आवंढा...

 

आशिष येण्याची वेळ झाली होती, अरुणाने चहा ठेवला आणि ती जरा बैठक आवरत होती, जरा गरगरलं, तिने लक्ष दिलं नाही. आता ती झाडू हातात धरायला गेली पण तिला झाडू दोन-दोन दिसायला लागले. डोळ्यासमोर बोंगाडे कोळी नाचत होते तरही सवयीप्रमाणे लक्ष न देता डोळे चोळत तिने झाडू पकडला. आता मात्र जास्तचं गरगरलं. तिथेच डायनींगची खुर्ची ओढून ती बसली. पोटात कळ यायला लागली. पायात तीव्र वेदना होवू लागल्या. क्षणात डोकं दुखायला लागलं. अरुणाला आता कळालं,

 “अग बाई, ही आली आता.” म्हणत ती दुखणार अंग घेऊन गुमान खुर्चीवर बसली होती. दुखण्याने कनहत तिला नवरात्र आठवली.

घरी घट बसले होते आणि अरुणाची मनातच घालमेल सुरु होती, तिने दिवसं बोटावर मोजली आणि आधी फार्मसी गाठली होती, औषध घेतली मग जरा बिनधास्त होती. तिने नवरात्राचा गरबा आणि सर्वच मनमुराद करत मज्जा केली होती. घरात काम आणि सारच कसं तिच्या वावरण्याने लखलखीत झालं होतं. त्या सुंदर वातावरणात पलंगावर सतत पडून असणारे तिचे सासरे रमले होते. 

म्हणालेही होते, “सुनबाई तुझ्यामुळे आज परत ते दिवस जगलो मी, ही गेली आणि वाटलं होतं अशी नवरात्र आता कधीच नसणारं पण नाही तू प्रथा आणि परंपरा अगदीच थाटात आणि मनातून पार पडल्या. ती जातांना तुला सारं शिकवून गेली."

बोलतांना डोळ्यात अश्रू होते त्यांच्या, अरुणाच्या डोक्यावर हात ठेवून परत म्हणाले होते, “अरुणा, काळजी घेत जा ग स्वतःची, तू आहेस म्हणून या घराला शोभा आहे... तुम्ही बाया स्वतःला झोकून देता आणि मग सवय लागते ग आम्हा पुरुषांना... नाही ना काळजी घेत आम्ही तुमची, फसवता ग तुम्ही स्वतःला आणि आम्हांलाही.  मी नाही घेतली ग माझ्या गायत्रीची काळजी आणि बघ ना मला सोडून निघून गेली ती... ती अधून मधून कुरकुरत होती आणि मी तिला सगळं सुरळीत करतांना बघून लक्ष द्यायचो नाही. मला जरा जरी त्रास झाला की माझी क्षणाक्षणाला काळजी घेणारी ती पण मी तिची काळजीच घेवू शकलो नाही. अजूनही सावरलो नाही मी... माफच करू शकत नाही मी स्वतःला... तू... तू काळजी घे बरं का!"

सासऱ्यांचे शब्द आता अरुणाच्या कानात घुमत होते. तिला चुकल्यासारखं झालं, स्वतःला आवरत ती मनातच म्हणाली, “इथेच चुकतो आम्ही बाया. बाबा बरोबर म्हणतात, सर्वाना आनंद देण्याच्या नादात आम्ही सुटतो आणि मग हे असं दुखणं घेवून बसतो ज्याची कुणाला कदर नसते. हम्म्म... कारणीभूतही काहीशा आम्हीच, जरा काही दुखत असलं तरी काम करत राहतो, 

क्षणात दुखते म्हणून कुरकुर करतो तर क्षणात दुसऱ्यांच्या सुखासाठी दुखणं बाजूला करून कामाला लागतो. समोरचाही फसतो मग. आणि मग आमच्या कुरकुरीवरही कुणी लक्ष देत नाही. कदाचित त्याच कुरकुरीच शरीरात मोठं काही घडतं आणि मग सासूबाई सारखं मनात नसतांनाही जग सोडून जावं लागतं, आपल्यासोबत सर्वांना फसवतोच ना?”

विचारत डोकं अजूनच दुखायला लागला. आता परत तिला खूप त्रास होत होता, कंबर आणि पाय जसे शरीरातली सर्व शक्ती ओढत होते. उठून स्वतःसाठी ती पाणीही घेऊ शकत नव्हती. नकळत घड्याळावर लक्ष गेलं सहा वाजले होते. मुलं बाहेर खेळत होती आणि सासरे त्यांना बघत दारात खुर्ची टाकून बसले होते. 

परत तेच घडलं, मनात असूनही तिने कुणालाच आवाज दिला नाही. त्यांना असं बघून सुखावली आणि तशीच गुमान बसली सहन करत. आशिष घरी पोहचला, तिला असं बघून म्हणाला, “काय झालं? का चेहरा पडला आहे? सकाळी तर बरी दिसत होती, बघ जरा स्वतःकडे, नीटही राहत नाहीस तू! काय बघत आहेस बाहेर, आलोय मी.”

“अहो जरा पाणी देता का? मला ना...”

‘मी आत्ताच आलोय, घे तू ... आणि स्वतःकडे बघ जरा, काम करत जा... बाकीच्या बाया बघ कशा तरतरीत असतात...बघावं तेव्हा प्रसन्न वाटतात आणि तू ... घरी आलं की प्रसन्न वाटायला हवं.”

“अहो ऐका ना...मला जरा ... “

आशिषने तिचं ऐकलंही नाही आणि रागात बॅग सोफ्यावर फेकली, सॉक्स त्याने काढून खाली टाकले आणि खोलीत कपडे बदलायला निघून गेला.

अरुणाला आशिषच वागणं जरा बोचलं होतं पण सवय, त्याच काही ऑफिसमध्ये बिनसलं असणार म्हणून हा आज असा, हा विचार करत तिने त्याच बोलणं मनातून काढून टाकलं. अरुणाला दाटून आलं होतं, कसं बसं  करत ती उठली होती तर बाहेरून मुलगा येऊन तिच्या कुशीत शिरला आणि तिने आवंढा गिळला. मागेच सासरेही आत आले. म्हणाले, “चहा टाकला का ग अरुणा, घेतेस का ग?”

अरुणा कणवत म्हणाली, “हो, गरम करते आणि घेते,” म्हणतच तिला अजून कळ आली, कंबरेला झटका पडल्या सारखं झालं आणि अंधारी आली तिला. सोफ्यावर बसलेले सासरे हे सगळं बघत होते. अरुणा स्वतःला सावरत हळूच उठली आणि खोलीकडे निघाली. खोलीत ती काही पेनकिलर शोधत होती. पलंगावर बसलेल्या आशिषने तिला बघून परत मान मोबाईलमध्ये घुसवली आणि लक्षही दिलं नाही. 

आता मात्र अरुणाच्या आतमध्ये मंजुलिका शिरली, गळ्यात आधीच दाटलेला आवंढा तिने दुखत असूनही गिळला आणि एकदम वचका धरल्यासारखी ती ओरडली, “ये माणसा, काही माणुसकी आहे का तुझ्यात? इथे मला त्रास होतोय आणि तुझे नाटकं सूर आहे. कळत नाही का तुला? आई आणि बहीण होती ना तुला की असाच आहेस बिना नात्याचा, कळत नाही, एवढा वाढलास, शिकला नाही का? निदान या दिवसात तरी मला माणूस म्हणून वागणूक दे.” 

अरुणा काय बोलत होती हे तिला कळत नव्हत, जराश्या सहानुभूतीच्या शब्दांसाठी आसुसलेली आवंढा गिळून अजूनच रागीट झाली होती. अगदीच बदललेला अरुणाचा अवतार बघून काहीसा घाबरलेला आशिष उभा झाला. क्षणात प्रकार त्याच्या लक्षात आल. समोरच्या ड्रॉवर मध्ये तो पेनकिलर शोधू लागला.

अरुणाच्या आवाजाने सासरे खोलीच्या दारात आले, त्यांना समोर बघताच अरुणा शांत झाली, “बाबा मला माफ करा, मी... मी काय बोलले मलाही कळाल नाही हो... असं काही बोलायचं नव्हतं मला.” तिला काहीही न बोलता त्यांनी तिच्या हातात गरम पाण्याची पिशवी दिली, “अरुणा, तुला आधीही बोललो मी काळजी घेत जा, मला कळालय ग, हे असं होतं या दिवसात, बऱ झालं ओरडलीस याला. काही म्हणणार नाही मी. माझ्या हिला किती त्रास झाला शेवटी, मी काहीच करू शकलो नाही, तू या घरचा आत्मा आहेस. तू आहेस म्हणून या घरची माणसं हा एवढा माज दाखवतात.”

मग त्यांनी एक कटाक्ष आशिषवर टाकला, “आशिष, चूक तुझी नाही रे, चूक माझी आहे, माझ्याकडून शिकलास ना हे सारं तू, पण आता मला ती चूक सुधारायची आहे, बायकोला नाही जपू शकलो पण शरीरात ताकद असेपर्यंत सुनेला नक्की जपेल निदान तिच्या या दिवसात तरी, माझं किती करते ती मग थोडफार तिचं करायला माझा मान काही कमी होणार नाही... तू नाही शिकलास निदान माझे नातू हे नक्की शिकतील.

आता मात्र अरुणाला आवंढा गिळता आला नाही .....तो फुटला आणि.... ढसाढसा वाहू लागला.

“कर मोकळा तो आवंढा, कशाला गिळायचा....त्रास होतो त्याचा. शांत हो तू.“ बाबा तिला शांत करत म्हणाले.

बाबांचं असं म्हणन ऐकून आशिषला आई आठवली, तिचा त्या दिवसातला त्रास डोळ्यासमोर आला. आणि नकळत दाटलेला आवंढा त्याने आज अरुणासाठी गिळला. तिला खोलीत बसवून त्याने तिच्यासाठी चहा गरम करून आणून दिला, बाबांनी दिला आणि आज वडिलांसोबत स्वयंपाकाचा बेत करत गप्पा केल्या.

आज बऱ्याच दिवसांनी अरुणा तिच्या खोलीत महावारीच्या दिवसात आराम करत होती. क्षणाक्षणाला तिला भरून येत होतं आणि आवंढा दाटून तिने तो गिळला नव्हता....

©️उर्मिला देवेन

urmiladev@gmail.com


कथा कशी वाटली ते नक्की कळवा, कथा आवडल्यास माझ्या पेजला लाईक करायला विसरू नका. मानल्या तळ्यात पेज





Post a Comment

0 Comments