एक प्रेम दिवाणी...

 



एक प्रेम दिवाणी...

चंद्रिकाला तिच्या नवऱ्यासाठी गिफ्ट घ्यायचं होतं. खूप प्रेम होतं तिचं चंदूवर. नवसाच नवरा म्हणायची ती त्याला. लग्नाला १५ वर्ष झाली होती तरीही प्रेम आजही कालच्या सारखं नवीन होतं त्याचं.

व्हॅलेंटाईन डे आलेला, चंद्रिका सुंदरश्या गिफ्टच्या शोधात मॉलमध्ये पोहोचली. दरवर्षी प्रमाणे तिला अगदीच चंदू गेसहि करू शकणार नाही असचं काहीसं हवं होतं. अचानक तिने गिफ्ट उचललं, तेव्हांच कुणीतरी दुसऱ्या बाईनेही दुसऱ्या बाजूने त्याला हात लावला, एकाच वेळी ते गिफ्ट दोन्हीकडून उचलल्या गेलं. दोघीही स्मित हसल्या. चंद्रिका लगेच बोलली,

“संध्या तू. अग संधू ना तू?”

साध्याने मात्र चंद्रिकाला ओळखलं होतं पण तरीही ती पलटणार होतीच पण चंद्रिका आवाज दिला आणि ती मागे वळून बघत गोड हसली.

चंद्रिकाला तिला एवढ्या वर्षा नंतर बघून काय आनंद झाला होता ती सांगूच शकत नव्हती, तिने चंद्रिकाचा हात धरला,

“संधू, किती वर्षाने भेटलोय ग, दोन दशक होतील ना? आहेस कुठे आणि इथे कशी?”

संध्या परत गोड हसली, “अग मी सहज आले होते इकडे, कामासाठी, मग हा मॉल दिसला, वेळ होता, शिरले.”

बोलतांना इशाऱ्यात चंद्रिकाने ते गिफ्ट मी घेते असा इशारा केला आणि सध्याने स्मित हसत होकार दिला.

“वर्षांनी भेटलोय आपण, चल इथे वरच्या माळ्यावर कॉफी शॉप आहे, चहाही मस्त मिळतो तिथे. बसू ना जरा वेळ.”

संध्या परत स्मित हसली, आणि तिच्या सोबत निघाली.

दोघींनी चहा आणि सामोसा ऑर्डर केला. चंद्रिकाने तिच्या बद्दल सर्व सांगितलं, चंद्रकांत म्हणजे तिच्या नवऱ्याबद्दल बोलतांना ती थांबत नव्हती, चंद्रकांतचं तिच्यावर असणारं अतोनात प्रेम व्यक्त करतांना तिच्याकडे जणू शब्द नव्हते.

“मी ना वेलांटाईन डेसाठी प्लान करते आहे. चंद्रकांतला माहितहि नाही, तो सारखा कामात असतो ग, आता बघ ना मुल मोठी झालीत, माझी मोठी मुलगी यंदा नवीत आहे आणि मुलगा सातवीत. त्यांचे ते करतात. मग काय आपण आपलं करायचं. तेवढाच आयुष्यात आनंद.”

चंद्रिका बोलत राहिली, सामोसा आला होता, तिने तो खायला घेतला. पण संध्या काही खात नव्हती.

चंद्रिका पुढे बोलत राहिली, तिने आतापर्यंत काय झालंय सगळं तिला सांगितलं, बारावीपर्यंत दोघीही सोबत शिकल्या होत्या, संध्या हुशार होती मग पुढे ति सायन्सपदवीसाठी शहरात निघून गेली होती, कधी कधी ती सुट्ट्यामध्ये ती यायची. चंद्रिका त्याचं गावात BA केलेलं. पदवी संपताच तिचं लग्न जुळलं. पण आज एवढ्या वर्षाने योगायोग तिच्या लक्षात आला, ज्या कॉलेजमध्ये सध्या BSC करत होती त्याचं कॉलेज मध्ये चंद्रकांत Mscला होता.

अलगत चंद्रिकाने बोलण्यात विचारलं, “काय ग तू चंद्रकांतला ओळखत होतीस काय ग?”

ती हसली, “ त्याने काय फरक पडणार आता, जावूदे.”

चंद्रिकाचा सामोसा खावून झाला होता पण संध्याने हातही लावला नव्हता, तिने वेटरला आवाज दिला,

“भय्या, प्लन सामोसा नही चाहिये, कढी मिलेगी क्या?”

“हा जी दीदी, क्यो नाही, आपने चायभी ऑर्डर कि थी तो मैने सोचा प्लन सामोसा दे दु, और यहा सब चाय के साथ प्लन सामोसाहि लेते है. मै आपकेलिय अभी ले आता हु!”

चंद्रिका लगेच बोलली, “हि सवय ना ह्यालाही आहे बघ... काय ना, त्यालाही असचं हवं असतं... कोरडा सामोसा त्याला गळयाच्या खाली जातच नाही म्हणे...”

“मलाही ग, सवय लागली आता... कुठे मोळणार... चाळीशी गाठली आता, आपण सवयीचे गुलाम आता.” बोलतांनाही तिच्या चेहऱ्यावर कमालीची शांतता आणि समाधान होतं.

चंद्रिका चहा पीत होती, आणि भाराभीर बघत होती. संध्या मात्र मस्त सामोसा आणि कढीचा आनंद घेत होती. चंद्रिकाने अलगत गिफ्ट घेतलेली रेसिट जपून ठेवली, बघत म्हणाली,

“ये संधू थंक्स ग, हे मला ठेवू दिल्या बद्दल. अरे मी किती वेळी ना, बोलतच बसले. तू सांग, कशी आहेस. नवरा मुलं काय ग करतात...”

संध्याने सामोस्याचा शेवटचा बाईट घेतला, ती कशी खाऊन तृप्त झाली होती. आठवणीत शिरल्या सारखी मुग्ध झाली होती. चंद्रिकाच्या प्रश्नाच उत्तर दिलंच नाही तिने. लागलीच तिने तिची ओढणी सावरली, आणि मोकळा गळा चंद्रिकाला दिसला, नंतर तिचं लक्ष तिच्या माथ्यावर पडलं, ना टिकली ना काही, नुसत्या कपाळवर रेष्या मात्र दिसल्या. चंद्रिका गप्पच झाली, आपण काहीतरी चुकीचा प्रश्न केलाय असचं तिला वाटलं,

तिच्या चेहऱ्यावरचे हावभाव बघत, संध्या जरा थंड चहा घेत होती, चाह्चे पूर्ण सिप घेवून झाले तिचे, कप बाजूला ठेवला,

“मला ना असा थंड चहा आवडतो, हळू हळू सिप गळयाखाली.... “

चंद्रिकाला चद्रकांतच चहा पिणं अलगत आठवलं. पण सध्याचा मोकळा गळा तिला बोचत होता.

संध्याने चंद्रिकाची मनाची घालमेल ओळखली,

“अग, मी लग्नच केलं नाही. आपला एकटा जीव आणि सदाशिव. बाबा वारले, आई मग भावासोबत अमेरिकेत राहायला गेली. गावात करमत नव्हत मग मी काका काकू सोबत राहत असायची, एकटे होते ग ते. तेही पाच वर्ष झाली वारले. गावातल्या बँकेत कारकून आहे, त्याचं गावात. राहते एकटी. भाऊ कधी कधी फोन करतो. भाचे बोलतात, समाधानी आहे.”

नंतर चंद्रिकाला काहीतरी आठवलं आणि ती म्हणाली,

“तू तर प्रेम विवाह करणार....”

“प्रेम केलेलं पण लग्न नाही करता आलं, पण माझं प्रेम सतत वाढत गेलं, प्रगती करत गेलं, आज मी अशी भक्कम उभी आहे ना ते त्या प्रेमाच्या जोरावरच... माझी मी मजेत आहे.”

“पण तरीही लग्नच केलं नाहीस..”

ती उठण्याच्या तयारीत गोड हसली,

“चंदू सारखा दुसरा नाही ना कुणी भेटला, निघते ग मी. वेळ खूप झालाय, तू काळजी घे, आणि खूप आनंद झाला मला तुला भेटून, तुझी प्रगती बघून मन कसं तृप्त झालं. नवरा बायकोमधलं असं प्रेम सहसा बघायला मिळत नाही.”

“नंबर देणा तुझा...” चंद्रिका फोन काढत म्हणाली.

तिने मनात फिरणारा एक नंबर पटकन टेबलवरच्या टिशू पेपर वर लिहून दिला, म्हणाली, “बंद आहे हा आता, बॅटरी नाही त्यात, आहे बॅग मध्ये पडून, घरी पोहचले कि चार्ज करते. तुचं कॉल कर, मी तर जरा वेंधळी आहे नंबर दिलास तरी कुठेही ठेवून देईल म्हणून नकोच देवूस.”

ती घाईत निघून गेली. चंद्रिकाने गिफ्ट पेकिंगला दिलेलं मग तीतिथेच बसली होती काही वेळ, उरलेला सामोसा संपवत होती. मनात विचार शिरत गेला काही दोन दशक मन मागे गेलं, पहिल्या दिवाळीत जेव्हा ती माहेरी आली होती तेव्हां तिच्या आईने संध्या बद्दल तिला सांगितल होतं.

संध्याच घरचं कुणीच लग्नाला आलेलं नव्हतं. माहित झालं होतं कि तिच्या कॉलेजच्या एका मुलावर तिचं प्रेम होतं, पण त्याच्या घरच्यांनी तिला नाकारलं. घरच्यांच्या दाबावाखाली येवून त्या मुलाने दुसऱ्या मुलीशी लग्न केलं होतं. संध्याची मनस्थिती बघून तिचे वडील हृदय विकारच्या झटक्याने वारले. संध्यामुळे घरच्यांची बदनामी झाली होती मग त्यांनी गाव सोडलं.

चंद्रिका विचारात उठली, बिल देण्यासाठी ती काऊंटर वर आली, तर माहित झालं, संध्याने तिचं बिल दिलं होतं. तिने गिफ्ट घेतलं. बाजूला उभी राहून, चंद्रिका दिलेला नंबर सेव करू लागली, नंबर आधीच तिच्या फोन मध्ये होता, चंद्रकांतच्या नावाने, त्याचा अगदीच जुना आणि पहिला नंबर होता तो. कधीचा बंद झालेला. पण आजही मोबाईलचा डेटा ट्रान्सफर करतांना प्रत्येक वेळी नवीन मोबाईलमध्ये जसाचा तसा येणारा. आणि आठवण म्हणून जपून ठेवण्यासाठी तसाच असणारा.

क्षणभरात चंद्रिका गोंधळली, काहीही मिळालं नाही नंबर लिहिण्या साठी टिशू पेपरचा वापर चंद्रकात कही वर्षापासून करतो हे तिला पटकन आठवलं, सांर काही स्पष्ट होतं गेलं, अचानक तिच्या लक्षात आलं, साध्याने तिच्या बोलण्यात चंदू नाव घेतलं होतं, जेव्हा कि चंद्रिकाने तिच्याशी बोलतांना एकदाही त्याच्या ह्या नावाचा उल्लेख केला नव्हता. चंद्रकांतने तिच्याशी लग्न केलं नव्हतं आणि ती आजही तशीच होती. काय करावं तिला सुचेना झालं होतं पण बोलयचं काय, चंद्रकांतने तिच्या प्रेमाला मनातून स्वीकारलं होतं. खूप प्रेम करायचा तो तिच्यावर हेही ती नाकारू शकत नव्हती मग संध्याच्या प्रेमाला का तो दर्जा दिला नाही त्याने.... कदाचित दिला असता तर आज संध्या खूप खुश असती.... काय अंतर होतं तिच्या प्रेमात... विचाराने हादरली होती.

मॉलची लिफ्ट सोडून ती पायऱ्या उतरत होतीच तर समोरच्या पानवाल्या कडून गाणं कानावर पडलं

एक राधा एक मीरा,
दोनों ने श्याम को चाहा,
अंतर क्या दोनों की चाह में बोलो,
एक प्रेम दीवानी एक दरस दीवानी ।

डोळे डबडबले होते, संध्याला सारं काही माहित होतं तरीही ती प्रेम दिवाणी शांत होती. तिला वाटलं असतं तर ती तिचा संसार मोडू शकली असती परंतु... प्रेम बसं प्रेम केलं होतं तिने, संध्याला मनातून नमन करून ती घरी आली. चंद्रकांतला कामात बघून परत तिला संध्या आठवली.... मनात म्हणाली, “ह्या जन्मांत चंद्रिका चंद्रकांतची आहे... ह्याचं चंद्राच्या प्रकाशात हि चंद्रिका मानाने लुकलुकत आहे पण ह्या नभात संध्या असल्याशिवाय आम्हाला काहीच किंमत नाही.... तुझं प्रेम अनमोल आहे संध्या... तू प्रेम दिवाणी आहेस.... ह्या वेलांटाईनला मला खर प्रेम अनुभवायला मिळालं बसं अजून काय.... हप्पी व्हॅलेंटाईन संधू....”

तिने अलगत जावून चंद्रकांतला मिठी मारली, तो तसाच थंड चहा पीत काम करत होता. ती त्याला बघत राहिली.

 

प्रिय वाचक कथा कशी वाटली नक्की कळवा. आपली प्रतिक्रिया माझ्यासाठी अनमोल आहे.

हप्पी व्हॅलेंटाईन डे!!!


©️उर्मिला देवेन

urmiladev@gmail.com

धन्यवाद! 🙏🙏

फोटो साभार गुगल

-------------------------

सदर लेखाच्या प्रकाशनाचे व वितरणाचे सर्व अधिकार लेखिकेकडे राखीव.

धन्यवाद!!

Post a Comment

1 Comments

  1. नेहमप्रमाणेच अप्रतिम

    ReplyDelete
Emoji
(y)
:)
:(
hihi
:-)
:D
=D
:-d
;(
;-(
@-)
:P
:o
:>)
(o)
:p
(p)
:-s
(m)
8-)
:-t
:-b
b-(
:-#
=p~
x-)
(k)