#भिंगरी_“द_रिव्हेंज”_(भाग १)




जयंतला जावून आज वर्ष झालं होतं होती. जयाने घरच्या दरवाज्यावर टांगलेले त्याचा फोटो काढला आणि त्याला कापडाने पुसत होती, डोळ्यात अश्रू दाटले होते, "काहून असं केलं तुमी, आणं कराच होतं त आमालेबी सांगत्या न, चारही जीव जावून पडलो असतो त्या विहिरीत, आपल्या चौघालेही चांग्ल्यान डूबवलं असतं पाण्यात, विहीर माय न." आणि ती हंबरडा फोडून रडू लागली.


सहा वर्षाचा अरुण मायले बघून कसा सा होत होता. जवळच त्याची तीन वर्षाची लहान बहिण भावना आईकड टुकू टुकू बघत पोळी साखरेच्या पाण्यासोबत खात होती. 

मायले पाहून तिच्यापण डोळ्यातून अश्रू पडत होते. आजच्या दिवशी तरी पोरांनी पोटभर जेवावं म्हणून आईने घरी सकाळीच पोळी केली होती. लेकरांना पोळी रोज मिळत नाही म्हणून गेणेशने न पाहाल्या गेल्यामुळे आणि दीर्घ काळापासून आजाराने त्रस्त मनस्थितीत आत्महत्या केलेली हेच नमूद होतं पंचनाम्यात.

जयाने सुद्धा ते खरं मानलं होतं. तिला कुठे काय माहित होतं की नेमकं काय घडलं होतं ते, आणि जाणून तरी काय करणार होती ती, तिचं कुणी ऐकणार नव्हतंच ना! गावातल्या पंचायती पासून तर पोलीस ठाण्या पर्यंत गुण्या भाईचे माणस होते. गुण्या भाई गावात त्याच्या फोर्म हाउसवर मुली घेवून मज्जा करायला आला असला की जयंतच काम लागायचं, त्याच्या फोर्म हाउसवर ताजी भाजी, गावारणी कोंबडी नेवून देण्याचं. पैसे जास्त पडायचे आणि गुण्या भाईचा विश्वास होता त्याच्यावर मग त्यालाच सांगावा येत असे.  

दिवस संपला आईच्या कोलाहलात आणि नवीन पहाट झाली. सकाळी काळ्या चहा सोबत आईन उरलेली पोळी दोन्ही पोरांना वाटून दिली आणि म्हणाली, "अरुण्या, शाळेला जाजो बरोबर, दुपारच्याले खिचडी आणून देजो लायनीले, नाहीतर दिवसभर उपाशीच रायल ती, बाईची अंघोळ घालून देजो आणि मगच जाय शाळेले, आज मले यायले वेळ होयल, पल्याडच्या गावात मिरच्या तोडले चाललो म्या. लय दिवसानं काम भेटलं. "

अरुण आईला लाडात म्हणाला, "आय, पैसे येयल त मले एक शर्ट घेवून देजो, हिवाळा येयेल आता, लायन्या बाईने घातला क माह्यासाठी काय बिन राहत नाय वं"

"अरे अरुण्या तुले शाळेतून भेटणार होता ना ह्या वेळले..काय रे झालं त्याचंवालं"

"माहित नाय आय ..मास्तर म्हणत्या मालच आला नाय म्हणून, अन BPL च कार्ड मागत्यात ते."

आईने डोक्याला हात लावला, "अरे देवा! मी तर विसरलोच होतो, कारड तयार करायला दिलं होतं म्या, तो बाबू बी ५० रुपये मागून राहिला ना...कोठून अनु रे अरुण्या. काल बापूचा दिवस होता त समान आणलं न रे आपुन.. मिरची तोडून पैसे आले का जातो म्या..तू सांग तुह्या गुरुजीले, देतो म्हणून."

मग तिने अरुणला कुशीत घेत म्हटल, "बाळ्या, आज बिन हिले तशीच राहू दे घरात, चड्डीवर, रायल ते... तू तुया शर्ट घालूनच जाय, मी वापसिले एखाद सस्ता झबला आणतो हिच्यासाठी. तू तिले लाडी गोडी लावून घालून देजो एखाद जून पोलकं, तुये आयकते ते. माय वालं ऐकत नाही हे पोरगी..ये भावना ते भिंगरी सोड ना वं पोरी."

मग तिने भावनाला कडेवर घेतलं, "काय वं भावना घालसील न? मग म्या नवीन डरेस आणल. माह्या लाडाच्या लेकीसाठी.काय बाई येवढी गोरी पान पोरं जन्माले आली बाई माह्या घरी पण कशी रायते. क्या वं भवाने एखाद मोठ्या घरी जन्मली असती तर राजकुमारी सारखी रायली असती वं तू."

आणि जया डोळ्या निणारी जमलेले अश्रू पदराने पुसे लागली, पोरीला कडेवरून खाली ठेवलं, चुलीजवळ ठेवलेल्या पाण्याच्या बाटलीला टोकर लावत परत अरुणला म्हणाली, "चालली म्या.. खिचडी आणजो आठवनीन तुह्या बाईसाठी."

बाहेरून ट्रकचा होर्न ऐकायला आला तशी ती निघाली, ठेकेदार गावातल्या बाया जमा करून मिरची तोडण्यासाठी नेत होता. ट्रकचा वेळ चुकला असता तर तिला गावाबाहेर पायदल जाणं अवघड झालं असतं.

जया घरातून सकाळी सहालाच निघून गेली होती. घरात दोन भावंडच होती, समोरच्या छपरीत सकाळची ऊन येत होती दोघेही भांवंड खेळत होते. जेमतेम ८ वाजले असतील आणि भावना भावाच्या मागे लागली, "दादा, खिचडी कवा आणशील? माले भूक लागली ना."

अरुणने माठातलं थंड पाणी काढलं, त्यात मीठ आणि साखर टाकली, अंगणात असलेल्या निंबूच्या झाडावरून निंबू आणलं. बहिणीला नीबूपाणी वाल्यावाणी निंबूपाणी ह्या ग्लासातलं त्या ग्लासात ओतून तिची मज्जा घेत तिच्या समोर करून दिलं. तिने ते गटागटा प्यालं. नंतर तिची अंघोळ घालून दिली. तिला घरची भांडी काढून खेळायला दिली, आणि शाळेची तयारी करत म्हणाला

"मी हा गेलो आणि खिचडी घेवून आलो, तू चाय बनव माह्यासाठी तुया खेळण्यातला." आणि मग त्याने त्याचा झोरा उचलला, खिचडीचा डब्बा झोरयात भरला.भावनाचा पापा घेतला, तिला लाडाने गोंजारलं. तिचा प्यांट बरोबर केला आणि मोडक्या तोडक्या ओसरीच दार समोरून लावून देत तिला हाताने इशारे करत निघून गेला.

शाळा अगदीच पाच मीनटावर होती मग अरुणच लक्ष राहत होत घराच्या फाटकावर.

शाळा सुरु झाली आणि अरुण खिचडीच्या वासावर पोट भरत दुपारच्या जेवणाची वाट बघत होता. घंटी वाजली, तडक उठून खिचडीच्या लाईन मध्ये लागला, गरम गरम खिचडी मिळाली होती डब्यात, ती घेतली पटकन झोरयातल्या डब्यात नेवून टाकली आणि परत लाईन मध्ये डब्बा घेवून लागला, तेव्हड्यात त्याला कुणीतरी हटकलं, "ये तू आताच घेतली ना, झाली खाऊन?"

त्याने काहीच म्हटलं नाही, गुमान परत दुसरा डब्बा समोर केला, पहिल्यांदा दिली होती म्हणून त्याला डब्बा भर दिलीच नाही बाईने. जेवढी दिली होती तेवढी सर्वांसोबत खाल्ली पण त्याच पूर्ण लक्ष घराच्या फाटकावर होतं. त्या फाटकातून त्याला भावना उभी दिसत होती. जसा जरा रडण्याचा आवाज आला, तसा तो बाई मी घरून येतो म्हणत पळाला. भावना घराच्या बाहेरच्या फाटकाला टेकून होती, अरुण येताच बिलगली, "दादा भूक लागली, खिचडी देनं...खिचडे दे माले..भूक लागली..."

अरुणने झोरयातून डब्बा गंमत करत जसा काढला तिचा चेहरा फुलून गेला,  परत बिलगली भावाला. दोघेही बसले अंगणात. अरुणने पहिला घास तिला भरवला. ती खाण्यात गुंग झाली. नंतर तिने बनवलेला खेळण्यातला चहा त्याने पिला,  मस्त झालाय असं सांगून परत फाटक बंद करून निघून गेला. शाळेचा मुख्याधापक नवीन होता आणि त्याला तो शाळेच्या गेटातून दुपारी आत येतांना दिसला, गुरुजीला शिस्त लावायची होती मग त्यांनी अरुणला थांबवलं आणि एवढ्या वाजता शाळेत फक्त खिचडी खाण्यासाठी यतो म्हणून रागवत, बाहेर कोंबडा व्हायला सांगितलं. अरुण चार वाजेपर्यंत तसाच उभा होता आणि भावना त्याला फाटकाच्या फटीतून बघत होती. तोच नेहमीप्रमाणे गुण्या भाईच्या गाड्या शाळेसामोरून जोरात गेल्या. येवढ्या मोठाल्या गाड्या गावात वर्षातून दोन तीनवेळाच येत असतं. ज्यात बंदूकधारी माणस असायची. आणि ज्या गाड्यांना बघताच लोकं दारं लावून घरात बसायची. गाड्या दिसताच शाळेच्या मास्तराने अरुणला वर्गात घेतलं आणि मग काही वेळात सर्व शांत झाल्यावर शाळा सुटली.

सुट्टी झाली आणि तो घरी आला, सानू त्याला बिलगली, नंतर त्याने स्वतः चा शर्ट काढला आणि तिला घालून दिला, सानुने खेळण्यातला चहा आणि भावासाठी ठेवलेली खिचडी त्याला दिली. दोघांनीही उरलेली खिचडी सोबत खाल्ली आणि मग अरुण भवनाला भिंगरी घुमवून दाखवाचा  आणि ती आनंदाने उड्या मारायची. बहिणीला आनंदी बघून अरुण नवीन नवीन प्रकारे भिंगरी फेकायचा. कधी हातावर कधी ताटावर... अरुण पहिलीत होता आणि सतत गाणं म्हणत असायचा, “एक होती भिंगरी, तिचं नावं झिंगरी....एक होती भिंगरी ....”त्याला साथ देत भावनाही तोत्ड्या बोलात ते गाणं म्हणत असायची. दोघेही गाणं म्हणत भिंगरी खेळत मायची वाट बघत होते.

जयाने फाटक झोरात उघडलं, दोघही तिला बिलगली. तीही तेवढ्याच ताकतीने मुलांना बिलगली होती. बिलगताच मनाला शांती भेटवी अशी ती काही क्षणासाठी शांत झाली होती. बिलगल्या मुळे तिच्या गळ्यातली काळ्या मण्याची माळ तुटून ऐक ऐक मणी खाली पडत होता. जयाचा अवतार काहीसा बदलेला होता, डोळे लाल होते, केसं विस्कटलेली होती, ब्लाउज फाटलेलं...ओठ कोरडे पडले होते. धावत आल्याने धापा टाकत होती. अंगावर वरपांडे पडले होते. शरीर कापत होतं, अश्रू अटकले होते, मन हुंदके देत होतं. गळ्यात आवंढा दाटला होता.

पुढचा भाग इथे वाचा. 

कथेच्या अपडेट साठी तुम्ही माझ्या पेजलाही लाईक करू शकता. https://www.facebook.com/manatlyatalyat

फोटो साभार गुगल

©उर्मिला देवेन

urmiladev@gmail.com

तुम्ही देत असलेल्या प्रतिसादाबद्दल खूप धन्यवाद!!!



Post a Comment

0 Comments