तोंडावर हात ठेवला, “ये जयू काहीही काय बोलतेस? कुणी ऐकेल ना तर वाट लागायची.”

“सहा वाजलेत, आता मी भीत नाही, ऑफिसची वेळ संपली आणि इथे सगळेच त्याला बोक्या म्हणतात, चायला, टूकुर टूकुर बघत असतो मुलींकडे, त्याला वाटतं कुणाला कळत नाही, पण नजर असते सर्वांची जेव्हा तो चोरून बघत असतो, बोक्या नाही तर काय! ते जावूदे, निघायचं ना.”

“अग, मला जरा काम आहे.”

“रती रोजच करतेस ग? किती करशील? तो बोक्या म्हणाला का तुला काही?”

“नाही, सर काहीतरी वेगळं बोलत होते. तू हो पुढे, मी निघते आठ पर्यंत.”

“रती, तू ना, आई झाली कि कळेल ग, घराची कशी ओढ लागून राहते ते, नजर घडीवर असते ग, चला तुझे दिवस आहे छाप नोटा, माझ्या मुलाला पाळणा घरातून घ्यावं लागतं मला. सात नंतर ती बाई डोळे वटारून बघते. निघते ग मी, काळजी घे, जास्त वेळ नको थांबू. आणि त्या बोक्या पासून सावध राहा ग. नवऱ्याला बोलावून घे ऑटो मिळत नाहीत नंतर.”

रतीने दोन तास थांबून उद्याच प्रेझेनटेशन पूर्ण करत होती. मयूर तिला त्याच्या कॅबीन मधून बघत सिगारेट वर सिगारेट ओढत होता. मनात गुरगुरत होता,

“ही ना खूप वेगळी आहे, जाळ्यात अडकवावं लागेल हिला. डाव टाकावा लागेल, स्वतः हून काही माझ्याकडे काम व्हावं म्हणून येणारं नाही. जरा स्वतःला प्रेझेंट करावं लागले मला, हरकत नाही, जरा तिच्या कला कलाने घेवूया, पण आइटम मस्त आहे यार... पटली ना की जमलं माझं... चला मयूर, लांडोर फसवायची आहे. मी मोर आहेच आणि हिला हेरलं तर हिची किंमत वाढेल माझ्या मुळे आणि मग.... ह्या बिनडोक लांडोरीवर माझी मर्जी चालेल...हा हा हा....”

आता आठ वाजले होते.  त्याने त्याचा लॅपटॉप बॅग मध्ये टाकला. एक सिगार परत पेटवली, रतीला कॅबिनच्या खिडकीतून ताकत त्याने ती संपवली. बॅग घेतली आणि कॅबिनच्या बाहेर गाडीची चाबी हातात घेत तो आला. रती अजूनही बसून काम करत होती. तिला न बघितल्या सारखं करत तो आधी पुढे गेला, रती मात्र त्याला बघून उभी झाली, तोच नजर त्याने मागे टाकली,

“अरे तू अजून आहेस होय, अग राहूदे, उद्या कर, मिटिंग ४ वाजता आहे. तुझ्या कडे वेळ आहे.”

सर, बसं झालंच आहे माझं, उद्या मग मी माझी तयारी करेन.

वॉव, ग्रेट! कॅन आय सी…

शुअर सर, सांगा काही करेक्शन असलं तर.“

मयूर ने शेजारची खुर्ची ओढली, आणि प्रेझेनटेशन बघत होता रतीही शेजारी उभी होती, म्हणाला,

“ग्रेट, तू पूर्ण पोईट मांडलेस. नो कॉमेंट. जरा हे सगळं प्रोपर एकदा अलायीन कर. म्हणजे कसं मटेरीअल उत्तम पण दिसायला हवं ना. आपण सुंदर असलो तरी मेकअप करतोच ना? मेकअप इट.”

“ओके सर, नक्कीच!”

“राहूदे, तू लॅपटॉप घरी घेवून जा, घरी कर, चल मी तुला सोडून देतो. मीही निघत आहे आता.”

तेवढ्यात मयूरच्या बायकोचा फोन आला, फोन बघताच मयूर म्हणाली, “चला आमच्या धर्मपत्नीचा बुलावा आला, निघायला हवं.” आणि त्याने फोन उचलला,

“हा सानी, हा काय निघालोच. बस अर्ध्या तासात पोहोचतो. तू घे ना जेवायचं डाइनिंगवर. मी आलोच. हो हो मी घेवून येतो तुझं आवडतं श्रीखंड.”

फोन ठेवला आणि त्याने रतीला इशारा केला सोबत निघण्याचा. रती जरा अवघडली होती. बॉस सोबत निघायचं म्हणजे तिला अवाक वाटत होतं. विषय टाळावा म्हणून म्हणाली,

मॅडम वर खूप प्रेम आहे ना तुमचं! वाट बघत आहेत त्या. तुम्ही निघा. मी निघते ऑटोने, तसही मला उलट दिशेन जावं लागतं.

“हो माझी अर्धांगिनी आहे ती, रोज वाट बघते माझी, मी घरी गेल्या शिवाय जेवत नाही ती, आज तिच्या आवडीच श्रीखंड घेवून जायचं आहे, असो, पण ठीक आहे, तुला सोडलय हे सांगेन ना मी तिला, समजून घेईल ती, खूप समजूतदार आहे माझी बायको. तू आवर लवकर.”

“मॅडमने पण इंटेरीअर कोर्स केलाय ना? त्याही आपलं ऑफिस जॉईन करू शकतात.” रती तिची बॅग आवरत म्हणाली.

“हुमम.... पण तिचं काही वेगळं सुरु असतं, आणि तिला नाही आवडत मी तिचा बॉस म्हणून... घरी ती माझी बॉस असते ना...”आणि तो जोरात हसायला लागला.

रतीही हसली. तिला असं हसत मयूर तिला म्हणाला, “अरे हसतांना किती फ्रेश दिसतेस तू, नाहीतर नेहमी कशी काळजीत दिसतेस, सर्व ठीक आहे ना तुझ्या घरी.”

रती लगेच म्हणाली, “हो सर सर्व ठीक आहे, आम्ही दोघेच आहोत, मजेत सुरु आहे सर्व.”

निघतांना तिची ओढणी अलगत खाली पडली, आणि ती मयुरच्या जुत्या खाली आली, ओढणी अडकल्याने रती ओढल्या गेली आणि तिचा तोल गेला, तोच मयूरने तिला त्याच्या बाहूत पकडलं, “अरे रती सांभाळ. ओढणी बघ तुझी, सॉरी.”

हो सर म्हणत मनात दचकत रतीने स्वतःला आवरलं. मयूरने सज्जन माणसासारखं तिला राजेशच्या ऑफिस समोर सोडलं, खूप काही अजून विचारलं नाही. हवी तेवढी चौकशी केली. आणि सरळ गाडी घराकडे वळवली.

रती राजेशच्या ऑफिस मध्ये आली, राजेश नेहमीप्रमाणे, कॉन्ट्रॅक्टसाठी टेंडर भरत होता. रती अली त्याला जाणवलही नाही. रती मागून येवून त्याच्या मिठीत शिरली, राजेश दचकला, “अग हो बाजूला, हा फोर्म भरू दे, बघ हा टेंडर मलाच मिळणार.”

“हुमम ...असंच हो... पण मी ही मिठी नाही सोडणार. मला तुला काही सांगायचं आहे”

“वेडी आहेस का? हो बाजूला. नंतर बोलू आपण.”

रतीचा सारा मूड गेला होता. ती एका कोपऱ्यात बसून फोन बघत बसली होती. काही वेळाने मयूरचा मेसेज आला, “घरी पोहचलो. गुड नाईट.”

रती विचार करत राहिली, मयूरला आज तिने नव्याने ओळखलं होतं, नाहीतर त्याची ती बोक्या म्हणून असलेली ओळख तिला माहित होती. मनात म्हणाली,

ऐकण्यात आणि बघण्यात खूप फरक असतो! ऑफिस मध्ये साऱ्या बायका सरांना काय काय नाही ते बोलत, पण सर नाहीत तसे, मी आज एकटी होते त्यांच्या सोबत पण एकही गोष्ट मला ते चुकीची बोलले नाही. जावूदे. मला कामाशी मतलब.”

रतीला मयूर आज आवडला होता.... बॉस म्हणून. आणि मयूरने त्याचा पहिला डाव फेकला होता. आता पुढे काय बघूया पुढल्या भागात.

कथा कशी वाटली नक्की कळवा! कथा कॉर्पोरेट विश्वाची घाणेरडी बाजू दाखत उलगडल्या जाणार आहे. दीर्घ कथा आहे, निदान १० भागांची, तेव्हां आपला प्रतिसाद अनमोल आहे. प्रत्येक भागाच्या अपडेटसाठी आजचं पेजला लाईक करा. आठवड्यातून दोन दीर्घ भाग प्रकाशित होतील, बुधवारी आणि शुक्रवारी तेव्हां [पेजला आवर्जून भेट द्या. प्रतिक्रिया नोंदवा आणि मनातल्या तळ्यात सहभागी व्हा!

नवीन कथा वाचण्यासाठी पेजला लाईक नक्की करा!

 https://www.facebook.com/manatlyatalyat


जोडीदार कथेचे भाग सर्व भाग इथे आहेत - कादंबरी कथा- जोडीदार... प्रवास तुझा माझा 

https://www.manatalyatalyat.com/search/label/%E0%A4%95%E0%A4%BE%E0%A4%A6%E0%A4%82%E0%A4%AC%E0%A4%B0%E0%A5%80%20%E0%A4%95%E0%A4%A5%E0%A4%BE?&max-results=8

पेजला लाईक करा 

कथेच्या प्रकाशनाचे सर्व अधिकार लेखिकेकडे राखीव 

फोटो साभार गुगल

©उर्मिला देवेन

Urmiladev@gmail.com

Post a Comment

0 Comments